मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग अकरा ( श्रीराम -भाग ३ )

 उगवतीचे रंग 

 विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग अकरा ( श्रीराम -भाग ३ )

रामायण म्हणजे ' वाल्मीकींच्या भाव मनीचे. ' हे वाल्मीकींच्या मनीचे भाव तर रामाचे चरित्र रेखाटताना एका विशेष उंचीवर पोहोचले आहेत. रामायणातले लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान आदी चरित्रे भव्यदिव्य तर खरीच, पण त्या सगळ्यांपेक्षा रामाचे व्यक्तिमत्व विशेष तेजाने आणि आपल्या अलौकिक कर्तृत्वाने झळाळून निघणारे आहे. रामरायाचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्षाची अखंड मालिका आहे. त्याचे संपूर्ण आयुष्य म्हणजे भावना आणि कर्तव्य यांच्यातील संघर्ष आहे. पण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींमध्ये आणि रामामध्ये हा एक मोठा फरक आहे की आपल्या जीवनात बऱ्याचदा कर्तव्यापेक्षा भावनेला आपण श्रेष्ठ स्थान देतो. रामाचे जीवन म्हणजे कर्तव्यनिष्ठतेची पराकाष्ठा. त्याच्या आयुष्यात भावना आणि कर्तव्य यांच्यात नेहमीच कर्तव्याचा विजय झालेला आहे. आपल्या ध्येयापासून तो कधीही ढळलेला नाही. शिवाजी महाराजांच्या बद्दल समर्थ रामदास स्वामींनी जे म्हटले आहे "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, श्रीमंत योगी, जाणता राजा ' ते  सगळे वर्णन श्रीरामाला अगदी चपखल लागू पडते. 

आधीच्या लेखांमधून  राम हा  आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती इ तो कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याव्यतिरिक्तही एक व्यक्ती म्हणूनही त्याच्या चरित्राचा मागोवा घेत असताना नैतिक वजन म्हणजे काय असते, नेता कसा असतो, मित्र कसा असतो या सगळ्या गोष्टींचा उलगडा सुद्धा रामाच्या चरित्रातून आपल्याला होतो. श्रीरामाचे चरित्र सगळ्याच दृष्टीने आदर्श आहे. त्याच्या या उज्वल चारित्र्याचा प्रभाव रामायणातील सर्वच पात्रांवर पडत असे. राम आपल्यापेक्षा जे वयाने लहान आहेत, त्यांना तर मार्गर्शन करीतच असे पण त्याच्यापेक्षा जे ज्येष्ठ होते, त्यानांही प्रसंगी दोन शब्द सांगण्यास तो मागेपुढे पाहत नसे. पण असे करताना त्यांचा उपमर्द होईल अशा पद्धतीने तो कधीही बोलत नसे. त्याचे बोलणे नेहमी विनम्र, मृदू भाषेत असायचे. विनम्र भाषेतही आपले म्हणणे कसे मांडता येते याचा आदर्श म्हणजे राम आहे. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी प्रत्येक वेळी आरडाओरडा करण्याची गरज नसते. तुमचे नैतिक वजन असेल तर समोरची व्यक्ती नक्कीच तुमचे म्हणणे ऐकते.  ' राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे ' याचे आदर्श उदाहरण म्हणजे रामाचे वागणे आहे. लक्ष्मण, भरत, सीता इ सगळे त्याच्यापुढे फारसा युक्तिवाद करत नसत किंवा केला तरी जेव्हा राम असे म्हणत असे की ' मला असे वाटते..' तेव्हा त्याचे ते बोलणे सगळे मान्य करीत. त्याचा शब्द अंतिम असायचा. 

वनवासात जाताना दशरथाने त्याला सांगून पाहिले की लगेच जाण्याची जरुरी नाही. थोडे उशिरा जा. पण त्याने सांगितले की तुम्ही तुमचे कर्तव्य केले आहे. आता मला माझे कर्तव्य करू द्या. या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते ती ही की दशरथाची अशी तक्रार होती की राम खूपच आज्ञाधारक आहे. तो माझे सगळेच म्हणणे ऐकत आला आहे. पण यावेळी तो माझे म्हणणे न ऐकेल तर बरे होईल. म्हणजे गंमत बघा. पालकांची अशी तक्रार असते की माझा मुलगा माझे अजिबात ऐकत नाही. पण इथे मात्र परिस्थिती उलट होती. म्हणून तर पुत्र असावा तर रामासारखा असं म्हटलं जातं. 

राम वनात जायला निघाला, तेव्हा माता कौसल्या देखील त्याच्याबरोबर जायला तयार झाली. तेव्हा रामाने तिची समजूत घातली. दशरथासारखा कर्तव्यनिष्ठ, धर्मपरायण पती असताना तू एखादया विधवेसारखी माझ्या मागे वनात येऊ नकोस. तू त्यांची काळजी घे. कौसल्या यावर काही बोलली नाही. कारण रामाचे नैतिक वजन. वनवासात असताना तर एका प्रसंगी वसिष्ठ ऋषी रामाला परत फिर आणि अयोध्येस येऊन राज्यकारभार कर असे सांगतात. पण त्यांनाही तो सांगतो की मला पितृआज्ञा मोडायची नाही. त्यांना जे वचन दिले ते मला पाळलेच पाहिजे. रामाने एकदा एखाद्याला शब्द दिला म्हणजे दिला. तो कालत्रयीही तो फिरवत नसे. किंवा आताच्या लोकांसारखे सोयीस्कर ' मला तसे म्हणायचे नव्हते ' असे म्हणत नसे. जेव्हा बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा रामासोबत असणाऱ्या सुग्रीव इ मंडळींनी ' तो रावणाचा भाऊ आहे. राक्षसकुळातला आहे. त्याला आश्रय देऊ नका ' अशा प्रकारचे मत प्रदर्शित केले. पण जेव्हा रामाने आपल्याला त्याला आश्रय द्यायचा आहे असे सांगितले, तेव्हा रामाचा शब्द अखेरचा होता. त्याच्यापुढे कोणीही बोलू शकत नव्हते. पण हे रामाच्या भीतीमुळे नव्हे तर त्याच्या असलेल्या नैतिक वजनामुळे. 

सुग्रीव आणि निषादराज हे रामाचे खास मित्र होते. सुग्रीवाबद्दल बोलताना तर राम म्हणत असे की सुग्रीव हा माझा पाचवा भाऊ आहे. रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला गादीवर बसवले ते त्याला सीता शोधात त्याचा उपयोग व्हावा या हेतूने नव्हे, तर त्याची बाजू योग्य होती म्हणून. त्याच वेळी सुग्रीवाला तो हेही सांगायला विसरला नाही की तू तात्पुरता राज्यकर्ता आहेस. नियमाने तुझ्या घरात वारसाहक्काने राज्य राहू शकत नाही. तेव्हा पुढे वालीचा पुत्र अंगद हा त्याचा वारस आहे. किती उज्ज्वल चारित्र्य आणि केवढी न्यायप्रियता..! निषादराजही रामाचा असाच जिवलग मित्र होता. प्रसंगी रामासाठी प्राण सुद्धा देणारा. जेव्हा भरत रामाला भेटायला अरण्यात सेना घेऊन येतो, तेव्हा निषादराजाला वाटते की हा रामाशी युद्ध करण्यासाठी आला आहे, तेव्हा तो आपली सेना घेऊन रामाशी लढण्यासाठी सज्ज होतो. या युद्धात त्याची हानी झाली असती, प्रसंगी प्राणांवरही बेतले असते. पण त्याला ही पर्वा नसते. मैत्रीत किंवा प्रेमात ' द्यायचं असतं '. त्याग असतो, समर्पण असते. ते आपल्याला इथे दिसते. रामही आपल्या मित्रांसाठी काही करायचे बाकी ठेवत नाही. रामाला सुग्रीवाचे राज्य सहज घेता आले असते, निषादराज तर त्याला आपले राज्य द्यायला तयार होता. पण रामाला राज्यलालसा नव्हतीच. 

जसा राम हा आदर्श बंधू, आदर्श मित्र होता तसाच आदर्श मार्गदर्शक किंवा नेताही होता. सुग्रीव, हनुमान, नल, नील, जांबुवंत आदी आपल्या सेनेतील वीरांना तो आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करतो. फक्त योग्य प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करतो. एक राजा म्हणून कसे वागावे हे सांगताना तो सुग्रीव, बिभीषण आदींना फार सुंदर उपदेश करतो.  जसा रामासारखा बंधू, मित्र असावा असे म्हटले जाते तसेच शत्रूही असावा तर रामासारखा असे म्हटले जाते. रामायणात मारीच्याच्या तोंडी हे वाक्य आहे. रामासारखा शत्रू मिळणं ही भाग्याची गोष्ट. राम आणि रावण हे एकमेकांचे शत्रू होते. पण जेव्हा रावणाचा वध होतो, तेव्हा बिभीषण त्याच्यावर अंत्यसंस्कार करावयास नकार देतो. तो रामाला म्हणतो की रावण म्हणजे पशुतुल्य व्यक्तिमत्व. त्याच्यावर कशाला अंत्यसंस्कार करायचा ? तेव्हा राम त्याला म्हणतो, ' रावण हा पराक्रमी, शूर होता. इंद्रादी देवांना त्याने बंदी बनवले होते. तो जिवंत होता तोपर्यंत माझे त्याच्याशी शत्रुत्व होते. पण मरणानंतर वैर संपते. तू त्याचा भाऊ आहेस. भावाला शोभेल असा त्याचा अंत्यसंस्कार कर. तू करणार नसलास तर मी करीन. तो जसा तुझा भाऊ आहे तसाच माझाही आहे. ' रामाच्या हृदयाची केवढी ही श्रीमंती..!  

 रामजवळही कोणताच भेदभाव नव्हता. जातपात, स्त्रीपुरुष, उच्चनीच सगळेच त्यांच्यादृष्टीने सारखे होते. निषादराज, सुग्रीव याना त्याने त्यामुळेच मित्र म्हणून हृदयाशी धरले. भोळ्या शबरीचा भक्तिभाव जाणून तिची उष्टी बोरे खाऊ शकला.एकदा का रामाने एखाद्याला स्वीकारले किंवा हृदयाशी धरले की तो आयुष्यभर ते नाते जपत असे. त्याकाळात जसे अयोध्येचे राज्य होते, तसे लंकेचेही राज्य होते. लंकेचा राजा रावण हा अत्यंत सामर्थ्यशाली होता. आणि अनेक छोट्या छोट्या राज्यांवर अन्याय करत होता. त्याची दहशत होती. रामाने या सगळ्या छोट्या छोट्या राज्यातील लोकांना त्याच्या वनवासातील काळात अन्यायाशी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांना लढायला शिकवले. त्यांना स्वबळावर उभे केले. रामाने ठरवले असते तर पुष्कळ राजांना त्याने आपला मांडलिक बनवले असते किंवा त्यांचे राज्य घेता आले असते. पण त्याला राज्याचा लोभ नाही. अयोध्येचे राज्य तो भरताला देतो. सुग्रीवाचे राज्य त्याला देतो. बिभीषणाची तर सोन्याची लंका असते. पण तिचाही मोह त्याला पडत नाही. 

 महाभारतात तर पांडवांसारख्या भावांना राज्य मिळू नये म्हणून केवढी कपट कारस्थाने रचली जातात हे आपल्याला माहिती आहे. त्यातून तर पुढे महाभारताचे युद्ध होते. म्हणून या सगळ्यात रामाचे व्यक्तिमत्व आणि त्याचे कार्य झळाळून उठताना आपल्याला दिसते. त्यानंतरच्या इतिहासात राज्य आपल्यालाच मिळावे म्हणून महाभारतातला कंस आपल्या वडिलांना तुरुंगात टाकतो.  औरंगजेबासारखा क्रूरकर्मा सुद्धा आपल्या वडिलांना तुरुंगात टाकतो आणि आपल्या भावांना ठार मारायलाही मागेपुढे पाहत नाही.

बिभीषण रामाला त्याला लंकेचे राज्य देऊ करतो, तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणतो

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

हा श्लोक आपल्याला सांगतो की जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही महान असतात. म्हणून तो लक्ष्मणाला म्हणतो, ' लंका सोन्याची असली तरी मला नको. ' आपल्या आई आणि मातृभूमीचा आदर करणारे एवढे निस्पृह आणि आदर्श उदाहरण दुसरे नाही.

आज आपण बऱ्याच वेळेला रामराज्याबद्दल बोलतो. रामराज्य यावे असे सगळ्यांना वाटते. कारण रामाच्या राज्यात प्रजा सुखी होती. राम हा प्रजाहितदक्ष राजा होता. प्रजेच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा तो राजा होता. म्हणून रामराज्य आम्हाला हवेहवेसे वाटते. रामाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करून लेखणीला विराम देतो. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

    ०९/०८/२०२० 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 






























राम जेव्हा वनवासात जायला निघतो, तेव्हाचा प्रसंग खरोखरीच अतिशय करुण आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यावेळी दशरथाची अवस्था मोठी कठीण झालेली असते. आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेल्या रामाला वनवासात जा हे सांगण्यासाठी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाहीत. तेव्हा रामच ते समजून घेऊन आपल्या 
रामाची महानता दाखवणारी एकदोन उदाहरणे सांगतो. मित्र निषादराज त्याला आपले राज्य देण्यास तयार असतो. पण राम ते स्वीकारायला नकार देतो. पुढे रावणाचा वध केल्यानंतर बिभीषण सुद्धा लंकेचे राज्य त्याला अर्पण करण्यास तयार असतो. त्यालाही राम नाही म्हणतो. राम वनवासात जायला निघतो, तेव्हा अयोध्येची सगळी प्रजा त्याच्या बाजूने असते. त्याने ठरवले असते तर त्या प्रजेचे बंड घडवून आणून राजा होऊ शकला असता. पण तो ते करत नाही.  उलट वनवासात असताना निषादराजाला भरताकडे आणि अयोध्येकडे लक्ष ठेवायला सांगतो.  हे सगळे तीनही प्रसंग आपल्याला राम किती निस्पृह होता हे जाणवून देतात.  महाभारतात तर पांडवांसारख्या भावांना राज्य मिळू नये म्हणून केवढी कपट कारस्थाने रचली जातात हे आपल्याला माहिती आहे. त्यातून तर पुढे महाभारताचे युद्ध होते. म्हणून या सगळ्यात रामाचे व्यक्तिमत्व आणि त्याचे कार्य झळाळून उठताना आपल्याला दिसते. त्यानंतरच्या इतिहासात राज्य आपल्यालाच मिळावे म्हणून महाभारतातला कंस आपल्या वडलांना तुरुंगात टाकतो.  औरंगजेबासारखा क्रूरकर्मा तर आपल्या वडिलांना तुरुंगात टाकतो आणि आपल्या भावांना ठार मारायलाही मागेपुढे पाहत नाही.

बिभीषण जेव्हा त्याला लंकेचे राज्य देऊ करतो, तेव्हा तो  लक्ष्मणाला म्हणतो

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

हा श्लोक आपल्याला सांगतो की जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही महान असतात. म्हणून तो लक्ष्मणाला म्हणतो, ' लंका सोन्याची असली तरी मला नको. ' आपल्या आई आणि मातृभूमीचा आदर करणारे एवढे निस्पृह आणि आदर्श उदाहरण दुसरे नाही.

आज आपण बऱ्याच वेळेला रामराज्याबद्दल बोलतो. रामराज्य यावे असे सगळ्यांना वाटते. कारण रामाच्या राज्यात प्रजा सुखी होती. राम हा प्रजाहितदक्ष राजा होता. प्रजेच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा तो राजा होता. म्हणून रामराज्य आम्हाला हवेहवेसे वाटते. रामाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...