उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एक
कालच म्हणजे १५ डिसेंबरला सरदार पटेलांची पुण्यतिथी होती. आजपासून आपण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आढावा घेणार आहोत. भारताचे पहिले गृहमंत्री, उपपंतप्रधान, एक सच्चे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे सरदार पटेल. त्यांच्याविषयी मी जसजसे वाचू लागलो, तसतसे या व्यक्तिमत्वाने मला अधिकाधिक प्रभावित केले. मग त्यांचा गुजरातमधील अलीकडेच उभारण्यात आलेला पुतळा ' द स्टॅच्यू ऑफ युनिटी ' माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यांचे कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे यथार्थ प्रतीक म्हणजे स्टॅचू ऑफ युनिटी.
स्वातंत्र्यपूर्वकाळ आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड म्हटला की काही ठळक नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात प्रामुख्याने पंडित नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यासारख्या व्यक्ती प्रमुख आहेत. या सगळ्या महान पुरुषांच्या यादीत सरदार पटेलांचे नाव घेतल्याशिवाय कोणताही इतिहासाचा लेख पूर्ण होऊ शकणार नाही, एवढे मोठे कर्तृत्व सरदार पटेलांचे आहे. हा काळ कोणाला गांधीयुग वाटतो, तर कोणाला नेहरू युग. तसाच हा काळ पटेल युगही म्हणायला हरकत नसावी. कारण सरदार पटेल हे गांधीजींच्या सत्याग्रहाची कल्पना राबवणारे प्रभावी कप्तान होते. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाने देशात विलीन करून सरदार पटेलांनी भारतीय स्वातंत्र्याला एक नवा अर्थ प्राप्त करून दिला. ही संस्थाने भारतात विलीन झाली नसती तर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे म्हणता आले नसते.
ही सगळी संस्थाने एकहाती स्वतंत्र भारतात विलीन करण्याचे श्रेय सरदार पटेलांचे आहे. त्यामुळे पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठीचा मार्ग निष्कंटक झाला. ही संस्थाने जर स्वातंत्र्यपूर्वी भारतात विलीन झाली नसती, तर ती स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली असती. त्यांच्याशी लढताना स्वतंत्र भारताचा वेळ आणि पैसा खर्च झाला असता. पंडित नेहरू आणि महात्मा गांधी ही निःसंशय मोठी व्यक्तिमत्वे. पण त्यांना जे यश मिळाले त्यामागे सरदार पटेलांचा पोलादी हात होता. काही माणसं बाजी जिंकून देणारी असतात. तसेच नेहरू आणि गांधीजींच्या कार्यात त्यांची बाजू जिंकून देणारे हे व्यक्तिमत्व.
त्यांच्या बोलण्यात जरब होती. नजरेत वाघासारखी दहशत. त्यामुळे मोठमोठे संस्थानिक, इंग्रज अधिकारी सरदार पटेलांना वचकून असत. त्यांच्याजवळ हा लांबचा आणि तो जवळचा असा भेदभाव नसे. सगळ्यांना सारखी वागणूक आणि सगळ्यांना समान न्याय. एकदा का त्यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन जायची. मात्र वरवर कठोर वाटणाऱ्या या महापुरुषाचे अंतःकरण तितकेच मृदू आणि संवेदनशील होते. अशा या महापुरुषाचे चरित्र आपण पुढील काही भागात पाहणार आहोत. ( पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१६-१२-२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा