मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग तीन

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग तीन 

     आपल्या शिक्षकांकडून मिळालेले हे ज्ञान, संस्कार आणि आशीर्वाद घेऊन कलाम प्रत्यक्ष व्यावहारिक जगामध्ये आपली भूमिका पार पडण्यासाठी निघाले. १९५८ मध्ये बंगलोर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी म्हणून नोकरी स्वीकारली. येथे त्यांनी विमान तयार करण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले. या संस्थेतून खूप काही आत्मसात केल्यानंतर ते पदवीधर एरोनॉटिक्स इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या समोर दोन पर्याय होते. एक म्हणजे भारतीय वायुदलात वैमानिक म्हणून काम करणे किंवा दुसरे म्हणजे भारताच्या संरक्षण खात्यात ( Directorate of Technical Development and Production ) नोकरी स्वीकारणे. या दोन्ही ठिकाणच्या परीक्षा त्यांनी दिल्या. हवाई दलातील परीक्षा देण्यासाठी त्यांना देहराडूनला जावे लागले. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयातील संचालनालयाच्या विभागात त्यांना नेमणूक मिळाली आणि तेथे ते वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदावर रुजू झाले.

     येथे रुजू होण्यापूर्वी ते देहरादूनहून ऋषिकेशला गेले होते. तेथे ते स्वामी शिवानंद यांच्या भेटीसाठी गेले. स्वामी शिवानंदांच्या व्यक्तिमत्वाने ते भारावून गेले. स्वामी शिवानंद म्हणजे जणू भगवान बुद्ध आहेत असे त्यांना वाटले. त्यांचे कलाम हे मुस्लीम नाव ऐकल्यावर स्वामीजी जराही विचलित झाले नाहीत. उलट ते कलामाना म्हणाले, मुला, तू निराश होऊ नकोस. तू हवाई दलात जावंस असं विधिलिखित नाही. हे अपयश तू विसरून जा. तुला पुढील मार्गावर नेण्यासाठी नियतीचा हा एक संकेत होता. किती सुंदर शब्दात स्वामीजींनी कलामांना सांगितले ! आणि खरेच आहे. इंग्रजीत एक वाक्य आहे, When God closes one door, He opens another. खरोखर नियतीने पुढील कार्यासाठीच जणू ही योजना केली होती.

     पुढे कानपूरला काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर कलाम बेंगळूरुला एडीई ( Aeronautical Development Establishment ) या संस्थेत काम करू लागले. तेथे त्यांनी एका वर्षानंतर स्वदेशी बनावटीचे हॉवरक्राफ्टचे डिझाईन बनवले. नंतर पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्रमुख डॉ एम जी के मेनन यांनी भेट दिली आणि कलाम यांच्या कामगिरीने ते प्रभावित झाले. आणि पुढे त्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेत रॉकेट इंजिनिअर या पदासाठी निवड करण्यात येऊन त्यांना थुंबा येथील रॉकेट लॉन्चिंग स्टेशनला भेट देण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या पुढील मिसाईल मॅन म्हणून गौरवल्या जाणाऱ्या करिअरची ही सुरुवात होती. त्यादृष्टीने जणू त्यांची पायाभरणी सुरु होती. या पायाभरणीत अपार कष्ट होते. समर्पित भावाने काम करायचे होते. या सगळ्यात कलाम कुठेही कमी पडले नाहीत. थोड्याच दिवसात त्यांना अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्थेत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरले. तत्पूर्वी कलामांनी आपल्या गावी म्हणजे रामेश्वरमला जाऊन आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. काही आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत घालवले आणि मग तेथून ते थेट व्हर्जिनियातील नासाच्या केंद्रात दाखल झाले.

     या अमेरिकेतील नासाच्या दौऱ्यात कलामांना क्षेपणास्त्र बनवण्याची प्रेरणा प्राप्त झाली. त्यांना एके ठिकाणी एक चित्र पाहायला मिळाल. या चित्रात टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्या लढाईत टीपूने इंग्रंजावर केलेला एका क्षेपणास्त्राचा प्रयोग केलेला दाखवला होता. हे पाहून त्यांनी मनोमन निश्चय केला की भारतातून अस्तंगत झालेले हे क्षेपणास्त्र आपण पुनरुज्जीवित करायचे. आपले प्रशिक्षण संपल्यानंतर ते भारतात परतले. एव्हाना भारताने क्षेपणास्त्र क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. यावेळी क्षेपणास्त्र क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांसोबत अमेरिका, रशिया आणि फ्रान्समधून आलेले शास्त्रज्ञ काम करीत होते. कलामांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. डॉ विक्रम साराभाई हे महान शास्त्रज्ञ या वेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी डॉ कलाम यांच्यावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.

     १९६७ मध्ये रोहिणी या स्वदेशी उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. या वेळी या उपग्रहाने त्याचा पहिला टप्पा पार केला. परंतु दुसऱ्या टप्प्यात ते नियंत्रणाबाहेर गेले आणि श्रीहरीकोटापासून ५६० किमी अंतरावर समुद्रात कोसळले. परंतु या अपयशाने ते खचून गेले नाहीत.  डॉ कलाम आणि अन्य शास्त्रज्ञांचे मार्गदर्शक आणि प्रमुख डॉ विक्रम साराभाई यांचे १९७१ ,मध्ये दुर्दैवाने निधन झाले. पण या सगळ्यांना आपले गुरु डॉ विक्रम साराभाई यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने वाटचाल करायची होती. निराश होऊन किंवा हिंमत हरून चालणार नव्हते. त्यामुळे कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले अथक प्रयत्न चालू ठेवले. अनेक अडचणीतून त्यांनी मार्ग काढला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मनापासून प्रयत्न असले तर नियतीचे साहाय्य मिळतेच. १८ जुलै १९८० रोजी रोहिणी उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडला गेला. या यशामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला.उपग्रह प्रक्षेपणाची यंत्रणा असलेल्या काही मोजक्या देशात भारत जाऊन बसला. कलामांच्या या कामगिरीची दाखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सन्मान जाहीर केला. समस्या कोणतीही असो, ती कलाम लीलया सोडवीत. या त्यांच्या कौशल्याचा कस पुढील काळात लागला.

     कलाम यांच्यावरील जबाबदाऱ्या आता वाढत चालल्या होत्या. आता स्वदेशी बनावटीचा अग्निबाण तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना त्यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि बारा वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला. क्षेपणास्त्र बनवण्याची रूपरेषा आखण्यात आली. सरफेस टू सरफेस मिसाईल पृथ्वी, सरफेस तो एअर मिसाईल आकाश, त्यानंतर त्रिशूळ, नाग अशी क्षेपणास्त्राची नावे निश्चित करण्यात आली. या कामासाठी कलाम यांनी स्वतःला वाहून घेतले. दिवस रात्र, खाजगी जीवन इ ची कोणतीही आठवण त्यांना या कामात गढून गेल्याने राहिली नाही. ( क्रमशः - पुढील भाग शुक्रवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०४/११/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...