मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग चोवीस ( रामायणातील काही ज्ञात /अज्ञात गोष्टी भाग एक )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग चोवीस ( रामायणातील काही ज्ञात /अज्ञात गोष्टी भाग एक ) 

जय श्रीराम. रामकथा लिहीत असताना मला काही वाचकांकडून रामायणातील काही गोष्टींबद्दल विचारणा झाली. अशा बऱ्याच गोष्टी वाचकांनी विचारल्या की ज्यांचा उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणात नाही. त्यात नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही गोष्टी अशा. श्रीरामाला बहीण होती का ? असली तर ती कोण ? वालीचा वध श्रीरामाने कपटाने का केला ? लंका विजयानंतर अयोध्येत परतल्यावर श्रीरामाने सीतेचा त्याग का केला ? हा तिच्यावर अन्याय नाही का ? शंबुक प्रकरणात शंबुक नावाच्या शूद्राची हत्या श्रीरामाने केली असे म्हटले जाते. यावरून पुरोगामी म्हणवणारे आणि श्रीरामावर श्रद्धा नसणारी मंडळी श्रीरामावर ते  स्त्री शूद्र विरोधी होते अशा प्रकारची टीका करून त्यांना दोषी ठरवून मोकळे होतात. कैकेयी आणि बिभीषण यांच्यावर अनेक आरोप केले जातात. त्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न मी त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना करण्याचा प्रयत्न केला आहे. 

मी कोणी विद्वान नाही. रामायणाचा एक वाचक या नात्याने वरील काही प्रश्नांचे माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी उत्तरे प्रमाण मानली पाहिजेत असा माझा आग्रह नाही. रामकथा लिहिताना फक्त एक आणि एकच उद्देश माझ्या डोळ्यासमोर होता. तो म्हणजे हजारो वर्षे अनेकांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारी रामकथा थोड्या वेगळ्या अंगाने आपल्यासमोर मांडणे. 

सगळ्यात आधी आपण एक गोष्ट लक्षात घेऊ या. रामकथा वाचताना आपण प्रमाणभूत कोणता ग्रंथ मानायचा, तर तो आहे श्री वाल्मिकी रामायण. वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर पुढे अनेक रामायणे लिहिली गेली. वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या भाषेत. काळाच्या ओघात त्यामुळे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये अनेक बदल झाले. म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणात नसलेल्या गोष्टी पुढे उत्तरकांडात वर्णन करण्यात आल्या. त्यामध्ये आपणआजपर्यंत ऐकलेल्या अनेक गोष्ट आहेत. उदा. शबरीने भक्तिभावाने उष्टी बोरे प्रभू रामचंद्रांना खायला दिलीत. लक्ष्मणाने सीतेचे संरक्षण करण्यासाठी लक्ष्मणरेषा ओढली होती. श्रीरामाने परिटाचे बोलणे ऐकून सीतेला वनात पाठवले. गौतम ऋषींनी अहिल्येला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला होता. त्याचप्रमाणे श्रीरामाच्या राज्यात शंबुक नावाचा शूद्र तप करीत होता. शूद्रांना तपाचरणाचा अधिकार नाही म्हणून श्रीरामाने त्याचा शिरच्छेद केला. यापैकी एकही गोष्ट मूळ वाल्मिकी रामायणात नाही. मूळ वाल्मिकी रामायण युद्धकांडानंतर संपते. उत्तरकांड हे पुढे नंतर त्याला जोडण्यात आले असून आता आपण त्याला रामायणाचा एक भाग मानतो. पण तो वाल्मिकींनी लिहिलेला नसल्याने आपल्याला अधिकृत मानता येत नाही. 

आता आपण पहिल्या मुद्द्यावर येऊ. श्रीरामाला बहीण होती का ? तर या प्रश्नाचे उत्तर मूळ वाल्मिकी रामायणात मिळत नाही. पण नंतरच्या रामायणांमध्ये हा उल्लेख बालकांडात येतो. त्याचप्रमाणे पुढे महाभारतातही या रामभगिनीचा उल्लेख आला आहे. असे म्हणतात की दशरथ राजाला श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चार सुपुत्र होण्याआधी कौसल्येपासून एक मुलगी झाली होती. तिचे नाव शांता. ती अत्यंत रूपवान होती. कौसल्यामातेची एक बहीण वर्षिणी ही अंगदेशचा राजा रोमपाद याला दिलेली होती. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. एकदा रोमपाद आणि वर्षिणी अयोध्येला आले असताना वर्षिणीने कौसल्येला तुझी ही कन्या मला देऊन टाक असे म्हटले. त्यानंतर दशरथाने शांतेला रोमपाद राजाला दत्तक म्हणून तिला दिले. नंतर ती पुढे अयोध्येत आली नाही. श्रीरामाने सीतेचा त्याग केल्यानंतर मात्र ती अयोध्येत आली होती आणि सीतेला वनवासात पाठवले हे तिला आवडले नाही. तिने त्या प्रसंगी श्रीरामाला दोष दिला. 

शांतेला रोमपाद राजाला दत्तक दिल्यानंतरचा एक प्रसंग आहे. एकदा रोमपाद राजा तिच्याशी खेळण्यात मग्न असतो. त्याचवेळी एक ब्राह्मण त्याच्याकडे शेतीसाठी मदत मागण्यासाठी येतो. ते पावसाळ्याचे दिवस असतात. परंतु रोमपाद शांतेबरोबर खेळण्यात इतका मग्न असतो की तो त्या ब्राह्मणाला विन्मुख पाठवतो. तो ब्राह्मण इंद्राचा भक्त असल्याने इंद्र कोपतो आणि रोमपादाच्या राज्यात पाऊस पाडत नाही. त्यामुळे दुष्काळ पडतो. शेवटी शृंग ऋषींनी यज्ञ केला. नंतर इंद्राने प्रसन्न होऊन पाऊस पाडला . या घटनेमुळे रोमपाद शृंग ऋषींवर खुश होतो आणि शांतेचा विवाह या शृंग म्हणजे ऋष्यशृंग ऋषींशी लावून देतो. पंधराव्या शतकातील कवी बलरामदास यांनी उडिया भाषेत लिहिलेल्या ' दांडी रामायणात ' हे उल्लेख सापडतात. 

पुढे दशरथ राजाने आपल्याला अपत्य नव्हते म्हणून जो पुत्रकामेष्टी यज्ञ केला, त्या यज्ञाचे प्रमुख पुरोहित पद ऋष्यशृंग ऋषींना म्हणजेच आपल्या जावयाला दिले. त्यांच्या अधिपत्याखाली तो यज्ञ झाला. हा यज्ञ सुफल संपूर्ण होऊन दशरथ राजाला पुढे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार सुपुत्रांचा म्हणजेच ब्रह्मदेवाच्या चाळीसाव्या पिढीचा जन्म झाला. कदाचित तेव्हापासून ' हे चाळीस पिढ्यात कोणी केले नाही ' असा वाक्प्रचार आला असावा. कारण ही अद्वितीय घटना चाळीसाव्या पिढीत घडली होती. 

श्रीरामाच्या बहिणीबद्दलची म्हणजेच शांतेबद्दलची ही माहिती वाचून कोणी असे म्हणेल की जर हे मूळ वाल्मिकी रामायणात नाही, तर खरे कशावरून ? ही शंका बरोबर आहे. पण जेव्हा मूळ रामायणात नसलेल्या इतर अनेक गोष्टी आपण स्वीकारतो, तेव्हा हेही स्वीकारायला हरकत नाही. कारण मुळात रामायण हे व्यक्ती आणि नातेसंबंधांवर आधारलेलं महाकाव्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शांतादेवी आणि ऋष्यशृंग ऋषींची मंदिरे नेपाळच्या ललितपूर जिल्ह्यात आहेत. तसेच आपल्या देशात हिमाचल प्रदेशातील कुल्लुपासून ६०/७० किमी अंतरावर शांतादेवी आणि ऋष्यशृंग ऋषींचे मंदिर आहे. देशभरातून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०९/०९/ २०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...