मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग पंचवीस ( रामायणातील ज्ञात अज्ञात गोष्टी भाग दोन )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग पंचवीस ( रामायणातील ज्ञात अज्ञात गोष्टी भाग दोन )

' समस्तांमधे कथा गोड या राघवाची ' असे समर्थ रामदास म्हणतात खरेच आहे. रामकथेची गोडी अवीट आहे. पण ज्यांना केवळ दोष पाहण्याची सवय असते, त्यांना रामकथेतील चांगल्या गोष्टी न दिसता त्यातील शंकास्थाने दिसतात. शंका घ्यायला हरकत नाही. शंकेचे निरसनही व्हायलाच हवे. पण जेव्हा आपण रामकथेबद्दल बोलतो तेव्हा दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली म्हणजे रामायण घडले त्याला आज पाच ते सहा हजार वर्षे होऊन गेली. जेव्हा रामायण घडले तेव्हा त्याकाळी अशी कोण व्यक्ती होती की जिने हे प्रत्यक्ष पाहिले आणि लिहून ठेवले ? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे महर्षी वाल्मिकी. त्यामुळे जे वाल्मिकी रामायणात आहे ते प्रमाण मानायला हवे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे की आपल्याला श्रीराम हवे आहेत, त्यांचे  गुण हवे आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला आपले जीवन सार्थकी लावायचे आहे. त्यामुळे नको त्या गोष्टीत लक्ष घालून आपला बुद्धिभेद करून घेऊ नये. तरी काही गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न मी माझ्यापरीने करतो आहे. 

मारीच राक्षस जेव्हा सुवर्णमृगाचे रूप घेऊन आला, आणि श्रीरामांना भुलवून दूर घेऊन गेला तेव्हा श्रीरामांचा बाण लागल्यावर त्याने मायावी आवाज काढून सीतेला गोंधळात टाकले. सीतेला असे वाटले की राम संकटात आहेत. ती लक्ष्मणाला वाटेल ते बोलून श्रीरामाच्या मदतीसाठी जाण्यास भाग पाडते . तेव्हा लक्ष्मण त्यांच्या कुटीभोवती एक रेषा आखतो आणि सीतामाईला ती रेषा ओलांडून बाहेर पाय ठेवू नकोस असे बजावतो. हीच ती लक्ष्मणरेषा. पण या रेषेचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही. हा उल्लेख तेलुगुतील रंगनाथ रामायणात आला आहे. कृतिबास रामायणात त्याचा उल्लेख आहे. रामायणानंतरच्या काळात जसजसे महिलांवरचे अत्याचार वाढत गेले, तसतसे या लक्ष्मणरेषेचे महत्व वाढत गेले. ती लोककथांतून आली आहे. अशा कथा या त्या त्या काळच्या समाजमनाचा एक प्रकारे आरसाच असतात. समाजाची स्थिती आणि मानसिकता त्यातून प्रतिबिंबित होते. 

पण ही लक्ष्मणरेषा फार महत्वाची आहे. तेव्हाही आणि आताही. तेव्हा सीतामातेने त्या रेषेबाहेर पाय ठेवला आणि रावणाने तिचे अपहरण केले. रामकथेला त्या घटनेने कलाटणी मिळाली आणि पुढचे रामायण घडले. लक्षणरेषा ही संयमाचे प्रतीक आहे. लक्ष्मरेषा जेव्हा जेव्हा ओलांडली जाते, तेव्हा तेव्हा अनर्थ होतो. स्वतः लक्ष्मणाने सुद्धा आपल्या स्वतःभोवती एक अदृश्य अशी लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. ती होती निग्रहाची, संयमाची. आपल्या पत्नीला उर्मिलेला अयोध्येत सोडून रामासोबत वनवासात आल्यानंतर त्याने सीतेकडे मान वर करून एकदाही पाहिले नव्हते. वंदन करण्यापुरतेच तिच्या चरणांचे दर्शन तो घेत होता. अशा या लक्ष्मणाने आखलेली ही लक्ष्मणरेषा आजही आपल्यासाठी प्रतीकात्मक दृष्टीने महत्वाची आहे. ती संयमाचे, निग्रहाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. 

श्रीरामांनी केलेल्या सीतेच्या त्यागाबद्दलही त्यांना दोष दिला जातो. पण श्रीरामांनी प्रजेचे ऐकून राज्याच्या हितासाठी सीतेचा जो त्याग केला तो राणी म्हणून केला. पत्नी म्हणून नाही. कुटुंब आणि राष्ट्र यांच्या हिताचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. तेच श्रीरामांनी केले. नंतर श्रीरामांनी जो यज्ञ केला त्यावेळी सर्वानी त्यांना ' धर्मशास्त्राप्रमाणे दुसरी पत्नी करता येते ' असे सांगितले. पण त्यावेळी श्रीरामांनी लोकांना स्पष्ट शब्दात सांगितले की रामाच्या हृदयात फक्त एकालाच स्थान आहे आणि ते म्हणजे फक्त सीतेलाच. त्यामुळे श्रीरामांनी सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून घेतली आणि यज्ञ पूर्ण केला. त्यांच्या हृदयात दुसऱ्या कोणाला पत्नी म्हणून स्थानच नव्हते. सीता पवित्र आणि निष्कलंक आहे, हे तिच्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणाऱ्या श्रीरामाशिवाय कोण जाणू शकत होते ? सीतेचा त्याग हे श्रीरामाच्या स्वसुखाच्या सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहे. 

रामायणाच्या उत्तरकांडात श्रीरामांनी तपाचरण करीत असलेल्या शंबुक नावाच्या शूद्राचा वध केला असा आरोप केला जातो. कारण असे सांगितले जाते की त्याकाळी शूद्रांना तपाचरणाचा अधिकार नव्हता. पण ही गोष्ट न पटणारी आहे. तर्कसंगत नाही. शिवाय मूळ वाल्मिकी रामायणात कुठेही याचा उल्लेख नाही. ही कथा नंतर प्रक्षेपित करण्यात आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे श्रीराम निषादराज, शबरी यांच्यासारख्यांना हृदयाशी धरतात ते असे करतील अशी शक्यता नाही. 

वालीचा वध श्रीरामांनी कपटाने केला असा त्यांच्यावर आरोप केला जातो. पण यात तथ्य नाही. कारण वालीचा वध करण्यापूर्वी सुग्रीव श्रीरामांच्या शक्तीची परीक्षा घेतो. तो दोन गोष्टी श्रीरामांना करायला सांगतो. एक म्हणजे दुनदुभी राक्षसाने माणसांना मारून अस्थींचा जो पर्वतप्राय ढीग केलेला असतो तो दूर उडवून देणे आणि सात तालवृक्ष असतात, त्यांना एका बाणात लक्ष करणे. श्रीराम या दोन्ही गोष्टी सहज करतात. त्यामुळे वालीला मारण्यासाठी ते समर्थ आहेत. वालीला कपटाने मारण्याचे कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आधी सुग्रीवाला ते वालीशी लढायला सांगतात. या युद्धात सुग्रीव जेव्हा जखमी होतो, तेव्हा ते वालीशी युद्ध करतात. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे श्रीरामांनी वालीच्या राज्यात जाऊन त्याच्याशी युद्ध केले आहे. वालीच्या बाजूने लढणारे त्याचे शक्तिशाली असे वानर सैन्य होते. इथे श्रीरामांच्या बाजूने लढणारी कोणतीही सेना नव्हती. 

वाली आणि त्याचे सैन्य श्रीरामावर मोठमोठ्या शिळा, झाडे यांचा वर्षाव करीत होते. त्याचे प्रत्युत्तर श्रीरामांनी आपल्या बाणांनी दिले आहे. जेव्हा वालीचा वध झाला तेव्हा वालीची पत्नी तारा येऊन वानरसेनेला त्याबद्दल दोष देऊ लागली. तेव्हा ते वानर तिला सांगतात 

“जीवपुत्रो निवर्तस्व पुत्रं राक्षस्व चांगदम् !

अन्तको रामरूपेण हत्वा नयति वालीनम् !!
क्षिप्तान् वृक्षान् समाविध्य विपुलाश्च तथा शीला: !
वाली वज्रसमैर्वाणैर्वज्रेणेव निपातितः !!
अभिभूतमिदं सर्वं विद्रुतं वानरं बलम् !
अस्मिन् प्लवगशार्दूले हते शक्रसमप्रभे !! ( वाल्मीकिरामायण किष्किन्धा ० १९/११-१३)

सुदैवाने आपला पुत्र अंगद जिवंत आहे. त्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्या. वालीने श्रीरामावर अनेक प्रकारचे मोठमोठे वृक्ष आणि शिळा फेकून मारल्या. परंतु श्रीरामांनी त्या सर्वांचे भेदन केले. मृत्यूच्या रूपाने आलेल्या एकट्या श्रीरामांनी वालीचा वध केला आहे. आणि वालीचा म्हणजेच आपल्या राजाचा वध झाला हे पाहून वानरसेना पळून गेली. 

आता आणखी दोन गोष्टी लक्षात घेऊ या. युद्ध प्राचीन काळातले असो की आधुनिक काळातले. त्यात दोन गोष्टी असतात. एक आक्रमण अर्थात अटॅक आणि दुसरे म्हणजे बचाव किंवा संरक्षणात्मक पवित्रा अर्थात डिफेन्स. आपल्या अस्त्र शस्त्रांनी शत्रूवर त्याला मारण्यासाठी हल्ला करणे म्हणजे आक्रमण. दुसरे म्हणजे शत्रूने केलेला अस्त्र शस्त्रांचा मारा चुकवण्यासाठी घेतलेला एखादा बचावात्मक पवित्रा म्हणजे डिफेंस. आजही आपले सैनिक शत्रूपासून बचाव करण्यासाठी खंदक किंवा बॅंकर्सचा आश्रय घेतात. प्राचीन काळात चिलखत, ढाल रथ इ गोष्टींचा वापर संरक्षणार्थ करण्यात येई. श्रीरामांजवळ यापैकी एकही गोष्ट नव्हती. ते वनवासात असल्यामुळे स्वसंरक्षणार्थ धनुष्यबाण तेवढे त्यांच्याजवळ होते. वालीने फेकलेले मोठमोठे दगड, वृक्ष यांच्यापासून बचाव करण्यासाठी बचावात्मक पवित्रा  घेणे त्यांना भाग होते. म्हणून त्यांना वृक्षाच्या आड उभे राहून वालीचा वध करावा लागला. मला असे वाटते की एवढे स्पष्टीकरण श्रीरामांच्या बाजूने पुरेसे आहे. ज्या महानुभावांना या बाबतीत श्रीरामांना दोषी ठरवायचे आहे, त्यांना खुशाल ठरवू देत. त्यामुळे श्रीरामाचे आणि रामकथेचे महत्व कमी होत नाही. 

अर्जुन आणि दुर्योधन यांच्यातील एक कथा महाभारतात आपण ऐकली आहे. दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागायला जातो. योगायोगाने त्याच वेळी अर्जुनही तिथे येतो. अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाजवळ उभा असतो आणि दुर्योधन उशाशी. त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला आधी पाहतो, आणि त्याला मदत मागण्याची संधी आधी देतो. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, युद्धामध्ये मी स्वतः शस्त्र हाती घेणार नाही. त्यामुळे एका बाजूला निःशस्त्र असा मी आहे, आणि एका बाजूला माझी नारायणी सेना. तेव्हा अर्जुन म्हणतो, ' केशवा , मला तू हवा आहेस. तू असल्यानंतर तुझी नारायणी सेना मला नको. ' तर अर्जुनाच्या या उत्तराने दुर्योधन आनंदित होतो. तो अर्जुनाला मुर्खात काढतो आणि प्रत्यक्ष नारायणाला सोडून नारायणी सेना मागून घेतो. जसे अर्जुनाला नारायण हवे असतात, तसेच आपल्यालाही राम हवे आहेत. नारायणी सेना नारायणाशिवाय काय कामाची ? तसेच रामकथेतील इतर सर्व वादग्रस्त गोष्टी बाजूला ठेवून आपण फक्त श्रीरामाला हृदयात स्थान द्यावे. त्यानेच आपला हेतू साध्य होणार आहे. हंसाची नीरक्षीरविवेक दृष्टी आपण ठेवावी. हंस पक्षी पाणी आणि दूध वेगळे करतो असे म्हणतात. श्रीरामाचे चरित्र लोकोत्तर आणि अद्वितीय आहे. आपणही गैरसमजांचे पाणी बाजूला सारून रामकथेतील अमृत तेवढे प्राशन करावे. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

११/०९/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...