मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा भाग चौदा ( हनुमान - उत्तरार्ध )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा भाग चौदा ( हनुमान - उत्तरार्ध ) 

हनुमान लंकेस जाण्याआधी त्याची जणू तीन प्रकारची परीक्षा नियतीने घेतली. त्याच्या बुद्धिमत्तेची, धैर्याची आणि स्वामी निष्ठेची. पण या तीनही परीक्षेत तो लीलया आपल्या बुद्धिचातुर्याने उत्तीर्ण झाला. कारण त्याचे ध्येय निश्चित होते, आपल्या स्वामींवर म्हणजेच रामावर आणि त्याच्या कार्यावर अतूट श्रद्धा होती. त्याने लंकेसाठी जेव्हा उड्डाण केले तेव्हा, नागमाता सुरिका त्याच्यासमोर आली. तू माझे खाद्य आहेस. माझ्या तोंडातून बाहेर पडू शकलास तर पुढे जाता येईल असे तिने हनुमानाला सांगितले. हनुमान आपल्या प्रसंगावधान आणि बुद्धिचातुर्यामुळे या प्रसंगातून बाहेर पडला एवढेच नव्हे तर नागमाता सुरिकेचा आशीर्वादही त्याला प्राप्त झाला. पुढे समुद्रात असणारा मैनाक पर्वत विविध प्रलोभने घेऊन त्याच्यासमोर आला आणि तू या ठिकाणी थोडी विश्रांती घे अशी विनंती त्याला करू लागला. परंतु त्याही प्रलोभनानाला हनुमान बळी पडलेला नाही. ज्याची आपल्या ध्येयावर आणि कार्यावर दृढ निष्ठा असते, त्याच्या मार्गात अशी अनेक प्रलोभने येतातच. जो या प्रलोभनांचा मोह टाळून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, तोच जीवनात यशस्वी होतो. पुढे लंकेच्या प्रवेशद्वाराजवळ सिंहिका नावाची भयानक राक्षसी त्याच्यासमोर उभी राहते. परंतु हनुमान अनुपम धैर्याने तिचा सामना करतो.  

त्याने केलेलं जे लंकादहन आहे, त्यातही त्याची बुद्धिमत्ता दिसते. ती एका वानराने केलेली नुसती मर्कटलीला नाही. हनुमानाला असलेली कुशल राजनीतीची जाण त्यातून दिसते. पुढे चालून जे रामरावण युद्ध होणार आहे, त्यातले अर्धे काम तो लंकादहनाने करून टाकतो. लंकावासीयांचे मनोधैर्य त्यामुळे खच्ची होते. रामाचा एक दूत, एक सेवक जर एवढे प्रचंड नुकसान लंकेचे करू शकतो, तर प्रत्यक्ष रामाने अयोध्येवर स्वारी केल्यानंतर काय होऊ शकेल त्याची चुणूक लंकावासीयांना त्यातून दिसते. त्याचप्रमाणे अजेय,अभेद्य अशी जी रावणाच्या लंकेची ख्याती होती, ती तो या कृत्याने धुळीस मिळवतो. हनुमानाच्या चातुर्याचे आणि बुद्धिमत्तेचे अनेक दाखले आपल्याला रामायणात बघायला मिळतात. त्याने आपण स्तिमित होतो. त्याचा भक्तिभाव पाहून आपण नम्र होतो. मारुती हा भलेही वानरकुलातला असेल, पण त्याचा पुरुषोत्तम असण्याचा प्रवास एक व्यक्ती , एक माणूस म्हणून सुरु झाला. जसा रामाचा देवपदापर्यंतचा प्रवास हा एक माणूस म्हणूनच सुरु होतो, तसाच अगदी हनुमानाचा. हे राम आणि हनुमान यांच्यातील साम्य आहे. तो नर होता की वानर हे घडीभर बाजूला ठेवू. पण तो पुरुषोत्तम मात्र होता. आणि राम जसा पुरुषोत्तम आहे तसाच पुरुषोत्तम हनुमानही आहे. रामायणाच्या उत्तरकांडात स्वतः रामाने हनुमानाला पुरुषोत्तम म्हटले आहे. प्रत्यक्ष रामाने ज्याला पुरुषोत्तम म्हणून दाखला ( सर्टिफिकेट ) दिला आहे, त्याच्या मोठेपणासाठी दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही. 

हनुमान सीतेचा शोध करून जेव्हा परत येतो, तेव्हा त्याच्या कामगिरीसाठी रामाजवळ शब्द नाहीत. राम म्हणतो, ' हे हनुमंता , तुझे माझ्यावर अगणित उपकार झालेले आहेत. मी तुला काय देऊ ? तुला देण्यासारखे असे काय आहे ? तुझ्या प्रेमाची, सेवेची आणि त्यागाची किंमत कशानेही होणार नाही. आणि म्हणून मी तुला माझे प्रेमरूपी केवळ आलिंगन देतो. यावरून रामाच्या हृदयात हनुमंताला केवढे श्रेष्ठ स्थान होते ते आपल्याला लक्षात येते. खरं तर हनुमानालाही दुसरे काही नकोच होते. तो म्हणतो, ' प्रभू, मला माझी तुमच्यावर असलेली जी प्रेमभक्ती आहे ती कमी होऊ नये आणि रामाशिवाय मनात कोणताही अन्य भाव निर्माण होऊ नये, एवढेच वरदान द्या. '

अशा प्रकारे हनुमानाजवळ अलौकिक बुद्धिमत्ता, पांडित्य, वाक्चातुर्य, निष्कपटता, रामाच्या प्रति अढळ श्रद्धा होती. हनुमान हे आपल्या स्वामीप्रती असणाऱ्या समर्पणभावाचे उत्तम उदाहरण आहे. केवळ रामाचे नाव घेऊन आपल्याला हनुमानासारखे रामाचे दास होता येणार नाही. त्यासाठी हनुमानाच्या गुणांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. समर्थ रामदासांनी हनुमंताचे हे गुण ओळखले होते. त्या पारतंत्र्याच्या काळात लोकांमधला स्वाभिमान नष्ट झाला होता. गुलामगिरीची वृत्ती अंगात भिनली होती. स्वतःमधली शक्ती, लोक विसरले होते. अशा परिस्थितीत हनुमानासारखे उज्ज्वल, तेजस्वी आणि बुद्धिदाता, शक्तिदाता असलेले दैवत लोकांमध्ये त्यांचे हरवलेले स्वत्व पुन्हा जागवू शकेल ही खात्री समर्थ रामदासांना होती. लोकांना शक्तीची उपासना करण्याची शिकवण देणे जरुरीचे होते. म्हणूनच त्यांनी गावोगावी मारुतीची मंदिरे स्थापन करून हनुमानाचा आदर्श लोकांसमोर ठेवला. 

मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम 
वातात्मजं वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये !!

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
१६/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...