उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा -भाग एकवीस ( कुटुंबसंस्था )
विवाहसंस्था किंवा कुटुंबव्यवस्था कशी असावी याचे उत्तर रामायणात आपल्याला मिळते. कुटुंब हा समाजाचा एक छोटा आणि मूलभूत घटक आहे. अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. कुटुंबातील व्यक्तींचा विकास झाला तर आपोआपच समाजाचा आणि देशाचा विकास होतो. हा विकास केवळ आर्थिक स्तरावर नव्हे तर बौद्धिक, भावनिक आणि एकूणच व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास येथे अपेक्षित आहे. असा विकास ज्या व्यक्तीचा झालेला असतो, तिला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असते. माझे कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रतीअसणारे कर्तव्य कोणते याची जाण जर मला असेल तर मी जबाबदारीने वागेन. ही जी जबाबदारीची, कर्तव्याची भावना आहे ती रामायणकालीन कुटुंबात लहानपणापासून जोपासण्यात येत असे.
विवाहसंस्था का निर्माण झाली असावी ? तर स्त्री आणि मुले यांची काळजी घेणे, भरण, पोषण करणे आणि त्यांना संरक्षण पुरवणे त्याचबरोबर समाजाचा आणि व्यक्तीचा विकास करणे हाही विवाह संस्थेचा उद्देश आहे. केवळ व्यक्तीच्या सुखासाठी विवाहसंस्थेची निर्मिती झाली नाही. या सगळ्या गोष्टींची पुरेपूर जाणीव रामायणकालीन लोकांना होती. त्या काळात विनिमयासाठी वस्तू आणि सोने म्हणजेच सोन्याची नाणी प्रचारात होती. आजच्या सारखा कागदी नोटांचा शोध त्या काळात लागलेला नव्हता. आजची नोटा किंवा रुपया ही कागद रूपातील करन्सी हे आपल्या प्रगतीचे प्रतीक आहे. पण यावर सरकारचे नियंत्रण असल्याने सरकार आपल्या आवश्यकतेप्रमाणे त्याची छपाई करू शकते. त्यामुळे कधी कधी चलनवाढ किंवा मंदी यासारख्या समस्या उभ्या राहतात.
त्या काळात स्त्रियांना जरी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असले तरी आज जशी स्त्री पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडते, तशा प्रकारची जबाबदारी त्या काळात स्त्रियांवर नव्हती. पुरुष पैसा कमावून आणत असे. घरातील सर्व व्यवहार मात्र स्त्रिया पाहत असत. ' अतिथी देवो भव ' ही घराची परंपरा असायची. श्रीराम वनवासात असताना एकदा सीतेला ते एका ऋषींचा आश्रम दाखवतात. त्या आश्रमात आता कोणीही राहत नसते. राम सांगतात, ' पूर्वी येथे ऋषी पती पत्नी राहत असत. येणाऱ्या जाणाऱ्या अतिथींचे ते स्वागत करीत असत. पण आज त्यांचे कोणी नाही. पण त्यांनी लावलेले हे वृक्ष आज अतिथींचे स्वागत करतात. त्यांना सावली, फळे देतात. ' कुटुंबसंस्थेचे कामही असेच आहे. आल्या गेल्या अतिथींचे स्वागत करणे. पुढे ही परंपरा त्यांची मुले चालवतात. त्यातूनच समाज पुढे जात असतो.
रामायणकाळात कष्टाने आणि प्रामाणिकपणानेच लोक पैसे कमवीत असत. गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्याला कोणीही आपली मुलगी देत नसे. समाज अशा व्यक्तीला खड्यासारखे बाजूला ठेवीत असे. त्यामुळे आपोआपच लोक नैतिकतेचे पालन करीत असत. सन्मार्गाने पैसा कमवीत असत. आपण असे समजण्याचे कारण नाही की रामायणकालीन लोक अरसिक होते. ते जीवनाचा आनंद घेत नव्हते. ते उत्तम पोशाख परिधान करत असत. सुगंधी द्रव्ये अंगाला लावून फिरत असत. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असत. तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न बनवून खात असत आणि खाऊ घालत असत. पण या सगळ्या गोष्टीत संयम आणि धर्माचे पालन या दोन मुख्य गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांच्या जीवनात शांतता आणि आनंद नांदत होता.
लग्न किंवा विवाह म्हणजे केवळ दोन शरीरांचे मिलन नव्हे. ते दोन मनांचे, हृदयाचे मिलन आहे. आज आपण लग्नापूर्वीचे ते प्रेम म्हणतो आणि लग्नानंतरचा जो असतो तो संसार. याचा अर्थ संसारात प्रेम असत नाही किंवा असू नये असा आहे का ? तेच प्रेम जेव्हा लग्नानंतरही पतिपत्नीत असेल, तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होईल. आजही आपल्याकडे सप्तपदी करताना जे मंत्र म्हटले जातात, त्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. पण त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. भटजी मंत्र म्हणण्यात गर्क, वऱ्हाडी जेवणात गर्क आणि वधूवर त्यांच्या वेगळ्या विचारात. त्यामुळे विवाह समारंभ ही केवळ औपचारिकता होते. सप्तपदीच्या वेळी म्हटला जाणारा हा एक मंत्र बघा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा