मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सात

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सात 

( नमस्कार. आज नववर्षाचा पहिला दिवस. २०२० हे वर्ष कोरोनाने ग्रासले होते. या नवीन वर्षावरही त्याचे सावट आहेच. त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्यासमोर त्याने उभ्या केल्या आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार या संदर्भात खूप काही करावे लागणार आहे. हा नववर्षाचा मंगल कलश नियतीने आज आपल्या हातात सोपवला आहे. त्याच्याकडे कसे पाहायचे ते आपल्या हातात आहे. पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा आहे हे ठरवण्याचं आपल्या हातात आहे. पण नवीन वर्ष नेहमीच नवीन आशा सोबत घेऊन येत असते. हा मंगल कलश आपण उत्साह, उमेद आणि सकारात्मक विचारांनी भरू या आणि दुःख, दैन्य, निराशा यांना हद्दपार करू या. 

या वर्षात आपण सरदार पटेलांसारख्या महामानवाचे चरित्र पाहतो आहोत. सरदार पटेलांची देशभक्ती, निर्भयता, कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, संकटांशी सामना करण्याची विजिगिषु वृत्ती आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल. त्यांचे चरित्र आपल्याला सांगते की संकटांशी सामना करण्यासाठी पोलादी मनगटाबरोबरच पोलादी मन हवे. पोलादी मनासोबतच कधीही न कोमेजणाऱ्या आशा, आकांक्षांची पालवी सदैव हिरवी राहू द्या. आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ) 

बार्डोलीचा सत्याग्रह कमालीचा यशस्वी झाला होता. या लढ्याने ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त हादरा दिला होता. शेतकऱ्यांवर अन्यायकारक शेतसारा लादून झाल्यानंतर सरकारने मिठावर कर लादला होता. सर्वसामान्यांची नित्य आणि दैनंदिन गरज असलेल्या मिठावरचा कर अन्यायकारकच होता. याविरुद्धही आंदोलन करून सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देण्याचे ठरले. गुजरातमधील दांडी हे गाव या सत्याग्रहासाठी निश्चित करण्यात आले. या दांडी गावाची निवड सरदार पटेलांनीच केली होती. १२ मार्च १९३० ला ही दांडी यात्रा सुरु झाली. पण त्यापूर्वीच इंग्रज सरकारने पटेलांना अटक केली होती. पटेल बाहेर राहिले तर लोकांच्या असंतोषाला तोंड देणे कठीण होईल अशी भीती इंग्रज सरकारला वाटत होती. खरे तर पटेलांची अटक अन्यायकारकच होती कारण अटक करण्यासाठी त्यांच्यावर कोणते आरोप ठेवायचे हे सुद्धा सरकारला लवकर निश्चित करता येत नव्हते. पण पटेलांसारख्या सिंहाला सरकार घाबरले होते हे निश्चित !

पटेलांच्या अटकेचा देशभर निषेध झाला. लोकांमध्ये संताप उसळून आला. तुरुंगातही पटेलांना अगदी सामान्य कैद्यासारखी वागणूक देण्यात आली. पण त्याची तमा त्यांनी बाळगली नाही. कारण त्यांना माहिती होते की ' रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल . ' गांधीजींच्या साबरमती आश्रमापासून ही दांडी यात्रा सुरु झाली. यात गांधीजींच्या निवडक अनुयायांसह हजारो लोक सहभागी झाले. ही यात्रा २४ दिवस चालली. सत्याग्रहींनी या दरम्यान ३८५ किमी चे पायी चालून आपला निर्धार दाखवून दिला. या सत्याग्रहात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. गांधीजींनी आणि सर्व सत्याग्रहींनी दांडी सत्याग्रहादरम्यान ब्रिटिशांच्या अत्याचारांना निर्भयतेने तोंड दिले. दांडी लढा कमालीचा यशस्वी झाला. ' उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया. ' खरोखरच या सत्याग्रहाने ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला. या लढ्याने गांधीजींना राष्ट्रीय पातळीवरील क्रमांक एकचा नेता बनवले तर पटेलांना आपोआपच दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय नेता. 

खरे तर १९२९ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे सरदार पटेल अध्यक्ष होणार होते पण त्यावेळी त्यांच्याजागी पं नेहरूंची निवड करण्यात आली. पुढे १९३१ मध्ये झालेल्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सरदार पटेलांची निवड झाली. या दरम्यान इंग्रज सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतीकारकांना फाशी दिले होते. त्यामुळे इंग्रज सरकारविरुद्ध देशभर संताप होता. त्याच वातावरणात हे अधिवेशन झाल्याने त्यावर या घटनेचे दुःखद सावट होते. लोकांच्या मनात म गांधींबद्दल रोष होता. पण या प्रसंगी सरदार पटेल हे गांधीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लोकांच्या निदर्शनांना ते दोघे शांतपणे आणि निर्भयतेने सामोरे गेले. हळूहळू जनक्षोभ कमी झाला. या अधिवेशनात पटेलांनी एक अगदी छोटेखानी भाषण केले. त्यात त्यांनी लोकांच्या भावनांना हात घालून यांच्यामधली देशभक्तीची ज्योत प्रज्वलित पुन्हा प्रज्वलित केली. या अधिवेशनात खान अब्दुल गफार खान हे आपल्या ' खुदाई खिदमदगार ' या संघटनेसह सामील झाले होते. या अधिवेशनाने त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळख मिळवून दिली. सरदार पटेलांनी या पुढे काँग्रेसच्या अधिवेशनाचे सर्व कामकाज हिंदीतच व्हावे असा आग्रह धरला आणि तो मान्य करण्यात आला. 

पुढे इंग्रज सरकारने म गांधी, सरदार पटेल आणि महादेव देसाई यांना अटक करून पुण्याजवळील येरवडा तुरुंगात ठेवले.  जवळपास दीड वर्षांचा हा कालावधी होता. या दरम्यान गांधीजी आणि पटेल यांच्यात वेगळे ऋणानुबंध निर्माण झाले. तुरुंगातून सुटल्यानंतर गांधीजींनी एक पत्रक काढले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, ' पटेलांच्या सहवासात राहायला मिळणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाची गोष्ट होती. त्यांचं अतुलनीय धैर्य आणि सळसळतं देशप्रेम मला माहिती होतं. पण त्यांच्यामध्ये आईचं प्रेमळ हृदय असेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. ' गांधीजींचे हे उदगार पटेलांबद्दल खूप काही सांगून जातात. वरवर कठोर भासणारा हा नेता किती प्रेमळ आणि मातृहृदयी असू शकतो याची साक्ष गांधीजींचे हे उदगार देतात. 

या कालावधीत पटेलांनी मातेच्या ममतेने गांधीजींची काळजी घेतली/ त्यांना हवे नको ते पाहिले. पण त्याच वेळी गांधीजींना त्यांनी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे सांगण्यास कमी केले नाही. पटेल गांधीजींचे अनुयायी होते तरी गांधीजींच्या सगळ्या मतांशी ते सहमत होते असे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी वारंवार उपोषण करणे पटेलांना आवडत नव्हते. उपोषण हे शस्त्र आहे आणि ते वारंवार वापरलं तर त्याची धार बोथट होईल असे ते गांधीजींना सांगत. गांधीजींची मुस्लिमांच्या अनुनयाची भूमिका पटेलांना मान्य नव्हती. एखाद्या प्रश्नावर उपवास करून तुम्ही फक्त हिंदूंच्याच भावनांवर दडपण आणता असे ते गांधीजींना म्हणत. 

पुढे इंग्रजांनी प्रांतीय स्वायत्ततेचा कायदा केला. या कायद्यानुसार १९३७ मध्ये प्रांतीय निवडणूका होणार होत्या. त्यासाठी काँग्रेसचे संसदीय प्रमुख म्हणून सरदार पटेलांची निवड करण्यात आली होती. या कालावधीत पटेलांनी जी पक्षाची बांधणी केली तिला तोड नाही. त्यामुळेच पुढे होणाऱ्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष सामोरे जाऊ शकला.स्वातंत्र्यानंतर देशातील प्रमुख पक्ष म्हणून जे काम काँग्रेसने केले त्याचे श्रेय सरदार पटेलांच्या या पक्षबांधणीच्या कार्याला द्यावे लागेल. हे करत असताना त्यांची भूमिका एखाद्या कडक प्रशासकाची होती. या कालावधीत काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद झाले. पक्ष फुटण्याची भीती होती. पण पटेलांच्या पोलादी हाताने हे मतभेद बाजूला सारून पक्षाला एकसंध ठेवण्याचे काम केले. पंडित नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस या सारख्या नेत्यांशीही त्यांचे काही बाबतीत मतभेद होते. पण त्यांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेऊन प्रसंगी या नेत्यांना दोन शब्द सुनावण्यास कमी केले नाही. पटेलांना प्रसिद्धीची हाव नव्हती. सत्तेची लालसाही नव्हती. देशासाठी निरलसपणे कार्य करीत राहणे हा त्यांचा स्वभाव होता. 

( क्रमशः - पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०१/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...