मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग एक

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग एक 

कर्नाटक मधील जोग धबधबा. या ठिकाणी  एक कुटुंब आपल्या मुलांना धबधबा दाखवण्यासाठी घेऊन गेले होते.  तो भव्य आणि आशिया खंडातील सर्वात उंच असलेला धबधबा पाहून सर्वजण आनंदित झाले. धबधबा पाहून झाल्यावर जवळच्याच मंदिरात सगळेजण दर्शनासाठी  गेले. त्या कुटुंबातला एक छोटा मुलगा मात्र त्यांच्यासोबत गेला नाही. तो एका जवळच्या टेकडीवर जाऊन त्या धबधब्याची भव्यता निरखित होता. अफाट उंचीवरून कोसळणारा तो  पाण्याचा प्रवाह पाहून त्याच्या मनात आले केवढा हा शक्तीचा आणि पाण्याचा अपव्यय. या शक्तीचा काही उपयोग नाही का करून घेता येणार ? आपण मोठे झालो की नक्कीच यासाठी काहीतरी करू या अशी खूणगाठ त्या मुलाने मनाशी बांधली. पुढे या जोगच्या धबधब्यावर जलविद्युत निर्माण होऊन ती ऊर्जेच्या रूपाने कारखान्यांची चक्रे फिरवू लागली. लाखो लोकांची घरे प्रकाशमान झाली. जलविद्युत निर्माण झाल्यानंतर त्याच पाण्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी होऊन शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध झाले. ते या मुलाच्या अंगी असणाऱ्या गुणाने आणि मोठेपणी त्याच गुणांचा वापर करून आपल्या कार्यकतृत्वाने त्याने ही किमया घडवून आणली. 

बालपणीच असा विचार करणाऱ्या या मुलाचे नाव होते. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. मोक्षगुंडम हे तेलंगणा प्रांतातील आणि पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील गावाचे नाव आहे. त्या प्रांतातील पद्धतीनुसार आपल्या नावाआधी गावाचे नाव लावण्याची पद्धत होती. अजूनही बऱ्याच ठिकाणी ती आहे. त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर. या बालकाच्या मनात आले तसे विचार इतरही मुलांच्या मनात बऱ्याच वेळा येत असतात. पण  ते विचार सोडून न देता त्या विचारांचा सातत्याने पाठपुरावा करणे, स्वतःचे जीवन त्या दृष्टीने घडवणे आणि आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहणे ही अशा व्यक्तींची महानता असते. भारतवर्षामध्ये जी जी महान व्यक्तिमत्वे होऊन गेली त्यातील एक आदरणीय नाव म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार येत गेला. असे म्हटले जाते की सावलीत झाड नीट वाढत नाही. झाडाला मोठे होण्यासाठी उन्हाचे चटके सोसावेच लागतात. पाऊस, वादळवारा अंगावर घ्यावा लागतो. माणसाचेही तसेच आहे. जेव्हा माणसाच्या आयुष्यात संघर्ष असतो, संकटे येतात तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने त्यांना तोंड देण्यासाठी समर्थ होतो. विश्वेश्वरैय्याचे बालपण सुद्धा अशाच संकटाने आणि संघर्षाने भरलेले आहे. 

विश्वेश्वरैयाचें कुटुंब मोठे होते. आई वडील, चार भाऊ आणि दोन बहिणी. या कुटुंबाची परिस्थिती अगदी सामान्य. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री हे गावातील महादेवाच्या मंदिरात पुजारी होते. त्यांना ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकीय ज्ञानही अवगत होते. पण असे असले तरी त्यांची मिळकत बेताचीच होती. तुटपुंजे उत्पन्न असल्यामुळे दोन वेळेचे भागवताना नाकी नऊ यायचे. उत्पन्न कमी असले तरी संस्कारांची श्रीमंती होती. त्यामुळे कष्ट, प्रामाणिकपणा , नम्रता, वडिलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आदर यासारख्या गुणांचे बाळकडू त्यांना आपल्या घरातूनच मिळाले होते. विश्वेश्वर लहान असतानाच एक मोठे संकट त्यांच्या परिवारावर कोसळले. त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. जे थोडेफार उत्पन्न मिळत होते, तेही आता मिळेनासे झाले. त्यांच्या आईला आपल्या मुलांना कसे वाढवावे ही चिंता पडली. विचारांती तिने आपल्या भावाकडे म्हणजे विश्वेश्वराच्या मामांकडे मुलांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. विश्वेश्वरचे मामा बंगलोरला राहत होते. तेथे आपल्या मुलांना घेऊन ती माता आली . 

विश्वेश्वरांचा मामा अत्यंत सहृदयी आणि सज्जन असे व्यक्तिमत्व. त्यांचीही परिस्थिती सामान्यच होती. पण आपल्या बहिणीवर आलेल्या संकटात हा भाऊ तिचा पाठीराखा झाला. त्याने आपल्याकडे त्या सगळ्यांना ठेऊन घेतले. मुलांच्या शाळेची व्यवस्था केली. पण त्यांचीही परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मुलांना आपल्या वह्यापुस्तकांचा, शाळेचा खर्च स्वतःच करावा लागायचा. त्यातूनही ही मुले शिकली. प्रसंगी पोटाला चिमटा देऊन त्यांनी शिक्षणाची ही शिदोरी ग्रहण केली. विश्वेश्वर अभ्यासात अतिशय हुशार. गणित आणि इंग्रजी हे त्याच्या आवडीचे विषय. आपल्या शाळेचा खर्च भागवण्यासाठी विश्वेश्वरने शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. एका मुलाची शिकवणी घेण्यासाठी तर त्याला आठ किमी लांब चालत जावे लागे. रस्त्याने जाताना तो मनातल्या मनात गणिताच्या प्रमेयांची, समीकरणांची उजळणी करत असे, इंग्रजीचे स्पेलिंग आणि उतारे यांचे पाठांतर करत असे. चालण्यामुळे शारीरिक व्यायाम आणि अभ्यासाच्या उजळणीमुळे बौद्धिक व्यायाम आपोआप घडत होता. इंग्रजी, गणित या विषयात पारंगतता येत होती. शिकवण्यामुळे देखील हे विषय पक्के होत होते. तेथील मॉडर्न स्कुलचे मुख्याध्यापक चार्लस वॉटर्स यांचे ते आवडते विद्यार्थी होते. त्या काळच्या शालांत परीक्षेत ते जिल्ह्यात पहिले आले. 

पुढील शिक्षणासाठी त्यांनी सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथून बी एस्सीची पदवी प्राप्त केली. बी एस्सीला ते विद्यापीठात प्रथम आले होते. त्यांचे गुरु चार्लस वॉटर्स यांना तर आपल्या या लाडक्या विद्यार्थ्याला कोठे ठेवू आणि कोठे नको असे झाले होते. वॉटर्स यांनी त्यांना आपले शिफारसपत्र देऊन म्हैसूरच्या महाराजांकडे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पाठवले. त्यांची हुशारी पाहून म्हैसूर दरबारने त्यांना शिष्यवृत्त मंजूर केली आणि विश्वेरैय्यानी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. तेथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी अडीच वर्षातच पूर्ण केला. त्या परीक्षेतही ते विद्यापीठात पहिले आले. प्रतिष्ठेचे असे बर्कले पारितोषिक त्यांना मिळाले. यावेळी त्यांना बक्षीस म्हणून चार्लस वॉटर्स यांनी एक भलीमोठी डिक्शनरी भेट दिली. आणि तत्कालीन मुंबई राज्याच्या पी डब्ल्यू डी विभागाने त्यांना आपल्या नाशिक विभागात धुळे येथे खान्देश विभागाचे असिस्टंट इंजिनिअर म्हणून नेमणूक केली. येथूनच त्यांच्या अभियंता म्हणून पुढील यशस्वी जीवनाची वाटचाल सुरु झाली. 

विश्वेश्वरैया म्हणजे सामान्य परिस्थितून निर्माण झालेले असामान्य व्यक्तिमत्व. त्यांचे ' द मेमॉयर्स ऑफ वर्किंग लाईफ ' ( माझ्या आयुष्यातील कामांची स्मृतिचित्रे )  हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.  पण त्यात आपल्या प्रतिकूल परिस्थितीबद्दल ते काहीही लिहीत नाहीत. स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल, मुलेबाळे, पत्नी यांच्याबद्दल लिहीत नाहीत. ते म्हणतात मी प्रतिकूल परिस्थितून पुढे आलो. त्यात काय मोठे ? भारतात लाखो लोकांना अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागते. या त्यांच्या शब्दातूनच स्वतःकडे कोणतेही मोठेपण  घेण्याची त्यांची विनम्र वृत्ती आपल्याला दिसते. ज्यांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल अशा लोकांसाठी ते जणू सांगतात, " माझी प्रत्यक्ष कृती हेच माझे मत ! माझ्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर माझ्या कामांबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. त्यातूनच बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजतील आणि माझे व्यक्तिमत्वही कळेल. " 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०८/११/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...