उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एकवीस ( अंतिम )
आजच्या या शेवटच्या भागात सरदार पटेल यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण पाहणार आहोत. सरदार पटेल म्हणजे भारताला लाभलेले एक महान व्यक्तिमत्व. सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आपलेसे वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. धोतर, झब्बा आणि जाकीट असा त्यांचा साधा पोशाख असायचा. त्यांच्या पोशाखात किंवा व्यक्तिमत्वात बडेजाव कुठेही नव्हता. भारतात विखुरलेली ५६५ संस्थाने भारतात एकहाती विलीन करूनही त्यांचे श्रेय त्यांनी स्वतःकडे स्वतःहून कधीच घेतले नाही. त्याचे श्रेय त्यांनी त्या त्या राजांना त्या त्या वेळी दिले हा त्यांचा केवढा मोठेपणा. नाटकीपणा, पुढे पुढे करणाऱ्यांची त्यांना चीड होती.
पटेलांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक अजब रसायन होतं. साधेपणा आणि भारदस्तपणा, कमी बोलणं आणि स्पष्टवक्तेपणा, मुत्सद्दीपणा आणि मनाची निष्कपटता या गुणांचं अजब मिश्रण म्हणजे सरदार पटेल. मनाचा निर्धार, प्रचंड आत्मविश्वास, ठाम कृती या त्यांच्या जमेच्या बाजू. कुठलाही प्रश्न रेंगाळत न ठेवता त्यावर काहीतरी तात्काळ निर्णय घेणे हा त्यांचा स्वभाव. त्याचबरोबर त्यांच्या निर्णयाबाबत कोणी काही मतभेद व्यक्त केले तर ते ऐकून आपल्या निर्णयात बदल करण्याची सुद्धा त्यांची तयारी असायची. पण त्यांच्या सगळ्या निर्णयात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य असायचे.
म गांधी आणि पं नेहरू यांचे वर्णन आपण धर्मनिरपेक्ष नेते म्हणून करतो. पण सरदार पटेलही धर्मनिरपेक्षच होते. पण त्यांची धर्मनिरपेक्षता सर्व धर्मीयांना समान न्याय देणारी होती. त्यांची धर्मनिरपेक्षता अल्पसंख्याक म्हणून गांधी किंवा नेहरूंसारखी कुणा विशिष्ट समाजाला झुकते माप देणारी नव्हती. राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची होती. त्यांनी लखनौ येथे १९४८ मध्ये एका प्रसंगी मुस्लिम समुदायासमोर केलेलं भाषण त्यांच्या भूमिकेची साक्ष देतं. हे त्यांचे विचार आजही अनुकरणीय आहेत. ते म्हणतात, ' काही लोक माझं वर्णन मुस्लिमांचा शत्रू म्हणून करतात. पण मी मुस्लिमांचा मित्रच आहे. मात्र मी जे काही बोलतो ते स्पष्ट आणि देशहिताचं असतं. मी आपल्याला आवाहन करतो की या कठीण काळात आपण भारतावर केवळ निष्ठा न दाखवता आपल्या वागण्याबोलण्यातून तसं दाखवून दिलं पाहिजे. पाकिस्तान घुसखोर टोळ्यांच्या माध्यमातून भारतावर जे भ्याड हल्ले करतो, त्याचा तुम्ही जाहीर निषेध का करत नाही ? आताच पार पडलेल्या तुमच्या परिषदेत तुम्ही काश्मीर प्रश्नावर एकही शब्द का बोलला नाहीत ?
' ज्यांना पाकिस्तानात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं आणि तिथे शांततेत राहावं. आम्ही इकडे राहून भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहू. भारतात जे मुस्लिम बांधव राहू इच्छितात त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्याला आता हिंदू आणि इतर धर्मियांसोबतच एकाच जहाजात प्रवास करायचा आहे. जगायचे असेल तर ते बरोबरच आणि मरायचे असेल तर तेही एकमेकांसोबतच. तुम्हाला एकाच वेळी दोन घोड्यांवर स्वार होता येणार नाही. आता तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. '
भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानला मालमत्तेतील हिस्सा म्हणून ५५ कोटी रुपये भारताने द्यायचे होते. या गोष्टीला पटेलांचा विरोध होता. पण हे पैसे पाकिस्तानला देऊन आपण मुस्लिमांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करावा अशा मताचे गांधीजी होते. गांधीजी केवळ एवढे सांगून थांबले नाहीत तर हे पैसे द्यावेत म्हणून त्यांनी उपोषण सुरु केले. साहजिकच गांधीजींसारख्या मोठ्या नेत्याने उपोषण केल्यामुळे त्यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला. पटेलांवर आणि मंत्रिमंडळावर हे पैसे देण्यासाठी दबाव येऊ लागला. पटेलांनी आपला आग्रह सोडला. पण या गोष्टीमुळे अत्यंत व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला. पण पटेलांसारखा प्रभावी नेता गमावून चालणार नव्हते म्हणून माऊंटबॅटन आणि गांधीजी यांच्या आग्रहामुळे पटेलांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही.
पटेल एक कुशल प्रशासकही होते. आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी ते पूर्ण स्वातंत्र्य देत आणि त्यांच्यावर विश्वास टाकत. त्यांचे आपल्या अधिकाऱ्यांना आणि सचिवांना नेहमी सांगणे असायचे की मंत्री नाराज होतील म्हणून आपले म्हणणे सांगण्याचे टाळू नका. तुमचे मत स्पष्टपणे व्यक्त करा. जर आपले मंत्री नाराज होतील किंवा रागावतील या भीतीपोटी जर तुम्ही तुमचं प्रामाणिक मत मांडलं नाही, तर सरकारला योग्य निर्णय घेणं कठीण जाईल. असे करण्यापेक्षा तुम्ही राजीनामा दिलेला बरा. पटेल यांचा हा मोलाचा सल्ला आजही मंत्री आणि अधिकारी यांनी विचार करावा असा आहे.
देशासाठी कणाकणाने झिजणाऱ्या या महान नेत्याची प्रकृती आता साथ देईनाशी झाली होती. सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला होता. आतड्याच्या जुन्या विकाराने पुन्हा उचल खाल्ली होती. तशातच त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी आता त्यांना दिल्लीहून मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांची कन्या मणिबेन त्यांच्याजवळ सावलीसारखी उभी राहून त्यांची सेवा करत होती. प्रकृतीत सुधार होताना दिसत नव्हता. १४ डिसेंबरची रात्र त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारी ठरली. १५ डिसेंबर १९५० चा दिवस उजाडला, तो या लोहपुरूषाला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी. हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना आला. सकाळी साधारणपणे साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पटेलांच्या निधनाची बातमी देशात पसरताच एकच हलकल्लोळ उडाला. लोकांना आपल्या लाडक्या नेत्याचा हा वियोग चटका लावून गेला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत सर्व लहानथोर नेत्यांनी, चाहत्यांनी एकच गर्दी केली. मृत्यूने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले होते पण या लोहपुरूषाची दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र शेवटपर्यंत कायम होती. मृत्यूही ती हिरावून घेऊ शकला नाही. मृत्यूसमयी त्यांच्या चेहऱ्यावरचा करारीपणा आधीसारखाच झळकत होता. सरदार पटेल लोकांच्या मनामनावर कायम राज्य करत राहतील. त्यांचा जन्मदिवस ३१ ऑक्टोबर आपण ' राष्ट्रीय एकता दिवस ' म्हणून साजरा करतॊ. १९९१ मध्ये या भारतमातेच्या महान सुपुत्राचा ' भारतरत्न ' देऊन गौरव करण्यात आला. गुजरातमधील नर्मदा धरणाच्या परिसरातील केवाडिया येथील त्यांचा भव्य पुतळा ' द स्टॅच्यू ऑफ युनिटी ' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले सुपुत्र आणि थोर मूर्तिकार राम सुतार यांच्या सर्जनशील हातातून द स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखी कलाकृती साकार झाली आहे ही आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०३/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )
![]() |
| मणिबेन आणि सरदार पटेल |

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा