उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग दोन
धुळ्याला आल्यानंतर तेथील आवाहनात्मक कामे जणू त्यांची वाटच पाहत होती. दातर्तीच्या पाटाचे काम आणि धुळे शहराचा पाणीपुरवठा यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते पावसाळ्याचे दिवस होते. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अशा वेळी त्यांची कसोटी लागणार होती. त्यांनी नदीच्या पात्राखालून पाईपलाईन टाकून , त्यात सायफन किंवा वक्रनलिकेचे तत्व वापरून ह्या दोन्ही योजना पूर्ण केल्या. धुळे शहरात त्यांचे वास्तव्य फक्त सोळा महिने होते, पण या अल्प कालावधीत आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला. त्या कामांना आज एकशे तीस वर्षांच्या वर कालावधी लोटला आहे. पण अजूनही त्या योजना वापरात आहेत. पुढे त्यांनीआपल्या कल्पकतेने अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले पण आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी केलेला या परिसराचा कायापालट चिरस्मरणीय आहे.
आपल्या कारकिर्दीचा त्यांचा पुढील यशस्वी टप्पा म्हणजे पुणे येथे राबवलेल्या निरनिराळ्या योजना. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या सेवा कालखंडातील वीस वर्षे पुण्यात गेली. त्यामुळे पुण्यावर त्यांचे प्रेमही होते. शिवाय त्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षणही पुण्यातच झाले होते. पुण्यात आल्यानंतर त्यांनी मराठी शिकून घेतले. तसेच पुढे ते जेथे कामानिमित्त गेले, तेथील भाषा त्यांनी शिकून घेतल्या. नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांची वृत्ती त्यांना आपल्या आयुष्यात खूप उपयोगी पडली. गरजेनुसार हिंदी, उर्दू, गुजराती या भाषादेखील त्यांनी आत्मसात केल्या. पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आणि अनेक थोरामोठ्यांच्या भेटी झाल्या. त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, शि म परांजपे यांच्यासारखी नामवंत साहित्यिक, समाजसुधारक आणि नेतृत्व करणारी मंडळी होती.
या मंडळींशी परिचय झाल्याने त्यांना त्यांची काम करण्याची, विचार करण्याची, जनतेचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत समजली. त्यांचे अनुभवविश्व आणखी व्यापक झाले. पण त्यांच्या एक लक्षात आली की ही सगळी मंडळी एकत्र येण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. ही सगळी मंडळी एकत्र आली तर समाजहिताच्या दृष्टीने आणखी काहीतरी भरीव काम होऊ शकेल असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी परिश्रम घेऊन डेक्कन क्लबची स्थापना केली. या ठिकाणी पुण्यातले समाजधुरीण एकत्र येऊ लागले. करमणुकीसोबतच विविध विषयांवर चर्चा होऊ लागल्या. पुढे याच धर्तीवर त्यांनी बंगलोर येथे सेंच्युरी क्लबची स्थापना केली. स्त्रियांनी घराबाहेर पडले पाहिजे, विविध सामाजिक उपक्रमात भाग घेतला पाहिजे म्हणजे स्त्रिया पुढे येतील या कल्पनेतून त्यांनी लेडीज क्लबची स्थापना केली.
याच सुमारास सक्कर शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आता सक्कर हे शहर पाकिस्तानातील सिंध प्रांतात आहे, पण त्यावेळी ते मुंबई प्रांतात समाविष्ट होते. त्यामुळे त्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विश्वेश्वरैयाना तेथे पाठवण्यात आले. या सक्कर शहराला दोनतीन वर्षांपासून गढूळ पाणीपुरवठा होत होता. लोकांना शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यावर उपाय सापडत नव्हता. त्यासाठी तत्कालीन ब्रिटिश इंजिनिअर्सनी जे उपाय सांगितले ते अव्यहार्य आणि अत्यंत खर्चिक होते. विश्वेश्वरैयानी या सर्व परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर उपाय शोधून काढला. नदीच्या पात्रातच विहीर खोदून तेथपर्यंत पाईपलाईन टाकून ते पाणी नैसर्गिकरित्या वाळुतुनच गाळून जाईल अशी योजना त्यांनी केली. ही पाईपलाईन सच्छिद्र असून त्यातील पाणी तिच्या सभोवती असलेल्या वाळुतुनच गाळून जाईल अशी व्यवस्था त्यांनी केली. या विहिरीला जॅकवेल आणि पाईपलाईनला पर्कोलेशन गॅलरी असे नाव दिले गेले. यामुळे विश्वेश्वरैयाचे नाव सर्वतोमुखी झाले. जिथे कुठे असे प्रश्न उद्भवतील, तिथे ते सोडवण्यासाठी आता विश्वेश्वरैयाना पाठवले जाऊ लागले.
नंतर ते पुन्हा पुण्यात आले. पुणे शहराचा पाणीप्रश्न बिकट झाला होता. पुण्याला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होत होता. त्यातूनच शेतीला देखील सिंचनासाठी पाणी पुरवले जात होता. तसे या धरणातील पाणी पुरेसे होते. पण वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे या पाणीपुरवठ्यावर ताण पडत होता. तसेच शेतकरी पाण्याचा वापर काटकसरीने करत नव्हते. शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरले तर ते सर्वांना पुरेल असे विश्वेश्वरैयानी सांगितले. शेतकरी हे ऐकण्यास तयार नव्हते. त्यांच्यात असंतोष उफाळून आला. ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे हवेच होते. त्यांनी शेतकऱ्यांना भडकावून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. पण विश्वेश्वरैया डगमगले नाहीत. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे ठरवले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शेतकऱ्यांची सभा घेतली. ही सभा अयशस्वी व्हावी आणि विश्वेश्वरैयांची फजिती व्हावी अशी अपेक्षा असलेल्या ब्रिटिश अधिकारीच यावेळी तोंडावर पडले.
विश्वेश्वरैयांच्या कार्यपद्धतीवर यावेळी केसरी वर्तमानपत्राने खास अग्रलेख प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला. तसेच विश्वेश्वरैयानी खडकवासला धरणाची उंची न वाढवता त्यावर आटोमॅटिक दरवाजांची योजना केली. आता पावसाचे जास्तीचे धरणात आलेले पाणी आपोआप दरवाजे उघडून बाहेर पडू लागले. इतर वेळी हे दरवाजे आपोआप बंदच राहत. या दरवाजांच्या योजनेसाठी विश्वेश्वरैयाना जागतिक पेटंट मिळाले आणि त्यांचे नाव जगभर जाऊन पोहोचले. त्यांची ही योजना प्रमाणाबाहेर यशस्वी झाली. आणि पुढे महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक धरणासाठी या पद्धतीचा वापर त्यांनी केला. त्यामुळे धरणांची उंची वाढवणे, धरणांच्या भिंती रुंद करणे यासारख्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली. शिवाय पुराच्या पाण्यामुळे धरणाचे नुकसान होण्याची शक्यता नाहीशी झाली. त्यांनी बसवलेले हे स्वयंचलित दरवाजे अनेक वर्षे बिनतक्रार काम करीत राहिले.
शेतकरी समृद्ध व्हावा, त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी. त्याचबरोबर सरकारचा महसूल देखील वाढावा यासाठीचे त्यांचे प्रयत्न अत्यंत यशस्वी झाले. शेतीच्या सिंचनासाठी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या तीस टक्के पाणी मिळावे आणि त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी अशी योजना त्यांनी आखली. या पद्धतीला ब्लॉक पद्धत म्हटले जाते. ही पद्धत पुढे त्यांनी अनेक ठिकाणी वापरली. पावसाचे पाणी आणि निसर्ग यांचा मानवी कल्याणासाठी वापर करून घेण्याची त्यांची कल्पकता आणि या कल्पकतेचा चपखल वापर करून घेण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट याना तोड नाही. अशा व्यक्तीची योजना कदाचित नियतीनेच देशाच्या विकासासाठी केली असावी. ( क्रमशः - पुढील भाग शुक्रवारी )
( संदर्भ: सर विश्वेश्वरैय्या - मुकुंद धाराशिवकर )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
११/११/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा