उगवतीचे रंग
पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग तीन ( अंतिम )
आधीच्या दोन भागात आपण रामायणातील खलपुरुष रावण आणि वाली तसेच जालंधर आणि हिरण्यकश्यपू यांची आणि त्यांच्या पतिव्रता असलेल्या पत्नींची माहिती पाहिली. आजच्या भागात आपण श्रीकृष्ण चरित्रात येणाऱ्या शंबरासुर, वासुदेव पौंड्रक आणि महाभारतातील धृतराष्ट्र आणि त्यांच्या पत्नींविषयी माहिती घेणार आहोत.
शंबरासुर हा श्रीकृष्णाच्या प्रमुख शत्रूंपैकी एक होता. तो स्वतःला सर्वशक्तिमान समजत असे. अनेक मायावी विद्यांमध्ये तो निपुण होता. त्याच्या पत्नीचे नाव मायावती होते. शंबरासुराच्या अंगी असलेल्या अपार शक्तीमुळे तो देवांना तो अजेय झाला होता. श्रीकृष्ण आणि रुख्मिणीचा प्रथम पुत्रच त्याचा वध करेल असा त्याला शाप होता. त्यानुसार श्रीकृष्ण आणि रुख्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्न याच्या हाती त्याचा वध होतो. त्याचे मायासुर, कुम्भकेतू इ पुत्रही युद्धात मारले जातात. या शंबरासुराची पत्नी मायावती ही धर्मपरायण आणि पतिव्रता असते. तिला आपल्या पतीचे वागणे आवडत नाही. श्रीकृष्णाशी शत्रुत्व पत्करू नका असे ती अनेकदा त्याला समजावते. पण आपल्या सामर्थ्याच्या धुंदीत असलेला शंबरासुर तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपला सर्वनाश करून घेतो.
श्रीकृष्णाच्या प्रमुख शत्रूंपैकी आणखी एक होता वासुदेव पौंड्रक. तो स्वतःला भगवान म्हणवून घेत असे. खरा श्रीकृष्ण मीच आहे असे तो म्हणत असे. त्याने श्रीकृष्णाप्रमाणेच नकली शंख, चक्र, गदा इ गोष्टी बनवून घेतल्या होत्या. मायावी विद्येतही तो प्रवीण होता. त्याचा एक भाऊ स्वतःला बलराम म्हणवून घेई आणि बलरामाप्रमाणेच तो हलधारी होता. पौंड्रकच्या नगरीत साधूंना यज्ञ करण्यास, श्रीकृष्णाचे नाव घेण्यास मनाई होती. असे कोणी आढळले तर त्यांचा अनन्वित छळ होत असे. एक शक्तिमान असलेला वानर त्याचा हनुमान म्हणून मिरवत होता. या पौंड्रकाची पत्नी होती तारा. ती अतिशय सुशील, धर्मपरायण स्त्री होती. तिने पौंड्रकाला वेळोवेळी त्याच्या नकलीपणाची जाणीव करून दिली. ती म्हणत असे, ' तुम्ही कसले भगवान ? खरे भगवान तर वासुदेव श्रीकृष्ण आहेत. तेव्हा हे नाटक बंद करा. प्रजेचा छळ करू नका. श्रीकृष्णांना शरण जा. ' पण आपल्याच धुंदीत आणि घमेंडीत असलेल्या पौंड्रकाने आपल्या पत्नीच्या या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर एकदा तो तिला मारायलाही प्रवृत्त झाला होता. पण जसे लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो जसा वाघ होत नाही, तसेच वासुदेव पौंड्रकाचे झाले. श्रीकृष्णाशी शत्रुत्व पत्करून तो आपल्या प्राणांनिशी सर्वस्व गमावून बसला. या वासुदेव पौंड्रकाने आपल्या काकांचे राज्य हिरावून घेऊन त्यांना कैदेत टाकले होते. पण त्याचे काका श्रीकृष्ण भक्त होते. श्रीकृष्णानेच त्यांचे रक्षण केले आणि पौंड्रकाचा वध झाल्यानंतर त्यांना गादीवर बसवले.
