मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री भाग १


 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री भाग १ 


 २ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. हे दोघेही भारतमातेचे थोर सुपुत्र..दोघांचेही जीवन भारतमातेसाठी समर्पित होते. 

आजपासून या निमित्ताने भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्तिमत्वांबद्दल या लेखमालेतून आपण माहिती घेणार आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून भारतरत्न पदवी पर्यंत पोहोचलेल्या काही व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख यानिमित्ताने आपल्याला करून द्यावी आणि त्यांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा कार्यातून आपल्यालाही काही प्रेरणा घेता आली तर ती घ्यावी हा या लेखमालेचा उद्देश आहे. सुरुवातीला भारतरत्न पुरस्काराबद्दल थोडी माहिती करून घेऊ. 

भारतरत्‍न हा आपल्या देशातील  सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या आणि भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला जातो. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला.

हे मेडल सोनेरी पिंपळाच्या पानाच्या आकाराचे कासे धातूपासून बनवले जाते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, त्या खाली देवनागरी लिपीमध्ये भारतरत्नकोरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्यराजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते. भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. 

 लाल बहादूर शास्त्रींच्या  कार्याची आणि व्यक्तिमत्वाची ओळख आपण करून  घेणार आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पं नेहरू यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने सांभाळली. पं नेहरूंनी सतत १७ वर्षेपर्यंत पंतप्रधानपद भूषवल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या प्रसिद्धिपराङमुख नेत्यावर ही जबाबदारी पडली. पण या कणखर व्यक्तिमत्वाने ही जबाबदारी तितक्याच समर्थपणे पेलली. पाकिस्तानच्या घुसखोरीला जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. 

भारतीय राजकारणात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना. या व्यक्तीची शारीरिक उंची होती फक्त पाच फुट दोन इंच. पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ही व्यक्ती हिमालायापेक्षा उंच ठरली. उज्ज्वल चारित्र्य, आपल्या तत्वांवर अविचल निष्ठा, आरपार प्रामाणिकपणा, साधा सरळ मृदू स्वभाव, नेहमी हसतमुख असलेली ही व्यक्ती होती भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. शास्त्रीजी कधीही आकांडतांडव करून वा हातवारे करून आपल्या भावनांचे उघड प्रदर्शन करीत नसत. त्यांच्या मनातील भावना त्यांच्या नजरेतून प्रकट होई. ते आपले म्हणणे मोजक्या शब्दात व्यक्त करीत. त्यांची स्नेहाळ नजर समोरच्या व्यक्तीचे मन सहज जिंकून घेत असे. एके काळी त्यांचे सचिव असलेल्या सी पी श्रीवास्तव यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांचा उल्लेख त्यांनी राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम असा केला आहे तो अगदी सार्थ आहे. पंडित नेहरूंसारखे प्रभावी व्यक्तिमत्व त्यांना लाभले नव्हते तरी आपल्या अंगभूत गुणांच्या सहाय्याने त्यांनी समोरच्यांना सहज जिंकून घेतले. एखादी उपमा देऊनच बोलायचे झाले तर पंडित नेहरु म्हणजे सुंदर असे गुलाबाचे फुल तर शाश्त्रीजी म्हणजे पांढरा शुभ्र सुगंधी मोगरा..! स्वतःच्या हाताने सुत कातून त्याचा शिवलेला पांढरा शुभ्र इस्त्रीचा कुर्ता आणि स्वच्छ पांढरे धोतर हा त्यांचा पोशाख.

  खरोखरच लाल बहादूर म्हणजे अनोखा लाल होता. २ ऑक्टोबर १९०४ रोजी मोगलसराई येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शारदाप्रसाद हे अलाहाबाद येथे शिक्षक होते आणि आई रामदुलारीदेवी. त्यांच दुसरं अपत्य म्हणजे लाल बहादूर. नियतीने जणू बालपणापासून त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. ते केवळ दीड वर्षांचे असताना प्लेगच्या साथीत त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर येऊन पडली. त्यांचे आजोबा म्हणजे रामदुलारी देवींचे वडील त्यांना आपल्याकडे घेऊन गेले. पण दुर्दैवाने त्यांचेही दोनच वर्षांनी आजारपणात निधन झाले. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी रामदुलारी देवींचे काका दरबारीलाल यांनी घेतली. आणि मोठ्या प्रेमाने त्यांचा सांभाळ केला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपण म्हणतो. लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत हे प्रकर्षाने आढळून येते. त्यांच्या लहानपणचे दोन प्रसंग थोडक्यात सांगण्याचा मोह येथे आवरत नाही.

ते आणि त्यांचा मामा पुरुषोत्तम लाल ज्याला लल्लन म्हणत असत, ते दोघे एकदा संध्याकाळी गंगेवर फेरफटका मारत असताना त्यांना आंबे विकणारा एक म्हातारा दिसला. म्हातारा त्यांना म्हणाला, ‘ आंबे फार गोड आहेत. खाऊन पहा. आवडले तर घ्या. एका आण्याला शंभर देईन. दोघांनी एक एक आंबा चाखून पाहिला. आंबा अतिशय गोड होता. दोघांनी आंबे घेण्याचे ठरवले आणि आपल्या खिशातून पैसे काढून ते म्हाताऱ्याला दिले. म्हातारा आंबे मोजून देऊ लागला. पन्नास आंबे मोजून झाले तेव्हा लाल बहादूर त्या म्हाताऱ्याला म्हणाला, ‘ पुरेत एवढे आंबे. म्हातारा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. तेव्हा लाल बहादूर त्यांना म्हणाला, ‘ तुम्ही ठेवून घ्या बाकीचे आंबे. आम्हाला एवढेच पुरेत.म्हातारा त्यांच्याकडे अविश्वासाने पाहत होता. त्याला पहिल्यांदाच असे कोणीतरी भेटले होते. तो त्यांचे आभार मानून निघून गेला. लल्लनमामा लाल बहादुरला म्हणाला, ‘ तू असे का केलेस ? तो चांगला आपल्याला शंभर आंबे देणार होता.यावर लाल बहादुरने मोठे सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘ संध्याकाळची वेळ होती म्हणून तो आपल्याला एका आण्यात शंभर आंबे द्यायला तयार झाला. त्याच्या परिस्थितीचा फायदा आपण कशाला घ्यायचा ? तो पुढे जाऊन आणखी कोणाला तरी उरलेले आंबे विकील. त्याला दोन पैसे मिळतील. लहान वयात केवढी समज होती ही दुसऱ्याच्या परिस्थितीची ! दुसरा एक प्रसंग ते शाळेत शिकत असतानाचा आहे. ते तेव्हा सहावीत शिकत होते. त्यावेळी शाळेत त्यांचे वर्मा हे आडनाव लावले होते. ते आपल्या आईला म्हणाले, ‘ हे जातीवाचक आडनाव लावण्याची माझी इच्छा नाही. मला जातीभेद आवडत नाही. तेव्हा आईने, त्यांच्या आजोबांनी आणि आणि त्यांचा मुलगा बिंदेश्वर प्रसाद यांनी या गोष्टीला मान्यता दिली. आणि लाल बहादुरनी आपले वर्मा हे आडनाव शाळेच्या रेकॉर्डमधून वगळण्यात यावे असा अर्ज दिला. आणि त्याचं नाव केवळ लाल बहादूर झालं. पुढे त्यांनी बनारस येथील काशी विद्यापीठातून शास्त्री ही पदवी मिळवली आणि त्यांच्या नावापुढे शास्त्री ही उपाधी लागली. हे दोन प्रसंग त्यांच्या मनाची जडणघडण कशी होत गेली हे दाखवतात. ( पुढील भाग रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०२/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...