उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सहा
नागपूर सत्याग्रह, गुजरातमधील पूरपरिस्थीतीशी सामना आणि गुजरातमधील बोरसद आणि परिसरातील दरोडेखोरांचा बंदोबस्त या तीन यशस्वी लढ्यानंतर पटेलांचा चवथा लढा होता तो म्हणजे बार्डोली सत्याग्रहाचा. आजच्या या लेखात बार्डोलीच्या सत्याग्रहाचे हे लखलखीत आणि तेजस्वी पर्व आपल्याला समजून घ्यायचे आहे. या बार्डोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभाई पटेलांना ' सरदार ' म्हणून ओळख मिळवून दिली.
गुजरातमधील बार्डोली हे ठिकाण सुरत या शहरापासून अवघ्या बत्तीस किमी अंतरावर आहे. या सत्याग्रहाचे केंद्र बार्डोली होते म्हणून हा सत्याग्रह बार्डोलीचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. तसा हा सत्याग्रह संपूर्ण गुजरातमध्येच पसरला होता. सुरत, भडोच, नाडियाद, अहमदाबाद इ शहरे त्याची प्रमुख केंद्रे होती. हा सत्याग्रह प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता. या सत्याग्रहाचे बीजारोपण गांधीजींनीच केले होते. पण चौरीचौरा या गावात हा सत्याग्रह हिंसक बनला आणि जमावाने तेथील पोलिसचौकी जाळून टाकली. काही पोलीस त्यात ठार झाले. त्यामुळे गांधीजींनी हा सत्याग्रह स्थगित केला होता.
१९२७ चा हा काळ होता. याच काळात सुरतमध्ये एका अननुभवी कमिशनरची इंग्रज सरकारने नेमणूक केली. या महाशयांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही अंदाज न घेता शेतसाऱ्यात एकदम २९ टक्के वाढ सुचवली. नंतर ब्रिटिश सरकारने ही वाढ २२ टक्क्यांवर आणली तरी ती देशातील इतर प्रांतात केल्या जाणाऱ्या शेतसाऱ्यापेक्षा खूप जास्त होती. शेतकऱ्यांना आपले कोणतेही म्हणणे मांडण्याची संधी न देता सरकारने ही सारावसुली सक्तीची केली होती. साहजिकच गुजरातमधील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता. या कठीण प्रसंगातून वल्लभभाई पटेल नक्कीच काहीतरी मार्ग काढतील ही आशा शेतकऱ्यांना होती.
या संदर्भात गुजरातमधील शेतकऱ्यांचे काही नेते पटेलांना भेटले. त्यांनी पटेलांच्या कानावर सगळी परिस्थिती घातली आणि सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय जाहीर केला. स्वतः पटेलांनाही या सगळ्या परिस्थितीची जाणीव होती. पण सत्याग्रहाला सुरुवात करण्याआधी शेतकऱ्यांची मानसिक स्थिती त्यांना जोखून पाहायची होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या नेत्यांना सांगितले की सत्याग्रह करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कदाचित प्रदीर्घ काळ संघर्ष करावा लागू शकतो. हा संघर्ष करताना हालअपेष्टा, उपासमार, तुरुंगवास इ त्रास सोसावा लागेल. त्याला तुमची तयारी आहे का ? तसेच हा संघर्ष शांततेने करावा लागेल. त्यात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चालणार नाही. तेव्हा तुम्ही सर्वांशी बोलून त्यांची या गोष्टींना तोंड द्यायची तयारी आहे का हे विचारा. शेतकऱ्यांचे नेते आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांशी बोलून पुन्हा पटेलांकडे आले. सर्वांनी सत्याग्रहाचा निर्धार व्यक्त केला. आता या सत्याग्रहासाठी गांधीजींची सुद्धा परवानगी घेणे भाग होते. पटेलांनी गांधीजींना शेतकऱ्यांची बाजू आणि भूमिका समजावून सांगितली. गांधीजींनी सत्याग्रहाला वर सांगितलेल्या अटींवरच परवानगी दिली की ज्या अगोदरच पटेलांनी शेतकऱ्यांना सांगितल्या होत्या.
आता सत्याग्रहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जवळपास ८७००० शेतकरी या लढ्यात सामील झाले होते. या शेतकऱ्यांना एका सूत्रात बांधून नियोजनबद्ध आंदोलन करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण पटेल ही व्यक्तीच अशी होती की त्यांच्या नियोजनामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जात होत्या. त्यांनी या लढ्यासाठी अशी काही यंत्रणा उभी केली की त्याचे नियोजन पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी देखील तोंडात बोटे घातली. या लढ्यात पटेल प्रमुख सेनापती होते. त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या हाताखाली अनेक विभागप्रमुख होते आणि या विभागप्रमुखांच्या हाताशी इतर लोक. या काळात घोडेस्वारांचे एक पथकच उभारण्यात आले. हे घोडेस्वार गावोगावी फिरून परिस्थितीची पाहणी करीत, अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवत. त्यांच्यामुळे गावोगावच्या सत्याग्रहाची नेमकी स्थिती पटेल आणि इतर प्रमुखांना कळत असे.
