मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग एक )

 उगवतीचे रंग


विश्वास देशपांडे, चाळीसगाव

भारतरत्नावली

द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग एक )

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ जे आर डी टाटा. भारत सरकारने1957 मध्ये पद्मविभूषण आणि 1992 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान केलेला पहिला भारतीय उद्योजक. परवाना प्राप्त पहिला भारतीय वैमानिक. भारत सरकारशी पहिला हवाई करार करणारा, आधी टाटा एअरलाईन्स आणि नंतर एअर इंडियाचे प्रमुख. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी टाटा उद्योगसमूहाचे चेअरमन बनलेल्या जे आर डीनी पदभार हाती घेतला तेव्हा फक्त१४ उद्योग समूहाची मालकी असणाऱ्या टाटांच्या जे आर डिंच्या कार्यकाळात ९१ नवीन उद्योगांची भर पडली. जिथे एखादी कंपनी सुरु करणे आणि ती चालवणे हीच गोष्ट मुळी आव्हानात्मक असते तिथे एवढया कंपन्या सांभाळण्याचे हे त्यांचे कौशल्य तोंडात बोट घालायला लावते. अशा कर्तृत्ववान जे आर डी यांच्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण थोडा इतिहास आणि थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ या.

टाटा उद्योगसमूह. केवळ भारतातच नाही तर जगभरात आदराने ज्याचं नाव आदराने घेतलं जातं असा एक ब्रँड. टाटा म्हटलं की झालं. टाटा म्हटलं की उत्तम दर्जाची खात्री, विश्वसनीयता. जे देशासाठी उत्तम ते टाटा करणार. आज दैनंदिन लागणाऱ्या घराघरातील मिठापासून तर अगदी बाहेर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वाहनापर्यंत, कुशल कामगारांपासून ते बुद्धिमान इंजिनिअर्स निर्माण करण्यापर्यंत, तसेच पोलाद, वस्त्रोद्योग, खाणी, रसायने आणि इतर विविध प्रकारचे उद्योग या सगळ्या गोष्टीत टाटा अग्रेसर आहे. इंजिनिअर्स, तंत्रज्ञ, आय टी क्षेत्रातील मंडळी टाटांच्या संस्थांमध्ये काम करताना मोठ्या अभिमानाने करतात ते उगीच नाही. हा नावलौकिक टाटांनी अपरिमित कष्ट करून कमावला आहे. त्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे.

खरं तर देशाभिमानी असलेले आणि देशाच्या नवनिर्माणात अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे हे टाटा कुटुंबीय किंवा त्यांचे पूर्वज मूळ भारतीय नाहीत हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ही मंडळी मूळची इराणमधील पार्स या प्रांतातील. इराणमध्ये सातव्या शतकात अलेक्झांडरने आक्रमण केले. तो प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली आला. त्याने तेथील पर्शियन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती केली. अशा परिस्थितीत आपले प्राण आणि धर्म वाचवण्यासाठी तेथील पर्शियन लोकांना परागंदा व्हावे लागले. त्यातील काही मंडळींनी चीनमध्ये आश्रय घेतला.

काही लोक भारतात आले. नियतीने त्यांच्या भाग्यात भारत देश लिहिला होता. त्यांच्या हातून पुढे भारतमातेच्या प्रगतीसाठी हातभार लागायचा होता. ही मंडळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गुजरातमध्ये आली. गुजरातमध्ये आल्यावर तेथील हिंदू राजा यादव राणा याने त्यांना आश्रय दिला. पण हे सहजासहजी घडले नाही. सुरुवातीला या लोकांनी जेव्हा गुजरातमध्ये आश्रय मागितला, तेव्हा तेथील राजाने आपल्या राजदूतामार्फत दुधाने काठोकाठ भरलेला एक पेला या निर्वासितांना पाठवला. त्याचा अर्थ असा होता की हा पेला दुधाने काठोकाठ भरला आहे. त्याच्यात आता कोणतीही जागा नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आम्ही तुम्हाला सामावून घेऊ शकत नाही.

ही मंडळी मोठी हुशार होती. त्यांच्या पुरोहिताने त्या दुधात थोडी साखर घातली आणि तो पेला राजाकडे परत पाठवला. त्यातून त्यांनी असे सुचवले की दुधात साखर सामावू शकते. एवढेच नाही तर त्या दुधाची गोडी साखरेने वाढते. जशी दुधात साखर सामावून जाते, तसेच आम्हीही आपल्यात सामावून जाऊ, गुण्यागोविंदाने राहू आणि मैत्रीची, सहकार्याची गोडी वाढवू. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि चातुर्याची राजाने प्रशंसा केली आणि अर्थातच त्यांना गुजरातमध्ये आश्रय मिळाला.

गुजरातमध्ये सुरत, बडोदा आणि नवसारी येथे ही मंडळी स्थायिक झाली. ही सगळी मंडळी पर्शियातून आल्यामुळे पारशी म्हटली गेली. खरोखरच दुधात साखर विरघळावी तशी ही मंडळी इथल्या मातीशी एकरूप झाली. नवसारी हे टाटा कुटुंबाचे मूळचे ठिकाण. खरे तर या गावाचे नाव आधी नवसारी नव्हते. ते होते नागमंडल. पण ही पारशी मंडळी जेथून आली त्या इराणच्या भागात सारी नावाचे शहर होते. हे नागमंडल शहर पाहून त्यांना सारी शहराचीच आठवण झाली. नागमंडलचे नवसारी झाले.

ही मंडळी वृत्तीने धार्मिक. त्यांच्या धार्मिक स्थळाला अग्यारी म्हणतात. झेंदावस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ. पण या मंडळींनी धर्म आपल्या वैयक्तिक आचरणापुरताच सीमित ठेवला हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य. त्यांच्या आचरणाच्या, व्यवहाराच्या किंवा व्यवसायाच्या आड त्यांचा धर्म कधीच आला नाही. याआम्ही आधी भारतीय आणि नंतर पारशी अशीच त्यांची भूमिका राहिली. जेव्हा भारतीय हिंदूंना समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले जात होते, त्याच वेळी ही मंडळी समुद्र उल्लंघून दूरदेशी व्यापारासाठी जात होती. नवसारीतील टाटांच्या कुटुंबियांचा कापडाचा व्यापार होता. त्यावर ही मंडळी उत्तम पैसा कमावत होती. याच कुटुंबातील एक कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेला मुलगा जमशेटजी हा साहसी होता. त्याने केवळ कापडाचा व्यापार नव्हे तर कापडनिर्मिती करायचे ठरवले. त्याच्या लक्षात आले की ही कापडनिर्मिती मुंबईत चांगल्या प्रकारे होऊ शकते कारण मुंबईच्या दमट हवामानात कापसाचा धागा लवकर तुटत नाही. शिवाय मुंबई हे नैसर्गिक बंदर होते. येथून देशविदेशात व्यापार करणे सोयीचे होणार होते.

डोक्यात योजना तयार झाली होती. इंग्लंडमध्ये कापडगिरण्या नुकत्याच सुरु झालेल्या होत्या. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तेथूनच आणावी लागणार होती. पण ज्याने एखादी गोष्ट करण्याचा ठाम निर्धारच केला आहे, त्याला कोणताही अडथळा अडवू शकत नाही. जमशेटजींनी कापडगिरणीसाठी लागणारी यंत्रसामग्री मँचेस्टरहून मागवली. मुंबईत टाटांची पहिली कापडमिल सुरु झाली. कापडमिलचे नाव होते ' एम्प्रेस मिल. " ही गोष्ट होती १८७४ मधली. टाटांच्या या कापडगिरणीत अत्याधुनिक पद्धतीने कापडनिर्मिती होऊ लागली. हे कापड देशविदेशात जाऊ लागले. टाटांना अमाप पैसा मिळाला. पण त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी हा पैसा आपली खाजगी मालमत्ता न समजता सार्वजनिक संपत्ती मानली. या संपत्तीतून भारताच्या विकासासाठी पुढचे अनेक संकल्प त्यांच्या डोक्यात आकार घेत होते. तो काळ औद्योगिक क्रांतीचा होता. युरोपातील ही क्रांती त्यांना भारतात आणायची होती. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी कार्लाईल यांचे भाषण ऐकले होते. आपल्या भाषणात कार्लाईल म्हणाले होते की आता यापुढील काळात ज्याच्याजवळ पोलाद असेल, त्याच्याजवळ सोने असेल. थोडक्यात म्हणजे पोलादाला सोन्याचे मोल येईल. कार्लाईलचे हे शब्द त्याच्या मनाला स्पर्शून गेले आणि त्यांनी भारतात पोलादनिर्मिती करायची ठरवली. त्यांना जलविद्युत प्रकल्प सुरु करायचा होता, विश्वविद्यापीठ सुरु करायचे होते. ( क्रमशः )

( पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव

०५/०२/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...