मुख्य सामग्रीवर वगळा

रामायणकालीन समाज, शिक्षण व शासनव्यवस्था

 रामायणकालीन समाज, शिक्षण व शासनव्यवस्था 

                                                                                                                 - विश्वास देशपांडे, चाळीसगाव   


रामायणकालीन समाज आणि शासनव्यवस्थेवर लिहिताना माझा ऊर अभिमानाने भरून येत  आहे. तो यासाठी की अशा प्रकारची आदर्श समाजरचना कोणे एके काळी आपल्या देशात विद्यमान होती. आज जेव्हा आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा आणि शिक्षण व्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा रामायणकालीन समाजव्यवस्थेतील फरक आपल्या नजरेत ठळकपणे भरतो. हा फरक सगळ्याच बाबतीत पडलेला आहे. शिक्षणपद्धती, कुटुंबव्यवस्था, शासन संस्था या सगळ्यांमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. आज जेव्हा आपली भौतिक प्रगती झाली आहे, अनेक नवनवीन शोध लागत आहेत, अशा वेळी मात्र आपल्या उज्वल, दैदिप्यमान आणि तेजस्वी संस्कृतीची पीछेहाट होताना दिसत आहे. नीतिमूल्ये हरवत चालली आहेत. तरुणांमध्ये निराशेची भावना वाढताना दिसते आहे. कालानुरूप अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी भगवद्गीता, रामायणासारखे ग्रंथ आपल्याला नक्कीच दिशा दाखवू शकतील. 

रामायणकाळातील समाजाचे वर्णन स्थूलमानाने करायचे झाले तर हा समाज पापभिरू, शाश्वत अशा नैतिक मूल्यांचे पालन करणारा आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. अध्यात्म हा या समाजाचा पाया  कोणत्याही कृत्याला अध्यात्मिक नैतिक अधिष्ठान होते. आज आपण अध्यात्म आणि धार्मिक या शब्दांचा अर्थ संकुचित केला आहे. देव देव करणे, जपजाप्य करणे आणि मंदिरात जाणे म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म ही प्रवृत्ती आहे. धार्मिक हा शब्दही रूढ अर्थाने वापरलेला नाही. धर्म याचा अर्थ आपले जे निहित कर्म आपल्या वाट्याला आले आहे,  ते उत्तम प्रकारे करणे. आणि आपल्या कार्याला जेव्हा अध्यात्मिक आणि नैतिक अधिष्ठान असते, तेव्हा ते प्रत्येक कर्म उत्तम होते. आज कार्याच्या पाठीमागे असणारा हा पाया हरवलेला आपल्याला दिसतो. म्हणून रामायणाचा आणि रामायणकालीन समाजाचा अभ्यास आपल्याला हितावह ठरणारा आहे. 

मंदिरे 

त्या काळातील मंदिरे ही समाज प्रबोधनाची केंद्रे होती. सांस्कृतिक केंद्रे , स्वाध्याय केंद्रे होती. वेद उपनिषदांचे अध्ययन त्या ठिकाणी केले जात असे. आजकाल मंदिरांना जे बाजारू स्वरूप आले आहे, ते त्या काळी नव्हते. मंदिरात केवळ भक्ती आणि उपासनाच केली जात होती. नगरातील प्रजाजन सायंकाळी वा रात्री जमून त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेत असत. अशा प्रकारचे धार्मिक उत्सव हे लोकांना प्रेरणा देणारे, प्रबोधन करणारे आणि मूलतःच त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या नैतिक मूल्यांना बळकटी देणारे असत. या मंदिरांच्या माध्यमातूनच वैदिक संस्कृती आणि परंपरा जिवंत राहिल्या आणि आपल्या पर्यंत पोहोचू शकल्या.

संस्कारांची विद्यापीठे 

आपले आयुष्य साधारण शंभर वर्षांचे मानले तर त्या हिशेबानें आपल्या पूर्वजांनी आपल्या आयुष्याचे चार आश्रम कल्पिलेले होते. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. साधारणपणे पन्नासाव्या वर्षी सांसारिक जबाबदारीतून निवृत्त होऊन पती पत्नी वानप्रस्थाश्रम स्वीकारीत. त्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऋषीमुनींच्या आश्रमात होत असे. असे आश्रम म्हणजे तपोवन असत. वानप्रस्थाश्रम स्वीकारलेले नागरिक अशा तपोवनांमध्ये जाऊन राहत. त्यांच्याजवळ अनुभवांचा खजिना असे. विविध कौशल्ये असत. या त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्यांचा फायदा ते आश्रमातील विद्यार्थ्यांना देत. 

विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे जे ऋषीमुनींचे आश्रम असत, त्यातील ऋषीमुनी वेद, उपनिषदे , युद्धकला, राज्यव्यवस्था इ सर्व विषयांत निपुण असणारे असत. बहुतेक ऋषीमुनी हे गृहस्थाश्रमी असल्याचे उल्लेख रामायणात आढळतात. असे असूनही ते त्यागी, निरिच्छ आणि कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न बाळगणारे असत. म्हणूनच ते कोणाचे लिंपित नसत. ते तेजस्वी आणि अत्यंत स्वाभिमानी जीवन जगत. समाजातील लोक आणि बऱ्याच वेळा अशा आश्रमांना राजाश्रय असायचा. पण तो मिळेल न मिळेल, प्रसंगी उपाशी राहून, काटकसर करून विद्यार्थ्यांना हे तपस्वी शिक्षण देत असत. कोणत्याही विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नसे. सर्व शिक्षण पूर्णपणे मोफत होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर कृतज्ञता म्हणून शिष्य त्यांच्या पात्रतेप्रमाणे जी काही गुरुदक्षिणा देतील, तिचा स्वीकार केला जात असे. 

या आश्रमांमध्ये म्हणजेच तपोवनांमध्ये जीवनाला उपयुक्त असे शिक्षण दिले जाई. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्वावलंबनाचे धडे मिळत. राजपुत्र आणि सामान्य विद्यार्थी यांच्यात भेद केला जात नव्हता. राम आणि कृष्णानेही आपल्या गुरुगृही सर्व प्रकारची कामे केल्याचे उल्लेख आपण रामायण, महाभारतात वाचतो. श्रीराम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, बलराम हे राजपुत्र असूनही त्यांना कोणतीही सूट किंवा वेगळी वागणूक दिली जात नव्हती. श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांनाही एकाच पातळीवरची वागणूक दिली जात होती. विद्यार्थ्यांना आपले कपडे स्वतः धुणे, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, आश्रमाची स्वच्छता ठेवणे ही कामे करावी लागत. त्यामुळे स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये आपोआपच व्यक्तिमत्वाचा एक भाग बनत. सकाळची आपापली कामे लवकर आवरून विद्यार्जन करणे महत्वाचे असे. 

आजच्या काळात हॉस्टेलमध्ये मिळणाऱ्या सुखसुविधा, उत्तम भोजन इ गोष्टी त्या काळी विद्यार्थ्यांना मिळत नव्हत्या. स्वावलंबन, ब्रह्मचर्य पालन, सात्विक आहार या गोष्टींवर भर दिला जात होता. म्हणूनच विद्याग्रहण करण्याकडे त्यांचे चित्त एकाग्र होत असे. सूर्यकिरणांनी जर कागद जाळायचा असेल तर, विखुरलेल्या सूर्यकिरणांनी ते काम होत नाही. त्यासाठी काचेच्या भिंगात सूर्यकिरणे एकत्रित करावी लागतात तरच शक्ती केंद्रित होऊन कागद पेट घेऊ शकतो. आजकाल विद्यार्थ्यांचे लक्ष विखुरलेल्या सूर्यकिरणांसारखे मोबाईल, टीव्ही, सिनेमा आणि अन्य गोष्टींमध्ये विखुरले गेले आहे. सोयीसुविधा, सर्व गोष्टी आयत्या मिळणे, धनिक पुत्रांना वेगळी वागणूक आणि गरिबांच्या मुलांना मिळणारी वेगळी वागणूक या गोष्टी लहानपणापासूनच त्यांच्या मनात आपल्या समाज व्यवस्थेविषयी भेदभाव आणि अढी निर्माण करतात. 

त्या काळात स्त्रियांना देखील सर्व प्रकारच्या शिक्षणात तरबेज करण्यात येत असे. स्त्रिया या सर्व विद्यात पारंगत असत. रामायणकालीन स्त्रिया या सुधारलेल्या आणि प्रगत विचारांच्या होत्या. कैकेयीला युद्धकला अवगत होती. तिने दशरथाला युद्धात मदत केली होती. स्त्रियांना वेद, उपनिषदे इ बरोबरच राज्यकारभार आदींचे शिक्षण देण्यात येत असे. श्रीरामाला जेव्हा वनवासात जावे लागेल असे निश्चित झाले, तेव्हा राज्यकारभार कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी ' सीता ही सर्व ज्ञानाने परिपूर्ण असून ती राज्यकारभार सहज सांभाळू शकेल. त्यामुळे चिंता नाही. ' असा सार्थ विश्वास सीतेबद्दल व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आश्रमात बरेच वेळा गुरुमाता देखील विद्यादानात महत्वाची जबाबदारी पार पाडत असत. 

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असे. पण या कालात देखील तो आजन्म विदयार्थी राहील याची दक्षता गुरु घेत असत. गृहस्थाश्रमात असताना देखील वेद, उपनिषदे, शास्त्रे इ चे अध्ययन त्याने करत राहावे अशी शिकवण दिली जात होती. त्यामुळे त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींवर साहजिकच सद्सद्विवेक बुद्धीचे नियंत्रण राहून त्याच्या हातून अयोग्य गोष्टी घडत नसत. त्यांच्या या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला मिळत असे. श्रीरामाने गुरु वसिष्ठांच्या आश्रमात शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसिष्ठानी सगळ्या शिष्याना निरोप देताना जो उपदेश केला तो फार सुंदर होता. आजही तो सगळ्यांनी लक्षात घ्यावा असा आहे.  ते म्हणतात, '" आज तुमचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षात ठेवा ' सा विद्या या विमुक्तये ' अर्थात जे मुक्त करते ते ज्ञान. म्हणून मी तुम्हाला आजपासून माझ्या सर्व आज्ञातुन मुक्त करीत आहे. एखादी गोष्ट मी सांगितली म्हणून प्रमाण मानू नका. आपले ज्ञान, विचार, विवेक यांच्या साहाय्याने निर्णय घ्या. ' आत्मदीपो भव. स्वयंप्रकाशित व्हा. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीन ऋण फेडावे लागतात. देवऋण, पितृऋण आणि आचार्यऋण. परमेश्वराची भक्ती केल्याने आणि सर्वाभूती ईश्वर पाहिल्याने देवऋण फेडता येते. आपले सुख त्यागून मात्यापित्यांची आज्ञा पाळणे आणि त्यांना सुख देणे यामुळे पितृऋण फिटते आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करणे, मानवधर्माचा आदर्श प्रस्थापित करणे यामुळे आचार्यऋण फेडता येते. " वसिष्ठ किंवा विश्वामित्र यांच्यासारख्या ऋषींचे आश्रम म्हणजे त्या काळातील विद्यापीठे होती. ही केवळ शिक्षणाची नव्हे तर संस्कारांचीही विद्यापीठे होती. 

आजच्या काळात सुद्धा वसिष्ठानी केलेला हा उपदेश गुरु आणि शिष्य दोघांना मार्गदर्शक आहे. राम आणि लक्ष्मण वसिष्ठांच्या आश्रमातून घरी जाण्यासाठी जेव्हा निघतात, तेव्हा श्रीराम आपल्या गुरुमातेला म्हणतात, " माते, या आश्रमात तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिले. आईची आठवण येऊ दिली नाही. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. " किती हा नम्रपणा...! धन्य ती प्रेमळ गुरुमाता आणि धन्य ते शिष्य. जणू समसमा संयोग जाहला. म्हणून रामायण आमच्या मुलांना शिकवणे, सांगणे आवश्यक आहे. अशा प्रकारची सुंदर शिक्षण व्यवस्था त्या काळी अस्तित्वात  होती. वसिष्ठांसारखे तपस्वी, निस्पृह गुरु होते.  गुरूंचा आदर करणारी राजसत्ता आणि प्रजाजन होते. 

अष्टप्रधान मंडळ 

त्या काळात राजाला सल्ला देण्यासाठी अष्टप्रधान मंडळ किंवा अमात्य होते. या अष्टप्रधान मंडळातील सदस्य किंवा अमात्य हे आपापल्या क्षेत्रात निष्णात असत. त्यांचे चारित्र्य उच्च दर्जाचे असे. अशाच मंडळींची निवड अमात्य म्हणून होत असे. ही मंडळी अत्यंत निस्पृह असत. त्यांच्या शब्दाला किंमत असे. त्यांचा उत्तम अशा प्रकारचा आदरसत्कार राजदरबारी होत असे. कारण त्यांची योग्यताही तेवढी असायची. या मंडळींना ठराविक असे मानधन दिले जात असे. विविध प्रसंगी राजाला महत्वाचा सल्ला देण्याचे कार्य ही मंडळी निस्पृहपणे करीत असत. त्या काळात लोकांचे चारित्र्य उच्च दर्जाचे होते. त्यामुळे ही मंडळी लोभाला बळी पडून आपले कर्तव्य विसरणे किंवा काही कारणाने राजाला चुकीचा सल्ला देतील अशी सुतराम शक्यता नव्हती. पण ही मंडळी वेतन घेत असल्याने राजसत्तेवर अंकुश ठेवू शकत नव्हती. राजसत्तेने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्याला ते फारसा विरोध करू शकत नव्हते. पण अर्थात असे प्रसंग त्या काळी फार कमी आले. कारण सामान्य प्रजाजनांपासून ते राजापर्यंत सर्व व्यक्ती चारित्र्यसंपन्न आणि उच्च नैतिक मूल्यांचे पालन करणाऱ्या होत्या. 

ऋषिमंडळ 

त्या काळात राजसत्ताही ज्यांचा आदर करीत असे अशा प्रकारचे ऋषिमंडळ अस्तित्वात होते. या ऋषिमंडळात साधना करणारे, तपस्वी, ज्ञानसंपन्न आणि तेजस्वी ऋषीमुनी असत. ते अत्यंत निस्पृह आणि निर्मोही असत. ते राजाकडूनच काय पण कोणाकडूनही काहीच घेत नसल्याने ते आपला सल्ला देताना अत्यंत निस्पृह आणि निर्भीडपणे देत असत. त्यांना कोणाचीही  भीती बाळगण्याचे कारण नव्हते. प्रसंगी राजाचाही कान पकडू शकतील एवढे नैतिक सामर्थ्य आणि धैर्य त्यांच्यात होते. विश्वामित्र ऋषी जेव्हा यज्ञ करीत होते, तेव्हा राक्षस त्यांच्या यज्ञात विघ्ने आणत असत. यज्ञाचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले आणि त्यांनी त्यासाठी रामाची मागणी केली.  त्यावेळी दशरथाने पुत्रप्रेमापोटी आणि श्रीराम लहान आहे म्हणून त्याला पाठवण्यास नकार दिला. अशा वेळी विश्वामित्रांनी ऋषिमंडळाचे प्रमुख असणारे ऋषी वसिष्ठ यांच्या कानावर ही गोष्ट घातली. वसिष्ठानी दशरथाला सांगितले की विश्वामित्र सांगतात ते बरोबर आहे. त्यांच्यासोबत श्रीरामाला पाठवण्यास हरकत नाही. तेव्हा दशरथ राजा त्यांचा सल्ला नाकारू शकला नाही. 

तेजस्वी आणि चारित्र्यसंपन्न राजसत्ता 

 राजघराण्यातील स्त्रीपुरुषांचे चारित्र्य अत्यंत महत्वाचे मानले जात असे. श्रीरामांचे ईक्षवाकु कुळ तर याबाबतीत प्रसिद्धच होते. ' रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई ' हे ब्रीद ते पाळत असत. एकदा जे वचन दिले, शब्द दिला तो प्राण गेला तरी बेहत्तर पण त्याचे पालन ते करीत असत. श्रीराम तर एकवचनी, एकपत्नी आणि एकबाणी म्हणून प्रसिद्धच आहे. युद्धात कैकेयीने दशरथाला मदत केली होती, म्हणून दशरथाने तिला दोन वर दिले होते. ते त्याने पाळले. त्याची किंमत त्याने आपल्या प्राणांचे मोल देऊन चुकवली. श्रीरामाने सुद्धा आपल्या पित्याच्या शब्दांचा मान राखण्यासाठी आनंदाने वनवास पत्करला. पुढेही आपल्या आयुष्यात श्रीरामाने ज्यांना ज्यांना शब्द दिला, तो त्याने प्रसंगी वाटेल ते मोल देऊन पाळला आहे. श्रीराम वनवासात असताना भरत त्यांना भेटायला येतो. त्यांना परत अयोध्येला चालण्याविषयी विनवितो. या प्रसंगी तो वसिष्ठांचा निरोपही श्रीरामाला देतो. वसिष्ठ ऋषी भरतासोबत असा निरोप पाठवतात की श्रीरामाने अयोध्येला परतावे. पण श्रीराम भरताला सांगतात की वसिष्ठाना सांग की राम पितृआज्ञेचे उल्लंघन करू इच्छित नाही. 

अनेक प्रसंगातून रामायणातील राजघराण्यातील व्यक्तींचे हे उच्चतम चारित्र्य अधोरेखित झाले आहे. प्रजाजनांच्या सांगण्यावरून सीतेला वनवासात पाठवणे असो की प्राणाहून प्रिय असलेल्या लक्ष्मणाला किरकोळ तांत्रिक चुकीसाठी देहदंड देण्याचा प्रसंग असो, श्रीरामाने भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिलेले आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे लक्ष्मणाचा रामाप्रती असलेला सेवाभाव, समर्पण वृत्ती, सीतेचे रामासोबत वनात जाणे, श्रीरामाचा राज्यत्याग, भरताचे बंधुप्रेम इ अनेक गोष्टींना उपमा नाही. 

अशा तऱ्हेने रामायणकाळात नैतिक मूल्यांना सर्वोच्च महत्व होते. नीतिसंपन्न प्रजा, चारित्र्यसंपन्न राजसत्ता, निरपेक्ष वृत्तीने कार्य करणारे अमात्य मंडळ, तप:सामर्थ्य असलेले तेजस्वी ऋषिमंडळ या सगळ्या गोष्टींमुळे रामराज्य हे आदर्श ठरते. श्रीरामाला मानणाऱ्या लोकांना तर रामराज्य यावे असे वाटतेच पण जे नास्तिक लोक आहेत, त्यांना देखील रामराज्याची संकल्पना आकर्षित करते आहे. आजच्या काळात जेव्हा शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था यांच्याकडून निराशाच पदरी पडते आहे, कौटुंबिक पातळीवर गृहकलह आणि असंतोष आहे, समाज व्यवस्था भ्रष्टाचाराने किडली आहे, आजचा तरुण त्याला नाकारल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधीअभावी निराश आणि हताश झाला आहे, अशा वेळी रामायणकालीन समाजव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. हजारो वर्षांपासून रामायण आपल्याला दिशा दाखवत आले आहे. आजही या ग्रंथात ते सामर्थ्य आहे. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
    २४/०८/२०२० 















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...