श्रीराम आणि भारतीय संस्कृती या दोन गोष्टी इतक्या एकरूप झाल्या आहेत की जणू दुधात साखर ! त्या वेगळ्या करता येणार नाहीत. आपले वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय जीवन उजळून टाकण्याची क्षमता रामायणात आहे. जीवनाच्या या वेगवेगळ्या स्तरांवर जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे आदर्श रामायण आपल्यापुढे उभे करते. जीवनात विविध कर्तव्ये पार पाडत असताना, त्या प्रसंगांना कसे सामोरे जावे, निर्णय कसे घ्यावेत याचा आदर्श रामायण आपल्यासमोर ठेवते. श्रीरामाचे जीवन म्हणजे आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श राजा कसा असावा याचा आरसा आहे. महर्षी वसिष्ठांनी म्हटले आहे, ‘रामो विग्रहवान् धर्म:!’ मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचे साक्षात साकार दर्शन म्हणजे प्रभू रामचंद्र! म्हणून संतांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे ‘कृष्णचरित्र’ हे उच्चारणीय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी,’ तर ‘रामचरित्र’ हे आचरणीय आहे.
राम व रावण या दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्तिमत्त्वांभोवती गुंफलेली कथा म्हणजे ‘रामायण’ असून तो एक शाश्वत आरसा आहे. रामकथेतील राम-लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, हनुमंत यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून चिरंतन जीवनमूल्यांचे दर्शन आपल्याला या रामकथारूपी आरशात घडते. प्रसिद्ध रामकथाकार पू. मोरारीबापू रामायणाबद्दल बोलताना म्हणतात, "रामायण हा सांप्रदायिक ग्रंथ नसून, ते एक विद्यापीठ आहे. ‘गीता’ हे योगशास्त्र आहे. ‘भागवत’ वियोगशास्त्र आहे, तर ‘रामायण’ हे प्रयोगशास्त्र आहे." रामचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यातल्या सुख-दु:खाच्या प्रसंगी मनुष्याने जीवनमूल्यांचे दर्शन घडवावे. त्यासाठी रामाला आदर्श मानून रामाप्रति आपल्या मनात अनन्यभाव निर्माण करावा, असे संतसाहित्य सांगते.
प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात श्रीरामांचे पूर्वज किती तपस्वी आणि कर्मयोगी होते याचे सुंदर वर्णन आले आहे. श्रीरामाचे कुळ आजन्म शुद्ध आहे. आपल्यासारख्या सामान्य जनांची शुद्धता ही स्थल-कालसापेक्ष असते. श्रीरामांच्या कुळातील लोक निरंतर कर्मयोगी आहेत. स्वर्गातून गंगामातेला पृथ्वीवर आणण्याकरिता या वंशाच्या तीन पिढ्या झटल्या आहेत. जितके महान कार्य आपल्याला करावयाचे असेल तितकी खोल पायाभरणी जाणीवपूर्वक केली पाहिजे आणि माणसाने अखंड उद्योगी असले पाहिजे. ही शिकवण यातून आपल्याला मिळते. रामराज्य हे उगीच आदर्श ठरलेले नाही. त्याच्यामागे ही तपश्चर्या आहे. सर्वोच्च आदर्श असलेले श्रीरामांचे जीवन आताच्या काळातल्या फुटपट्ट्या लावून आपल्याला मोजता येणार नाही. त्यासाठी बुद्धी शुद्ध हवी व निदान बुद्धीने, प्रतिभेने आपल्याला त्या काळात जाऊन त्या परिस्थितीची दिव्यता-दाहकता लक्षात घ्यावी लागेल. सर्व प्रकारचे ऐश्वर्य असतानादेखील श्रीराम उपभोगशून्य जीवन जगतात. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष आहे. ( रामकथेचे महत्व - भाग दोन रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा