उगवतीचे रंग
भारतरत्नावली
अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग दोन )
अटलजी ग्वाल्हेरच्या कॉलेजातून हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या तीनही विषयात विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. अशा हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना तेव्हा ग्वाल्हेर संस्थानची शिष्यवृत्ती मिळत असे. ती अटलजींना सुद्धा मिळाली. पण अशा विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर संस्थानात काही काळ नोकरी करावी लागे. पण अटलजी ज्या निष्ठेने संघाच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य करीत होते, ते पाहून त्यांच्यासाठी ही अट शिथिल करण्यात आली. या पुढील शिक्षणासाठी अटलजींनी कानपूरला जाण्याचे ठरवले. कानपूरला जाऊन एकाच वेळी एम ए आणि एल एल बी करण्याचा त्यांचा मानस होता.
पण यावेळी एक गमतीदार गोष्ट घडली. अटलजींच्या वडलांनी देखील त्यांच्या सोबत लॉ ला प्रवेश घेण्याचे ठरवले. एकाच वेळी वकिलीचे शिक्षण घेणारे हे बहुधा पहिलेच पिता पुत्र असावेत. ते एकत्र एकाच होस्टेलवर राहत आणि एकाच वर्गात बसत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष ही जोडी आकर्षून घेत असे. एम ए च्या परीक्षेत अटलजींनी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला. पण एक आश्चर्याची गोष्ट घडली. त्यांचे वडील वकिलीची परीक्षा पास झाले. अटलजी मात्र त्यात अयशस्वी झाले. त्याला कारणही तसेच होते. या काळात मुस्लिम लीगच्या ' डायरेक्ट ऍक्शन ' मुळे देशातील वातावरण गढूळ झाले होते. हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा धोक्यात आला होता. हिंदूंवर अत्याचार होत होता. देश फाळणीच्या उंबरठयावर उभा होता.
अशा वेळी संघाचे जातीय सलोख्यासाठी प्रयत्न सुरु होते. हिंदू समाजाचे मनोधैर्य टिकून राहावे यासाठी संघ प्रयत्नशील होता. गोळवलकर गुरुजी सर्वांना सहकार्यच आवाहन करीत होते. अशा वेळी अटलजींसारखी देशभक्त व्यक्ती केवळ अभ्यासात रमणे शक्यच नव्हते. खरं तर त्यांना वकिलीसोबतच पी एच डी पण करायचं होतं. पण भारतमातेला जणू त्यांच्यासारख्या तरुणांची गरज होती. भारतमातेच्या सेवेप्रित्यर्थ लॉ आणि पी एच डी या आपल्या दोन्ही स्वप्नांवर अटलजींनी जाणीवपूर्वक पाणी सोडले आणि संघकार्यासाठी वाहून घेतले.
ते लखनौ जवळील संडीला गावी आले. इथे त्यांची प्रकृती बरी नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली. याच काळात त्यांची प्रसिद्ध कविता ' अमर आग है ' लिहिली गेली. या कवितेतून त्यांच्या भावनांना अटलजींनी वाट करून दिली आणि देशभक्तीची ही आग प्रत्येक हृदयात पेटवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले.
कोटि कोटि आकुल हृदयोमे
सुलग रही है जो चिंगारी,
अमर आग है, अमर आग है !
ही देशभक्तीची आग त्यांच्या हृदयात सतत धगधगत होती. याच कालावधीत ' राष्ट्रधर्म ' या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एका अगदी खोलीत त्यांच्यासोबत अटलजी इतर काही संघ कार्यकर्त्यांसोबत राहू लागले. अटलजी खाण्याचे जरी शौकीन होते तरी याकाळात मिळेल ते जेवण स्वीकारून त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. यावेळी पाञ्चजन्य या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही त्यांच्यावर आली. संघकार्य करीत असताना अटलजींवर संघाच्या एकात्मभावाचा अतिशय चांगला परिणाम झाला. संघामध्ये जातपात, भेदभाव आदींना स्थान नव्हते. या सगळ्या गोष्टींनी प्रभावित होऊन अटलजींनी आपल्या गळ्यातील जानवे काढून टाकले. त्यांचे वडील त्यांना याबाबत बोलले, तरी त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून होते यावर अटलजींचा ठाम विश्वास होता. कोणतीही गोष्ट इतरांना सांगण्याआधी ते स्वतः ती आचरणात आणत असत.
अटलजींच्या विचारात स्पष्टता असे. त्याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. देशातील मुस्लिम लीगने निर्माण केलेले वातावरण पाहून गोळवलकर गुरुजींनी देशातील मुस्लिमांसंदर्भात एक विधान केले होते. त्यावेळी त्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी इंदिराजी उपस्थित होत्या. त्यांना गोळवलकर गुरुजींचे विधान अजिबात मान्य नव्हते. त्या अटलजींना म्हणाल्या, ' याचा अर्थ या देशात मुस्लिमांना स्थान नाही. ' अटलजी म्हणाले ' असे त्यांनी कुठे म्हटले आहे हे मला दाखवा. ' इंदिराजी म्हणाल्या की गोळवलकर गुरुजींच्या मते मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायला हवे. याचा अर्थ त्यांना या देशात स्थान नाही. अटलजींनी इंदिराजींना फार सुंदर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ' यात चूक ते काय राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे याचा अर्थ त्यांना या देशात स्थान नाही असा होत नाही. या देशाचे नागरिक म्हणून राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायलाच हवे. राष्ट्रीय प्रवाह ओळखता यायला हवा. त्याबाबतच मतभेद असतील तर मग बोलणेच व्यर्थ ! ' या अटलजींच्या तर्कशुद्ध उत्तरावर इंदिराजींना काही बोलता आले नाही. ( क्रमशः - पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
६. १२/. २०२०
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा