मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग चार

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग चार 

     शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली रेल्वेची अशी वेगवान प्रगती होत असतानाच १९५६ मध्ये दक्षिण भारतात अरियालूर येथे एक भीषण रेल्वे अपघात घडला. यात १४४ प्रवासी जागीच ठार झाले. या अपघाताने शास्त्रीजी शास्त्रीजींना व्यथित झाले. यापूर्वीही सुमारे तीन महिने आधी असाच एक अपघात होऊन ११२ लोक ठार झाले होते. तसा शास्त्रीजींचा या अपघातांशी प्रत्यक्ष संबंध नव्हता. पण संवेदनशील मनाच्या शास्त्रीजींना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनी या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला. पहिल्या वेळेस पं नेहरूंनी तो स्वीकारला नाही. पण दुसऱ्यांदा मात्र शास्त्रीजींच्या आग्रहाखातर त्यांना तो स्वीकारावा लागला. आजच्या काळात असे स्वतःहून एखाद्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणारे किती पदाधिकारी आणि मंत्री आढळतील ? अर्थातच आजच्या काळात अशी गोष्ट दुर्मिळ आहे.

     यानंतर १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुका आल्या. यात निवडणुकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या वतीने शाश्त्रींवर आली. त्यांनी अपार मेहनत घेऊन निवडणुकांचे नियोजन केले आणि पक्षाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. स्वतःही पश्चिम अलाहाबाद मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले. यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात दळणवळण मंत्री म्हणून शपथविधी झाला. दळणवळण मंत्री म्हणून ते फार थोडा काळ या पदावर राहिले. पण या अल्प काळात त्यांनी विशाखापट्टणमला जहाजे बांधण्याचा कारखाना सुरु केला. पोस्ट व तर खात्यातील कर्मचाऱ्यांनी या काळात संपाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या मागण्यांची दाखल शास्त्रीजींनी घेतली आणि संप मिटवला.

     पुढे अचानक त्यांच्याकडे व्यापार व उद्योगधंदे खात्याचे मंत्रिपद चालून आले कारण अर्थमंत्री पदावर असलेल्या कृष्णम्माचारी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांच्या पदावर मोरारजी देसाई यांची नेमणूक आणि मोरारजी देसाई यांचे व्यापार उद्योगधंद्याचे महत्वाचे पद शास्त्रीजींकडे चालून आले. या पदावर आल्यानंतर शास्त्रीजींनी आपली अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याची परंपरा सुरु ठेवली. स्वतंत्र भारतात व्यापार व उद्योगधंद्यांची वाढ व्हावी म्हणून त्यांनी अनेक यशस्वी उपाययोजना राबवल्या. देशाची सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर शेती आणि उद्योग यांची सांगड घातली पाहिजे हे त्यांनी दूरदृष्टीने हेरले. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून शेती आणि उद्योगधंदे यांचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याबरोबरच देशांच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांचे योगदान महत्वाचे आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला. त्यामुळे शेतकरी तसेच जवानांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली.

       १९६१ मध्ये शास्त्रीजींकडे अत्यंत महत्वाचे पद चालून आले. ते देशाचे गृहमंत्री झाले. अशा नवनव्या मंत्रिपदांची जबाबदारी पेलणारे शास्त्रीजी मात्र कमालीचे साधे राहत. त्यांच्या राहणीमानात त्यांच्या पदांमुळे कोणताही फरक पडला नाही. त्यांचा सुरुवातीचाच साधा पेहराव कायम राहिला. या त्यांच्या साधेपणामुळे एकदा रेल्वे स्टेशनवर पोलीस त्यांना ओळखू शकले नाहीत. त्यांच्या स्वभावातील सौजन्य, मार्दव इ गोष्टी कायम राहिल्या. नैतिकतेची आणि त्यांची कधीही फारकत झाली नाही. स्वतःच्या फायदातोट्याचा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही.

     गृहमंत्री झाल्यानंतर शास्त्रीजींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक आणि अभ्यासपूर्वक असे निर्णय घेऊन या पदाला न्याय दिला. सुरुवातीला त्यांना आसाममधील भाषिक प्रश्नाच्या निमित्ताने सुरु झालेल्या दंगलीला तोंड द्यावे लागले. या परिस्थितीत त्यांनी स्वतः आसाम दौरा करून महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि चर्चेअंती समाधानकारक तोडगा काढून त्यांच्यासमोर ठेवला. त्यामुळे नेत्यांचे समाधान झाले आणि दंगल थांबली. याच सुमाराला पंजाबमध्ये स्वतंत्र पंजाबच्या आंदोलनाची ठिणगी पडली. आंदोलन कर्त्यांनी शाश्त्रीजींवर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दडपण आणले. पण शाश्त्रीजी खंबीर राहिले. कोणत्या वेळेस काय करायचे याचे उत्तम तारतम्य त्यांच्याजवळ होते. ते त्यांच्या धमकावणीला बळी पडले नाहीत. सरकारने त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. त्यांच्या उपोषणालाही भीक घातली नाही. शेवटी आंदोलन हळूहळू थांबले. असा हा निश्चयाचा आणि धैर्याचा महामेरू होता. भलेतरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांचे वागणे होते.

१९६२ मध्ये सरकारला हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा होता. परंतु या गोष्टीला दक्षिण भारतातील लोकांचा तीव्र विरोध होता. असा निर्णय एकतर्फी घेतल्यास पुन्हा मोठे भाषिक आंदोलन उभे राहण्याची शक्यता होती. या संदर्भात शास्त्रीजींनी सखोल अभ्यास करून ऑफीशियल लँग्वेजेस बील लोकसभेत मांडले. त्यात त्यांनी हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांना स्थान देण्याचे मान्य केले. अशा रीतीने हे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच त्यांनी संपविले. दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांमध्ये यामुळे सलोख्याचे वातावरण निर्माण व्हायला मदत झाली. ( क्रमशः ) 

पुढील भाग रविवारी 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०९/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...