उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग बावीस ( रामायणकालीन शिक्षण )
शिक्षण ही मनुष्याच्या जीवनाला उन्नत करणारी सर्वात सुंदर गोष्ट आहे. रामायणकालीन संस्कृती ही एक अद्वितीय संस्कृती होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रामायणकालीन शिक्षण पद्धती. खाणीतून बाहेर काढलेल्या हिऱ्याला सुद्धा पैलू पाडावे लागतात. मनुष्य ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे. प्राणिमात्रातील तो हिराच आहे. रामायणकाल म्हणजे तर अशा एकापेक्षा एक सुंदर हिऱ्यांची खाणच होती. त्या काळात अशा हिऱ्यांना पैलू पडणारे कुशल हातही अस्तित्वात होते. म्हणून श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्यासारखे दैदिप्यमान हिरे निर्माण झाले. त्यांचे तेज आजही फिके झालेले नाही.
इंग्रजी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणत असत. जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण रामायणकालीन शिक्षण म्हणजे जणू कामधेनूचे दूध असे मी म्हणेन. गायीला आपण कामधेनू सुद्धा म्हणतो. गायीचे दूध बालकाला बुद्धिमान आणि तेजस्वी बनवते. हीच बुद्धिमत्ता आणि तेजस्विता त्या काळातील शिक्षणाने आपल्या विद्यार्थ्यांना दिली होती. ही शिक्षण आणि संस्काराची शिदोरी त्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडत असे.
आज शिक्षणाची आणि जीवनाची, शिक्षणाची आणि व्यवहाराची फारकत झालेली आपल्याला दृष्टीस पडते. त्या काळात जीवनासाठी उपयुक्त शिक्षण दिले जाई. साधा विचार आपण करू या की आजचे शिक्षण मुलांना परिपूर्ण बनवते का ? त्याला दैनंदिन जीवनातील कामे, कौशल्ये शिकवते का ? मुलांना कपडे धुता येतात का, भांडी घासता येतात का, स्वयंपाक करता येतो का, स्वतःच्या शरीराची नीट स्वच्छता तरी ठेवता येते का ? या सगळ्या मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव रामायणकालीन शिक्षणात होता. कारण विद्यार्थी जेव्हा आश्रमात रहात असे, तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याला स्वतःला कराव्या लागत. त्यामुळे स्वावलंबनाचा गुण आपोआपच येत असे. ' आत्मनिर्भर व्हा ' असे वेगळे सांगण्याची जरुरी नव्हती.
त्या काळात मौंजीबंधन विधीनंतर म्हणजे साधारणपणे वयाच्या आठव्या वर्षी विद्यार्थ्याला गुरुगृही जावे लागे. गुरुगृह म्हणजे गुरूंचा आश्रम असे, ज्याला तपोवन असेही म्हंटले जाई . तपोवनात खरोखरच तप, साधना करून तेजस्वी असलेले ऋषीमुनी राहत असत. आपल्या विद्यार्थ्यांना ते तसेच तेजस्वी घडवत असत. हे गुरु वेदादि सर्व विद्यात निष्णात असत. शिकवण्यासाठी ते विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेत नसत. त्यांचे आश्रम राजाच्या किंवा समाजाच्या उदार आश्रयावर चालत. विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर यथाशक्ती गुरुदक्षिणा देत असत.
या तपोवनांचे किंवा आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर वागवले जाई . राजाचा मुलगा असो की गरीबाचा, सर्वाना आश्रमातील कामे करावी लागत. शिवाय पहाटे लवकर उठून, स्वतःचे आवरून , स्वयंपाक करून गुरूंच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित व्हावे लागे . विद्यार्थ्यांचा दिनक्रम अतिशय व्यस्त असायचा. गुरूंची शिस्तही असायची आणि सोबत त्यांचे आणि गुरुमातेचे अपत्यवत प्रेम आपल्या सर्व शिष्यांवर असायचे. श्रीराम, लक्ष्मणादि भावंडे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिकली तर पुढे महाभारत काळात श्रीकृष्ण, बलराम, सुदामा हे सर्व सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकले. या काळात श्रीराम, श्रीकृष्ण यांनी राजपुत्र असून देखील आश्रमातील सर्व कामे केली. श्रीरामाचे सुपुत्र लवकुश सुद्धा वाल्मिक ऋषींच्या आश्रमात अशाच पद्धतीने शिकले. लवकुश किती तेजस्वी होते, हे आपल्याला माहिती आहे. प्रत्यक्ष श्रीरामाच्या अश्वमेध यज्ञाचा अश्व अडवण्याचे सामर्थ्य या चिमुकल्या बालकांमध्ये अशा शिक्षणामुळेच आले.
आज विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी राहिले तर होस्टेलमध्ये राहतात. या होस्टेलची जाहिरात सर्व सुखसोयींनी युक्त, सुग्रास भोजन इ प्रकारे केली जाते. रामायणकाळात विद्यार्थ्यांना साधकाचे कठोर जीवन जगावे लागे . सर्व सुखसोयी आणि सुग्रास भोजन या गोष्टींना महत्व नव्हते. विद्यार्जन करणे हा प्रमुख हेतू होता. विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचर्याचे पालन करणे अपेक्षित आणि आवश्यक असे. त्यामुळे आजसारखे इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होत नसे. एखाद्या भिंगातून सूर्यकिरणे एकत्रित केली तर त्यांची शक्ती वाढते. विखुरलेल्या सूर्यकिरणांमध्ये ती शक्ती नसते. तशी एकाग्रतेमुळे त्या काळातील विद्यार्थ्यांची वाढत असे. त्या काळात आजच्या सारखे छापील ग्रंथ उपलब्द्ध नव्हते. त्यामुळे पाठांतराला खूप महत्व होते. हजारो श्लोक विद्यार्थ्यांचे पाठ असत. सर्व ज्ञान मुखोद्गत असे. पाठांतराने स्मरणशक्ती वाढते. स्मरणशक्ती आपण जेवढी वाढवू तेवढी वाढते.
आजच्या शिक्षणपद्धतीत पाठांतराच्या या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पाठांतरामुळे अनेक गोष्टी लहानपणीच पाठ होतात. मग त्या चांगल्या कविता असतील, पाढे असतील. काही जागरूक पालक आजही आपल्या मुलांकडून स्तोत्रे, कविता इ गोष्टी पाठ करून घेतात. मनाचे श्लोक, रामरक्षा इ सारखी स्तोत्रे, भगवद्गीता इ गोष्टी लहानपणी सहज मुखोद्गत होऊ शकतात. त्याचा उपयोग वाणीचे दोष घालवणे, शुद्ध उच्चार करणे इ साठी सुद्धा होतो.
त्या काळात स्त्रियांना देखील सर्व प्रकारच्या शिक्षणात तरबेज करण्यात येत असे. स्त्रिया या सर्व विद्यात पारंगत असत. रामायणकालीन स्त्रिया या सुधारलेल्या आणि प्रगत विचारांच्या होत्या. कैकेयीला युद्धकला अवगत होती. तिने दशरथाला युद्धात मदत केली होती. स्त्रियांना वेद, उपनिषदे इ बरोबरच राज्यकारभार आदींचे शिक्षण देण्यात येत असे. श्रीरामाला जेव्हा वनवासात जावे लागेल असे निश्चित झाले, तेव्हा राज्यकारभार कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी ' सीता ही सर्व ज्ञानाने परिपूर्ण असून ती राज्यकारभार सहज सांभाळू शकेल. त्यामुळे चिंता नाही. ' असा सार्थ विश्वास सीतेबद्दल व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आश्रमात बरेच वेळा गुरुमाता देखील विद्यादानात महत्वाची जबाबदारी पार पाडत असत.
आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असे. पण या कालात देखील तो आजन्म विदयार्थी राहील याची दक्षता गुरु घेत असत. गृहस्थाश्रमात असताना देखील वेद, उपनिषदे, शास्त्रे इ चे अध्ययन त्याने करत राहावे अशी शिकवण दिली जात होती. त्यामुळे त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींवर साहजिकच सद्सद्विवेक बुद्धीचे नियंत्रण राहून त्याच्या हातून अयोग्य गोष्टी घडत नसत. त्यांच्या या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला मिळत असे. गुरु वसिष्ठांच्या आश्रमात शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसिष्ठानी श्रीरामासह सगळ्या शिष्याना निरोप देताना जो उपदेश केला तो फार सुंदर होता. आजही तो सगळ्यांनी लक्षात घ्यावा असा आहे. ते म्हणतात, '" आज तुमचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षात ठेवा ' सा विद्या या विमुक्तये ' अर्थात जे मुक्त करते ते ज्ञान. म्हणून मी तुम्हाला आजपासून माझ्या सर्व आज्ञातुन मुक्त करीत आहे. एखादी गोष्ट मी सांगितली म्हणून प्रमाण मानू नका. आपले ज्ञान, विचार, विवेक यांच्या साहाय्याने निर्णय घ्या. ' आत्मदीपो भव. स्वयंप्रकाशित व्हा. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीन ऋण फेडावे लागतात. देवऋण, पितृऋण आणि आचार्यऋण. परमेश्वराची भक्ती केल्याने आणि सर्वाभूती ईश्वर पाहिल्याने देवऋण फेडता येते. आपले सुख त्यागून मात्यापित्यांची आज्ञा पाळणे आणि त्यांना सुख देणे यामुळे पितृऋण फिटते आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करणे, मानवधर्माचा आदर्श प्रस्थापित करणे यामुळे आचार्यऋण फेडता येते. "
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०४/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा