उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग वीस ( रामायणकालीन शासन व्यवस्था )
आधीच्या लेखात आपण रामायणकालीन समाजाची थोडक्यात माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. रामायणकालीन समाजाची काही मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा समाज मानवी समाजाच्या एका प्रगत पातळीवर जगत होता. आज आपल्याला अक्षरशः स्वप्नवत वाटेल अशा प्रकारचे जीवन या लोकांचे होते. उच्च नैतिक मूल्यांचे पालन, आपल्या कार्याला धर्माचे अधिष्ठान, त्याग, सेवावृत्ती आणि सहकार्य यावर आधारित जीवनशैली त्यांची होती. सर्वात महत्वाचे म्हणजे मी समाजाचे काही देणे लागतो, ही भावना प्रत्येकामध्ये न सांगताही जागृत होती. याच भावनेतून लोक स्वेच्छेने कर ( व्हॉलंटरी टॅक्स पेयिंग ) देत होत होती. या रामायणकालीन जनतेचे मला काही विशेष वाटेल असेल तर ते हे आहे की ही जनता आनंदी होती. रामराज्यात दीन, दुःखी, भिकारी, लाचार असा कोणी नव्हता. आज संयुक्त राष्ट्रांतर्फे जगातील आनंदी राष्ट्रांची यादी जाहीर केली जाते. त्याला आनंदाचा निर्देशांक ( हॅपिनेस इंडेक्स ) म्हटले जाते. रामराज्यात हा आनंदाचा निर्देशांक सर्वात जास्त होता म्हणून तर रामराज्य सगळ्यांना हवेहवेसे वाटते. आज भुतानसारखा छोटासा आणि अविकसित देश या आनंदाच्या निर्देशांकात सगळ्यात वर आहे. भारताचा क्रमांक दरवर्षी खाली घसरत असून तो आता १३३ व्या स्थानावर गेला आहे.
आधीच्या लेखात मी म्हटले होते की People get the government they deserve. लोकांची जशी योग्यता असेल तसे सरकार त्यांना मिळते. रामराज्यातील शासनव्यवस्था रामायणकालीन लोकांना साजेशीच होती. ही व्यवस्था उच्च अशा नीतिमूल्यांवर आधारित होती. रामायणकालीन शासनव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा लोकांचा जीवनात कमीत कमी हस्तक्षेप होता. ज्या राष्ट्रातील लोक मुळातच समजूतदार,शांतताप्रिय आणि स्वयंस्फूर्तीने नियम पाळणारे असतील, तेथे शासनाला जास्त हस्तक्षेप करण्याची आवश्यकता भासत नाही. रामायणकालीन शासनव्यवस्थेचे व्यवस्थेचे दोन स्तर होते. त्यावर एक तिसरा स्तरही होता. पण तो अदृश्य स्वरूपात. तो कोणता हे पुढे येईलच.
त्या काळात राजाला राज्यकारभारविषयक सल्ला देण्यासाठी अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात होते. या अष्टमंडळातील प्रधान किंवा अमात्य हे आपापल्या क्षेत्रात निष्णात तर असतंच पण ते अत्यंत निस्पृह, उत्तम चारित्र्य असलेले, उच्च नीतिमूल्यांचा आदर करणारे, कोणत्याही मोहाला बळी न पडणारे असे असत. त्यांची निवडच या सगळ्या गोष्टी पाहून केली जात असे. त्यांना चांगले मानधन देण्यात येत असे. त्यांच्या निवास आदी सर्व गोष्टींची व्यवस्था राजातर्फे होत असे. त्यामुळे त्यांना प्रजेत आणि राजदरबारी मानाचे स्थान दिले जाई. पण तरीही ते पगार घेत असल्याने आणि राज्याचे ते सेवक असल्याने राजा त्यांचा प्रत्येक सल्ला ऐकलेच असे सांगता येत नव्हते. एखादी गोष्ट राज्याच्या आणि प्रजेच्या हिताची असली तरी ती करण्यासाठी ते राजाला भाग पाडू शकत नव्हते. राजाला योग्य सल्ला देणे एवढेच त्यांचे काम होते. शिवाय ते निस्पृह असले तरी मोहाला बळी पडणारच नाहीत अशी खात्री कुणीही देऊ शकत नव्हते. कारण शेवटी मनुष्य स्वभाव आहे. पण अशी शक्यता ९९. ९९% नव्हती.
तेव्हा समजा अमात्य मंडळ भ्रष्ट झालेच किंवा त्यांनी चुकीचा सल्ला राजाला दिला तर त्यासाठी एक ऋषिमंडळ अस्तित्वात होते. या मंडळातील ऋषी तपस्वी, तेजस्वी आणि भौतिक गोष्टींचा मोह नसणारे असे असत. राजाकडून ते काहीही घेत नसत. त्यामुळे राजाचे मिंधे असणे किंवा लाचार असणे ही शक्यताच त्यांच्या बाबतीत नव्हती. त्यामुळे त्यांना एखादा निर्णय योग्य वाटला नाही, तर प्रसंगी राजाचा कान धरून त्याला ती गोष्ट करायला लावण्याचे नैतिक सामर्थ्य त्यांच्यात होते. राजसत्ता ही अशा थोर मुनींचा आदर करीत असे. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन एखादा निर्णय घेण्याची हिंमत राजसत्तेमध्ये नव्हती.
याचे एक उदाहरण आपण पाहू म्हणजे ही गोष्ट आणखी स्पष्ट होईल. विश्वामित्र ऋषी त्यांच्या अरण्यात असलेल्या आश्रमात यज्ञ करीत होते. आणि राक्षस या यज्ञात विघ्ने आणून त्या यज्ञांचा विध्वंस करीत असत हे आपल्याला माहिती आहे. या यज्ञांचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले आणि त्यांनी त्यासाठी रामाला आपल्या मदतीला देण्याची मागणी दशरथ राजाकडे केली. सुरुवातीला राम लहान आहे, तो राक्षसांचे पारिपत्य कसे काय करू शकेल या विचाराने आणि पुत्रमोहाने दशरथाने विश्वमित्र ऋषींना रामाला पाठवण्यास नकार दिला. प्रसंगी आपण स्वतः येऊन यज्ञाचे राक्षसांपासून रक्षण करू असे दशरथ राजाने सांगितले. यानंतर विश्वामित्र ऋषींनी ऋषिमंडळाचे प्रमुख असलेल्या वसिष्ठ ऋषींच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला विश्वामित्रांची मागणी योग्य आहे आणि रामाला त्यांच्यासोबत यज्ञाच्या रक्षणासाठी पाठवण्यास हरकत नाही असा सल्ला दिला आणि दशरथ राजाला तो मान्य करावा लागला.
तेव्हा अमात्य मंडळ आणि त्यावर असलेले ऋषिमंडळ हे अत्यंत निस्पृह, चारित्र्यवान , तपस्वी आणि तेजस्वी असल्याने रामराज्यातील शासनव्यवस्था कमालीची पारदर्शक होती. पण अशी कल्पना करू की समजा या दोघांकडूनही एखादी चूक झाली तर त्यावर अदृश्य असा एक तिसरा स्तर होता. ते म्हणजे जे राजे त्या काळात राज्य करीत होते, ते अत्यंत चारित्र्यवान आणि उच्च नीतिमूल्यांचा आदर करणारे होते. याबाबतीत इक्श्वाकु कुळातील दशरथ आणि श्रीरामासह जवळपास सर्वच राजे आदर्श होते. मिथिलेचा राजा जनक याचे उदाहरण सुद्धा या ठिकाणी दिल्याशिवाय राहवत नाही. जनक राजा हा अत्यंत विद्वान, तपस्वी, तत्वज्ञानात निपुण, उच्च नीतिमूल्यांचे पालन करणारा आणि चारित्र्यवान असा होता. राज्यकर्त्यांनी कसे असावे त्याचा आदर्श म्हणजे हे रामायणकालीन सगळे राजे आहेत. ते सगळे प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यपरायण होते.
श्रीरामाला युवराज म्हणून राज्याभिषेक होणार होता, पण कैकेयीने दशरथाकडे मागून घेतलेल्या दोन वरांमुळे श्रीरामाला वनवासात जावे लागणार होते आणि भरताला राज्य मिळणार होते. याप्रसंगी रामाने वनवासात जाऊ नये असा सल्ला खुद्द दशरथ राजासह लक्ष्मण आदींनी रामाला दिला. पण श्रीराम म्हणजे नैतिक मूल्य पालनाचे सर्वोच्च आणि आदर्श उदाहरण होते. आपल्या वडिलांनी कैकेयीला दिलेले वचन खोटे ठरू नये तसेच ' रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाय पर वचन न जाई ' या कुळाच्या ब्रीदाला कलंक लागू नये श्रीरामाने हसत हसत वनवास पत्करला. आणखी एका दुसऱ्या प्रसंगात या अदृश्य अशा तिसऱ्या स्तराचे मनोरम दर्शन आपल्याला घडते आणि आपण स्तिमित होतो. आणि श्रीरामाला मनोमन नमन करण्यापलीकडे आपल्या हातात काही राहत नाही.
प्रसंग असा आहे की राम वनवासात असताना भरत त्यांना भेटायला जातो. या प्रसंगी भरत रामाने अयोध्येत परत यावे आणि राज्य करावे अशी विनंती करतो. पण श्रीराम त्याला नकार देतात. भरत मग हुकुमी एक्का म्हणून वसिष्ठ ऋषींची इच्छा रामाला सांगतो. वसिष्ठ ऋषींचे स्थान किती वरचे आणि श्रेष्ठ आहे ते मी वर सांगितलेच आहे. ऋषिमंडळाचे ते प्रमुख असतात. वसिष्ठ ऋषींच्या इच्छेनुसार रामाने अयोध्येला परत यावे असे भरत रामाला सांगतो. पण श्रीराम त्याला सांगतात की वसिष्ठ ऋषींना माझा आदरपूर्वक नमस्कार सांग. पण त्यांना हे सांग की राम पितृआज्ञेचे उल्लंघन करू इच्छित नाही. म्हणजे बघा, शासन व्यवस्थेतील अमात्य मंडळ, त्यावर असलेले ऋषिमंडळ यांच्यावरही हा तिसरा अदृश्य स्तर होता. तो म्हणजे स्वतः राजे हे नैतिक मूल्ये सर्वोपरी मानत. त्यांना सर्वोच्च महत्व देत. प्रजेप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यपालनाचा एक भाग म्हणून श्रीरामाने आपल्या प्राणप्रिय सीतेला वनवासात पाठवले. सीता निर्दोष आहे हे श्रीराम जाणत होते. रामायणाच्या शेवटी कालपुरुष श्रीरामाच्या भेटीला येतो. त्याच्यासोबतच्या अटीचा भंग लक्ष्मणाने केला म्हणून आपला जणू प्राण असलेल्या लक्ष्मणाला श्रीरामाने देहदंडाची शिक्षा ठोठावली.
अशा प्रकारची उच्च नीतिमूल्ये असलेली शासनव्यवस्था रामायणकाळात होती. राजे भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व देत होते. हे शासनव्यवस्थेचे तीन स्तर नव्हते तर मानवी नीतिमूल्यांचे एकावर एक असणारे आदर्श असे स्तर होते की जे आजच्या काळात आपल्याला स्वप्नवत वाटतात. हे चारित्र्य, ही नीतिमूल्ये निर्माण करावी लागतात. ती आपोआप उगवत नाहीत. त्यासाठी आधी मशागत, नंतर पेरणी आणि काळजीपूर्वक निगराणी करावी लागते, तरच रामराज्याचे पीक हाती येते.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा