उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तीन
वल्लभभाई बोरसदला वकिली करत असताना त्या ठिकाणी कधी कधी इंग्लंडहून कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आलेले बॅरिस्टर खटला चालवण्यासाठी येत असत. त्यांचा रुबाब काही वेगळाच असे. इतर सामान्य वकिलांना ते तुच्छ समजत. शिवाय ते इतर वकिलांपेक्षा जास्त फी आकारत. त्यांचे हे वागणे वल्लभभाईंना सहन होणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनीही बॅरिस्टर बनण्याचा निर्धार केला. वल्लभभाईंनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की त्यापासून त्यांना कोणी परावृत्त करू शकत नसे. शिवाय ते अत्यंत कमी बोलत. आपण काय करायचे ठरवले आहे याची जाहीर वाच्यता ते कधीच करत नसत. त्यामुळे त्यांच्या बॅरिस्टर बनण्याच्या निर्णयापासून घरची मंडळी देखील अनभिज्ञ होती.
त्यांच्याजवळ बॅरिस्टर होण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धिमत्ता होती. पण सामान्य कुटुंबातून आल्यामुळे पैशाचा अभाव होता. बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना इंग्लंडला जावे लागणार होते. त्यासाठी त्या काळात किमान दहा हजार रुपयांची आवश्यकता होती. त्यांनी आपल्या खर्चात काटकसर करून वकिलीतून मिळणाऱ्या पैशातून ती रक्कम जमा करायला सुरुवातही केली होती. आपल्याला इंग्लंडला जाण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून अर्जही केला होता. पण त्यावेळी विधिलिखित वेगळेच होते. त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा व्ही जे पटेल या नावाने आला आणि पोस्टमनने तो नामसाधर्म्यामुळे त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई याना दिला. विठ्ठलभाईंनाही बॅरिस्टर होण्याची इच्छा होतीच. त्यामुळे आपण मोठे बंधू असल्याच्या अधिकाराने त्यांनी इंग्लंडला जाण्याचे ठरवले. वल्लभभाईंचा त्या वेळी इंग्लंडला जाण्याचा प्लॅन बारगळला. पण त्यांनी मोठ्या मनाने आपल्या भावाला जाण्यासाठी परवानगी दिली एवढेच नव्हे तर त्याच्या जाण्यासाठी लागणारा खर्चही केला.
विठ्ठलभाई परत आल्यानंतर १९०९ मध्ये त्यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. आतापर्यंत पारंपरिक धोतर, फेटा वापरणाऱ्या वल्लभभाईंनी इंग्रजी वेष परिधान केला. बोटीने प्रवास सुरु झाला. ध्येयाचा ध्रुवतारा मात्र सदैव डोळ्यांसमोर होता. त्यामुळे इतर सर्व मोहाचे क्षण बाजूला सारून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. इंग्लंडला पोहोचण्यापूर्वीच त्यांचा ' रोमन लॉ ' चा अभ्यास पूर्ण झाला होता. इंग्लंडला पोहोचल्यावर त्यांनी अगदी साधारण असलेल्या वसतिगृहात राहून अभ्यास केला. पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. तेथून जवळ असलेल्या एका ग्रंथालयात त्यांची पुस्तके आणि अभ्यास करण्याची सोय मात्र झाली. या ग्रंथालयात जाण्यासाठी वल्लभभाईंना दहा ते बारा किमी चालत जावे लागे. पण आपले ध्येय गाठण्यासाठी रोजचे हे अंतर ते सहज आणि आनंदाने पार करत. लवकरच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी कायद्याचा उच्च अभ्यास पूर्ण केला. ' रोमन लॉ ' या विषयात ते पहिले आले. बॅरिस्टरची पदवी मिळवून १९१३ मध्ये ते मायदेशी परतले.
आता अहमदाबाद त्यांना खुणावत होते. शर्ट, पॅन्ट, कोट, डोक्यावर फेल्ट हॅट या पोशाखात त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसत होते. त्यातच त्यांचे भेदक डोळे, चेहेऱ्यावरचा करारीपणा आणि निर्धार आणि डोळ्यातील बुद्धिमतेची चमक समोरच्या व्यक्तीवर लगेचच प्रभाव पाडणारी होती. त्यांचा युक्तिवाद बिनतोड असायचा. त्यांची उलटतपासणी अगदी कसलेल्या साक्षीदाराचीही भंबेरी उडवून देत असे. त्यांच्या निर्भय, निष्पक्ष वागण्यामुळे प्रसंगी ते न्यायाधीशांना सुद्धा दोन शब्द सुनावण्यास कमी करत नसत. बॅरिस्टर म्हणून लवकरच त्यांनी आपले वेगळे स्थान अहमदाबादला प्रस्थापित केले.
त्यांचा राजकारणात प्रवेश सुद्धा योगायोगाने झाला. ते अहमदाबादला वकिली करत असताना १९१४ मध्ये एक नवा पालिका कायदा आला. या नवीन कायद्याद्वारे सरकारला पालिकेवर आय सी एस झालेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करता येणार होती. या द्वारे निवडून आलेल्या सदस्य मंडळावर नियंत्रण ठेवून पालिकेचा कारभार आपल्या ताब्यात घेणे हा सरकारचा अंतःस्थ हेतू होता. त्यानुसार सरकारने एका शिलिडी या नावाच्या अधिकाऱ्याची पालिकेवर आयुक्त म्हणून नेमणूक केली. या अधिकाऱ्याने त्याला मिळालेल्या अधिकारात सर्व नियमांची पायमल्ली करून वारेमाप खर्च करायला सुरुवात केली. यामुळे पालिकेचे प्रशासन पुरते ढवळून निघाले. शिवाय स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था बिघडली. शहरात अनागोंदी माजली. अशा या अधिकाऱ्याला पायबंद घालण्यासाठी तशाच कार्यक्षम व्यक्तीची गरज होती. आणि ती व्यक्ती वल्लभभाईंच्या रूपाने लोकांना दिसली.
वल्लभभाई पालिकेच्या निवडणुकीत निवडून आले आणि अशा रीतीने प्रथमच राजकारणात त्यांचा योगायोगाने प्रवेश झाला. या अधिकाऱ्याला वठणीवर आणण्याचे आव्हान वल्लभभाईंनी स्वीकारले. सर्वप्रथम त्यांनी निवडून आलेल्या सदस्यांना एकत्र केले. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. स्वत्व आणि स्वाभिमान हरवलेल्या सदस्यांमध्ये त्यांनी लढण्याची ठिणगी प्रज्वलित केली. या अन्यायाशी लढायचे असेल तर मनातली भीती प्रथम काढून टाकली पाहिजे असे त्यांनी या लोकांना सांगितले. त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते आपण सर्वांनी पण मनन करण्यासारखे आहे. ते म्हणतात-
“सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकानेतुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”
वल्लभभाईंनी वैधानिक मार्गांचा वापर करून त्या अधिकाऱ्याच्या अधिकारांवर , खर्चावर मर्यादा आणली. सभागृहात ठराव करून सदस्यांनी मान्यता दिलेले टेंडर पास करणे त्याला बंधनकारक केले. या शिलिडी नावाच्या अधिकाऱ्याने पुढे आणखी चुका आणि अन्याय केले. वल्लभभाईंनी त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे एकत्रित करून पालिकेच्या बोर्डाद्वारे त्याला बडतर्फ करावे अशी शिफारस केली. वल्लभभाईंचे म्हणणे सरकारला मान्य करावे लागले आणि शिलीडीची गच्छंती अटळ झाली. हा वल्लभभाईंचा खूप मोठा विजय होता.
यानंतर वल्लभभाईंची गाठ प्राट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याशी पडली. पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या शाळा आणि परीक्षांचे अधिकार काढून घेण्याचा त्याचा डाव होता. हा डाव वल्लभभाईंनी इतका पद्धतशीरपणे हाणून पाडला की सरकारला शाळा पालिकेकडेच सुपूर्द कराव्या लागल्या. हा त्यांचा दुसरा मोठा विजय होता.
याच सुमारास म. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. त्यांच्या तेथील यशस्वी लढ्यामुळे गांधीजींकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. गांधींच्या व्यक्तिमत्वाला एक तेजस्वी वलय प्राप्त झाले होते. गांधीजी भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. गांधीजींनी भारतात आल्यावर अहमदाबादलाच साबरमती काठी आपला आश्रम स्थापन केला. लोकमान्य टिळकांच्या ' स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ' या मंत्राने देशभरातील वातावरण भारलेले होते. त्याच दिशेने गांधीजींची पावले पडत होती. त्यांनी चंपारण्याचा सत्याग्रह केला आणि तो यशस्वी झाला. त्यांच्या या लढ्याने गांधीजी शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, जनसामान्यांचे एक मोठे नेते म्हणून पुढे आले. या सर्व गोष्टींचा वल्लभभाईंवर खूप मोठा प्रभाव पडला. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वल्लभभाईंनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करण्याचे ठरवले. हा त्यांनी अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. ( क्रमशः )
( पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२०/१२/२०२०

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा