उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग दोन )
आपल्याला जे आर डीं चं जीवन समजून घेण्यापूर्वी जमशेटजींनी आपले साम्राज्य उभं करण्यासाठी जे परिश्रम घेतले आणि विविध उद्योग सुरु केले ते समजून घेतले तर जे आर डीं ना समजून घेणे सोपं जाईल. म्हणून या पहिल्या एकदोन भागात आपण टाटा उद्योगसमूह कसा प्रगत होत गेला ते जाणून घेऊ या. आधीच्या भागात आपण पाहिले की कापडाच्या व्यापारासाठी जमशेटजी मुंबईत आले. भारतातच कापडनिर्मिती करण्यासाठी त्यांनी मँचेस्टरहून यंत्रसामुग्री मागवली. १८७४ च्या सुमारास नागपूरमध्ये एम्प्रेस मिल सुरु झाली. जमशेटजी हे केवळ उद्योजक नव्हते तर भारताच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांची दृष्टी व्यापक आणि भविष्याचा वेध घेणारी होती. त्यांच्या डोळ्यापुढे तीन स्वप्नवत प्रकल्प होते, ज्या स्वप्नांना त्यांना आकार द्यायचा होता आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. स्वप्नं तर प्रत्येक व्यक्ती पाहत असते. झोपेतील स्वप्ने झोप संपल्यानंतर बहुधा आपल्याला आठवत नाहीत. पण जी व्यक्ती जागेपणी काहीतरी भव्यदिव्य कार्य करण्याची स्वप्नं पाहते, अशा व्यक्तीला ती स्वप्नं झोपू देत नाहीत. जमशेटजींची स्वप्नं हीअशा प्रकारची होती.
आपल्या देशबांधवांचे जीवन सुधारावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कधी कधी भारतातल्या गरीब लोकांच्या अवस्थेबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहत असे. भारताची प्रगती व्हायची असेल तर भारतीय तरुणांना उद्योग व तंत्रशिक्षण यात पारंगत केले पाहिजे हे त्यांनी जाणले. त्यासाठीच त्यांना भारतात बौद्धिक संपदेचा विकास करण्यासाठी विश्व विद्यापीठ स्थापन करायचे होते. असे विद्यापीठ की जेथून तरुण पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतील. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे शिक्षण घेऊन ते स्वतंत्र संशोधन करून भारताच्या विकासात सहभागी होतील. पण भारताचा केवळ बौद्धिक विकास होऊन भागणार नाही. भौतिक विकास आणि सुविधा देखील निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना पोलाद निर्मिती प्रकल्प आणि जलविद्युत निर्मिती करायची होती.
अशा माणसांची दृष्टी कशी काळाच्या पलीकडे पाहणारी असते ते पहा. त्यावेळी मुंबईला नुकत्याच कापडगिरण्या सुरु झालेल्या होत्या. पण त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका आणि त्यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी याचे चित्र त्यांना अस्वस्थ करीत होते. कापडगिरण्यांमध्ये इंधन म्हणून दगडी कोळशाचा वापर होत होता. गिरण्यांची धुराडी धुराच्या काळ्या रेषा वातावरणात ओढून वातावरण प्रदूषित करत होती. त्यामुळे जमशेटजींना विजेवर चालणाऱ्या गिरण्या किंवा उद्योग सुरु करायची इच्छा होती. वीज तेव्हा आजच्या इतकी दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेली नव्हती. तिच्या वापराची नुकतीच सुरुवात झालेली होती.
त्या काळात आपल्या देशात ब्रिटिशांचे राज्य होते. जमशेटजींच्या मनात असलेले हे तीन प्रकल्प साकार होण्यासाठी सरकारचे साहाय्य आवश्यक होते. पण ब्रिटिशांनी त्यांना सहकार्य करण्याचे नाकारले. पण स्वस्थ बसतील ते जमशेटजी कसले ? त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंबर कसली होती. भारतात विज्ञान, कला आणि उद्योग यांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या डोक्यात जी विश्वविद्यालयाची संकल्पना होती, तिला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे नुसता पाठपुरावाच केला होता असे नाही तर आतापर्यंत टाटांनी कमावलेल्या संपत्तीतून एक तृतीयांश मालमत्ता त्यासाठी देण्याचे ठरवले होते. असा विचार करणारा आणि त्यासाठी एवढा त्याग करणारा उद्योगपती विरळाच...!
हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारशी खूप संघर्ष आणि पाठपुरावा करावा लागला. लॉर्ड कर्झन तेव्हा भारताचा व्हॉइसराय होता. त्याने वैयक्तिक आकसापोटी टाटांना या गोष्टीसाठी खूप पाठपुरावा करायला लावला. पण शेवटी बंगलोर येथे प्रचंड जिद्द आणि त्याग आणि सततचा पाठपुरावा यातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. या संस्थेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि होणारे संशोधन उच्च दर्जाचे होते. पुढे याच संस्थेच्या तोडीची दुसरी एक शैक्षणिक संस्था टाटांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. तिचे नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ( टी आय एफ आर ). या दोन्ही संस्थांनी भारताला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मोलाचा हातभार लावून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डॉ होमी भाभा, डॉ विक्रम साराभाई यांच्यासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी आपले संशोधनकार्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्येच केले.
जमशेटजींनी जलविद्युतनिर्मितीसाठी डोंगरमाथ्यावर कृत्रिम सरोवराची निर्मिती केली. तेथील पाणी खाली आणण्यासाठी पाईपद्वारे कृत्रिम धबधबे तयार केले. यातून विद्युतनिर्मिती होऊ लागली. पोलादनिर्मितीसाठी त्यांनी खाणींचा आणि खनिज संपत्ती असलेल्या जमिनीचा शोध परदेशी तंत्रज्ञांना भारतात आणून घेतला. लवकरच या प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा झाली. हे सगळे करण्यासाठी जमशेटजींची अविश्रांत धडपड होती. ज्यांना यासंबंधी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी ' जमशेटजी टाटा यांचे भारतप्रेम ' हे आर एम लाला यांनी लिहिलेले पुस्तक अवश्य वाचावे. पुढे या सर्व कंपन्या जमशेटजींनी ' टाटा अँड सन्स ' मध्ये विलीन केल्या. जमशेटजींना दोराब आणि रतन अशी दोन मुले होती. याच सुमारास जमशेटजींच्या पत्नीच्या भावाचा दत्तक मुलगा रतन ( रतन दादाभाई टाटा ) हा देखील शिक्षणात आणि व्यापारात आपल्या बुद्धीची चमक दाखवत होता. ( योगायोगाने जमशेटजींचा धाकटा मुलगा आणि आर डी या दोघांचे नावही सारखे म्हणजे रतन हेच होते. ) हे रतन दादाभाई टाटा पुढे आर डी या नावाने प्रसिद्ध झाले. जमशेटजींच्या पारखी नजरेत त्यांची हुशारी भरली. या आर डीं च्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून जमशेटजीच होते. तेच त्यांचे रोल मॉडेल होते.
जमशेटजींनी मुंबईतील ज्या एलफिन्स्टन कॉलेजात शिक्षण घेतले होते, त्याच कॉलेजातून आर डीं नी शिक्षण घेतले. पुढे मद्रास येथील कृषी कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. नंतर आपल्या वडिलांना ते त्यांच्या व्यवसायात मदत करू लागले. त्यांचे वडील अतिपूर्वेच्या देशांशी व्यापार करीत असत. या व्यापारात त्यांनी आपल्या वडिलांना मदत करून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती. आर डीं ची बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील क्षमता जमशेटजींच्या चाणाक्ष नजरेने हेरली आणि त्यांना आपल्या कापड व्ययसायात भागीदार करून घेतले. पुढे १८८७ मध्ये ' टाटा अँड सन्स ' ची स्थापना झाल्यानंतर जमशेटजींनी आपला मोठा मुलगा दोराब आणि आर डी यांना या कंपनीचे भागीदार करून घेतले. ( क्रमशः )
( पुढील भाग बुधवारी )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा