उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग चार
आजच्या या भागात सरदार पटेल खेडा सत्याग्रहातून एक नेते म्हणून कसे पुढे आले हे आपण पाहणार आहोत. गुजरातमधील खेडा सत्याग्रह ही जशी भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक अतिशय महत्वाची घटना आहे , तशीच सरदार पटेलांच्या जीवनातील सुद्धा. या लढ्याने त्यांना भारतीय स्तरावर नेते म्हणून एक वेगळी ओळख मिळवून दिली .
गांधीजींची आणि सरदार पटेलांची भेट झाली तेव्हा सरदार पटेल हे ४२ वर्षांचे होते, तर गांधीजी ४८ वर्षांचे. त्यावेळी गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परत आले होतेआणि भारतात त्यांचे प्रचंड स्वागत झाले होते. अनेकांनी गांधीजींचे शिष्यत्व पत्करले होते. त्यात पंडित नेहरू, सी राजगोपालचारी यांच्यासारखे नेते तर होतेच पण सर्वसामान्य जनताही गांधीजींची अनुयायी बनली होती. काही मंडळी गांधीजींच्या कार्याने भारावून जाऊन त्यांची अनुयायी झाली होती, तर काही विचारपूर्वक. सरदार पटेलांनी गांधीजींचे शिष्यत्व विचारपूर्वक स्वीकारले. त्यांची वकिली ऐन भरात असताना आणि त्यांच्यावर त्यांच्या दोन लहान मुलांची जबाबदारी असताना, सगळा त्याग करून देशासाठी वाहून घेणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नक्कीच नव्हती. पण तो त्याग पटेलांनी केला.
गांधीजींच्या सहवासात पटेल अंतर्बाह्य बदलले. त्यांची कोट, शर्ट, फेल्टहॅट जाऊन आता त्या जागी पुन्हा पूर्वीचाच साधा पोशाख आला. आता ते धोतर, कुर्ता, जाकीट या पेहरावात वावरू लागले. पायातले साहेबी बूट जाऊन वहाणा आल्या. गांधीजींना प्रिय असलेल्या अहिंसा, शांतता, सत्याग्रह आदी तत्वांचा ते पुरस्कार करू लागले. अर्थात पटेलांनी स्वाभिमानाशी कधीही तडजोड करायला नकार दिला हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. गांधीजींना सुद्धा पटेल यांचा कडक, शिस्तप्रिय स्वभाव कमालीचा आवडला. आपल्या आंदोलनाचे नेतृत्व पटेलच उत्तम प्रकारे चालवू शकतील याची त्यांना खात्री होती. म्हणूनच खेडा सत्याग्रहाचे प्रमुख म्हणून त्यांनी पटेलांवर जबाबदारी सोपवली. ही निवड पटेलांनी सार्थ ठरवली. एखादा नेता आपले अनुयायी किंवा कार्यकर्ते कसे निवडतो, यावर त्याच्या नेतृत्वाचा दर्जा अवलंबून असतो असे गांधीजी म्हणायचे. सरदार पटेलांनी आपल्या कार्यकर्ते आणि अनुयायांची अशी कार्यक्षम, शिस्तशीर आणि भक्कम फळी उभी केली की पुढे तीन दशके स्वातंत्र्यलढ्यात या सगळ्यांनी मोठे योगदान दिले.
गांधीजींना आपण नेमलेल्या या नेत्यावर कधीही पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. उलट त्यांनी वेळोवेळी पटेलांचे कौतुकच केले. सरदार पटेलांची ही निवड आणखी एका अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण होती. गांधीजींनी सत्याग्रहाचे नेतृत्व ना देशातील जनतेला प्रिय असलेल्या नेहरूंवर सोपवले ना सी राजगोपालाचारी यांच्यासारख्या नेत्यावर. त्यासाठी त्यांनी पटेलांची निवड केली आणि गांधीजींचा विश्वास पटेलांनी सार्थ ठरवला.
गुजरातमधील खेडा सत्याग्रह अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आणि गांधीजींनी केलेल्या चंपारण्य सत्याग्रहापेक्षा वेगळा होता. चंपारण्य सत्याग्रह फक्त नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध होता. खेडा सत्याग्रहाला मात्र व्यापक परिमाण लाभले होते. गुजरातमध्ये १९१७ साली झालेल्या प्रचंड पावसानं ओला दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला होता. रब्बीचे पीकही म्हणावे तसे हाती लागले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच ब्रिटिश शासनाने सारावसुलीची मोहीम सक्तीने राबवण्यास सुरुवात केली. शेतकरी अशा रीतीने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत होता.
गांधीजी आणि पटेलांच्या नेतृत्वाखाली अठरा हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र सरकारला पाठवण्यात आले. त्यांची मागणी फक्त एवढीच होती की दुष्काळामुळे शेतकरी शेतसारा भरू शकत नाहीत. तेव्हा ही शेतसारा वसुली लांबणीवर टाकण्यात यावी. पण संवेदनाहीन ब्रिटिश सरकारने या शेतकऱ्यांच्या मागणीला आणि गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एवढे करून थांबेल ते इंग्रज सरकार कसले ! त्यांनी सारावसुली अधिक सक्तीची करून शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार सुरु केले. शेतसारा भरण्यासाठी काही शेतकऱ्यांना कर्जाने पैसा घ्यावा लागला. घरातील मुलाबाळांना उपाशी ठेवून हे कर्ज फेडावे लागले. काहींवर आपल्या जमिनी गहाण टाकण्याची वेळ आली . काहींच्या जमिनी सरकारने जप्त केल्या. एवढे करूनही सरकारचे समाधान झाले नाही तेव्हा घरातील दुभती जनावरे जप्त करण्यापर्यंत सरकारची मजल गेली.
आता मात्र गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या हाती सत्याग्रह करण्यावाचून पर्याय राहिला नाही. ८मार्च १९२२ रोजी गांधीजींनी सत्याग्रहाची घोषणा केली. या लढ्यामध्ये गुजरातमधील सहाशे गावातील शेतकरी सहभागी झाले. या सत्याग्रहात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. या महिला आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीशी सत्याग्रह करण्यासाठी, त्यात भाग घेण्यासाठी उभ्या राहिल्या. हे गांधीजी आणि पटेल यांच्या नेतृत्वाचे यश होते. या सत्याग्रहाच्या दरम्यान गांधीजींना काही कामासाठी इंदोर, दिल्ली येथे जावे लागले.
या काळात सत्याग्रहाची धुरा पूर्णपणे पटेलांच्या खांद्यावर होती. या काळात सरदार पटेल तहान भुकेची पर्वा न करता गावोगाव फिरले. अत्यंत कडक उन्हाचा त्यांना सामना करावा लागला. बऱ्याच वेळेला त्यांना पायी चालत जावे लागले. गावागावात फिरून त्यांनी लोकांचे मनोधैर्य टिकवून ठेवले. त्यांनी केलेल्या भाषणांमुळे लोकांमध्ये नवचैतन्य फुंकले गेले. त्यांनी लोकांना शेतसारा भरू नका असे आवाहन केले. ते आपल्या भाषणात लोकांना गाढवाचे उदाहरण देत असत. ' गाढव ओझं सहन करते. मालक त्याच्यावर एक मण ओझं लादतो. ते गाढवाने सहज वाहून नेलं की तो मग दीड मण ओझं लादतो. मालकाच्या अपेक्षा वाढत जातात. गाढवाच्या कष्टाची, त्रासाची त्याला जाणीव असत नाही. तुम्हीही हे तुमच्यावर लादलेलं शेतसाऱ्याचं ओझं फेकून द्या. सत्याग्रहाची ही ठिणगी उद्या देशभक्तीची मशाल होईल. तुम्ही आज जो त्याग आणि कष्ट सहन करत आहात, त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल. भारत देश तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. तुम्ही नवभारताचे निर्माते आहात. ' पटेलांच्या या शब्दांनी लोकांवर जादू केली. हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले. या गोष्टीची दखल ब्रिटिश शासनाला घ्यावीच लागली. सुमारे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर शेतसारा वसुली थांबविण्यात आली आहे असे सरकारने जाहीर केले.
हा सत्याग्रहींचा मोठाच विजय होता. त्यामुळे संपूर्ण देशभरात देशभक्तीची लहर उसळली. गांधीजींनी या यशाचे श्रेय सरदार पटेलांच्या नेतृत्वाला दिले. तर पटेलांनी या यशाचे श्रेय जनतेला आणि शेतकऱ्यांना दिले. या सत्याग्रहाने पटेलांचे नाव संपूर्ण देशभर पसरले आणि गांधी, नेहरू, टिळक यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत ते सन्मानाने जाऊन बसले. ( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/१२/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा