उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग एकोणीस ( रामायणकालीन समाज )
गेले काही दिवस आपण रामकथेवर चर्चा करतो आहोत. श्रीराम, रामायण आणि रामराज्य हे समजून घेत असताना रामायणकालीन समाज कसा होता हे पाहणे उद्बोधक ठरते. रामायणकालीन समाजाबद्दलची अधिकृत माहिती मिळण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे वाल्मिकी रामायण. वाल्मिकींचा जीवनकाल आणि रामायण किंवा रामराज्य हे समकालीन आहेत. रामायणाच्या बालकांडात अयोध्येतील लोकांचे आणि तत्कालीन समाजाचे सुंदर वर्णन वाल्मिकींनी केले आहे. प्रसिद्ध संस्कृत कवी भवभूती याच्या उत्तररामचरितमानस या ग्रंथातही भवभूती रामायणकालीन समाजाचे सविस्तर वर्णन करताना दिसतात.
रामायणकालीन समाज हा धर्मनियंत्रित होता असे प्रामुख्याने म्हणावे लागेल. त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागे धार्मिक अधिष्ठान होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपण भारतीय संस्कृतीत मानतो. पण रामायणकाळात अर्थ, काम आणि मोक्ष हे जे तीन पुरुषार्थ आहेत, त्यांना धार्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे आपोआपच नैतिक मूल्यांचे पालन होऊन वाईट गोष्टींना आळा बसत होता. रामायणकाळात वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात होती. प्रत्येक व्यक्ती आपापला व्यवसाय स्वतंत्रपणे करत असे. पण असे करताना ते इतरांशी फटकून वागत नव्हते. संपूर्ण समाज हा एकजिनसी किंवा एकमेकांशी समरस झालेला होता. इतरांच्या सुखदुःखाचा विचार करणारे लोक होते. त्यामुळे आपला व्यवसाय करताना इतरांच्या पोटावर पाय येणार नाही याची दक्षता आपोआपच घेतली जात होती.
आपापले व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव या नागरिकांमध्ये होती. इतिहास, नागरिकशास्त्र न शिकवताही ही भावना त्यांच्यामध्ये जागृत होती. हेच त्या काळातील ऋषीमुनींच्या शिकवणुकीचे मोठे यश मानावे लागेल. अशी समाजव्यवस्था आपोआप निर्माण होत नाही. त्यासाठी त्या काळातील धुरिणांनी पिढ्यानपिढ्या रक्त आटवले होते, तपश्चर्या केली होती. रामराज्य एका रात्रीत निर्माण होत नाही. याच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्या काळातील प्रजा स्वयंस्फूर्तीने कर ( टॅक्स ) देत होती. श्रीमंत माणसे तर कर द्यायचीच पण अगदी सामान्य किंवा गरिबातील गरीब माणूस सुद्धा आपल्या कमाईतला काही हिस्सा बाजूला काढून राजाला कर देत असत. कराचे ओझे वाटत नव्हते किंवा कर हा बळजबरीने वसूल केला जात नव्हता. तर मी समाजाचं काही तरी देणं लागतो, या भावनेतून लोक स्वतःहून कर देत होते. मला वाटतं ही गोष्ट रामराज्याला एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवते.
त्या काळात मंदिरे ही सांस्कृतिक केंद्रे होती. लग्नसमारंभ किंवा सार्वजनिक सभा,भाषणे इ ची ती ठिकाणे झालेली नव्हती. मंदिरांना आजच्यासारखे व्यावसायिक किंवा बाजारू स्वरूप आलेले नव्हती. या मंदिरांमध्ये फक्त शुद्ध भक्ती, उपासना, साधना केली जात असे. नैतिक मूल्यांची चर्चा करण्याचे हे व्यासपीठ होते. मंदिरांच्या बाहेर लोक दुकाने थाटून बसले नव्हते, देणगी, अभिषेकाच्या पावत्या फाडल्या जात नव्हत्या. मुळात मंदिर हा शब्दच किती पवित्र आहे ! असे पावित्र्य त्या काळातल्या मंदिरांनी जपले होते.
त्या काळात विवाह हे अनुवंश, घराणे किंवा कुळ पाहूनच केले जात असत. घराण्यातील उच्च परंपरा जपल्या जात. वडीलधाऱ्यांच्या, गुरुजनांचा आदर केला जात असे. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी स्त्रियांना देखील स्वातंत्र्य होते. शिक्षणाचा अधिकार होता. सामाजिक कार्यामध्ये स्त्रिया भाग घेऊ शकत असत. कैकेयी ही युद्धकलेत निपुण होती. सीता देखील सर्व विद्या आणि शास्त्रे जाणणारी होती. रामायणात श्रीराम जेव्हा वनवासात जाणार असे अयोध्येतील लोकांना समजते, तेव्हा ते राज्य कोण चालविणार असा प्रश्न वसिष्ठांना विचारतात. तेव्हा सीता राज्य सांभाळील. ती असताना राज्यकारभाराची काळजी नाही असे उत्तर ते देतात.
वाल्मिकी रामायणात प्रजेचे वर्णन करणारे बालकांडातील सहाव्या सर्गात जे श्लोक आले आहेत, त्यावरून असे दिसते की त्या काळातील लोक हे धार्मिक, पापभिरू, नैतिक मूल्यांचा आदर करणारे, बहुश्रुत, सत्यवादी होते. ते अल्पसंचय करणारे होते. गो धन आणि धनधान्याने मात्र संपन्न होते. बहुतेक लोक सुंदर आणि दीर्घायुषी होते. त्या काळातील लोकांना हक्क आणि कायद्याची जाणीव नव्हती. मात्र स्वकर्तव्याची जाणीव मोठ्या प्रमाणात होती. यातच रामराज्याचे मोठेपण आहे. रस्त्यावर थुंकू नका, रस्त्यावर कचरा टाकू नका आपले घर स्वच्छ ठेवता तसे आपले नगरही स्वच्छ ठेवा या गोष्टी त्या लोकांना सांगण्याची गरज नव्हती. कारण सामाजिक स्वच्छता,सामाजिक बांधिलकी या गोष्टी मुळातच त्यांच्या रक्तात भिनल्या होत्या.
जीवनातील जे आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्याशाश्रम यांचे पालन ते कसोशीने करत असत. आपले आयुष्य जर शंभर वर्षांचे गृहीत धरले तर, पन्नासाव्या गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन ते नागरिक वानप्रस्थाश्रम स्वीकारीत असत. अशा वेळी पती पत्नी दोघेही वनातील एखाद्या ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणी आपली सेवा देत असत. तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून देत असत. तेथे काही वर्षे व्यतीत केल्यानंतर त्यांची पुढील वाटचाल संन्याशाश्रमाकडे होत असे. अशा रीतीने वानप्रस्थाश्रम स्वीकारल्याने त्यांच्या पुढील पिढीवर आपोआप जबाबदारी पडून त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत असे. वानप्रस्थाश्रम स्वीकारल्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या मंडळींचे संसारातील लक्ष आपोआपच कमी होत असे. या सगळ्या गोष्टींमुळे सामाजिक आणि कौटुंबिक आरोग्यही चांगले राहत असे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा