मुख्य सामग्रीवर वगळा

मृत्यूकडून जीवनाकडे...

 उगवतीचे रंग 

मृत्यूकडून जीवनाकडे... 

कधी कधी हे सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते. आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही अशा गोष्टी प्रत्यक्षात घडतात. अशीच ही एका मुलीची कथा. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचलेली. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणता चमत्कार घडवू शकते, त्याचे प्रत्यंतर देणारी. ही घटना आहे २४ डिसेंबर १९७१ ची. 

ज्युलियन कोपकी, एक १७ वर्षांची मुलगी. पेरू देशाची राजधानी लिमा येथे शिक्षणासाठी आलेली.  नुकतेच हायस्कुलचे शिक्षण पूर्ण झालेले. तिचे आईवडील तेथून जवळच असलेल्या अमेझॉनच्या जंगलात एक प्रयोगशाळा स्थापून प्राणिशास्त्र आणि पक्षीशास्त्रावर संशोधन करीत असतात. तिची आई काही कामानिमित्त लिमा येथे आलेली होती. नाताळचा सण फक्त काही दिवसांवर आलेला होता. ज्युलिअनच्या डोळ्यात नाताळ साजरा करण्याची स्वप्ने तरळत होती. आपल्या वडिलांना भेटण्यासही ती उत्सुक होती. खरे तर तिच्या आईला आपले काम संपवून १९ किंवा २० डिसेंबरला परत आपल्या प्रयोगशाळेकडे जायचे होते . पण ज्युलिअनच्या शाळेत पदवीदान समारंभ २३ डिसेंबरला असल्याने ती थांबते आणि दोघीही तो कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या त्या अमेझॉनस्थित असलेल्या घराकडे आणि प्रयोगशाळेकडे जाण्याचे ठरवतात. 

चोवीस डिसेंबरच्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी त्या प्रयत्न करतात. पण सुट्या आणि नाताळ असल्याने सगळ्या विमानांची तिकिटे आधीच आरक्षित झालेली असतात. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना लांसा एअरलाईन्स ५०८ या विमानाचे तिकीट मिळते. त्या ज्युलिअनच्या वडिलांना ही बातमी कळवतात. लांसा ही विमानकंपनी तशी फारशी चांगली नाही. तिच्या विमानांना अपघात झाले आहेत. तेव्हा त्या  विमानाने येऊ नका असे तिचे  वडील कळवतात. पण दुसऱ्या कोणत्याही विमानाचे तिकीट उपलब्ध नसल्याने त्या दोघी याच विमानाने यायचा निर्णय नाईलाजाने घेतात. 

२४ डिसेंबरची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र बनून उभी ठाकते. त्या दिवशी विमान येते तेच सात तास उशिरा. खराब हवामानामुळे विमानाला उशीर झालेला असतो. विमानाची वाट पाहण्यातच सारा उत्साह मावळलेला असतो. अखेर एकदाचे विमान येते. सगळेजण आपापल्या आसनांवर स्थानापन्न होतात आणि विमान हवेत झेपावते. तसा तर तो प्रवास तासाभराचाच असतो. त्यामुळे उशीर झाला तरी एक तासाने आपण आपल्या घरी जाऊ ही आशा मनात असते. पण थोड्याच वेळात वातावरणात बदल होतो. विमान काळया ढगांमधून वाटचाल करते. विजा चमकू लागतात. विमान आता हवेमध्ये हेलकावे खाऊ लागते. प्रवाश्यांमध्ये भीती निर्माण होते. विमानातील वस्तू, बॅग, नाताळसाठी खरेदी केलेली खेळणी लोकांच्या अंगावर पडू लागतात. अचानक विमानाच्या डाव्या बाजूला बाहेर प्रकाशाचा लोळ दिसतो. ज्युलिअनची आई म्हणते, ' आता सगळे संपले बहुतेक. ' तेच तिच्या आईचे शेवटचे शब्द तिला ऐकू येतात. काही क्षणातच हवेतच स्फोट होऊन विमानाचे दोन तुकडे होतात. ज्युलिअनने सीटबेल्ट बांधलेला असतो आणि आपल्या खुर्चीला ती घट्ट पकडून असते. तिला विमानातून आपण खाली कोसळतो आहोत एवढी जाणीव फक्त होते. 

ज्युलिअनला जेव्हा शुद्ध येते, तेव्हा तिला आढळते की आपण एका घनदाट जंगलात पडलेलो आहोत. तिच्या खांद्याचे हाड मोडलेले असते. तेथे जखम होऊन प्रचंड वेदना होत असतात. पायाला दुखापत झालेली असते. उजव्या हाताला दुखापत झालेली असते. ती सुमारे दहा हजार फूट उंचीवरून खाली कोसळलेली असते. एवढ्या उंचीवरून पडूनही ती जिवंत असते हेच खरे तर मोठे आश्चर्य. ' देव तारी त्याला कोण मारी ' असे आपण म्हणतो ते तिच्या बाबतीत अक्षरशः खरे ठरले. पण ती वाचली तरी पुढचा जगण्यासाठीचा संघर्ष अजिबात सोपा नसतो. ती जेथे पडलेली असते ते ठिकाण म्हणजे अमेझॉनचे घनदाट आणि महाभयंकर जंगल. सर्वसाधारण माणसाची जाण्याची हिंमत होणार नाही असे ते ठिकाण. उंचच वाढलेली झाडे. सूर्यप्रकाश क्वचित दिसला तर भाग्य. विषारी साप, वाघ, सिंह इ प्राण्यांची रेलचेल, पिसवा, डास, निरनिराळे चावणारे कीटक यांनी हे जंगल भरलेले. शिवाय हे पावसाळी जंगल. कायम ओली जमीन. रात्री प्रचंड थंडी. अशावेळी या ज्युलिअनच्या अंगावर असतो फक्त एक आखूड स्कर्ट. पायातली एक सॅंडल कुठेतरी हरवलेली असते. एकाच सॅण्डलचा वापर करून ती चालते. निदान तो पाय तो सुरक्षित राहील या आशेने. 

सुरुवातीला तिला आपल्या आईची आठवण येते. आपल्या बाजूच्याच सीटवर असणारी आई कुठे असेल ! ती आजूबाजूला फिरून आपल्या आईचा आणि सहप्रवाशांचा शोध घेते पण व्यर्थ. त्या घनदाट जंगलात कोणताही मागमूस तिला लागत नाही. अशावेळी ती थकलेली असते. पोटात प्रचंड भूक असते. तिला एक मिठाईचा बॉक्स सापडतो. कदाचित विमानातूनच कोणाचा तरी पडलेला असावा. ती तेवढा बॉक्स संपवते. तेवढ्यापुरती भूक तर भागलेली असते. त्यातल्या त्यात एक सुरक्षित जागा बघून रात्र तेथे काढायची ठरवते. पण जंगलातील डास, कीटक तिला चावून हैराण करतात. अंगावरच्या पातळ कपड्यांमुळे प्रचंड थंडीलाही तोंड देणे कठीण होते. तशीच रात्र ती काढते. सकाळ होते. जीवनाच्या नव्या आशेने ती मार्ग शोधायला सुरुवात करते. पण अमेझॉनच्या प्रचंड आणि घनदाट जंगलात रस्ता तरी कसा आणि कुठे शोधणार ? चालून चालून दमते आणि पुन्हा तशीच रात्र कुठेतरी काढते. दुसऱ्या दिवशी तिला आपल्या डोक्यांवर विमानांची घरघर ऐकू येते. पण दाट झाडांमुळे विमान दिसत नाही. तरी ती सगळा जीव एकवटून ओरडते. पण काही उपयोग होत नाही. तिच्या विमानाला झालेल्या अपघातामुळे त्या शोधार्थ काही शोधपथके अमेझॉनच्या जंगलात येतात पण त्यांना काहीही सुगावा लागत नाही आणि ते परत जातात. 

बिचारी ज्युलियन जंगलात एकटी, असहाय भटकत राहते. तसे जंगल तिला अपरिचित नसते. जंगलातल्या वनस्पती, प्राण्यांविषयी तिला आपल्या आईवडिलांमुळे चांगली माहिती असते. पण यावेळी ती एकटी आणि असहाय असते. अशावेळी तिला आपल्या वडिलांनी सांगितलेला पहिला धडा आठवतो. जंगलात समजा तू हरवलीस तर पाण्याचा शोध घे. पाण्याच्या, नदीच्या प्रवाहाच्या दिशेने चालत राहा म्हणजे कुठेतरी मानवी वस्ती दृष्टीस पडेल. ती पाण्याचा शोध घेत असताना तिला पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. तिला खूप हायसे वाटते. ती ते पाणी पिऊन आपली तहान भागवते आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालत राहते. पाण्यातून किंवा नदीकाठाने चालणेही सोपे नसते. नदीतही विषारी जलचर, मगरी यांचे साम्राज्य असते. काठावरून इतके दाट जंगल आणि वेली असतात की सराईताला देखील चालता येऊ नये. आता तिच्या खांद्यावरील जखम चिघळलेली असते. त्यात अळ्या झालेल्या असतात. असे आठ दिवस ती चालत राहते. उपाशी राहण्यामुळे आणि सततच्या श्रमांमुळे आपली शक्ती आता संपत आली आहे, हे तिला जाणवते. 

नवव्या दिवशी नदी पार केल्यानंतर एक चढण तिला दिसते. मोठ्या कष्टाने ती चढण चढते. आणि आश्चर्य म्हणजे तिच्या दृष्टीला नदीकाठी बांधलेली एक नाव नजरेस पडते. बाजूलाच एक झोपडी असते. त्या झोपडीत कोणीही नसते. तिथे तिला रॉकेलचा एक डबा दिसतो. तिला आठवते की तिच्या वडिलांनी त्यांच्या कुत्र्याला जी जखम झाली होती आणि ज्यात अळ्या झाल्या होत्या त्यावर रॉकेल लावले होते. त्यामुळे ती त्या डब्यातील रॉकेल आपल्या खांद्यावरच्या जखमेत लावते. प्रचंड आग होते. पण इलाज नसतो. एकदा तिच्या मनात येते की किनाऱ्यावर बांधलेली ती नाव घेऊन आपण निघून जावे. पण अशाही परिस्थितीत तिची सद्सद्विवेकबुद्धी तिला सोडून गेलेली नसते. ती विचार करते की ज्यांनी कोणी ती आणली असेल त्यांची पंचाईत होईल म्हणून ती तो विचार सोडून देते. अतिश्रमाने ती तिथेच थकून झोपी जाते. 

दुसऱ्या दिवशी काही लोक तिथे येतात. या मुलीला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटते कारण अशा प्रचंड, भयानक जंगलात ही एकटीच तरुण मुलगी कुठून आणि कशी आली हा प्रश्न त्यांना पडतो. मग ज्युलियन त्यांना सगळी हकीगत सांगते. ती माणसे मग तिच्यावर थोडाफार औषधोपचार करतात. त्यांच्याजवळ असलेले खायला देतात. लवकरच तिच्या वडिलांची आणि तिची भेट घडवून आणतात. तिच्या वडिलांची अवस्थाही अत्यंत वाईट झालेली असते. या सगळ्या घटनेचा मानसिक परिणाम त्यांच्यावरही झालेला असतो. ज्युलियन त्यांना तिच्या आईबद्दल विचारते. पण त्यांनाही अजून तरी तिच्याबद्दल काही कळलेले नसते. ज्युलियन थोडी बरी झाल्यावर त्या अपघातग्रस्त विमानाच्या शोध घेणाऱ्या पथकात ती सहभागी होते. आपल्या आईचा शोध घेते. अखेर तिची आई त्यांना सापडते. पण अपघातामुळे ती प्रचंड जखमी होऊन यातनांना तोंड देत असते. तिला दवाखान्यात नेण्यात येते पण ती काही जगत नाही. ज्युलिअनच्या जखमा अजून पूर्णपणे बऱ्या झालेल्या नसतात. तिला पुढील उपचारासाठी जर्मनीत नेण्यात येते. तिथे ती बरी होते. 

पण धन्य ती ज्युलियन की एवढ्या घटनेनंतर देखील ती पुढे आपल्या वडिलांसोबतच अमेझॉनच्या जंगलात शोधकार्यासाठी स्वतःला वाहून घेते. प्राणिशास्त्रात डॉक्टरेट करते. या घटनेनंतर सुमारे चाळीस वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये ती आपल्या आठवणी ' व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय ' या पुस्तकात शब्दबद्ध करते. तिच्या या पुस्तकाला उत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार मिळतो. तिच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पेरूच्या सरकारतर्फे तिचा नुकताच २०१९ मध्ये सन्मान केला गेला. या तिकडच्या हिरकणीच्या जीवनावर अनेक चित्रपट आणि डॉक्युमेंटरी पण निघाल्या आहेत. 

थोड्याफार संकटाने खचून जाण्याऱ्या, नैराश्यग्रस्त होणाऱ्या सर्वांसाठीच ज्यूलियनची कथा प्रेरणादायी आहे. आपले जीवन ही परमेश्वराने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. थोड्याशा संकटांनी खचून जाऊन आत्महत्या करण्याइतके जीवन स्वस्त नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याला कठीणातल्या कठीण प्रसंगातून तारून नेऊ शकते हाच संदेश ज्यूलियनचे जीवन आपल्याला देते. 

©️  विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२७/०९/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...