मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग दहा ( श्रीराम- भाग दोन )

उगवतीचे रंग 

विश्वास  देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग दहा ( श्रीराम -भाग दोन )

' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे '  असे तुकाराम महाराज म्हणतात ते खरेच आहे. ऋषी वाल्मिकींनी रामायण का लिहिले त्याचे हेच कारण आहे. जगाच्या कल्याणासाठी. कारण रामरायांचा आदर्श त्यांना लोकांसमोर ठेवायचा होता. हा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी रामाला देवत्व प्रदान करून चालणार नव्हते. म्हणून मानव रूपातल्या श्रीरामाचा आदर्शच त्यांनी लोकांसमोर ठेवला. आपण श्रीरामाला विष्णूचा अवतार मानतो. वेद , उपनिषदे, पुराणे त्याचे गुणगान गातात, सकाळचे उषेचे आरक्त रंग आणि संध्यासमयीचे आकाशात उमलणारे सूर्यास्ताचे मनोहारी रंग, इंद्रधनुष्याचे सप्तरंग, ही मनोहर सृष्टी, आकाशात प्रकाशणारे चंद्रसूर्यादी तारे हे सगळे ज्याच्यामुळे प्रकाशमान होतात ती शक्ती म्हणजे राम. हे वाल्मिकींना माहित नव्हते का ? पण वाल्मिकींनी रामाचे हे रूप वाल्मिकी रामायणातून आपल्यासमोर आणले नाही. त्यांना त्याचे मानवी अवतारातील कार्यच दाखवायचे होते. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे होणारी त्याची वाटचाल दाखवायची होती. मानवजातीसमोर त्याचा आदर्श ठेवायचा होता. श्रीराम युगानुयुगांचा दीपस्तंभ आहे. त्याच्या प्रकाशात तुम्ही आम्ही वाटचाल करावी म्हणून वाल्मिकी रामायण आहे. रामाला फक्त देवत्व प्रदान करून जे त्याची पूजा करतात, ते लोक वाल्मिकींचा रामायण लिहिण्याचा मूळ हेतूच नष्ट करतात असे मला वाटते. रामाची पूजा तर करायचीच आहे, पण त्या आधी त्याच्या गुणांची पूजा आपण बांधली पाहिजे. तरच रामचरित्र आपल्याला समजले असे होईल. 

वाल्मिकींचा राम ही तुमच्याआमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. जेव्हा आपल्याला राज्याभिषेक होणार हे त्याला कळते, तेव्हा त्याला पराकोटीचा आनंद झाला आहे. ही आनंदाची बातमी तो सीतेला धावत जाऊन सांगतो. सुवर्ण मृगाच्या मागे तो सीतेचा हट्ट पूर्ण करण्यासाठी धावत जातो. जेव्हा रावणाकडून सीता हरण होते, तेव्हा तो तिच्या विरहाने कमालीचा व्याकुळ होतो. रामायणाच्या अखेरीस जेव्हा सीता भूमीमध्ये सामावते, तेव्हा प्रचंड शोक करतो. लंकेत जाण्यासाठी मार्ग द्यावा म्हणून तीन दिवस अखंड प्रार्थना केल्यावर देखील समुद्र आपल्या विनंतीला मान  देत नाही, हे पाहिल्यानंतर संतापतो. वाली वधानंतर सुग्रीव सीतेच्या शोधासाठी प्रयत्न न करता शांत बसला आहे, मौजमजा करतो आहे हे पाहिल्यानंतर क्रोधीत होतो. पण जेव्हा त्याला समजते की सुग्रीवाने आधीच आपल्या माणसांना सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवले आहे, तेव्हा उदार हृदयी राम त्याला लगेच क्षमा करतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला दर्शवितात की रामाचे वागणे हे एका सामान्य व्यक्तीप्रमाणे होते. त्याच्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती असती, तर ती अशीच वागली असती. 

मग रामाचे असामान्यत्व कशात आहे ? तेच आपण आता क्रमाक्रमाने पाहणार आहोत. विश्वामित्र ऋषींसोबत न भिता राक्षसांचा सामना करण्यासाठी जाणारा राम हा असामान्य आहे. गुरुगृही राहून नुकतेच शिक्षण पूर्ण करून आलेला राम प्रचंड अक्राळविक्राळ राक्षसांचा सामना करण्यासाठी वडिलांच्या आज्ञेने, गुरूंच्या आज्ञेने तत्परतेने निघतो. मला जमेल का, मी एकटा कसा जाऊ हे प्रश्नच त्याला पडत नाहीत. त्राटिकेचा वध, राक्षसांचा वध केल्याने विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडतो. या सगळ्यांमुळे आणि श्रीरामाच्या अत्यंत विनम्रशील वागण्यामुळे प्रसन्न झालेले विश्वामित्र रामलक्ष्मणांना दिव्यास्त्रे प्रदान करतात. मिथिलेला सीता स्वयंवरासाठी घेऊन जातात. या सगळ्या प्रसंगात राम गुरूंना कोणतेही प्रश्न विचारत नाही. केवळ गुरुआज्ञेचे पालन करतो. आणि त्याच्या या वागणुकीचे परिणामस्वरूप मधुर फळ त्याला गुरुजनांचा आशीर्वाद, सीतेची प्राप्ती या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. 

रामाचे असामान्यत्व दाखवणारा दुसरा प्रसंग. रामाला दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार हे जाहीर झालेले असते. त्या सर्वोच्चआनदाच्या स्थितीत राम असतो. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी राम दशरथाजवळ जातो, त्यावेळी कैकेयी त्याला सांगते की तुझ्यावरील अलौकिक प्रेमामुळे त्यांना तुला काही सांगण्याची हिंमत होत नाही, तेव्हा राम म्हणतो, ' मला सांगताना संकोच कसला ? त्यांनी जरी सांगितले की आगीत उडी मार, समुद्रात उडी टाक किंवा विष प्राशन करून मृत्यूला जवळ कर तरी माझी तयारी आहे. ' हे सांगताना राम स्वतःसाठी कोणतीही पळवाट शोधत नाही. अशा वेळी  कैकेयीचे निष्ठुर शब्द त्याच्या कानावर पडतात. ' भरताला राज्य आणि तुला चौदा वर्षांचा वनवास. ' हे ऐकल्यानंतर दुःखाची, विषादाची एखादी रेषा देखील रामाच्या चेहऱ्यावर उमटत नाही. तो जराही विचलित होत नाही.  स्थितप्रज्ञता काय असते ती या प्रसंगी बघायला मिळते. या प्रसंगी रामाच्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती असती तर प्रचंड क्रोधीत झाली असती. उलट या प्रसंगी राम कैकेयीला म्हणतो, ' माते, तू जरी मला भरताला राज्य दे असे सांगितले असते, तरी मी आनंदाने दिले असते. भरत आणि मी एकच आहोत. माझ्या शिक्षणात काहीतरी उणीव राहिली असेल, तीही या निमित्ताने भरून निघेल. कारण वनात ऋषीमुनींची भेट मला घडेल. ' इथे रामाचे असामान्यत्व आपल्याला दिसते. 

संपूर्ण अयोध्येची प्रजा त्याच्या पाठीशी आहे. लक्ष्मणासारखा भाऊ सांगतो आहे की प्रसंगी वडिलांना तुरुंगात टाकून आणि प्रजेमध्ये उठाव घडवून आणून राज्याच्या हितासाठी तू राजा हो. वडिलांचे आणि कैकेयीचे म्हणणे ऐकू नकोस. पण या सगळ्या गोष्टींना ठोकर मारून मातापित्यांची आज्ञा पाळण्यासाठी तो आनंदाने वनवासात जायला तयार होतो. प्रजेचा केवढा पाठिंबा आहे रामाला..! प्रजेला राजा म्हणून रामच हवा आहे. लोक स्वार्थासाठी प्रेम करतात. पण आपल्या प्रजेचे स्वार्थरहित प्रेम रामाला लाभले आहे.  राम जेव्हा वनात जायला निघतो तेव्हा अयोध्येतील प्रजाजन त्याच्या पाठीमागे खूप दूरपर्यंत जातात. त्यांची समजूत घालता घालता त्याची दमछाक होते. एवढे लोकांचे अकृत्रिम प्रेम रामाला लाभले आहे. अशा वेळी परिस्थितीचा लाभ घेऊन लोकांचे बंड घडवून आणणे आणि अयोध्येचे राज्य हस्तगत करणे त्याला सहज शक्य होते. पण तसा विचारही त्याच्या मनात आला नाही. आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनात जाणारा राम हा मर्यादापुरुषोत्तम आहे. 

वनात जाताना रामाला आपल्या तरुण आणि सुंदर पत्नीचा मोह अडवू शकला नाही. राजप्रासादातील रुचकर अन्नाऐवजी अरण्यात कंदमुळे भक्षण करावी लागतील या विचाराने तो विचलित झाला नाही. घोर अरण्य आणि त्यात येणारी संकटे त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली नाहीत. आपल्या आईला आणि पत्नीला मी वनात जाऊ का म्हणून त्याने विचारले नाही.  तो फक्त त्यांची परवानगी घेण्यासाठी गेला. नंतर सीता आणि लक्ष्मण यांनी त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला हा भाग वेगळा.  या सगळ्या गोष्टीत रामाचे असामान्यत्व आपल्याला बघायला मिळते. म्हणून तर रामाचा आदर्श आपल्यासमोर ठेवला जातो. सकाळच्या वेळेला रामप्रहर म्हटले जाते. या सकाळच्या वेळी आपली मनेही प्रसन्न असतात. सदैव प्रसन्नचित्त, प्रफुल्लित अशा रामाचे स्मरण करण्याची ही वेळ असते. मग आपलाही दिवस प्रफुल्लित, प्रसन्न असा जातो. ( भाग अकरा रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
०७/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...