मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पाच

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पाच 

सरदार पटेलांसारखे जे नेते असतात, त्यांना काही कौशल्ये जन्मजात लाभलेली असतात. एखादा प्रश्न मुळापासून सोडवणे, समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करून लोकांना दिलासा देणे, एखादा प्रश्न, समस्या किंवा योजना नियोजनबद्ध रीतीने मार्गी लावणे आणि असे करण्यात जर काही अडथळे येणार असतील तर त्यांची पर्वा न करता मोठ्या धाडसाने त्या गोष्टींना सामोरे जाणे ही त्यांची खासियत होती. असे नेते जनतेला लाभणे हे खरे म्हणजे जनतेचे भाग्यच !

१९२१ मध्ये अहमदाबादमध्ये जे काँग्रेसचे अधिवेशन भरले, त्यात पटेलांचे व्यवस्थापन कौशल्य प्रामुख्याने दिसून आले. या अधिवेशनाला तत्कालीन काँग्रेसचे प्रमुख नेते तर उपस्थित राहणारच होते पण देशाच्या विविध भागातून आणि ग्रामीण भागातून सुमारे पंधरा हजार लोक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार होते. या अधिवेशनाचे नियोजन करण्याची जबाबदारी पटेलांनी घेतली. त्यांनी या अधिवेशनाचे इतके सुरेख नियोजन केले की कोणताही गोंधळ न होता हे अधिवेशन सुरळीतपणे पार पडले. शिवाय आपल्या कार्यकर्त्यांना  त्यांनी एखाद्या कामाचे नियोजन कसे करावे याचा आदर्श घालून दिला. अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारला गेला, सर्व प्रतिनिधींसाठी पाणी, जेवणाची व्यवस्था केली गेली. व्यासपीठावरील नेत्यांसह सगळ्यांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली . इतक्या सगळ्या लोकांच्या चपलांचा प्रश्न मोठा होता. कार्यक्रमानंतर चपला घेण्यासाठी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता होती. याचे पटेलांनी मोठ्या हुशारीने नियोजन केले. त्यांनी प्रत्येक माणसाला आपल्या चपला आपल्यासोबत ठेवण्यासाठी एक कापडी पिशवी देण्याची व्यवस्था केली. त्या पिशवीसाठी अगदी अल्प असे शुल्क त्यांच्याकडून घेण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमानंतर लोकांचा आपल्या चपला शोधण्यासाठी होणारी धावपळ तर टळलीच शिवाय त्यातून जो निधी प्राप्त झाला, त्याचा वापर पटेलांना पुढे पक्षकार्यासाठी करता आला. या अधिवेशनाने काँग्रेसला एक देशव्यापी पक्ष म्हणून महत्व प्राप्त करून दिले. 

आता स्वातंत्र्य चळवळीने जोर पकडला होता. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जोर धरत होती. काँग्रेसचे कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन मिरवणुका काढत होते. नागपूर जिल्ह्यात ही चळवळ जोरात होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांना आता त्याची धास्ती वाटू लागली होती. त्यातूनच त्यांनी कधी तिरंगा घेऊन मिरवणूक काढण्याला बंदी, तर कधी संचारबंदी यासारखे आदेश लागू केले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना तिरंगा घेऊन मिरवणुकीची परवानगी मिळावी यासाठी पटेलांनी नागपुरात आंदोलन केले. त्यांनी गावोगावातील कार्यकर्त्यांना या सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन केले. देशभरातून कार्यकर्ते त्यात सामील होण्यासाठी येऊ लागले. त्याचेही नियोजन पटेलांनी केले. दररोज सुमारे पन्नास कार्यकर्ते यायचे आणि स्वतःला अटक करून घ्यायचे. अशा सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांना ब्रिटिशांनी अटक केली. शेवटी या चळवळीचा वाढता जोर पाहून सरकार नमले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना तिरंगा घेऊन मिरवणूक काढण्याची परवानगी तर दिलीच शिवाय तुरुंगातील कार्यकर्त्यांनाही मुक्त केले. हा सरदार पटेल यांच्या कार्यपद्धतीचा मोठाच विजय होता. पण त्यांनी याचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. हे श्रेय त्यांनी जनतेला आणि ब्रिटिश सरकारला दिले. 

याच सुमारास गुजरातमध्ये बोरसद आणि परिसरात दोन दरोडेखोरांनी जनतेला वेठीस धरले होते. हे दोन्हीही दरोडेखोर अत्यंत क्रूर होते. त्यांनी निर्दयपणे अनेक हत्या केल्या होत्या. इंग्रज सरकार मात्र हातावर हात धरून बसले होते आणि या दरोडेखोरांना लोकच आश्रय देतात असा उलट आरोप करत होते. लोक मात्र त्रस्त झाले होते. दरोडेखोरांच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस नेमून त्याचा खर्च कररूपाने तेथील जनतेवरच सरकारने लादला. पटेलांनी याही ठिकाणी लोकांना एकत्र करून लोकांना धीर दिला. अतिरिक्त पोलीस आणि त्यासाठीचा करही आम्ही भरणार नाही असे पटेलांच्या नेतृत्वात लोकांनी जाहीर केले. लोक स्वतःच एकत्र येऊन आपल्या परिसराचे संरक्षण करू लागले. याचा परिणाम दरोडेखोरांवर तर झालाच शिवाय इंग्रज सरकारने आपण लावलेले कर मागे घेतले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना रजेवर पाठवले. हा पटेलांचा मोठाच विजय होता. पण याचे श्रेय त्यांनी जनतेच्या धैर्य, एकी इ गुणांना दिले. 

पटेल स्वातंत्र्य चळवळींचे यशस्वी नेतृत्व करीत असताना अशा प्रकारे अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका सुरूच होती. १९२३ मध्ये गुजरातच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी पूर येऊन हजारो गावकऱ्यांची घरे उध्वस्त झाली. गावात आणि घराघरात पाच ते सहा फूट होते. पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी अनेकांनी झाडावर चढून आश्रय घेतला. अनेकांना अन्नपाण्याशिवाय अनेक दिवस राहावे लागले. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पटेल लोकांच्या मदतीला देवासारखे धावून गेले. त्यांनी कार्यकर्त्यांचे नियोजनबद्ध जाळे उभारून प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत मदत पोहोचेल अशा रीतीने काम केले. कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत करू लागले. 

या सगळ्या काळात इंग्रज सरकार मात्र कासवगतीने हालचाल करीत होते. पटेलांनी वेळेवर नियोजन करून मदत केली नसती तर जनतेला कोणी वाली राहिला नसता. पटेलांच्या कार्याचे देशभर कौतुक झाले. पण पटेलांना प्रसिद्धी वा कीर्ती नको होती. त्यांना कार्य करण्यात रस होता. त्यांच्या कार्याची बातमी इंग्लंडपर्यंत पोहोचली आणि इंग्लंडच्या राजानेही मदत जाहीर केली. इंग्रज सरकारलाही जाग येऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. पण पटेलांनी लोकांना कोणतीही गोष्ट मोफत घेऊ नका असे आवाहन केले. फुकट मिळणाऱ्या गोष्टींसाठी लोकांनी लाचार होऊ नये असे त्यांना वाटत होते.  सरकारलाही त्यांनी लोकांना मदत देण्यापेक्षा आवश्यक त्या गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध करून द्या असे आवाहन केले. 

( क्रमशः - पुढील भाग बुधवारी )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...