उगवतीचे रंग
पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग एक
या लॉकडाऊनच्या कालावधीत काही धार्मिक धारावाहिक पुन्हा पाहण्यात आल्या. रामायण, महाभारत, विष्णुपुराण इ. या सगळ्या मालिका पाहत असताना, पूर्वी लक्षात न आलेल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यातील काही सामायिक दुवे, त्या त्या धारावाहिकेतील नायक, खलनायक आणि त्यांच्या सहधर्मचारिणी, त्या पुराणातील नायक श्रीराम, श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू यांच्या अवतारामागील भूमिका, त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान या सगळ्या गोष्टी छानपैकी लक्षात आल्या. पूर्वी या मालिका पाहिल्या होत्या. पण त्यावेळी एखादे लहान मूल कसे एखादी गोष्ट उत्सुकतेने ऐकते, तशा त्या पाहिल्या गेल्या.
जशी रामायणाचा नायक म्हणून श्रीरामाला प्रसिद्धी मिळाली, तशीच त्याच्याबरोबर रावणाला आणि अनीतीने वागणाऱ्या वानरराज वालीला. श्रीकृष्ण मालिकेत तर अनेक खलपुरुष येतात. ते म्हणजे कंस, शिशुपाल, जरासंध, कालयवन, शंबरासुर आणि भगवान वासुदेव पौंड्रक. तर महाभारतात येणारे खलपुरुष दुर्योधन, दुःशासन, शकुनी, धृतराष्ट्र आदी. विष्णुपुराण किंवा भागवतात येणारे खलपुरुष म्हणजे हिरण्यकश्यपू, जालंधर इ. ही सगळी मंडळी श्रीराम, श्रीकुष्ण किंवा श्रीविष्णू यांच्याबरोबर शत्रुत्व केल्याने त्यांच्याबरोबरच इतिहासात अमर झाली. पण यातील बऱ्याच जणांच्या सहधर्मचारिणी या पतिव्रता होत्या, धर्मपरायण होत्या, अनेक कलाकौशल्यात निपुण होत्या आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या पतीला अध:पतनापासून वाचवण्याचे त्या सर्वांनी आटोकाट प्रयत्न केले. पण दुर्दैवाने त्यांच्या पतींनी त्यांच्या अमोलिक सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या सगळ्यांना मृत्यूला किंवा दारुण दुःखाला आणि पराभवाला सामोरे जावे लागले.
यातील काही पात्रे आणि त्यांच्या सहधर्मचारिणी यांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करू. रामायणातील खलनायक रावण. एक महापराक्रमी, विद्वान आणि सामर्थ्यवान राजा. वेदांची जाण, गायनकलेत निपुण असे अनेक गुण अंगी असलेल्या रावणात सगळ्यात मोठा दुर्गुण होता तो म्हणजे तो अत्यंत कामी आणि स्त्रीलंपट होता. या एका दुर्गुणाने त्याच्या सगळ्या चांगल्या गुणांवर बोळा फिरवला. जसे नावेला पडलेले एखादे छिद्र सुद्धा तिला बुडवण्यास कारणीभूत ठरते, तसा रावणाचा हा दुर्गुण त्याला अधोगतीकडे घेऊन गेला. रावणाने पळवून सीता ही काही पहिली स्त्री नव्हती. त्यापूर्वीही त्याने अनेक स्त्रियांना पळवून आणले होते. अनेक स्त्रियांवर अत्याचार केले होते. सुंदर स्त्री पाहिली की त्याच्यातली सगळी सभ्यता, विद्वत्ता तो विसरून जाई आणि त्याच्यातील पशु जागा होत असे.
कुशध्वज नावाच्या महर्षींची वेदवती नावाची कन्या होती. ती अप्रतिम सुंदर होती. तिच्या नावाप्रमाणेच ती जन्मल्यापासूनच वेद म्हणत असे. तिला पाहिल्याबरोबर रावणातला पशु जागृत झाला आणि त्याने त्या ऋषींच्या आश्रमातून तिला बाहेर ओढत आणून अत्याचार केला. बिचाऱ्या वेदवतीचे रावणासमोर काही चालले नाही. एकदा देवलोकात फेरफटका मारायला गेला असताना त्याच्या नजरेला रंभा नावाची अप्सरा पडली. ती नलकुबेराची पत्नी होणार होती. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. खरे म्हणजे लंकेचे राज्य त्याचे होते. पण रावणाने ते बळजबरीने हस्तगत केले. रंभेचा विवाह या कुबेराच्या मुलाशी म्हणजे नलकुबेराशी ठरलेला होता. म्हणजे रंभा ही नात्याने त्याची सून होती. तिने त्याला वारंवार तसे सांगूनही रावणाने तिचे काही ऐकले नाही आणि तिच्यावर अत्याचार केला. सीतेचे हरण केल्यानंतर मात्र त्याच्या पापाचे शंभर घडे भरले.
अशा या रावणाला एक सुंदर, सुशील आणि धर्मपरायण पत्नी लाभली होती. तिचे नाव मंदोदरी. मंदोदरी ही मयासुराची कन्या. मंदोदरीसारखे दुर्लभ स्त्रीरत्न रावणाची केवळ काही पूर्वपुण्याई असेल, म्हणून त्याला लाभले. मंदोदरी ही अत्यंत बुद्धिमान आणि अनेक कलांमध्ये निपुण होती. मंदोदरीला रावणाचे वागणे अजिबात आवडत नव्हते. तिने रावणाच्या वाईट कृत्यांना वेळोवेळी विरोध केला होता. सीतेला पळवून आणणे तर तिला मुळीच आवडले नव्हते. तिने रावणाला अनेक वेळा सीतेला सन्मानाने श्रीरामाकडे परत पाठवा म्हणून सल्ला दिला होता. पण अहंकारी, उन्मत्त झालेल्या रावणाने आपल्या पत्नीचा हा सल्ला धुडकावून लावला आणि आपला सर्वनाश ओढवून घेतला. मंदोदरी एके ठिकाणी रावणाला म्हणते, ' तुम्ही ज्यांच्यावर अत्याचार केला आहे अशा स्त्रिया शोकाने संतप्त होऊन तुम्हाला शाप देत आहेत. पतिव्रता स्त्रियांचा शाप कधी वाया जात नाही. पतिव्रतेचे अश्रू कधी निष्कारण भूमीवर पडत नाहीत. '
पतिव्रतानां नाकस्मात पतंत्यश्रूणि भूतले
हा सीतेसह सगळ्या पतिव्रतांचा शाप रावणाच्या विनाशास कारणीभूत ठरला. रावणाने मंदोदरीचे ऐकले असते तर.. ? अशाच प्रकारे रावणाचा पुत्र मेघनाद उर्फ इंद्रजित याची पत्नी सुलक्षणा किंवा सुलोचना ही देखील धर्मपरायण आणि पतिव्रता स्त्री होती. श्रीरामाबरोबरच्या युद्धात आपल्या पतीला यश मिळणार नाही हे ती जाणून होती. तिने देखील इंद्रजिताला श्रीरामाविरुद्ध युद्ध करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण इंद्रजिताने तिचे ऐकले नाही आणि तो देखील लढाईत मारला गेला. सुलक्षणा त्याच्याबरोबर सती गेली. रावणाच्या आणि इंद्रजिताच्या हट्टामुळे मंदोदरी आणि सुलक्षणा यांना हकनाक वैधव्याला सामोरे जावे लागले.
वानरराज वाली याची कथा अशीच आहे. खरे तर सुग्रीवाचे त्याच्यावर अतिशय प्रेम असते. वाली हा किष्किंधेचा राजा असतो. एका दैत्याचे पारिपत्य करण्यासाठी तो त्याच्यामागे एका गुहेत जातो. सुग्रीवाला गुहेच्या तोंडाशी उभे राहायला सांगतो. सुग्रीव तेथे उभे राहून एक वर्षेपर्यंत त्याची वाट पाहतो. गुहेतून येणारे रक्ताचे ओघळ पाहून आपला भाऊ वाली मारला गेला असा त्याचा समज होतो आणि तो गुहेच्या तोंडाशी एक मोठा दगड लावून ती गुहा बंद करून येतो. राज्यात अराजक माजू नये म्हणून सुग्रीव किष्किंधेचा राजा होतो. पण राक्षसाला मारून वाली परत येतो. सुग्रीवाला राजा झालेला पाहून त्याचा सुग्रीवाबद्दल गैरसमज होतो. तो सुग्रीवाच्या पत्नीचे अपहरण करतो आणि त्याला हाकलून लावतो. अशा या उन्मत्त वालीची पत्नी असते तारा. ती अतिशय बुद्धिमान होती. पतिव्रता स्त्रियांमध्ये तिची गणना केली जाते.
सुग्रीवाने जेव्हा रामाच्या साहाय्याने वालीला युद्धासाठी पाचारण केले तेव्हा तारा वालीला सांगते, ' सुग्रीवाला रामासारख्या पराक्रमी आणि दिव्य व्यक्तीचे साहाय्य लाभले आहे. तुम्ही त्याच्याशी युद्ध करू नका. सुग्रीव जेव्हा युद्धाचे आव्हान देतो आहे, तेव्हा श्रीरामाची शक्ती नक्कीच त्याच्या पाठीशी आहे. तुम्ही हे राज्य सुग्रीवाला देऊन टाका आणि श्रीरामाला शरण जा. ' पण आपल्या शक्तीचा गर्व झालेला वाली तिचे काही एक ऐकत नाही आणि श्रीरामाच्या हाती मृत्यूस प्राप्त होतो. वालीच्या वधानंतर तारा प्रचंड शोकमग्न होते आणि तिची समजूत कशी काढावी हा प्रश्न श्रीरामासह सगळ्यांपुढे पडतो. तेव्हा चतुर आणि बुद्धिमान असलेला हनुमान ताराची समजूत घालतो. पुढे जेव्हा सुग्रीव राजा होतो, तेव्हा तारा सुग्रीवाची पत्नी बनते. जेव्हा राम लक्ष्मणाने सुग्रीवाला सीतेच्या शोधासाठी दिलेली मुदत निघून जाते, आणि सुग्रीव काहीच करत नाही असे आढळून येते, तेव्हा लक्ष्मण अत्यंत क्रोधीत होऊन सुग्रीवाचा समाचार घ्यायला येतो, तेव्हा लक्ष्मणाला सामोरे जाण्याचे धैर्य सुग्रीवामध्ये नसते आणि तो ताराला लक्ष्मणाला समजण्यवासाठी पाठवतो. तारा आपल्या बुद्धिमत्ता आणि संभाषण कौशल्याचा वापर करून लक्ष्मणाचा क्रोध शांत करते आणि सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाने आधीच चारी दिशांना आपले सैनिक पाठवले आहेत असे सांगून त्याला आश्वस्त करते. ( पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१८/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा