मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दोन

  उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दोन 

सरदार पटेलांचा जन्म नाडियाड या त्यांचं आजोळ असलेल्या गावी झाला. ३१ ऑक्टोबर १८७५ ही त्यांची जन्मतारीख. पटेलांच्या जन्माचा काळ भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने धामधुमीचा होता. स्वातंत्र्य चळवळींनी आणि घडामोडींनी मंतरलेला होता. त्यांचे वडील झव्हेरीभाई हे देशभक्त होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात त्यांनी भाग घेतलेला होता. १८७५ मध्येच बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदेमातरम लिहून अनेक देशभक्तांना प्रेरणा दिली होती. १८८५ मध्ये अॅलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती. अशा या काळात सरदार पटेलांचा जन्म झाला. 

त्यांचं मूळ गाव होतं आणंद जवळील करमसाद. या गावी त्यांची वडिलोपार्जित शेती होती. असे असले तरी पटेलांचे कुटुंब सामान्य परिस्थितीतच दिवस कंठत होते. सरदार पटेलांना चार भाऊ होते. त्यांच्यापेक्षा मोठे तीन आणि एक लहान भाऊ. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण करमसाद या त्यांच्या गावीच झाले. पुढे मात्र ते शिक्षणासाठी नडियादला आणि त्यानंतर बडोद्याला गेले. 

त्यांचे वडील झव्हेरीभाई  हे उंचपुरे आणि मजबूत शरीरयष्टी असलेले होते. तसेच त्यांचे बोलणेही स्पष्ट असायचे. त्यांच्या नजरेत जरब होती. हेच गुण अनुवंशाने वल्लभभाईंमध्ये उतरले होते. त्यांची आई एक साधी सरळ गृहिणी होती. ती शिकलेली नव्हती, पण स्वच्छता, टापटीप हे गुण तिच्यातील गुण सरदार पटेलांनी घेतले होते. त्यांची आई धार्मिक वृत्तीची होती. ती त्यांना लहानपणी रामायण, महाभारतातील गोष्टी सांगे. या गोष्टी ऐकून त्यांना न्याय, सदाचार या गोष्टींबद्दल आदर तर अन्याय,अत्याचार याबद्दल चीड निर्माण झाली. याचा प्रत्यय त्यांच्या वागण्यात शालेय जीवनापासून दिसून आला. संघटन कौशल्य, नेतृत्व या गुणांची देणगी तर त्यांना जन्मजात लाभली होती आणि त्याची चुणूक त्यांच्या लहानपणापासूनच दिसून येत होती. 

करमसाद येथे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नडियादला पाठवले. या शाळेतील एक शिक्षक अगदी लहानसहान कारणावरून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करीत. मुळातच बंडखोर प्रवृत्ती असलेल्या आणि अन्यायाविरुद्ध चीड असलेल्या वल्लभभाईंना ही गोष्ट सहन होणे शक्यच नव्हते. त्यांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचे ठरवले. शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचा सत्याग्रह घडवून आणला. तीन दिवस मुले वर्गात बसली नाहीत. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली. त्या शिक्षकांची कानउघाडणी केली आणि यापुढे विद्यार्थ्यांना मारहाण होणार नाही असे आश्वासन दिले. हा सरदार पटेलांच्या जीवनातील पहिला सत्याग्रह होता. पुढेही असे अनेक प्रसंग आले. त्यांच्या नेतुत्वगुणांमुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके नेते बनले एवढेच नाही तर अनेक शिक्षकांचीही ते आवडते विदयार्थी बनले. 

न्यायी, विद्वान आणि प्रामाणिक शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता. असेच एकदा ते नडियादला शिकत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली. या निवडणुकीत एक शिक्षक उभे होते. त्यांच्याविरुद्ध गावातीलच एक धनाढ्य व्यक्ती उभी होती. ती व्यक्ती त्यांची शिक्षक म्हणून त्यांची हेटाळणी करत होती. ते त्या शिक्षकांना म्हणाले, ' तुम्ही कसे निवडून ते मी पाहतो. तुम्ही निवडून आलात तर मी माझ्या मिशा उतरवून ठेवेन. ' त्या काळात मिशा ठेवणे हे प्रतिष्ठेचे मानले जाई. वल्लभभाईंना जेव्हा हे कळले तेव्हा ते त्या शिक्षकांकडे गेले. त्यांना म्हणाले, ' तुम्ही कोणतीही काळजी करू नका. माघार तर मुळीच घेऊ नका. ' वल्लभभाईंनी सगळ्या विद्यार्थ्यांची एकजूट घडवून आणून त्या शिक्षकांचा जोरदार प्रचार केला आणि ते शिक्षक निवडून आले. वल्लभभाई मग सुमारे पन्नासेक विद्यार्थ्यांना घेऊन त्या धनाढ्य माणसाच्या घरी गेले. सोबत न्हावी पण घेऊन गेले आणि त्या व्यक्तीला कबूल केल्याप्रमाणे मिशा उतरवायला भाग पाडले. 

त्यांचा शिक्षकांप्रती असलेला हा आदर पुढेही अनेक प्रसंगातून दिसून आला. पुढे एकदा ते काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष असताना ते बडोद्याला काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना इंग्रजी शिकवत असणारे शिक्षक मंचरेशा वाडिया त्यांना भेटू इच्छितात असे त्यांना कळले. तेव्हा ते स्वतःच त्या शिक्षकांना भेटायला निघाले. त्या शिक्षकांची आणि त्यांची रस्त्यात भेट झाली. पटेलांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्या शिक्षकांना इतका आनंद झाला की त्यांनी पटेलांना आनंदाने मिठी मारली. 

त्या काळात मॅट्रिक झालेल्या व्यक्तीला कायद्याच्या दोन परीक्षा देऊन वकील होता येत असे. वल्लभभाईंनी हा मार्ग निवडला. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर या परीक्षा सहज उत्तीर्ण होऊन ते वकील बनले. त्यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई त्यांच्याआधीच वकील झाले होते. विठ्ठलभाईंनी आणि अन्य काही ज्येष्ठ वकील मित्रांनी त्यांना आपल्याकडे सहकारी वकील म्हणून काम करण्याची विनंती केली. पण त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला हे मानवणारे नव्हते. म्हणून त्यांनी गोध्र्याला स्वतंत्रपणे आपला वकिली व्यवसाय सुरु केला. त्यात लवकरच त्यांचा चांगला जम बसला. 

पुढे काही काळानंतर ते बोरसद या तालुक्याच्या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांना फौजदारी स्वरूपाच्या केसेस मिळू लागल्या. खून, दरोडे, मारामारी इ गुन्ह्यांचे प्रमाण त्या भागात मोठ्या प्रमाणावर होते. इंग्रज न्यायाधीश, वकील आणि पोलीस स्थानिक लोकांना असल्या गुन्ह्यांमध्ये बऱ्याच वेळा निष्कारण अडकवत असत. वल्लभभाईंनी अशा लोकांच्या केसेस घेणे सुरु केले. कायद्याचा, घडलेल्या गुन्ह्यांचा ते बारकाईने अभ्यास करीत. त्यांच्या युक्तिवादापुढे टिकाव धरणे सरकारी वकील, पोलीस आदींना शक्य होत नसे. त्यामुळे पोलिससुद्धा त्यांना वचकून असत. एकदा तर बोरसदला एक अशी घटना घडली की ज्यामुळे वल्लभभाईंचा वकील म्हणून असणारा दरारा आणखी वाढला. एकदा तेथील न्यायाधीश आपल्या आसनावर बसताना आपला नेहमीचा गाऊन घालायला विसरले. त्यांनी वल्लभभाईंना आपला युक्तिवाद सादर करण्यास सांगितले. तेव्हा वल्लभभाई म्हणाले, ' युक्तिवाद कोणापुढे करायचा ? न्यायाधीश महोदयांनी योग्य पोशाख केला नसल्याने हे न्यायालय असू शकत नाही.' या त्यांच्या बोलण्याने न्यायाधीश चपापले. त्यांनी वल्लभभाईंची माफी मागितली आणि अंगावर गाऊन चढवून पुन्हा येऊन बसले. न्यायाधीशांना असे खडे बोल सुनावण्याची हिंमत यापूर्वी कोणी केली नव्हती. या घटनेमुळे त्यांचा वकील म्हणून दबदबा आणखीनच वाढला. हाच स्पष्टवक्तेपणा आणि बाणेदारपणा त्यांना आपल्या पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला. 

याच सुमारास एक दुर्दैवी घटना मात्र घडली. ते बोरसदला वकील म्हणून उत्तम काम करीत असताना त्यांची पत्नी जव्हेरबाई यांचे एका छोट्याशा आजाराने दुःखद निधन झाले. यावेळी त्यांना मणिबेन ही मुलगी आणि डाह्याभाई हा मुलगा अशी दोन अपत्ये होती. ही मुले अवघी चारपाच वर्षांची असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले आणि मुले पोरकी झाली. यावेळी वल्लभभाईंचे वय अवघे तेवीस वर्षांचे होते. सगळ्यांनी त्यांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला तरी वल्लभभाईंनी यापुढे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

( क्रमशः - पुढील भाग रविवारी )

विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१८/१२/२०२०

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...