उगवतीचे रंग
राम गाणी - मनातली
श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन भारतीय संस्कृतीला पडलेली मधुर स्वप्ने आहेत. या दोघांच्या दिव्य व्यक्तिमत्वाने अनेकांना प्रेरणा दिली आणि महर्षी वाल्मिकींपासून महर्षी व्यासांपर्यंत आणि गोस्वामी तुलसीदासांपासून ते अगदी आजच्या ग दि माडगूळकरांच्या गीतरामायणापर्यंत हा मधुर भक्तीरस युगानुयुगे पाझरत राहिला आहे. आपल्यासारखे अनेक भ्रमर या गीतांचे मधुर रसपान करीत आले आहेत. रामकथेचे सव्वीस भाग आतापर्यंत आपण पाहिलेत. ' समस्तांमध्ये कथा गोड या राघवाची असे समर्थ रामदास म्हणतात ते श्रीरामाच्या गाण्यांच्या बाबतीतही खरे आहे. एखादी पूजा संपन्न झाल्यावर जशी आपण त्या देवतेची आरती करतो, तशीच रामकथा संपन्न झाल्यावर ही गीतरूपी श्रीरामाची आरती समजू या. आज मला आवडणारी काही राम गीते आणि त्यातील सौंदर्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. ग दि माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले गीतरामायण आज हजारो भारतीयांच्या ओठावर आहे. त्याबद्दल बोलणे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यामुळे आज श्रीरामाशी संबंधित इतर गीतांबद्दल बोलणार आहे.
श्रीरामाचा जन्म झालेला आहे. अत्यंत गोड आणि तेजस्वी असं हे बालक दिवस उजाडला तरी झोपून आहे. त्याला उठवण्यासाठी कौसल्या माऊली दुधाचा कलश घेऊन आली आहे. आशा भोसलेंच्या मधुर आवाजात ' उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली..' हे गाणं आपल्या डोळ्यासमोर जणू ते चित्र साकार करतं. सर्व प्रकारची गाणी गाणाऱ्या आशाताईंचा आवाज या गाण्याला इतका सात्विक आणि कोमल झाला आहे की जणू दुधावरची सायचं ! रवींद्र भट यांची शब्दरचना, आशाताईंचा अमृतासमान स्वर आणि बाबूजींचे कर्णमधुर संगीत यांचा सुरेख संगम या गीतात झाला आहे. असं वाटतं की आपण सगळे रसिक आणि मी एखाद्या सभागृहात सकाळच्या प्रसन्न वेळी एकत्र यावं आणि आपण सगळ्यांनी मिळून या अशा गीतांचा प्रत्यक्ष आस्वाद घ्यावा. आणि कार्यक्रमातून परत जाताना आपण ती प्रसन्नता सोबत प्रसाद म्हणून घेऊन जावी. असो. पण काही गोष्टी आपल्या बकेट लिस्टमध्ये ठेवायच्या असतात ना, तशी ही गोष्ट माझ्या बकेटलीस्ट मध्ये ठेवली आहे.
आता पाळण्यात असलेला हा श्रीराम हळूहळू चालायला लागला आहे. त्याचं हसणं, चालणं, बोलणं सगळंच खूप गोड आहे. आणि त्याच्या या बाललीलांनी गोस्वामी तुलसीदासांसारख्या संतांना जणू वेड लावलं आहे. ते म्हणतात, ' ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनीया..' आपलं मूल चालायला लागलं की आईला त्याचं केवढं कौतुक ! इथे तर मग श्रीरामासारख अलौकिक रूप असलेलं बालक. आपल्या पायातल्या नाजूक साखळ्यांचा मधुर आवाज करत ते दुडूदुडू धावतं आहे. त्याच्या तीनही माता त्याच्या मागून धावता आहेत. किती रम्य ते दृश्य असेल ! लता मंगेशकरांनी आपल्या मधुर आवाजात तुलसीदासांची ही अवीट गोडीची रचना अमर केली आहे.
पुढे हा श्रीराम हळूहळू मोठा होऊ लागतो. गुरुगृही शिक्षण पूर्ण करून विश्वामित्रांसोबत मिथिलेला जातो. त्या ठिकाणी सीतेच्या स्वयंवराचे आयोजन केलेले असते. सुंदर, सुकोमल अशी जनक कुमारी सीता सावळ्या अशा श्रीरामाला पाहून भान हरवते. जणू युगानुयुगे ज्याची वाट पाहिली ते सावळे परब्रह्म समोर उभे असते. मग श्रीरामाला पाहून सीतेच्या मनात या देखण्या सावळ्या परब्रह्माबद्दल अनुराग, प्रेमाची, लज्जेची स्त्रीसुलभ भावना दाटून येते. तिच्या या अवस्थेचे वर्णन ' लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा ..' या गीतात अतिशय सुंदर केले आहे. रमेश अणावकर यांचं हे गीत लतादीदींनी आपल्या मधुर आवाजाने अजरामर केले आहे. त्या स्वयंवराच्या प्रसंगाचे वर्णन, मंडपाचे वर्णन, तिथे जमलेल्या साऱ्यांचे वर्णन, सीतेचे लाजणे आणि श्रीरामाची नम्रता या सगळ्या गोष्टी या गाण्यात फार सुंदर गुंफल्या आहेत. गाण्याचे बोल साधेच पण अत्यंत अर्थवाही आहेत. जसे दही घुसळून नवनीत वर यावे तसा या गाण्याचा अर्थ लतादीदींच्या सुरांमुळे सहज वर आला आहे आणि आपल्या हृदयापर्यंत पोहोचला आहे.
पुढे श्रीरामाला आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनवासात जावे लागते. भरताला जेव्हा हे कळते तेव्हा तो श्रीरामाला परत आणण्यासाठी वनात जावे लागते. तो श्रीरामाला परत येण्यासाठी विनवतो. तेव्हा श्रीराम त्याला सांगतात, ' दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...' या गीतातल्या सगळ्याच ओळी इतक्या सुंदर आहेत की त्यांना सुभाषितांचे मोल प्राप्त झाले आहे. ( या ठिकाणी गीतरामायणातील हे गीत लेखातील घटनांचा ओघ वाहता ठेवण्यासाठी अपवाद म्हणून घेतले आहे. हे एक अजरामर गीत आहे आणि त्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाववत नाही हे आपल्यासारख्या सुज्ञ रसिक वाचकांना सांगणे नलगे ) तेव्हा या गीताद्वारे श्रीराम भरताला जीवनातील न टाळता येणारे सत्य सांगतात आणि त्याची समजूत घालतात.
पुढे वनवासात असताना श्रीरामांच्या हातून अहिल्येचा उद्धार होतो. त्या प्रसंगाची आठवण ' रघुनंदन आले आले, धरणीमाता कानी बोले या लता मंगेशकर यांनी गायिलेल्या सुंदर गीताने आपल्याला करून दिली आहे. ' माझ्यासाठी सांगा त्याला शिळा अहिल्या हो मी झाले ..' हा अहिल्येचा विलाप हृदय पिळवटून टाकणारा आहे. याच वनवासात असताना प्रभू श्रीरामांना त्यांची अहोरात्र वाट पाहणारी शबरी भेटते. तिच्या मनातील भावना ' रघुपति राघव गजरी गजरी, तोडीत बोरे शबरी...' या गीतात फार सुंदर वर्णन केल्या आहेत. पुन्हा एकदा आशाताईंचा सुमधुर आवाज या गीताला लाभला आहे. पी सावळाराम यांचे अतिशय साधे सोपे शब्द आणि वसंत प्रभू यांचं संगीत आणि जोडीला आशाताईंचा जणू मधात न्हालेला स्वर..! भक्तिभावानं ओथंबलेलं हे गीत कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.
पुढे लंकेत रावणावर विजय मिळवून श्रीराम जेव्हा अयोध्येत परत आले, तेव्हा त्यांचं अयोध्येत नागरिकांनी गुढ्या, तोरणे उभारून स्वागत केलं. श्रीराम परत येणं म्हणजे केवढी आनंदाची गोष्ट होती. त्याच वर्णन शब्दात करता येणार नाही. पण योगेश्वर अभ्यंकर यांच्या या गीतात त्यांनी ते सुंदर शब्दबद्ध केलं आहे आणि त्या शब्दातला अर्थ आणि गंध आपल्यापर्यंत पोहोचवला आहे माणिक वर्मा या गोड गळ्याच्या गायिकेने. त्या गाण्यातच ' रामभक्तीचा गंध दरवळे ' असे सुरेख शब्द आहेत. रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर आता उभारले जाईल. जणू ही ' श्रीरामाची विजयपताकाच ' आहे. आता केवळ अयोध्यावासियांसाठी नाही तर समस्त भारतवासियांसाठी ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट.
अशी अवीट गोडीची किती गाणी सांगावीत ! तरी काही गाण्यांचा राहवत नाही म्हणून फक्त उल्लेख करतो. कृष्णा कल्ले यांनी गायिलेले ' रामप्रहरी राम गाथा रंगते ओठावरी..', कबीराचे विणतो शेले हे पुन्हा माणिक वर्मा यांनीच गायिलेले गदिमांचं सुमधुर गीत, घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा हे माणिक वर्मांचंच गीत, अविरत ओठी यावे नाम श्रीराम जयराम जय जय राम ..' हे अरुण दाते यांनी गायिलेले मनोहर कवीश्वर यांचं गीत.. किती म्हणून नावं घ्यावीत. तशीच हिंदी गाणीही अप्रतिम. ' पायोजी मैने रामरतन धन पायो..' हे मीराबाईंचं अवीट गोडीचं लता मंगेशकर यांनी गायिलेले गीतही मनात भक्तिभाव जागं करते. तशी खूप गाणी आहेत. पण मला अत्यंत आवडणारी दोन गाणी सांगतो आणि थांबतो. ती दोन्ही गाणी लता मंगेशकर यांनी गायिलेली आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे ' श्री रामचंद्र कृपालू भज मन... ' आणि दुसरं म्हणजे ' तुम आशा विश्वास हमारे..' ही गाणी इतकी सुंदर आहेत की ती ऐकताना माझ्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहतात. दिवसातून एकदा तरी ही गाणी मी ऐकतोच. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. पण मानवी मनाला शांती प्रदान करणारे प्रार्थनेशिवाय दुसरे साधन नाही. ही गाणी आपल्याला शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी आहेत. जिथे रामनाम तिथे शांती, समाधान, प्रसन्नता आणि ऊर्जा. जास्त काय लिहावे ? जय श्रीराम.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा