उगवतीचे रंग
पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग दोन
परवाच्या लेखामध्ये आपण रामायणातील रावण आणि वाली यांच्या पत्नी अनुक्रमे मंदोदरी आणि तारा यांच्याबद्दल माहिती घेतली. आज पुराणकथांमधील जालन्धर आणि हिरण्यकश्यपू यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हिरण्यकश्यपू आणि जालंधर हे दोघेही दैत्य. दोघेही परमेश्वराच्या वरदानामुळे देवांनाही अजिंक्य झालेले. रावण आणि वाली यांच्या पत्नीप्रमाणेच त्यांच्या पत्नी देखील पतिव्रता आणि धर्मपरायण होत्या.
जालंधरची कथा स्कंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण आणि देवी पुराणात येते. जालंधर हा प्रत्यक्ष शिवशंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला असुर होता. पुराणातील कथेनुसार शंकरानी आपले तेज समुद्रात विसर्जित केले असताना त्या तेजापासून जालंधरचा जन्म झाला. हे लिहीत असताना मला प्रश्न असा पडला की प्रत्यक्ष शंकरांच्या अंशापासून उत्पन्न झालेला हा जालंधर धार्मिक, सात्विक आणि सर्वांना वंदनीय असा का झाला नाही ? तर त्याचे उत्तर असे मिळते की तो शंकरांच्या क्रोधाग्नीपासून उत्पन्न झाला होता. त्यामुळेच सात्विकता, धर्मपारायणता हे गुण त्याच्यामध्ये आले नाहीत. पण याच जालंधरचे भाग्य असे की त्याला अत्यंत सुशील, पतिव्रता आणि धर्मपरायण पत्नी लाभली. तिचे नाव वृंदा.ती लहानपणापासून श्रीविष्णूची भक्त होती. तिच्या तपश्चर्येच्या आणि पातिव्रत्याच्या बळावर जालन्धर इतका शक्तिशाली बनला की देवांनाही त्याचा पराभव करणे अशक्य झाले.
आपल्या या शक्तिसामर्थ्याने तो उन्मत्त झाला. अनेक सुंदर स्त्रियांना त्याने भ्रष्ट केले. इंद्राचा पराभव केला. प्रत्यक्ष श्रीविष्णूंची पत्नी लक्ष्मी हिच्याकडे सुद्धा त्याची वाईट नजर गेली. देवी लक्ष्मीकडे जाऊन त्याने तिला आपली पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्ष्मीने त्याला सांगितले की आपण दोघेही समुद्रातून उत्पन्न झालो आहोत. तेव्हा या नात्याने आपण बहीणभाऊ आहोत. जालंधरला हा तर्क पटल्यामुळे त्याने देवी लक्ष्मीला आपली बहीण मानून तिथून काढता पाय घेतला.
पुढे तो कैलास पर्वतावर आला आणि माता पार्वतीवर त्याची वाईट नजर पडली. त्यामुळे भगवान शंकरांना त्याच्याशी युद्ध करावे लागले. हे युद्ध अनेक दिवस चालले. जालन्धरच्या पाठीशी त्याच्या पतिव्रता पत्नीची शक्ती असल्याने शंकरानाही त्याचा पराभव करणे अशक्य झाले. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना साकडे घातले. जोपर्यंत वृंदाच्या पातिव्रत्याची शक्ती जालंधरच्या पाठीशी आहे, तोपर्यंत त्याचा पराभव करणे शक्य नाही हे देवांनी ओळखले होते. तेव्हा वृंदेचे पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी श्रीविष्णुंनी जालंधरचे रूप धारण केले. खरे तर वृंदा विष्णुभक्त असल्याने श्रीविष्णुंना ही गोष्ट मान्य नव्हती. पण जालंधरसारख्या अन्यायी आणि महाशक्तिमान असुराचा पराभव करण्याचा दुसरा कोणताही उपाय नव्हता. म्हणून नाईलाजाने श्रीविष्णुंनी जालंधरचे रूप धारण करून वृंदेचे पातिव्रत्य भंग केले. वृंदा सुरुवातीला ते ओळखू शकली नाही. तिने त्यांना आपला पती समजून त्यांच्याशी व्यवहार केला. तेव्हा तिचे पातिव्रत्याचे तेज नष्ट झाले. जालंधरच्या पाठीशी असलेली तिची पुण्याई नष्ट होताच, शंकरानी त्याचा वध केला.
हे सगळे वृंदेला लक्षात आल्यावर ती अतिशय शोकाकुल झाली आणि संतप्त होऊन तिने विष्णूला शाप दिला की तू दगड होशील. आणि तुलाही आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. तिच्या शापामुळे प्रत्यक्ष परमेश्वराला दगड म्हणजेच शाळीग्राम व्हावे लागले. पण भगवान विष्णूंनी तिच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला की तू तुळस होशील. असे म्हणतात की वृंदेने तेव्हा आत्मदहन केले. तिच्या राखेपासून एक तुळशीचे रोपटे उत्पन्न झाले. या घटनेची स्मृती म्हणून आपण दरवर्षी तुळशीविवाह साजरा करतो. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला विष्णुप्रिया असेही म्हटले जाते. पंजाबमधील जालंधर शहराचे नाव या जालंधरवरूनच पडले असल्याचे म्हटले जाते. आजही तेथे वृंदेचे मंदिर आहे. देवीरूपात तिची पूजा केली जाते.
पुराणात दुसरी कथा येते ती हिरण्यकश्यपूची. ही कथा आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. हिरण्यकश्यपू हा भक्त प्रल्हादाचा पिता. त्याच्या भावाचा म्हणजेच हिरण्याक्षाचा वध भगवान विष्णूंनी केल्यामुळे तो विष्णूंना आपला शत्रू मानत होता. त्याच्या राज्यात कोणालाही भगवान विष्णूच्या नावाने यज्ञ, जपतप, पूजा करण्यास मनाई होती. ऋषीमुनींचा छळ केला जात असे. या हिरण्यकश्यपुची पत्नी होती कयाधू. ती धर्मपरायण आणि पतिव्रता स्त्री होती. एकदा इंद्राने तिचे हरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महर्षी नारदांनी तिची मदत केली. त्यांच्या कुटीत तिच्या मुलाचा म्हणजेच प्रल्हादाचा जन्म झाला. तो गर्भात असल्यापासूनच विष्णुभक्तीचे संस्कार नारदांमार्फत त्याच्यावर झाले होते. श्रीविष्णूंचा कट्टर वैरी असलेल्या हिरण्यकश्यपूचा मुलगा मात्र विष्णूचा निस्सीम भक्त होता ही नियतीची लीला किंवा हिरण्यकश्यपू सारख्या स्वतःला भगवान समजणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी केलेली परमेश्वरी योजनाच होती.
हिरण्यकश्यपूने अतिशय कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता. या वरामुळे त्याला मनुष्य, देव, प्राणी, पशु इ पैकी कोणाच्याही हाती मरण येणार नाही असा वर मिळाला होता. त्यासोबतच कोणत्याही शस्त्राने, अस्त्राने मृत्यू येणार नाही, दिवसा किंवा रात्री मृत्यू येणार नाही, घरात किंवा बाहेर मृत्यू येणार नाही असा वर लाभला होता. या वरामुळे तो अजिंक्य झाला होता, उन्मत्त झाला होता. विष्णुभक्तांवर अत्याचार करीत होता. आपला पुत्र प्रल्हाद विष्णुभक्त आहे हे कळल्यानंतर तर त्याने त्याचा अनन्वित छळ केला. निरनिराळ्या प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या सगळ्या गोष्टींना त्याच्या पत्नीने म्हणजेच कयाधूने वेळोवेळी विरोध केला. पण आपल्या शक्तीच्या गर्वात धुंद असलेल्या हिरण्यकश्यपूने तिच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचे अन्याय आणि अत्याचार वाढत गेल्याने श्रीविष्णुंना आपल्या भक्ताच्या म्हणजेच प्रल्हादाचे रक्षण करण्याच्या निमित्ताने अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. श्रीविष्णुंनी नरसिंह अवतार धारण करून ब्रह्मदेवाने त्याला दिलेल्या वरदानाचा मान राखत त्याचा वध केला. त्यांनी त्याला दिवेलागणीच्या वेळी उंबरठ्यावर नेऊन आपल्या मांडीवर घेऊन त्याचा आपल्या नखांनी वध केला.
या पुराणातल्या कथा असल्या तरी त्या आपल्याला मार्गदर्शन करतात. कोणी कितीही शक्तिमान असला तरी एक दिवस त्याचा अंत हा ठरलेला असतोच. गर्वाचे घर खाली एक ना एक दिवस होतेच. शेवटी चांगली, सत्शील वागणूकच आपल्याला जीवनात उपयोगी ठरते. श्रीकृष्ण मालिकेत जेव्हा वासुदेव पौंड्रक लोकांवर अत्याचार करत असतो, तेव्हा रुख्मिणी श्रीकृष्णाला त्याबद्दल विचारते. तेव्हा श्रीकृष्णांनी फार सुंदर उत्तर दिले आहे. ते म्हणतात की प्रत्येक अशा छोट्या मोठ्या प्रसंगी जर मी लोकांचे रक्षण करायला धावून गेलो तर मानव आपले कर्तव्य, धर्म विसरेल. मी मानवाला बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे, चांगल्या वाईटाचा विचार करण्याचे सामर्थ्य दिले आहे. त्याचा त्याने वापर केला आहे. यापूर्वीच्या अवतारात मी वागण्याचे, नीतिमत्तेचे धडे लोकांना दिले आहेत. सदाचाराचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावर त्यांनी वाटचाल करायची आहे. ( पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा