मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग सव्वीस ( अंतिम )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग सव्वीस ( अंतिम ) 

आतापर्यंत रामकथेचे पंचवीस भाग झाले. या भागातून आपण रामायणातील निरनिराळ्या पात्रांवर आणि त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. उत्तररामायणातील लवकुश यांनी गायिलेल्या ' हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की...' या गीताचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. आज या लेखामालेच्या समाप्तीच्या वेळा तो उल्लेख पुन्हा करतो आहे. याचे कारण ही कथा का ऐकायची हे मला या शेवटच्या भागात पुन्हा सांगायचे आहे. कदाचित माझ्याकडे पुनरुक्तीचा दोष येईल पण तो दोष स्वीकारूनही मी ते सांगणार आहे. 

रामायण म्हणजे जणू वैदिक वांड्मयाचे नवनीत. रामायणात काय नाही ? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर ' जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते ' सर्व या ग्रंथात आले आहे. रामायणाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते. पण तुम्ही कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करील. त्याकडे जर तुम्ही एक महाकाव्य म्हणून पाहाल तर महाकाव्यांचा मेरुमणी म्हणजे रामायण. महाकाव्याच्या वाचनाने मनाला आनंद मिळतो. मानवी मूल्ये अधोरेखित होतात. मानसिक, भावनिक आणि बौद्धिक जाणिवा समृद्ध होतात. या सगळ्या गोष्टी रामायणात आहेत. रामायण म्हणजे रत्नांची खाण आहे. जेवढा शोध घेऊ तेवढी रत्ने हाताला लागतील. 

रामायणाकडे इतिहास म्हणून पाहाल तर तत्कालीन लोकांची राहणी, वागणे, बोलणे, समाजरचना यांची माहिती आपल्याला मिळते. गुरुकुल शिक्षणपद्धतीची माहिती मिळते. तत्कालीन अर्थव्यवस्था, युद्धकला इ ची देखील माहिती मिळते. कोणती सामाजिक, नैतिक मूल्ये पाळली जात होती त्यांची माहिती मिळते. या सगळ्यातून एक निष्कर्ष निघतो की त्या काळी आपली भारतीय संस्कृती अतिशय उच्च पातळीवर पोहोचली होती. अध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्ये यांना सर्वोच्च स्थान होते. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात सुवर्णकाळ म्हटला जावा असा तो काळ होता.  राजा आणि प्रजा यांचे नाते अतिशय प्रेमाचे होते. राजा दशरथ, राजा जनक असो की श्रीराम हे सगळे कर्तव्यपरायण आणि धर्मपरायण राजे होते. राज्यकर्त्यांनी कसे असावे याचा आदर्श होते. ऋषीमुनींचा, ज्ञानी लोकांचा आदर करणारे होते. प्रजेच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करणारे होते. 

रामायण नातेसंबंधांचा आदर्श ग्रंथ आहे. पती पत्नीचे नाते, बंधुप्रेम, आईवडील आणि मुलांचे नाते, गुरुशिष्यांचे नाते, मित्रत्वाचे नाते, स्वामी आणि सेवकाचे नाते या सगळ्या नात्यांचा रामायण म्हणजे कळसाध्याय आहे. श्रीराम आणि सीता, लक्ष्मण आणि उर्मिला या सारखी त्यागावर आणि निष्ठेवर आधारित नाती रामायणात आहेत. पती आणि पत्नी यांनी कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ द्यायची असते, हे रामायण आपल्याला शिकवते. श्रीराम वनवासात जायला निघाले, तेव्हा सीतेसारख्या सुखात वाढलेल्या राजकन्येने क्षणाचाही विचार न करता वनवासात जायचा निर्णय घेतला. सीतेचे अपहरण रावणाने केले तेव्हा श्रीराम पत्नी विरहाने किती व्याकुळ झाले होते हे जसे आपल्याला वाचायला मिळते, तसेच सीता सुद्धा श्रीरामांसाठी लंकेत असताना झाली होती. रावणाने तिला अनेक प्रलोभने दाखवली पण तिची आपल्या पतीवरची निष्ठा अभंग होती. काया वाचा मनाने ती फक्त श्रीरामाचीच होती. आज आपला होणारा भावी पती  किती पगार किंवा पैसा मिळवतो हे प्रकर्षाने पाहणाऱ्या मुलींनी तो सर्व परिस्थितीत आपली साथ देईल का, आपले संरक्षण करू शकेल का याही गोष्टींचा विचार केला पाहिजे. 

रामायणातील भावाभावांचा त्याग तर काय वर्णावा ? लक्ष्मणाचे श्रीरामाबरोबर वनवासात जाणे, श्रीरामाने प्राणप्रिय असलेल्या भरतासाठी राज्याचा त्याग करणे, भरताचे बंधुप्रेम, श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करणे या सगळ्या गोष्टी रामायणातच आढळतील. एकमेकांसाठी त्याग करण्याची जणू शर्यत लागली होती. आज भावाभावांची संपत्तीवरून होणारी भांडणे पाहिली की हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो. सख्ख्या भावांमधली ही परिस्थिती. शाळेत प्रतिज्ञा म्हणताना आपण ' सारे भारतीय माझे बांधव आहेत ' असे म्हणतो. हे बंधुप्रेम तर फार दूरची गोष्ट. 

आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य आपल्याला रामायणात बघायला मिळतील. श्रीरामांच्या अंगी केवढी नम्रता ! गुरु वसिष्ठ, विश्वामित्र,गुरुमाता यांचा त्यांनी कधीही अनादर केला नाही. गुरुही तेवढेच आदर्श होते. निस्पृह होते. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचे आश्रम म्हणजे विद्यापीठे होती. हजारो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असत. शिक्षण घेऊन गृहस्थाश्रमात पदार्पण केल्यानंतर देखील आजन्म विद्यार्थी बनण्याचे शिक्षण  त्यांना तेथे दिले जाई. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी ते जरी तपस्वी होते, ऋषी होते तरी आपल्या विद्यार्थ्यांना दैववादी बनवले नाही. त्यांना कर्तव्यपालनाचे धडे दिले. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धडे दिले. म्हणून श्रीरामांसारख्या त्यांच्या शिष्यांमध्ये शक्तिशाली रावणाचे पारिपत्य करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले. 

आज आपण नेहमी रामराज्याबद्दल बोलतो. रामराज्य यावे असे आपल्याला वाटते. पण त्यासाठी रामायणकालीन व्यक्तींनी जो त्याग केला, जी जीवनमूल्ये पाळली त्यांचा अंगीकार आपल्याला करावा लागेल. नुसते इतिहास, नागरिकशास्त्र शिकवून भागणार नाही. त्यात नागरिकांची कर्तव्ये दिलेली असतात. पण नुसते सांगून कोणी कर्त्यव्य पालन करणार नाही. त्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श उभे करावे लागतील. हे आदर्श रामायणासारखे ग्रंथ आपल्यापुढे ठेवतात. सध्याची शाळाकॉलेजात शिकवली जाणारी सामाजिक शास्त्रे नागरिकत्वाची कोरडी शिकवण देतात. रामायणासारख्या ग्रंथांची शिकवण त्यात भावनेचा, प्रेमाचा ओलावा निर्माण करू शकेल. कोणतीही गोष्ट जेव्हा हृदयातून येते, तेव्हा तिच्यात हा भावनेचा, प्रेमाचा ओलावा उतरलेला असतो. कोरडे शब्द म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. आतापर्यंत ते कसे शिरतील ? 

रामायण वाचून पुण्य मिळेल अशी समजूत करून घेतली तर महर्षी वाल्मिकींचा रामायण लिहिण्याचा हेतूच विफल होईल. गीतेसारखाच रामायण हा आचरण ग्रंथ आहे. त्यासाठीच रामायणाच्या माध्यमातून वाल्मिकींनी आपल्यासमोर आदर्श उभे केले आहेत. त्यांनी श्रीरामाला रामायणात कुठेही देवत्व बहाल केले नाही. श्रीरामाचा प्रवास त्याच्या आदर्श वागण्यामुळे मानवापासून पुरुषोत्तम पदापर्यंत झाला आहे. तो मर्यादापुरुषोत्तम झाला आहे. नरापासून नारायणापर्यंतचा तो प्रवास आहे. युगानुयुगांचा तो दीपस्तंभ आहे. हेच वाल्मिकींना आपल्यासमोर ठेवायचे आहे. आपल्याला कदाचित श्रीरामासारखे पुरुषोत्तम होता येणार नाही, नारायणपदापर्यंत पोहोचता येणार नाही, पण त्या मार्गावर वाटचाल तर आपण सुरु करू शकतो. आज आपली कुटुंबव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, अर्थव्यवस्था या सगळ्या स्तरांवर अधोगती होत आहे. कोणताही घटक समाधानी नाही. नैराश्याचे वातावरण आहे. लोक मानसिक स्वास्थ्य हरवत आहेत. अशा परिस्थितीत रामायण आपल्याला मार्गदर्शन करू शकते. 

रामायणाची महती सांगणारे  ' रामचरितमानस ' मधील दोन श्लोक फार सुंदर आहेत. त्यावर एक नजर टाकून आपण पुढे जाऊ या. जेव्हा पार्वतीने भगवान शंकरांना श्रीरामाच्या कथेबद्दल विचारले तेव्हा ते अतिशय प्रसन्न होऊन तिला सांगतात

रामकथा सुरधेनु सम सेवत सब सुख दानी, सतसमाज सुरलोक सब को न सुनै अस जानि  !

कामधेनूची सेवा केल्याने ज्याप्रमाणे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात, तशीच आपल्याला सर्व सुख देणारी ही रामकथा आहे. सत्पुरुषांचा समाज म्हणजे ईश्वरस्वरूप असलेली माणसे. मग असे असताना या रामकथेचे श्रवण कोण करणार नाही ? आणि पुढच्या श्लोकात तुलसीदास म्हणतात

रामकथा सुंदर कर तारी, संसय बिहग उडावनिहारी

रामकथा कलि बिटप कुठारी, सादर सुनु गिरिजाकुमारी

हातांची टाळी वाजवल्याने जसे पक्षी उडून जातात, तशीच श्रीरामकथा ऐकल्याने ( तिची टाळी वाजवल्याने  ) सर्व संशयरूपी पक्षी उडून जातात म्हणजेच संशय दूर होतात. कलियुगरूपी जो विषवृक्ष आहे, तो तोडण्यासाठी रामकथा म्हणजे कुऱ्हाडीचा अचूक असा प्रहार आहे. म्हणून हे गिरिजाकुमारी तू ही कथा आदराने ऐक.

अशी ही रामकथा सर्व सुख देणारी, सर्व संशय दूर करणारी आहे.

आजपर्यंत रामकथा अनेक थोर आणि विद्वान लोकांनी सांगितली आहे. मी थोर, विद्वान, लेखक इ कोणी नाही. पण रामायण लहानपणापासून ऐकत, वाचत आलो. त्यामुळे मला वाटलेले, कळलेले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत वाल्मिकींपासून ज्या सर्व थोर लोकांनी रामकथा सांगितली आहे, त्या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो. त्यांच्या सांगण्यातील काही अंश जर या लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचला असेल, तर ते श्रेय त्यांचे आहे. यातील उणिवांची जबाबदारी माझी आहे. हनुमानासारखा श्रीरामाचा भक्त झाला नाही. त्याच हनुमानाला प्रार्थना की त्याच्याप्रमाणेच रामनाम सदा आमच्या मुखात येवो आणि त्याच्याकडून जसे रामाचे कार्य घडले तसे कार्य करण्याचे सामर्थ्य आणि बुद्धी प्रभू श्रीराम आम्हाला देवो. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१३/०९/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...