उगवतीचे रंग
जैसी गंगा वाहे...
गेल्या महिन्यात सकाळी दहा अकराच्या सुमारास माझा फोन वाजला. पाहतो तर फोनवर माळी गुरुजी, वाडे असे नाव सेव्ह केलेले होते. मला अत्यंत आदरणीय आणि प्रिय असलेल्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा फोन पाहून मला खूप आनंद झाला. त्यांचा फोन घेतल्याबरोबर सुरुवातीला फक्त विश्वास असा प्रेमळ शब्द आणि नंतर ऐकू येतं ते अकारण आणि अकृत्रिम निर्मळ हास्य. सगळ्यांचे ते आदरणीय अण्णा. माझ्या वडिलांचे मित्र. माझे वडील आता नाहीत. पण अण्णांचा फोन आला की नकळत मला माझ्या वडिलांची आठवण होते आणि डोळे पाणावतात. अण्णांचा फोन आला की त्यांचे बोलणे ऐकत राहावे. आपण कल्पना करू शकणार नाही की आपल्याशी बोलणाऱ्या या समोरच्या व्यक्तीचे वय फक्त ९४ वर्षे आहे .
मी अण्णांना म्हटले की अण्णा या वयातही किती छान बोलता तुम्ही. बोलण्यात कुठेही विसंगती नाही. पुन्हा मग अण्णा निर्मळ हसतात. ते म्हणतात, ' अरे, ही साधनेची शक्ती. ' मग अण्णांच्या बोलण्यातून वेदांतातील, गीतेतील तत्वज्ञान सहज उलगडू लागते. त्यातल्या गोष्टी त्यांच्या स्वानुभवाचं रूप घेऊन प्रकटतात. आपण जणू एखादे रसाळ प्रवचन ऐकतो आहोत असा भास होतो. आपण जर त्यांना म्हटलं की अण्णा, किती छान सांगता आहात तुम्ही ! मग पुन्हा तेच निर्मळ हास्य. अण्णा म्हणतात, ' अरे मी बोलत नाही. ती शक्ती माझ्याकडून हे बोलवते आहे. माझे सगळे बोलणे, हसणे, जगणे हे त्या शक्तीमुळे. मी शक्तिपाताची दीक्षा घेतली आहे. गुरु केला आहे. बोलविता धनी तोच आहे. ' अण्णा कुठल्याही गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत.
बोलता बोलता अण्णा मला म्हणाले , ' तू गीता वाचली आहेस का ? ' मी म्हटले, ' हो वाचली आहे, अण्णा. पण मला फारशी कळलेली नाही आणि अंगवळणी तर त्याहून पडली नाही. तुमच्यासारखा माझा अभ्यास नाही. ' मग अण्णा म्हणतात, ' तुला मी गीतेवरचं एक पुस्तक वाचायला देणार आहे. मग अण्णा मला त्या पुस्तकाचे नाव, लेखक आणि पत्ता सांगतात. फोन नंबर सांगतात. हे सगळं फोनवरून सांगताना त्या फक्त ९४ वय असलेल्या अण्णांची कुठेही चूक होत नाही. मला म्हणतात, ' ते पुस्तक मागव. तुझी एक प्रत आणि माझ्यासाठी चार प्रती अशा पाच प्रती मागव. पैसे मी देईन. पुस्तकं आली की मला कळव. ' हा फोन झाल्यानंतर परत आठ दिवसांनी त्यांचा पुन्हा एकदा फोन आला. पुन्हा ते निर्मळ हास्य ऐकायला मिळालं. त्यांनी पहिला प्रश्न केला, ' ती पुस्तकं मागवली का रे ? त्यांना फोन केला होतास का ? '
मी खरं तर ती पुस्तकं मागवण्याचे विसरलेलो असतो. पण अण्णांचा फोन आल्यामुळे त्याच दिवशी मी फोन करून ती पुस्तकं मागवून घेतली आणि अण्णांना कळवलं. अण्णा सध्या नंदुरबारला आहेत. आपल्या मुलांकडे. त्यांचा मुलगा अशोक इकडे काही कामानिमित्त येणार होता. त्याला अण्णांनी आठवणीने माझ्याकडे पाठवलं आणि पुस्तकं आणण्यास सांगितली. त्याप्रमाणे तो आला, पुस्तकं घेऊन गेला आणि पैसेही देऊन गेला. मग त्याच्यासोबत भेट म्हणून अण्णांना माझीही दोन पुस्तकं पाठवली. आताही अण्णांचा अधूनमधून फोन येतो. मग ते मी ते गीतेवरचं पुस्तक वाचतो आहे की नाही याची आवर्जून चौकशी करतात. ते पुस्तक कसं वाचायचं ते सांगतात. एवढ्या प्रेमाने आजकाल कोण कोणाला सांगतो ?
कोण आहेत हे अण्णा ? तर त्यांचं नाव आहे देवराम श्यामराव माळी . जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे हे त्यांचं गाव. त्यांचे आईवडील लहानपणीच वारले. नगरदेवळा या गावी त्यांचं आजोळ. म्हणजे मामाचं गाव. तिथे आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी त्यांना सांभाळलं. त्यांचं बालपण खूप कष्टात गेलं. प्रसंगी मोलमजुरी सुद्धा करावी लागली. पण मनात शिक्षणाची आस होती. त्यामुळे पुढे भडगाव आणि नंतर चाळीसगावला ते शिकले. अकरावी झाले आणि शिक्षकांसाठीचा त्यावेळी असणारा पी टी सी कोर्स करून शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाली. त्यांची सुरुवातीची एक दोन वर्षे नोकरी एका खाजगी संस्थेत खांडबारा येथे झाली. खांडबारा हा आदिवासी भाग. तिथे त्यांनी इतके मन लावून मुलांना शिकवले की त्या दोन वर्षात त्यांच्यात आणि त्यांच्या विद्यार्थ्यात आयुष्यभराचे स्नेहबंध निर्माण झाले. निवृत्त झाल्यानंतर अण्णा एकदा आपल्या एका विद्यार्थ्यांला भेटण्यासाठी खास खांडबाऱ्याला गेले. म्हणजे सुमारे पन्नास साठ वर्षानंतर. पण इतक्या वर्षांनंतरही त्या विद्यार्थ्यांचे नाव त्यांना स्पष्ट आठवत होते. त्यांनी गावात त्याचा शोध घेतला. मनामध्ये तीव्र इच्छा असली की भेट होतेच. तशीच त्यांची आणि त्या विद्यार्थ्याची भेट झाली. तो विद्यार्थीही शिक्षक म्हणून आता निवृत्त झाला होता. पण त्याने त्यांना ओळखले आणि ' गुरुजी मीच तुमचा तो विद्यार्थी ' म्हणून त्यांचे पाय धरले. दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळले. अशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट खरेच दुर्मिळ.
पुढे अण्णा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत झालेत. नवनवीन शिकण्याचा ध्यास आणि वाचनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या वयाच्या ४५ व्या वर्षी अण्णांनी नोकरी करून बी ए ची पदवी प्राप्त केली आणि नंतर बी एड देखील केले. अण्णांच्या प्रामाणिक आणि कार्यक्षम सेवेची दखल शासनाने घेतली नसती तरच नवल ! जळगाव जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. चाळीसगावलाच ते सेवानिवृत्त झाले. या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान आपली तीन मुले आणि दोन मुलींचे शिक्षण, लग्ने त्यांनी केली. अण्णांच्या सहधर्मचारिणी तशा लौकिक अर्थाने फारशा न शिकलेल्या. पण आपल्या मुलामुलींना शिस्त लावण्यात आणि संस्कार देण्यात ही माउली कुठेही कमी पडली नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज अण्णांची ही सगळी मुले उत्तम शिकली आहेत. मोठा मुलगा नंदुरबारला आर्थोपेडिक सर्जन आहे. नात, नातू आणि पणतू आणि त्यांचे विवाह पाहण्याचे भाग्य अण्णांना लाभले आहे.
अण्णा माझे वडील असताना अधूनमधून आमच्या घरी येत असत. आमच्या गावी ते शिक्षकही होते. स्वच्छ पांढरेशुभ्र धोतर, त्यावर नेहरूशर्ट आणि डोक्यावर टोपी असा त्यांचा वेष असायचा. पण अण्णांचे व्यक्तिमत्व त्यात उठून दिसायचे. ते आमच्या घरी आले की माझ्या वडिलांची त्यांची पुस्तकांची देवाणघेवाण व्हायची. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा व्हायची. ही चर्चा बहुतेक वेळा गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या सारख्या ग्रंथांवर होत असे. अण्णांचे बहुतेक सगळ्या महत्वाच्या धार्मिक ग्रंथांचे वाचन झाले आहे. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांची त्यांनी अनेक पारायणे केली आहेत. त्यावेळी मला अण्णा आणि माझे वडील यांच्यात होत असलेल्या चर्चेतील फारसे कळत नसे. पण त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व, नीटनेटकी राहणी आणि साध्या अकृत्रिम वागणुकीमुळे माझ्यावर त्यांचा प्रभाव होता. तो आजतागायत कायम आहे.
निवृत्तीनंतर आपल्या गावाला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आपल्या समाजबांधवांना एकत्र केले. समाजमंदिर, मंगल कार्यालय उभारून ते त्यांच्या ताब्यात दिले. गावात यात्रेच्या वेळी कुस्त्यांच्या स्पर्धा आणि तमाशाचा फड उभा राहत असे. त्यांच्या प्रयत्नाने आणि प्रेरणेने गावकऱ्यांनी तमाशाचा फड बंद करून कीर्तन सप्ताह घ्यायला सुरुवात केली. ती परंपरा अजूनही सुरु आहे. अण्णांनी बरीच वर्षे शेतीही केली. त्यातही नवनवीन प्रयोग केले. आपल्या अनेक शेतकरी मित्रांना ते सांगितले. ' जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे..' असा त्यांचा स्वभाव.
अण्णांची दोन मुले नंदुरबारला आहेत आणि एक मुलगा औरंगाबादला आहे. मोठी कन्या मालेगाव तर लहान कन्या यावल येथे आहे. आता आपल्या वाढत्या वयामुळे ते वाडे येथील घर सोडून आपल्या मुलांजवळ नंदुरबारला असतात. मुलेही आपल्या अण्णांना आणि आईला आता तळहाताच्या फोडासारखे जपतात. अण्णांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनातून ते आता समाजसेवी उपक्रमांना मदत करतात. नुकताच त्यांच्या मुलांनी त्यांचा ९४ वा वाढदिवस साजरा केला. ते शंभरी नक्की गाठतील अशी खात्री आहे. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे हे कृतार्थ जीवन आहे. अशा वेळी मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो.
जैसी गंगा वाहे, तैसे ज्याचे मन
भगवंत जाण, त्याचे जवळी.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२५/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी क्रं ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा