उगवतीचे रंग
भारतरत्नावली
अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन )
राजकारणासारख्या रुक्ष वातावरणात राहूनही अटलजींनी आपली काव्यप्रतिभा कधी कोमेजू दिली नाही. त्यांच्यातला लेखक आणि कवी त्यांच्यातल्या राजकारणी व्यक्तीला सदैव मार्गदर्शन करीत राहिला. त्यामुळे इतर राजकारणी व्यक्तींप्रमाणे अटलजींनी बोलताना कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. देशभक्ती तर त्यांच्या नसानसात भिनली होती. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटकही झाली होती. पुढे ज्या संघाचं काम ते करीत होते, त्या संघावरही बंदी आली. पण अटलजी विचलित झाले नाहीत. आपल्या ' कदम मिलाकर चलना ' होगा या कवितेत ते म्हणतात
बाधाए आती हैं आए,
घिरे प्रलय की घोर घटाए
पावोंके नीचे अंगारे
सिर पर बरसे यदी ज्वालाये,
निज हाथोंसे हसते हसते,
आग लगाकर जलना होगा !
कदम मिलाकर चलना होगा !
हाच बाणा आणि हीच आग त्यांनी आयुष्यभर पेटती ठेवली. वेगळे वागणे त्यांना शक्यच नव्हते. याच सुमाराला अटलजी एक प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्धीस येत होते. आपल्या विदवत्तापूर्ण वक्तृत्वाने त्यांनी संघामध्ये एक वेगळी छाप पाडली होती. १९५७ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अटलजींसारख्या फर्ड्या वक्त्यावर संघाची मदार होती. त्यामुळे अटलजींना बलरामपूर, लखनौ आणि मथुरा या तीनही मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. घागरा नदीच्या काठी असलेले बलरामपूर हे नेपाळ यात्रेतील एक महत्वाचे ठिकाण होते. या ठिकाणी थांबून यात्रेकरू पुढे जात असत. अशा या बलरामपूरला जातीय वादाचे ग्रहण लागले होते. या ठिकाणी मुस्लिम धर्मीय जमीनदारांचे वर्चस्व होते. हे जमीनदार गोरगरीब हिंदू जनतेला भयंकर त्रास देत असत, पिळवणूक करीत असत. येथे त्यांची दहशत एवढी वाढली होती की हिंदूंना शंख, घंटा इ वाजविण्यासही बंदी होती. त्यामुळे या मुस्लिम जमीनदारांविरुद्ध जनतेत असंतोष होता. लखनौ आणि मथुरा येथील मतदारसंघात अटलजींचा पराभव झाला पण बलरामपूरमध्ये हिंदूंमधील असंतोषाचा फायदा त्यांना मिळाला आणि अटलजी १,१८,३६० मतांनी दणदणीत विजय मिळवून निवडून आले आणि अशा रीतीने संसदेत त्यांचा प्रवेश झाला.
यावेळी संसदेत गोविंद वल्लभ पंत, पं नेहरू, मौलाना आझाद, जगजीवन राम या सारखे दिग्गज आणि अनुभवी नेते निवडून आलेले होते. या तुलनेत अटलजी नवीन आणि अननुभवी होते. पण आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी या नेत्यांना देखील प्रभावित केले होते. त्यांचे प्रांजळ आणि परखड विचार, ओघवती आणि मंत्रमुग्ध करणारी अभ्यासपूर्ण भाषाशैली यामुळे त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. स्वतः पंडित नेहरूंनी अटलजींचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.
यानंतर १९६२ च्या लोकसभा निवडूणुकीत मात्र अटलजी निवडून येऊ शकले नाहीत. स्वतंत्र भारताच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत महत्वाचा होता. या काळात चीनचे आक्रमण, लाल बहादूर यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याचे पंतप्रधान पदावर आरूढ होणे, ताशकंद कराराच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणे या सारख्या वेगवान घटना घडत होत्या. अशा वेळी अटलजींसारखी व्यक्ती संसदेत असणे ही काळाची गरज होती. पण निवडून न आल्याने त्यांना ही संधी मिळू शकली नाही. याची खंत त्यांच्या संवेदनशील मनाला कायम होती. याची उणीव त्यांनी पुढे भरून काढली. असे असले तरी १९६२ आणि १९६८ या दोन्ही वर्षी ते राज्यसभेत सदस्य म्हणून होतेच.
अटलजींचं वक्तृत्व श्रोत्यांना खिळवून ठेवत असे. त्यामध्ये त्यांचा रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथांचा सखोल अभ्यास दिसून त्यात ते कोट्या इतक्या मार्मिक पद्धतीने करीत की समोरच्याची हसून हसून पुरेवाट होत असे. या जोडीला त्यांचे प्रभावी हातवारे यात भर घालत. मात्र श्रोत्यांना विनोदातून ते सहज गंभीर वस्तुस्थितीकडे घेऊन जात. जबाबदारीची जाणीव करून देत. विरोधी पक्षीयांच्या डोळ्यायेई. तुलसी रामायणाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भाषाशैली ओघवती असे. सभेच्या सुरुवातीपासूनच ते श्रोत्यांना खिळवून ठेवत. कोणाचेही नाव न घेता समोरचा जर चुकला असेल तर ते त्याच्या डोळयांत झणझणीत अंजन घालत आणि तेही कुठलीही मर्यादा न सोडता. त्यांच्या वक्तृत्वाचा एक किस्सा येथे सांगण्यासारखा आहे.
१९७० च्या सुमारास पुण्यात त्यांची एक जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील सरकारचा एक गमतीदार किस्सा सांगितला. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. मध्य प्रदेशातील प्राथमिक वर्गात अंकलिपीचं एक पुस्तक लावलेलं होतं. त्या पुस्तकात ' ग ' गणपतीचा असं दिलेलं होता. तेव्हा काही सदस्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. कारण त्यांची तथाकथित धर्मनिरपेक्षता आड येत होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्यांनी ठरवलं की गणपती हटवून दुसरं काहीतरी त्या जागी टाकायचं. मंडळाचे सदस्य त्यासाठी शोध घेऊ लागले. त्यांना शोध घेता घेता एक प्राणी आढळला. तो म्हणजे गाढव. त्यांनी गणपती हटवला आणि गाढवाला त्या जागी विराजमान केलं. वाजपेयींनी आपल्या मिश्किल शैलीत या घटनेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ' गणेशजी बुद्धी की देवता हैं और गधा मूर्खता का प्रतीक. लेकिन इनको गधा चलता हैं, गणेशजी नही. गणेशजीका तिरस्कार और गधे का पुरस्कार...यही हैं इनकी सरकार. ' ( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०९/१२/२०२०
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा