मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री भाग ३

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री भाग ३

      १९३० ते १९४५ या कालावधीत अनेक थोर नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. यात सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, लाल लजपतराय यांसारखी थोर मंडळी होती. इंग्रज सरकारने देऊ केलेल्या सुधारणांना प्रत्यकाने विरोध केला आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य हवे ही मागणी लाऊन धरली. या कालावधीत जसे या महान नेत्यांना तुरुंगवास घडला तसाच शास्त्रीजींना सुद्धा. या कालावधीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते सात वेळा तुरुंगात जाऊन आले. याच तुरुंगवासात शास्त्रीजींनी मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात वाचन केले. टॉलस्टॉय, अॅना कॅरेनिना या सारखी पुस्तके वाचली. या कालावधीत त्यांनी केलेल्या वाचनातून जगाचा इतिहास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली. तुरुंगात कैद्यांमध्ये भांडणे होत असत. शाश्त्रीजींनी त्यांच्या संवाद कौशल्याचा उपयोग कैद्यांमधील भांडणे सोडवण्यासाठी केला. कैद्यांना शिस्त, स्वातंत्र्य आणि स्वच्छतेचे धडे दिले.

     ८ ऑगस्ट १९४२ च्या दिवशी गांधीजींनी ब्रिटिशांना छोडो भारत चा इशारा दिला. हे आंदोलन पूर्ण भारतभर पसरले. या आंदोलनात गांधीजींसह सर्व मोठ्या नेत्यांचे अटकसत्र ब्रिटीशांनी चालवले. शास्त्रीजींनी आपल्या अटकेचा धोका ओळखून भूमिगत होणे पसंत केले कारण भूमिगत राहून त्यांना काही विशिष्ट कार्य करायचे होते. त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळींच्या नेत्यांपर्यंत गुप्त संदेश, पत्रके अत्यंत गोपनीयरित्या पाठविली. मोठे नेते तुरुंगात असताना एक प्रकारे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची धुरा भूमिगत राहून सांभाळली.

     या चळवळींच्या काळात आणि त्यांच्या तुरुंगवासात शाश्त्रीजीनी आपल्या देशासाठी आपले कौटुंबिक जीवन, जबाबदाऱ्या याकडे लक्ष दिले नाही. देशसेवेने ते एवढे प्रेरित झाले होते. आपल्या आनंदाचा, सुखाचा त्यांनी त्याग केला. त्यांच्या त्यागाची ही मशाल अत्यंत प्रेरणादायी आहे. ते तुरुंगात असताना एकदा त्यांची मंजू नामक मुलगी विषमज्वराच्या तापाने फणफणली. शाश्त्रीजीनी सरकारकडे सुटकेची विनंती केली. पण सरकारने एका अटीवर परवानगी दिली. ती अट म्हणजे त्यांनी यापुढे कधीच स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचा नाही. अर्थातच शाश्त्रीजीनी ही अट नाकारली. शेवटी सरकारने त्यांची विनाअट सुटका केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मंजूने इहलोकीचा निरोप घेतला होता. असाच दुसरा एक प्रसंग ! त्यांचा मुलगा विषमज्वराने तापला. यावेळी सरकारने त्यांना एका आठवड्यासाठी विनाअट सोडले. पण एक आठवड्यानंतरही त्याचा ताप कमी झाला नाही. शास्त्रीजीनी सरकारला सुटी वाढविण्याची विनंती केली. पण यावेळी सरकारने पुन्हा अट त्यांच्या समोर ठेवली. ती अमान्य करून शाश्त्रीजी पुन्हा तुरुंगाच्या दिशेने निघाले. लहान मुलगा, ‘ बाबा, जाऊ नका ना..अशी आर्त विनवणी करीत असतानाही देशाप्रती आपले असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा कर्तव्यकठोर पिता सगळे पाश मागे सोडून निघाला.

     एखाद्या कार्यात झोकून देणे म्हणजे काय असते याचा प्रत्यय शास्त्रीजींवरील ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या जायच्या त्या त्यांनी कशा प्रकारे पूर्ण केल्या हे पाहिले म्हणजे कळू शकेल. एकदा त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील शेतजमिनीचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली गेली. शेतीवर राबणाऱ्या कुळांची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत होती. यासाठी जमीनदार आणि कुळकायदा यांच्या संबंध पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज होती. कॉंग्रेसला यासंबंधी नवीन कायदा करायचा होता. याचा अभ्यास करण्यासाठी जी समिती नेमली गेली तिचे प्रमुख लाल बहादूर शास्त्री होते. शास्त्रीजीनी उपलब्ध कागदपत्रे, कायदे यांचा अभ्यास केला. जमीनदार आणि कुळांची स्थिती अभ्यासली. आणि तपशीलवार अहवाल सादर केला. त्यांनी केलेल्या शिफारशी अत्यंत कल्पक परंतु व्यवहार्य व गरीब शेतकरी आणि कुळांचे हित जोपासणाऱ्या होत्या. त्यांच्या या शिफारशींचे स्वागत झाले. १९३७ मध्ये उत्तर प्रदेशात जेव्हा निवडणुका होऊन कॉंग्रेसचे सरकार आले तेव्हा शास्त्री समितीच्या अहवालावर आधारित जमीन सुधारणा कायदा करण्यात आला. पुढे याच कायद्याच्या धर्तीवर इतरही अनेक राज्यांनी सुसंगत कायदे केले.

     पंडित नेहरू शास्त्रीजींचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून प्रभावित झाले होते. त्यांनी अनेक नवनवीन जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवायला सुरुवात केली. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस ते झाले. पुढे गोविंद वल्लभ पंत उत्त्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपले पार्लमेंटरी सेक्रेटरीपद शास्त्रीजीना दिले. पुढे ते पोलीस आणि दळणवळण खात्याचे मंत्री झाले. तेव्हा आपल्या कल्पनेतील काही गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. ब्रिटीश काळात पोलीस म्हणजे दडपशाहीचे प्रतिक बनले होते. जमावावर पोलीस कारवाई करताना मानवी दृष्टीकोन ठेवावा असे शास्त्रीजींना वाटत असे. जमावाला लाठीमार करून पांगवण्यापेक्षा त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडून पांगवण्याची कल्पना शास्त्रीजींचीच.शेवटी अगदीच नाईलाज झाला तर लाठीमार करावा अशा सूचना त्यांनी पोलीस दलाला केल्या. जनता आणि पोलीस यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे असे त्यांना नेहमी वाटे.

     १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतापुढे अनेक नवीन प्रश्न उभे राहिला. या सगळ्या प्रश्नांचा विचार स्वतंत्र आणि दूरदृष्टीने होणे आवश्यक होते. शास्त्रीजींना जी नवनवीन पदे राजकारणात आणि मंत्रिमंडळात प्राप्त झाली ; त्या पदावर काम करीत असताना त्यांनी या दूरदृष्टीचा परिचय दिला. त्यांची काम करण्याची पद्धत, बुद्धिमत्ता, सदसदविवेकबुद्धी, सर्वाना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा आजच्या राजकारण्यांनी आदर्श ठेवावा अशीच होती. त्यांनी आपण करीत असलेल्या प्रत्येक पदावर आपल्या अनोख्या कार्यशैलीची अमीट छाप उमटवली.

     १९५२ मध्ये पं. नेहरूंनी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून त्यांच्याकडे वाहतूक आणि रेल्वेमंत्रीपद दिले. शास्त्रीजींना गरीब परिस्थिती स्वतः अनुभवल्याने सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव होती. त्याचा उपयोग त्यांनी या पदाला न्याय देताना केला. रेल्वे खात्यात अनेक सुधारणा केल्या. कनिष्ठ वर्गाच्या सोयीसुविधांचा विचार केला. रेल्वेतील तिसरा वर्ग रद्द केला. अनेक नवीन गाड्या सुरु केल्या. रेल्वे खात्यात आमुलाग्र बदल करण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता होती पण त्यांना उपलब्ध झालेल्या निधी वापरून त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे डब्यांची निर्मिती वाढवली. रेल्वेचे होणारे अपघात, तिकीट दरांबाबत सुधारणा करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्या समितीच्या शिफारशी अमलात आणल्या.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०७/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...