या सगळ्यामुळे इंग्रज अधिकारी प्रचंड चिडले. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी जमीन, गुरेढोरे यांची जप्ती आणि काही ठिकाणी लिलाव सुरु केला. पण पटेलांनी आवाहन केल्याप्रमाणे शेतकरी शांत राहिले. इंग्रज अधिकारी गावात येत तेव्हा लोक आपली दारे लावून घरात बसत. गावात स्मशानशांतता असे. कोणीही बाहेर येत नसे. लोकांच्या अनुपस्थितीत इंग्रज अधिकाऱ्यांना ना लिलाव करता येत असे ना जप्तीची कारवाई. लोकांवर पटेलांचा एवढा प्रभाव होता की इंग्रज अधिकाऱ्यांना वाहन मिळणे कठीण होई. कधी कधी साधी दाढी करण्यासाठी त्यांना मैलोनमैल चालत जावे लागे.
यामुळे गावातील सर्व व्यवहार संध्याकाळी सुरु होत. संध्याकाळपासून पटेलांची विविध गावात भ्रमंती सुरु होत असे. विविध सभांना ते संबोधित करत असत. त्यांचे बोलणे प्रभावी असे. ' वन्ही तो चेतवावा रे, चेतविताच चेततो ' या समर्थांच्या उक्तीप्रमाणे पटेलांच्या भाषणांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण होत असे. या सत्याग्रहात पुरुषांबरोबरच महिलांचाही सहभाग होता. मिठुबेन पेटीट, शारदाबेन शाह , मणीबेन पटेल, भक्तिबा, अश्या स्त्रियांनी बारडोली सत्याग्रहात महिलांचा सहभाग वाढवला. शेतकर्यांना प्रेरित करणारे , या सत्याग्रहाची यशस्वी आखणी करून सामान्य शेतकर्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे करणार्या पटेलांना बारडोलीतील महिलावर्गाने 'सरदार' असे संबोधण्यास सुरुवात केली. महिला इतक्या भारल्या गेल्या होत्या की आपल्या घरातील पुरुषमाणसांना त्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करीत असत. एखाद्या सत्याग्रहीवर खटला सुरु असेल तर, घरातून त्याला सूचना दिली जात असे की तेथे काही भलतेसलते बोलू नका. लेचेपेचे राहू नका. आपल्या भूमिकेवर ठाम राहा. इतका पटेलांचा प्रभाव लोकांवर होता.
अनेक वर्तमानपत्रांनी या आंदोलनाच्या बातम्या छापून शेतकऱ्यांच्या आणि पटेलांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. कोणी पटेलांची तुलना लेनिनशी केली तर कोणी स्टॅलिनशी, पण पटेल हे पटेल होते. पायात साध्या चपला, धोतर, झब्बा आणि जाकीट असाच त्यांचा वेष असे. पण जनमानसावर प्रचंड प्रभाव असलेला हा माणूस होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोणीही वाढीव शेतसारा भरला नाही. त्यांच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून गावोगावच्या अनेक पाटील आणि तलाठ्यांनी राजीनामे दिले. इंग्रज सरकार आणि इंग्रज अधिकारी या सगळ्या एकजुटीपुढे हतबल झाले. शेवटी सरकारला चौकशी समिती नेमावीच लागली. या समितीच्या शिफारशीवरून शेतसारा २२ टक्क्यांवरून ५. ७ टक्क्यांवर आणण्यात आला. राजीनामा दिलेल्या तलाठी आणि पाटलांना पुन्हा कामावर घेण्यात आले. जप्त केलेल्या जमिनी पुन्हा परत करण्यात आल्या. या सगळ्या घटनांवर पटेल बारकाईने लक्ष ठेवून होते. कोणावरही अन्याय होणार नाही याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले.
पटेलांच्या लढ्याला मिळालेला हा मोठाच विजय होता. म गांधी, मोतीलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी नेत्यांनी वल्लभभाईंच्या लढ्याचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या एका सभेत एका शेतकऱ्याने उठून त्यांना म्हटले, ' तुम्ही आमचे सरदार आहात. ' हा त्यांचा सगळ्यात मोठा गौरव होता. ' सरदार ' हा एक छोटासा शब्द. पण त्यात केवढा विशाल अर्थ भरला आहे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारा, हजारो शेतकऱ्यांना एका सूत्रात बांधणारा आणि त्यांचा सत्याग्रह शांततेच्या आणि शिस्तीच्या मार्गाने यशस्वी करून दाखविणाऱ्या या व्यक्तीला ' सरदार ' ही सार्थ पदवी होती. या बार्डोलीच्या सत्याग्रहाने पटेलांच्या नेतृत्वाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. आता केवळ गुजरातमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर ते सरदार वल्लभभाई पटेल म्हणून ओळखले जाऊ लागले.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३०/१२/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा