उगवतीचे रंग
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग दोन
प्राथमिक शिक्षण मोगलसराई येथे पूर्ण झाल्यानंतर लाल बहादूर
पुढील शिक्षणासाठी बनारसला आले. तेथील हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश
घेतला. बनारस गंगेच्या काठावर वसलेलं पवित्र तीर्थक्षेत्र. तसेच त्या वेळी
स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल इ प्रभृतींची भाषणे त्यांना
त्यावेळी ऐकायला मिळाली. हरिश्चंद्र हायस्कूल मधील त्यांचे शिक्षक निश्कामेश्वर
मिश्रा अत्यंत प्रेमळ आणि देशभक्त होते. त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम साहजिकच लाल
बहादुरवर झाला. अशातच महात्मा गांधींच्या भाषणाचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर
झाला. महात्मा गांधीनी पुकारलेल्या असहकार चळवळीत त्यांनी सामील व्हायचे ठरवले. या
गोष्टीला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी प्रथम आपले शिक्षण पूर्ण करावे
अशी घरच्यांची इच्छा होती. त्यांच्या आईने मात्र त्यांना विचारपूर्वक आणि
सदसदविवेकबुद्धीला स्मरून कोणताही निर्णय घे असे सुचवले. आणि लाल बहादुरांनी
स्वातंत्र्य चळवळीत शिक्षण सोडून सामील व्हायचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचे वय
अवघे सोळा वर्षांचे होते. या वेळी त्यांना अटक करण्यात येऊन तुरुंगात जावे लागले.
पुढे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी काशी
विद्यापीठात प्रवेश घेतला. या ठिकाणीच त्यांचा संबंध तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ
भगवान दास यांच्याशी आला. डॉ भगवानदास यांचा सर्व धर्मांचा आणि सर्व समावेशक
समन्वय साधणारा अभ्यास आणि दृष्टीकोन यांचा प्रभाव लाल बहादूरवर पडला. त्यांनी
आपल्या शिकवणुकीतून एक विशाल दृष्टीकोन लाल बहादुरच्या मनात रुजवला. इतरांचा मान
ठेवणे, त्यांचे म्हणणे
लक्षपूर्वक ऐकणे आणि मग सर्व गोष्टींवर विचार करून निर्णय घेणे या गोष्टी
प्रकर्षाने त्यांच्याकडून लाल बहादुरने शिकल्या. याच विद्यापीठातून त्यांना पुढे
शास्त्री ही पदवी मिळाली. येथेच त्यांचे व्यक्तिमत्व विकसले. सळसळता उत्साह आणि
चैतन्य हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष होते. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक
प्रकारची शालीनता आणि मार्दव होते. अर्थात हास्यविनोदाचे त्यांना वावडे नव्हते.
बरेचसे विनोद ते स्वतःवरच करीत असत. पण अत्यंत साधेपणा त्यांच्याजवळ होता. आपल्या
गरीबीचे ते कधीही प्रदर्शन करीत नसत. असेल त्या परिस्थितीत आनंदाने राहणे, समाधानी राहणे हे जणू
त्यांच्या रक्तातच होते. त्यांच्याकडे त्यावेळी फक्त एक कुडता आणि धोतराची एक जोडी
होती. तीच ते स्वच्छ धुवून वापरत असत. त्यांचा हा साधेपणा ते पंतप्रधान झाल्यावर
देखील कायम राहिला.
हाच साधेपणा
त्यांच्या विवाहाच्या वेळी देखील दिसून आला. १९२७ मध्ये त्यांचा विवाह मिर्झापूर
येथील ललितादेवी यांच्याशी झाला. हा विवाह कुठलाही डामडौल न करता अत्यंत साधेपणाने
पार पडला. विवाहाच्या वेळी शाश्त्रीजीना हुंडा म्हणून काय मिळाले असेल ? त्यांच्या विचारांवर
गांधीजींचा प्रभाव असल्याने त्यांनी फक्त एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर
कापड घेणे पसंत केले. कुठलाही मोह त्यांच्या मनाला शिवला नाही. खरोखरीच ‘ बोले तैसा चाले ‘ अशा प्रकारचे त्यांचे
व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पत्नी ललितादेवी सुद्धा अत्यंत साध्या, संस्कारी आणि कष्टाळू
घराण्यातून आल्या होत्या. आपला पती देशासाठी जे काही करतो त्यावर त्यांचा पूर्ण
विश्वास होता. त्यांनी शाश्त्रीजींना त्यांच्या कामात साथच दिली. म्हणून लालबहादूर
शास्त्री देशासाठी निष्काम भावनेने समर्पित होऊ शकले.
शास्त्रीजी ‘ पीपल्स ऑफ दी सर्व्हनट्स
सोसायटी ‘ या संस्थेचे काम करीत
असत. हे काम अत्यंत चिकाटीचे आणि कष्टाचे होते. फारसा मोबदला मिळत नसे. परंतु
त्यांनी कमालीच्या निष्ठेने हे काम केले. या कामात त्यांचे कौशल्य आणि संघटन
चातुर्य दिसून आले. १९२८ मध्ये शास्त्रीजीनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी
त्यांना त्यांचे कार्य पाहून अलाहाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर
नेमण्यात आले. हा कालखंड असंतोषाने भरलेला होता. गांधीजींचे ब्रिटीशांविरुद्धाचे
आंदोलन ऐन भरात होते. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे नाकारले.
गांधीजीनी सविनय कायदेभंगाचे हत्यार उपसले. यावेळी गांधीजीनी सविनय कायदेभंगाच्या
चळवळीची सूत्रे शास्त्रीजींच्या हाती सोपवली. यावेळी जनजागृतीचे मोठे कार्य
शास्त्रीजीनी केले. इंग्रज सरकारने ही चळवळ दाबून टाकण्याकरिता अटकसत्र सुरु केले.
यावेळी शास्त्रीजींना सुद्धा अटक होऊन अडीच वर्षांची शिक्षा झाली. शास्त्रीजींचे
कार्य पाहून १९३० मध्ये अलाहाबाद कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. याच
कालावधीत ते पंडित नेहरूंच्या संपर्कात आले. त्यांचे संघटन कौशल्य, काम करण्याची पद्धत पाहून
पंडितजी अतिशय प्रभावित झाले. आणि मग पुढे वेळोवेळी पंडितजींनी त्यांच्यावर ज्या
जबाबदाऱ्या सोपवल्या त्या त्यांनी उत्कृष्टपणे पार पडल्या. त्यांच्या यशाची कमान
चढतीच राहिली. ( पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०४/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा