मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग सतरा ( रामकथेचे महत्व - भाग दोन )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग सतरा  ( रामकथेचे महत्व - भाग दोन ) 

रामकथा आजपर्यंत अनेक विद्वान आणि ज्यांची वाणी रसपूर्ण आहे अशा अनेक अधिकारी व्यक्तींनी सांगितली आहे. आपण सर्वानी ती वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली, पाहिली किंवा वाचली असेल. तरीही माझ्यासारख्या एका अतिसामान्य व्यक्तीकडून आपण ती ऐकत आहात, वाचत आहात हे माझे केवढे भाग्य ! 

मला खरोखर प्रश्न पडतो की वाल्मिकींसारख्या तपस्वी मुनींनी रामायण का लिहिलं असेल ? आपली साधना, तपस्या सोडून हा ग्रंथ लिहिण्यासाठी कर म्हणून प्रवृत्त झाले असतील ? राम आणि रावणाचं जे युद्ध झालं त्याने वाल्मिकी प्रभावित झाले असावेत का ? पण मग इतिहासात तर अशी अनेक युद्धे झाली. त्यासाठी एवढी प्रदीर्घ कथा लिहिण्याची काय गरज होती ? वाल्मिकींनी लवकुशांना रामायण शिकवले आणि त्यांच्याकडून ते मुखोद्गत करून घेतले, ते रामापुढे केवळ सांगण्यासाठी ? की ते रामायण राम नावाच्या चक्रवर्ती सम्राटापुढे ठेवून त्यांना त्याच्याकडून काही अपेक्षा होती ? माझ्या रसिक वाचक मित्रानो, यापैकी कोणताही उद्देश वाल्मिकींचा नव्हता. 

रामायण काळात मानवी मूल्ये आणि त्यांचं आचरण करणारे प्रजाजन आणि राजघराण्यातील व्यक्ती यांनी आपल्या उदाहरणाने एक उच्चतम आदर्श उभा केला आहे. त्यामुळे रामायणाकडे जर आपण इतिहास या दृष्टीने पाहू, तर तो मानवी मूल्यांच्या आचरणाचा सुवर्णकाळ होता असे म्हणावे लागेल. त्या काळातील हे वागणुकीचे आदर्श, उच्च मानवी मूल्ये, भावनेपेक्षा कर्तव्याला दिलेले श्रेष्ठ स्थान, पराकोटीची सात्विकता, मनाचा शुद्ध आणि निर्मळपणा हे दुसरीकडे कुठे शोधूनही सापडणार नाहीत. याच गोष्टी वाल्मिकींना आपल्यासमोर ठेवायच्या होत्या, म्हणून हे रामायण. हे सगळे आदर्श पाहिल्यानंतर जे नास्तिक लोक आहेत, त्यांना सुद्धा रामराज्य हवे असे वाटायला लागते, यातच रामायणाचे महत्व आहे. 

आज आमच्यासमोर मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. कुटुंब, समाज, शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, रोजगार इ नी मोठे प्रश्न आजच्या विचारवंतांसमोर उभे केले आहेत. शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था आज लोकांना सुखी आणि समाधानी करण्यात अयशस्वी ठरली आहे. बदलत्या परिस्थितीने कुटुंबासमोर आणि कुटुंबप्रमुखासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. ती आव्हाने सोडविण्यात अपयश आल्याने कुटुंबांमध्ये असंतोष, असुरक्षिततेची भावना, आपसातील गैरसमज इ गोष्टी निर्माण झाल्या आहेत. आजचा तरुण सुयोग्य शिक्षणाअभावी, योग्य मार्गदर्शनाअभावी आणि रोजगाराअभावी भरकटला आहे. त्याच्यात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. 

या अंधकारमय परिस्थितीत रामायणासारखे ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. हे ग्रंथ म्हणजे दीपस्तंभ आहेत. आजच्या अनेक समस्यांची उकल आपल्याला रामायणाच्या पानोपानी मिळेल. अनेकांना कदाचित हे पटणार नाही. रामायणासारखे ग्रंथ की ज्यांना पाच पाच हजार वर्षे झाली, ते काय मार्गदर्शन करणार ? आजच्या समस्यांची उत्तरे त्यातून कशी मिळणार असे आपल्याला वाटू शकते. त्यात काही वावगे आहे असेही नाही. पण आपण रामायणाकडे त्या दृष्टीने पाहत नाही. रामायण, महाभारत इ सारखे ग्रंथ म्हणजे काहींना  या पुराणकथा वाटतात. परंतु जेव्हा आपण या ग्रंथांकडे सकारात्मक दृष्टीने आणि श्रद्धापूर्वक पाहू तेव्हा आजच्या समस्यांची उत्तरे नक्कीच मिळतील. हेच काम भगवद्गीता सुद्धा आपल्यासाठी करते. उगीच हे वर्षानुवर्षे टिकून राहिले नाही. वर्षानुवर्षे हे ग्रंथ आणि राम आणि कृष्णासारखी व्यक्तिमत्वे समाजाचे भरण पोषण करीत राहिले आहेत. आजही त्यांच्यात आपल्याला प्रेरणा देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य आहे. 

रामायणातील राम , सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान इ पात्रांनी आपल्यासमोर नात्यांचे आदर्श उभे केले आहेत. इंग्रजीत ज्यांना आपण रोल मॉडेल म्हणतो, असे रोल मॉडेल म्हणजे ही माणसे आहेत. आजचे तरुण जेव्हा एखादा चित्रपट पाहतात, तेव्हा ते चित्रपटातील नायक नायिकेच्या भूमिकेशी एकरूप होतात. तरुणांना आपण त्या चित्रपटातल्या नायकासारखे असावे असे वाटते. तर तरुणींना आपण नायिकेसारखे असावे आणि दिसावे असे वाटते. ते साहजिकही आहे. पण शेवटी पडद्यावर उभे केलेले हे आदर्श काल्पनिक असतात. वास्तव जीवनाशी त्यांची फारकत असते. 

राज्याभिषेक होणार म्हणून खूप आनंदी आणि वनवासात जावे लागणार म्हणून दुःखी होणारा राम आपल्याला रामायणात दिसत नाही. तो एखाद्या स्थितप्रज्ञासारखा या परिस्थितीला सामोरा जातो. गीतेच्या परिभाषेत यालाच न उल्हासे, न संतापे । त्याची प्रज्ञा स्थिरावली ।।असे म्हटले आहे.

त्याच्या मनात बदला, सूड घेण्याची भावना नसते. आपले गुरु, माता पिता यांची आज्ञा तो शिरोधार्य मानतो. मित्र म्हणून लहानथोर सर्वांना हृदयाशी धरतो. कर्तव्यकठोर राजा म्हणून प्रजेसमोर स्वतःच्या प्रियजनांना देखील तो मोकळीक देत नाही. प्राणप्रिय असणाऱ्या सीतेला वनवासात पाठवतो, प्राणांहून प्रिय असणाऱ्या बंधू लक्ष्मणाला एका तांत्रिक चुकीसाठी स्वतः मृत्युदंडाची शिक्षा फर्मावतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांना त्यांची योग्यता नसतानाही महत्वाची पदे देणे, फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा फायदा पाहणे, अयोग्य असले तरी आपल्याच घराण्यातील व्यक्तींना वारस म्हणून पुढे करणारे आजचे राज्यकर्ते पाहिले की रामराज्य का हवे याचे उत्तर मिळते. भरतासारखा निःस्वार्थी भाऊ, सीतेसारखी पतिव्रता, सुग्रीव, निषादराज, बिभीषण यांच्यासारखे मित्र, हनुमान, अंगदासारखे एकनिष्ठ सेवक ही उदाहरणे रामायणाशिवाय दुसरीकडे कुठे सापडणार ? 

रामराज्याचा अर्थ आपल्याला असाही घेता येईल. आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी तो महत्वाचा आहे. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे आपले संत सांगतात.  पाण्याच्या थेंबात तेलाचा थोडासा अंश असल्यास तो पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे श्रीरामभक्‍तातही श्रीरामाची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो श्रीरामाशी एकरूप होऊ शकत नाही

लोखंडासारख्या असलेल्या आपल्या जीवनाला रामायण म्हणजे परिसस्पर्श आहे. लोखंडाचे सोने करण्याची शक्ती जशी परिसात असते, तशी आपल्या जीवनाला सुवर्णस्पर्श करून ते भव्य दिव्य आणि सुगंधित करण्याची क्षमता रामायणात आहे. हे रामायण त्याच्यासाठी आहे की मी माझ्या जीवनात भोग जरूर भोगेन, पण रामाचे स्मरण ठेवीन, रामाचेच काम करीन . रामाचे काम करणे म्हणजे त्याने सांगितलेल्या वाटेवरून वाटचाल करणे. मी आयुष्यात पैसा जरूर कमवेन, पण त्यातील रामाचा वाटा बाजूला काढून ठेवेन. रामाचा वाटा बाजूला काढून ठेवणे म्हणजे समाजाप्रती असलेल्या आपल्या ऋणाची जाणीव ठेवून त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करणे. रामायणाच्या या भट्टीत आपल्यातले जे जे हिणकस, क्षुद्र, अभद्र, अमंगल आहे, ते ते नष्ट होवो आणि अग्नीतून उजळून निघालेल्या सुवर्णासारखे आपले जीवन उजळून निघावे हीच प्रभुचरणी प्रार्थना.. ! 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२३/०८/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२ 

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...