उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा -भाग अठरा ( राम आणि रावण )
रामायणातील महत्वाच्या पात्रांचा आपण आतापर्यंत आढावा घेतला. रावण, कैकयी, मंथरा, वाली अशी काही पात्रे सोडली तर, इतर पात्रांनी आपल्यापुढे आपल्या वागणुकीने आदर्श उभे केले आहेत. केवळ राम सीताच नव्हे तर लक्ष्मण, भरत, हनुमान आदींनी त्यांच्या वागणुकीतून चारित्र्याचे, सेवेचे आणि भक्तीचे उच्चतम आदर्श आपल्यापुढे ठेवले आहेत. अनेक युगे लोटली तरी हे आदर्श काळाच्या ओघात नष्ट झाले नाहीत यातच त्यांची महानता आहे. आजच्या या लेखात आपण राम आणि रावण यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत, पण ती वेगळ्या अंगाने. राम आणि रावण या व्यक्ती म्हणून रामायणकाळात होत्या. आज त्या अस्तित्वात नाहीत. पण राम आणि रावण या दोन प्रवृत्ती आहेत, असा जर विचार केला तर या दोन्ही व्यक्ती प्रवृत्तीरूपाने आजही अस्तित्वात आहेत.
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत ' हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर, आपणचि जाला ' असे म्हटले आहे. हा खूप व्यापक विचार ज्ञानदेवांनी आपल्याला दिला आहे. पण तो जगून दाखवला तो रामासारख्या युगानुगाचे दीपस्तंभ असलेल्या व्यक्तींनी. हे संपूर्ण विश्व माझे घर आहे. या विश्वातील चराचर प्रत्येक प्राणी म्हणजे जणू आपणच आहोत या विचारावर ज्याची मती म्हणजे बुद्धी स्थिर झाली आहे अशी व्यक्ती म्हणजे विश्वात्मक दृष्टी असलेली व्यक्ती. अशा प्रकारची दृढ श्रद्धा आपल्या विश्वात्मक विचारावर श्रीरामाची होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीराम म्हणजे विश्वात्मक विचार. रावण म्हणजे याच्या बरोबर विरुद्ध असलेली प्रवृत्ती. रावण म्हणजे व्यक्तिवाद. मी आणि माझे याच्या पलीकडे दुसरे काही ज्याला दिसत नाही असा विचार किंवा प्रवृत्ती म्हणजे रावण. विश्वात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना हे विश्व, त्यातील अवघे प्राणिमात्र हे आपलेच वाटतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या विश्वात असलेल्या इतरांचे सुखदुःख अशा व्यक्ती आपलेच मानतात.
रावणाचे वागणे मात्र याच्या उलट होते. व्यक्तिवादाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावण. अशा माणसांना स्वतःचा स्वार्थ,स्वतःचे हित या पलीकडे दुसरे काही दिसत नाही. रावण शूर होता, विद्वान होता पण स्वार्थाने, विषयलोलुपतेने त्याची बुद्धी संकुचित झाली होती. दुसऱ्या व्यक्ती या केवळ आपला स्वार्थ पूर्ण करण्याचे माध्यम आहेत अशा विचाराने अशी माणसे वागतात. मग तो बिभीषणासारखा सदाचारी भाऊ असला तरी जेव्हा तो त्यांच्या स्वार्थाच्या आड येत असेल तेव्हा रावणासारखी माणसे त्यांना लाथ मारून हाकलतात. मंदोदरीसारख्या सुशील, पतिव्रता स्त्रीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणे, तिला बळजबरीने उचलून आणणे या गोष्टी चांगल्या नाहीत हे रावणासारख्या विद्वान माणसाला कळत नव्हते असे नाही. पण जेव्हा व्यक्तिवाद, स्वार्थ, विषयलोलुपता या गोष्टी बळावतात, तेव्हा चांगले आणि वाईट याचा विवेक माणूस हरवून बसतो. आणि तो समोरच्या व्यक्तीला आपल्या इच्छापूर्तीचे साधन मात्र बनवतो. महाभारतातील दुर्योधनाचे उदाहरण अशाच प्रकारचे आहे. एकदा दुर्योधन स्वतःबद्दल बोलताना म्हणतो की मी जे काही वागतो ते चांगले नाही हे मला कळते. पण चांगले वागण्याची मला बुद्धीच होत नाही. तेव्हा रावणी प्रवृत्तीची माणसे अशी असतात.
श्रीरामाचे संपूर्ण जीवनच दुसऱ्यांसाठी त्यागाचे उदाहरण आहे. तो राजा होता, पण उपभोगशून्य स्वामी होता. लोकांची सुखदुःखे ती माझी सुखदुःखे अशीच त्याची भावना होती. पित्याच्या शब्दासाठी वनात जाणे असो, भरतासारख्या भावासाठी केलेला राज्यत्याग असो की प्रसंगी आपल्या सुखाला तिलांजली देऊन प्रजेच्या हितासाठी कर्तव्यकठोर राजा म्हणून निर्णय घेणे असो, त्याने फक्त इतरांचाच विचार केला. सुग्रीवाला राज्य मिळवून दिले, बिभीषणाला लंकेचा सम्राट केले. अर्धशिक्षित अशा वानर प्रजातीच्या लोकांना त्याने एकत्र केले, लढायला शिकवले. शबरी, निषादराज यांना जातपात, उच्चनीच असे न मानता आपलेपणाने जवळ केले. एकदा त्याने ज्याला आपला मानले, त्याच्यासाठी त्याने वाटेल ते झाले तरी सोडले नाही. रामाचा स्वभावच असा होता की एकदा जो कोणी त्याच्या सहवासात आला, तो त्याचाच होऊन जात असे. असे का घडले असावे ? श्रीराम विष्णूचा अवतार होता म्हणून ? तो राजा होता म्हणून ? तर या प्रश्नांचे उत्तर नाही असे आहे. लोकांना रामाबद्दल वाटणारा आदर हा त्याच्या वागणुकीमुळे होता. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांना आपले मानणे, त्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणे ही रामाच्या स्वभावाची, वागणुकीची वैशिष्ट्ये होती. त्याचे व्यक्तिमत्व हे विश्वात्मक व्यक्तिमत्व होते.
रावण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. राम होण्यासाठी मात्र संस्कारांची गरज असते. रामायणात वाल्मिकींना हेच तर दाखवायचे आहे. माणूस प्रयत्न केल्यास नराचा नारायण होऊ शकतो हे श्रीरामाने आपल्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. माणसाचे अधःपतन होऊन त्याचा सर्वनाश कसा होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावण आहे. रावणाचा व्यक्तिवाद ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मी, माझे, माझे कुटुंब, माझे राज्य, फक्त माझी माणसे या पलीकडे अशा व्यक्तींना दुसरे काही दिसत नाही. ही प्रवृत्ती लहान मुलात देखील आपल्याला आढळून येते. लहान मूल त्याला दुसरे काही कळत नसल्यामुळे कमालीचे स्वार्थी असते. त्याला एखादे खेळणे जर आईवडिलांनी आणून दिले असेल तर, त्या खेळण्याला ते लहान मूल दुसऱ्या मुलाला हात लावू देत नाही. त्याच्या हातात खाऊ दिला तर एकटेच खाण्याची प्रवृत्ती असते. आपल्याला त्याला संस्कारांनी शिकवावे लागते.
एखादी वस्तू आपली असताना सुद्धा ती उदार मनाने देणे, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणे हे आपण लहान मुलाला संस्कारानीच शिकवतो. अशा गोष्टींचे वारंवार हॅमरिंग करावे लागते. आईवडिलांना आपल्या वागणुकीतून आपल्या मुलांना आदर्श घालून द्यावा लागतो. तेव्हा कुठे मुले घडतात. मला जसा जगण्याचा हक्क आहे, तसा इतरांनाही आहे. इतरांनी माझ्याशी जसे वागावे असे मला वाटते, तसेच मीही इतरांशी वागले पाहिजे. माझ्या विकासात समाजाचा, समाजातील विविध व्यक्तींचा सहभाग आहे, तेव्हा समाजाप्रती काही करणे हे माझे सुद्धा कर्तव्य आहे या गोष्टी केवळ संस्कारातूनच मुले शिकू शकतात.
रामायणाचा हेतू अशा चांगल्या गोष्टी आपल्यावर बिंबवणे हाच आहे. रामायणातील उज्वल आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठीच वाल्मिकींना रामायण लिहिण्याची गरज वाटली असणार हे उघड आहे. रामायण वाचून किंवा ऐकून आपल्याला पुण्य मिळेल, त्यासाठी आपण ते करायचे आहे, असा जर आपला समज असेल, तर वाल्मिकींचा हेतू आपण विफल केला असे होईल. ज्यांना ज्यांना रामराज्य पुन्हा यावे असे वाटते किंवा समाजात सात्विक गुणांचे प्राबल्य वाढून दुष्ट प्रवृत्ती नाहीशा व्हाव्यात असे वाटते अशा सज्जनांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. समाजातील रावणांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर रामाचे गुण आत्मसात करून आक्रमक होण्याची गरज आहे. रामाच्या धनुष्याच्या टणत्कार जेव्हा ऐकू येतो, तेव्हाच राक्षसांच्या उरात धडकी भरते. आक्रमक व्हायचे म्हणजे मारामारी, युद्ध नाही करायचे. ही विचारांची लढाई आहे. समोरच्या व्यक्तीला आपले विचार पटवून देता आले पाहिजे. विचारातून त्याचे मतपरिवर्तन झाले पाहिजे. त्यांना निरुत्तर करायचे तर त्यासाठी अभ्यास करावा लागेल. अभ्यास, संस्कार, साधना यातूनच तेजस्वी व्यक्तिमत्वे निर्माण होतील. अशीच माणसे देश घडवू शकतील.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा