मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग चार ( अंतिम )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग चार ( अंतिम )

कामात झोकून देणे किंवा एखादे काम किती निष्ठेने करावे याचे कलाम मूर्तिमंत उदाहरण होते. याचे एक उदाहरण येथे सांगण्यासारखे आहे. याच कालावधीत त्यांच्या प्रिय बहिणीच्या मुलीचे लग्न होते. जोहरा आणि तिचे पती यांनी कलाम यांना वेळोवेळी शिक्षणासाठी मदत केली होती. पण जोहराच्या मुलीच्या लग्नाचे देखील कलाम यांना लक्षात राहिले नाही एवढे ते आपल्या कामात गढून गेले होते. एकाएकी लग्नाच्या दिवशी त्यांना आठवण झाली. पण त्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तेथे पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. ही गोष्ट तत्कालीन संरक्षणमंत्री वेंकटरमण यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ कलाम यांच्यासाठी इंडियन एअर लाईन्सला कलामांसाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले. हे विमान त्यांना चेन्नई पर्यंत घेऊन गेले. तेथून पुढे त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले होते. अशा रीतीने कलाम आपल्या प्रिय भाचीच्या लग्नात पोहचू शकले. ही गोष्ट आपल्याला खूप काही सांगून जाते. त्यांचे आपल्या कामाप्रती असलेले समर्पण, निष्ठा याचेच हे फळ होते.

     हा क्षेपणास्त्र कार्यक्रम राबवीत असताना चारशे शास्त्रज्ञांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कलामांकडे आली. आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे पार पाडली. किंबहुना नेतृत्व कसे करावे आणि आपल्या सहकाऱ्यांकडून कशा प्रकारे काम करून घ्यावे याचा आदर्शच त्यांनी घालून दिला. त्रिशूळ या मिसाइलची यशस्वी चाचणी झाली. अग्नी या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्याच्या वेळी मात्र दोनदा अडचणी आल्या. त्यातील यंत्रे काही कारणाने नीट काम करेनाशी झाली. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी कलाम आणि त्यांच्या कार्यक्रमाला टीकेचे लक्ष्य केले. पण त्यामुळे कलाम विचलित झाले नाहीत. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. आणि २२ मे १९८९ ला अग्नी क्षेपणास्त्र यशस्वीपणे अवकाशात झेपावले. या वेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीनी त्यांचे मनापासून कौतुक केले. हे उड्डाण यशस्वी होणार हे जेव्हा निश्चित झाले तेव्हा संरक्षणमंत्री होते के सी पंत. त्यांनी कलामांना विचारले, ‘ अग्नीचे हे यशस्वी उड्डाण आपण कशा प्रकारे साजरे करावे असे तुम्हाला वाटते ?’  त्यावेळी कलाम यांनी स्वतःसाठी काहीही मागितले असते तरी त्यांना मिळाले असते. पण हा आधुनिक विज्ञान महर्षी काय उद्गारला असेल माहिती आहे ? ते म्हणाले, ‘ मला या अणू संशोधन केंद्राभोवती झाडांची एक लाख रोपे लावलेली हवी आहेत.अर्थातच कलाम यांची ही इच्छा तत्काळ पूर्ण आली हे सांगणे नलगे...! आज हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. याचे श्रेय कलामांना जाते. नंतर पुढच्याच वर्षी त्रिशूल या अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण झाले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या कार्यक्रमातला एक टप्पा पूर्ण झाला.

     यानंतर डॉ कलामांना आपण सेवानिवृत्त व्हावे असे वाटत होते. पण नियतीला त्यांच्या हातून महान कामगिरी करून घ्यायची होती. याच सुमारास अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. आणि त्यांनी राजस्थानातील पोखरण येथील अणुसंशोधन आणि अणुचाचण्यांचा कार्यक्रम पुढे सुरु ठेवावा असा आदेश दिला. या कामाची प्रमुख जबाबदारी अर्थातच डॉ कलाम यांच्यावर टाकण्यात आली. येथे कलामांचे प्रशासकीय कौशल्य सुद्धा दिसून आले. या कामांसाठी त्यांनी तीन महत्वाच्या संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्यात सुसूत्रता निर्माण केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, संरक्षण विभाग आणि मुंबईची भाभा अणुसंशोधन संस्था या त्या तीन संस्था होत. आणि कलामांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी अणुस्फोट चाचण्या करण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले. ही भारतासारख्या विकसनशील देशासाठी फार मोठी कामगिरी होती. या अणुस्फोटाबद्दल एवढी गोपनीयता बाळगण्यात आली होती की अमेरिकेचे टेहेळणी करणारे उपग्रह देखील याची नोंद घेऊ शकले नाही. हे अणुस्फोट झाल्यानंतरच जगापुढे ही गोष्ट आली ! आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अमेरिकेसारख्या पाश्चात्य राष्ट्रांनी साहजिकच भारतावर अनेक बंधने लादली. पण आपण त्यामुळे विचलित झालो नाहीत. ही या क्षेत्रातील घोडदौड आपण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. कलामांच्या या महत्वपूर्ण कामगिरीची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्यावर कळस म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी या विज्ञान महर्षींची निवड झाली. २५ जुलै २००२ रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. डॉ कलाम राष्ट्रपतीपदी आरूढ झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी त्यांचा गौरव करणारे लेख लिहिले. डॉ कलाम यांच्या रूपाने एक सुयोग्य व्यक्ती राष्ट्रपतीपदी आरूढ झाली अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला.

     डॉ कलामांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी काही काळ चेन्नई येथील अण्णादुराई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा केली. याच दरम्यान त्यांनी देशाच्या विविध भागांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. ते मुलांमध्ये आपला मोठेपणा विसरून रममाण होत असत. मुलांना बोलके करण्याचे एक मोठे कौशल्य त्यांच्या स्वभावात होते. २००२ च्या मध्यापर्यंत ते सुमारे ६०००० विद्यार्थ्यांना भेटले. एक लाख विद्यार्थ्यांना भेटण्याचा त्यांचा निश्चय होता. या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी आपल्या मनातील नव्या भारताची चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती. सुमारे दोन वर्षे ते भारतातील विविध भागात फिरले. या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यांची  दोन पुस्तके इंडिया २०२० आणि इग्नायटेड माइंड़्स ( प्रज्वलित मने ) त्यांनी विद्यार्थ्यांना अर्पण केली आहेत. त्यांच्या विचारांचे, अनुभवाचे सार या पुस्तकांमध्ये आहे. तरुणाईसाठी ही पुस्तके म्हणजे प्रेरणास्त्रोत आहेत.

     विज्ञानाची आवड असणारा आणि विज्ञानात रमणारा हा वैज्ञानिक एक साधा,सरळ आणि सच्चा माणूस होता. मोठ्या माणसापासून ते अगदी शिपायापर्यंत कोणालाही ते अगदी सहजपणे भेटत असत. रुद्रवीणा वाजवण्याची त्यांना आवड होती. दररोज कुराण आणि भगवद्गीता ते वाचत असत. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे ते एक लोकप्रिय राष्ट्रपती बनले. २००२ ते २००७ या कालावधीत त्यांनी राष्ट्रपती पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. आपल्या कामकाजाची एक आगळीवेगळी छाप त्यांनी उमटवली. राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा अखंड कार्यरत राहिले. विद्यार्थ्यांना भेटत राहिले. त्यांच्यामध्ये उज्ज्वल भारताची स्वप्ने पेरत राहिले. २८ जुलै २०१५ रोजी विद्यार्थ्यांमध्ये व्याख्यान देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यातच या कर्मयोग्याचा अंत झाला. उज्ज्वल भारताच्या विकासासाठी अखंड झेपावणारे एक मिसाईल आपले काम पूर्ण करून अखेर शांत झाले. २०२० मधील विकसित भारताचे स्वप्न त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. स्वप्ने पाहा, स्वप्ने पाहा आणि स्वप्ने पाहा... कारण स्वप्नेच विचारात परावर्तीत होतात आणि विचारातूनच आपण कृतीप्रवण बनतो हा त्यांचा तुमच्या आमच्यासाठी संदेश आहे.  

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०६/११/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...