महाभारतामध्ये धृतराष्ट्राचे पात्र येते. धृतराष्ट्र अंध आहे. वरवर तो न्यायी आणि शांत दिसतो. पण समुद्र वरवर जरी शांत दिसत असला, तरी आतमध्ये प्रचंड घडामोडी सुरु असतात. तसे धृतराष्ट्राचे आहे. तो तसा कपटी आहे. तो जसा दृष्टीने अंध आहे, तसाच पुत्रमोहाने सुद्धा अंध झालेला आहे. शकुनी आणि दुर्योधनाची कपट कारस्थाने त्याला कळत नाहीत असे नाही. पण तो त्यांना विरोधही करत नाही. किंबहुना त्याची या सगळ्या गोष्टींना मूक संमती असते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. अशा या धृतराष्ट्राची पत्नी आहे गांधारी. खरे तर लग्नापूर्वी तिला हेही माहित नसते की आपला होणारा पती अंध आहे. पण जेव्हा तिला हे कळते तेव्हा ती हे वास्तव स्वीकारते. शकुनी तिचा भाऊ असला तरी त्याचे हस्तिनापुरात राहणे तिला आवडत नाही. धृतराष्ट्राला ती वेळोवेळी राज्यावर पांडवांचा अधिकार आहे हे सांगते. महाभारत युद्धाच्या प्रसंगी दुर्योधन दररोज तिचे आशीर्वाद घेण्यासाठी येतो. त्यावेळी ती त्याला कधीही विजयश्रीचा आशीर्वाद देत नाही. तर ' यतो धर्मस्ततो जयः ' असाच आशीर्वाद देते. म्हणजे धर्माचा विजय होईल असे ती सांगते. या युद्धात दररोज तिचे पुत्र एकेक करून मारले जात असतात, तरीही दुर्योधनाला ती विजयाचा आशीर्वाद देत नाही.
द्रौपदी वस्रहरणाच्या प्रसंगी तर ती एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे कडाडते. सगळ्यांच्या देखत आपल्या सुनेची विटंबना झाली म्हणून सगळ्यांची निर्भत्सना करते. द्रौपदी शापवाणी उच्चारणार असते, तिला थांबवण्याचे सामर्थ्य त्या प्रसंगी फक्त गांधारीत असते. गांधारीचे दुर्दैव असे की तिच्या संपूर्ण त्यागमय आणि समर्पित जीवनात तिचे म्हणणे ना तिचा पती ऐकतो ना तिची मुले. त्यामुळे शंभर मुले असूनही ती निपुत्रिक होते. तिच्या सुना विधवा होतात. तिची मुलगी दुःशला विधवा होते. संपूर्ण कुरुवंशाचा नाश होतो.
या सगळ्या गोष्टी पुराणातील आहेत. पण त्यांच्याकडे एक नीतिकथा म्हणून देखील आपण पाहू शकतो. अन्याय, अत्याचार आणि आपल्या शक्तीची घमेंड या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. एक ना एक दिवस त्यांचा अंत हा ठरलेला असतो. जसे पेराल तसे उगवते. वाईट गोष्टीतून काही चांगले निपजेल अशी अपेक्षा करताच येत नाही. विषवृक्षाला आंब्याची मधुर फळे कशी येतील ?
या सगळ्या गोष्टीतून आणखी एक गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे स्त्रियांची उज्वल प्रतिमा. प्राचीन काळात देखील धर्मपरायण, पतिव्रता स्त्रियांची कमी नव्हती. प्रसंगी आपल्या पतीला उपदेशाचे चार शब्द सुनावण्याची हिंमत त्यांनी दाखवली आहे.
' कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती '
कुळामध्ये कुपुत्र जन्म घेऊ शकतात पण कुमाता कधीही असत नाही. ही गोष्ट या सगळ्या स्त्रियांनी सिद्ध करून दाखवली आहे. त्यांच्या प्रामाणिक सल्ल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांनी आणि पतींनी आपला सर्वनाश ओढवून घेतला आहे. अशा स्त्रिया प्राचीन काळातच होत्या असे समजण्याची गरज नाही. आजच्या काळात देखील बहुसंख्य स्त्रिया आपला पतिव्रता धर्म निभावत आहेत, आपले घर, कुटुंब, नोकरी अशा सगळ्या आघाड्या सांभाळत आहेत. आजच्या या धकाधकीच्या काळात आपले स्वत्व, स्वाभिमान जपत आहेत.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा