मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग तेरा ( हनुमान )

 उगवतीचे रंग 

रामकथा - भाग तेरा  ( हनुमान - पूर्वार्ध ) 

संपूर्ण रामायणाचा जर विचार करायचा झाला तर रामायणामध्ये रामाचे वनवासात जाणे, सीतेचे रावणाने हरण करणे आणि नंतर रामाने वानरांच्या आणि अन्य लोकांच्या मदतीने रावणाशी युद्ध करून रावणाला ठार मारणे आणि सीतेसह अयोध्येत परत येणे अशी महत्वाची कथा स्थूलमानाने सांगता येईल. अशा या रामायणात किष्किंधाकांडापासून  हनुमानाचा प्रवेश होतो. संपूर्ण रामायणात हनुमानाच्या चरित्राला एक आगळेवेगळे महत्व आहे. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात राहत असताना, रावणाचा मामा मारीच सुवर्ण मृगाचे रूप घेऊन येतो. त्याच्या त्या मायावी रूपाची मोहिनी सीतेवर पडते. त्याच्या शोधार्थ सीता रामाला त्या सुवर्ण मृगामागे पाठवते. पुढे तो मारीच रामाचा आवाज काढून लक्ष्मण आणि सीतेला आपल्याला वाचवण्यासाठी आर्त साद घालतो. लक्ष्मणाला हा मायावी आवाज आहे हे समजते पण रामाच्या प्रेमाने व्याकुळ झालेल्या सीतेला तो आवाज खरा वाटतो आणि  लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी पाठवते. या परिस्थितीचा फायदा घेऊन रावण सीतेला पळवून नेतो.

 इथून पुढे रामाच्या सीतेचा शोध घेण्याला सुरुवात होते. आणि या सीता शोधात जर सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावत असेल, तर तो आहे फक्त हनुमान. अंजनी आणि केसरी यांच्या पोटी जन्मलेला हा वायुपुत्र सगळ्या दृष्टीने अलौकिक आहे. तो ज्ञानी आहे, प्रचंड बुद्धिमान आहे. ' अतुलनीय बलधामा ' आहे. उज्ज्वल चारित्र्य आणि दास्यभक्ती यांचा आदर्श आहे. त्याला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे आणि ती म्हणजे रामनाम. जिथे कुठे रामकथा सुरु असेल, तिथे हनुमान उपस्थित असतोच असे म्हटले जाते. रामभक्तांना राम जेवढा प्रिय आणि वंदनीय आहे, प्रातःस्मरणीय आहे, तेवढाच हनुमान हा सदैव प्रिय आणि आदरणीय असा आहे. रामायणातून हनुमानाला वगळण्याची कल्पना करून पहा.  रामायणातला रस निघून जातो. 

रामाच्या परिवारातील राम आणि हनुमान वगळता इतर कोणाचेही स्वतंत्र मंदिर नाही. एवढे हनुमानाचे महत्व आहे. रामाची आणि हनुमानाची स्वतंत्र मंदिरे आहेत. एवढेच नाही तर ज्या ज्या ठिकाणी रामाची मंदिरे आहेत, त्या त्या ठिकाणी हनुमानाची सुद्धा मूर्ती विराजमान आहेच. जशी रामलक्ष्मण ही अविभाज्य जोडी, तशीच राम आणि हनुमान ही देखील अविभाज्य जोडी. ही रामभक्त असण्याची जी सर्वोच्च अवस्था हनुमानाने प्राप्त केली ती उगीच नाही. त्या मागे त्याचा सेवाभाव, भक्तीची पराकाष्ठा हे गुण आहेत. रामाच्या दृष्टीने कुठलेही महत्वाचे कार्य कोणावर सोपवून निर्धास्त राहावे अशी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे हनुमान. नाजूकातले नाजूक काम आणि कठीणातले कठीण काम आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर पार पाडणारा विश्वासू दूत म्हणजे हनुमान.

सुग्रीव जेव्हा रामलक्ष्मणाचा हेतू जाणून घेण्यासाठी हनुमानाला ऋष्यमूक पर्वतावर पाठवतो, तेव्हा हनुमान ज्या पद्धतीने रामाशी बोलतो ते पाहून प्रत्यक्ष राम त्याला ज्ञानी आणि वेदउपनिषदांचा जाणकार असल्याचे जाहीर करतो. . ही सोपी गोष्ट नाही. वाली वधानंतर वालीच्या पत्नीचा शोक अनावर होतो. तिचे सांत्वन करण्याचे काम हनुमान मोठ्या बुद्धिपूर्वक करतो. अंगद जेव्हा सुग्रीवाच्या विरोधात जाऊन राज्याचे दोन तुकडे करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतो तेव्हा अंगदाला समजाविण्यासाठी हनुमान जातो. अंगद हा वालीप्रमाणेच शक्तिशाली होता आणि कोणाचेही सहजासहजी ऐकणारा नव्हता. त्या अंगदाला हनुमान अशा पद्धतीने समजावतो की त्यामुळे राज्याचे दोन तुकडे तर होत नाहीतच पण अंगद हा रामाचा एकनिष्ठ सेवक बनतो.

म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांबद्दल जे म्हटले आहे

शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे !

तेच हनुमानाला सुद्धा तंतोतंत लागू होते.

हनुमंताचे आठवावे रूप
हनुमंताचा आठवावा प्रताप
हनुमंताचा आठवावा साक्षेप, भूमंडळी.
हनुमंताचे कैसे बोलणे, हनुमंताचे कैसे चालणे, हनुमंताचे सलगी देणे कैसे असे.

पुढे तो लंकेत सीतेच्या शोधासाठी जातो. सीतेचा सर्वत्र शोध घेतो. रावणाच्या स्त्रिया असतात, तेथे अंतःपुरात जातो. त्या ठिकाणी काही स्त्रियांना  तो नको त्या अवस्थेत पाहतो. पण त्याच्या मनाची जराही चलबिचल होत नाही. कारण ध्येय एकच डोळ्यापुढे. ' रामकाज करने को आतुर '. फक्त सीतेचा शोध घेणे. म्हणून तो जसा '  बुद्धिमतां वरिष्ठम ' आहे तसाच तो ' जितेंद्रिय ' देखील आहे. सीतेला पाहिल्यावर एकदम तो आपली ओळख देत नाही. तर आधी रघुकुल, त्याची परंपरा इ बद्दल बोलतो. सीतेचा विश्वास संपादन करतो. मगच आपण रामाचा दूत म्हणून आलो आहोत हे तिला सांगतो. रामाने जेव्हा वालीचा वध केला, तेव्हा वालीपुत्र अंगद हा अत्यंत संतापलेला असतो. अंगद हा अत्यंत पराक्रमी आणि बुद्धीमान असतो. अंगदाचे चातुर्य आणि बल यांची परीक्षा तो जेव्हा रामाचा दूत बनून रावणाच्या दरबारात जातो तेव्हा होते. 

असा हा महापराक्रमी आणि बुद्धिमान अंगद आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर स्वतंत्र राज्य स्थापनेच्या विचारात असतो. त्यावेळी किष्किंधा राज्याचे दोन तुकडे होण्याची भीती होती. शिवाय अंगद हा एवढा पराक्रमी होता की तो एकटा सुग्रीवाला भारी पडला असता. अशा वेळी अंगदाला समजावू शकेल अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे चतुर, बुद्धिमान असलेला हनुमान. तो आपल्या वाक्चातुर्याने अंगदाचे मन वळवतो. एवढेच नाही अंगद हा सुद्धा रामाचा एकनिष्ठ सेवक होतो. एवढे एखाद्याचे विचार बदलवण्याचे सामर्थ्य हनुमानाजवळ होते. उगीचच तो ' बुद्धिमतां वरिष्ठम ' नाही. रामाचा हनुमानाच्या बुद्धिमत्तेवर आणि निष्ठेवर प्रचंड विश्वास होता. जेव्हा बिभीषण रामाला शरण येतो, तेव्हा सुग्रीव, अंगद इ सगळे बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नका. तो शत्रुपक्षाचा आहे. रावणाचा भाऊ आहे असे सांगून विरोध करतात. सर्वात शेवटी श्रीराम हनुमानाला त्याचे मत विचारतात. माणसांची उत्तम पारख असणारा आणि मानसशास्त्राचा उत्तम अभ्यास असणारा हनुमान तात्काळ रामाला सांगतो की बिभीषणाला आपल्यामध्ये सामील करून घ्या. त्यानंतरच रामाने बिभीषणाचा स्वीकार केला आहे. ( पुढील भाग रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
   १४/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 





















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...