उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे , चाळीसगाव
रामकथा - भाग बारा ( बिभीषण )
बिभीषण हे रामायणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व. रावणाचा सख्खा भाऊ असला तरी त्या दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचं अंतर आहे. एक सद्वर्तनी, सदाचारी आणि धर्मपरायण आणि दुसरा विद्वान आहे, शूर आहे पण दुराचारी, अनीतीने वागणारा आहे. राक्षसकुळात जन्म घेऊन सुद्धा बिभीषण आपल्या कर्तव्याने आणि विचाराने एक वेगळी उंची गाठतो. बिभीषण हा रामाचा परमभक्त आहे, सेवक आहे. ' दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम .' हे वचन सार्थ ठरवणारा तो आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते, पण आपल्या कर्तृत्वाने आपले मोठेपण आपल्याला सिद्ध करता येते असा या वचनाचा अर्थ आहे.
बिभीषणावर काही लोक आक्षेप घेतात, आरोप करतात. काहींना असे वाटते की बिभीषण हा कुलद्रोही, देशद्रोही आहे. संकटाच्या काळी आपला भाऊ रावण याच्या सोबत उभे राहण्याचे सोडून तो शत्रू पक्षाला जाऊन मिळतो. तो ज्या कुलात जन्मला, त्या राक्षस कुळाला त्याने आपल्या वागण्याने कलंक लावला. आपल्या राष्ट्राशी द्रोह केला. पण या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. जे असे आरोप बिभीषणावर करतात, त्यांना रामायणच नीट कळले नाही असा त्याचा अर्थ होतो. आधी असे आरोप बिभीषणावर कोणी केले हे आपण लक्षात घेऊ. राम रावण युद्धात जेव्हा लक्ष्मण इंद्रजिताशी लढायला येतो, तेव्हा लक्ष्मणासोबत आपल्या काकाला पाहून इंद्रजित हे आरोप करतो. तो म्हणतो, ' तू काका आहेस. पण आपल्या कुळाला लाज आणली आहेस. आपल्या भावाशी, कुळाशी, राष्ट्राशी आणि धर्माशी द्रोह केला आहेस. " जो इंद्रजित आपल्या दुराचारी पित्याच्या वागण्याचे समर्थन करतो, त्याची साथ देतो, तो असे बोलणारच. त्याच्या बोलण्यावरून आपण बिभीषणाचे मूल्यमापन करणे म्हणजे न्यायालयात लबाडाची साक्ष खरी ठरवण्यासारखे आहे.
रावणाने केवळ सीतेला पळवून आणले होते असे नाही. त्यापूर्वी अनेक स्त्रियांवर त्याने अत्याचार केले होते. अनेक स्त्रियांना बळजबरीने आणून आपल्या अंतःपुरात ठेवले होते. या प्रत्येक वेळी बिभीषणाने त्याला भाऊ म्हणून या चुकीच्या कृत्याची जाणीव करून दिली होती. पण रावणाने त्याच्या म्हणण्याकडे काही एक लक्ष दिले नाही. रावणाच्या सीतेला पळवून आणण्याच्या कृत्याची निर्भत्सना तर कुंभकर्णाने सुद्धा केली होती. पण त्याने युद्धात रावणाची साथ दिली आणि तो मारला गेला. महाभारतात ज्याप्रमाणे पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही सदाचारी माणसे होती. पण त्यांनी अधर्माची साथ दिली आणि युद्धात कौरवांसोबत त्यांनाही नष्ट व्हावे लागले.
बिभीषणाला देशद्रोही म्हणणाऱ्यांनी बिभीषणाने आपल्या देशाची इभ्रत जाऊ नये म्हणून काही कमी प्रयत्न केले नव्हते हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याने अनेकदा रावणाला विरोध केला आहे.रावणाचे वागणे म्हणजे एकाधिकारशाही होती. त्याच्यापुढे कोणीही बोलत नसे. अशा वेळी बिभीषणाने त्याची पर्वा न करता त्याला खडे बोल सुनावले आहेत. जेव्हा अंगद हा रामाचा दूत म्हणून रावणाच्या दरबारात आला होता, तेव्हा रावणाने संतापून त्याला ठार करण्याची आज्ञा आपल्या सैनिकांना दिली होती. तेव्हा बिभीषणाने त्याला असे करणे राजनीतीच्या विरुद्ध आहे. राजदूताची हत्या कोणी करीत नाही. अशाने आपल्या राष्ट्राची बदनामी होईल हे रावणाला निक्षून सांगितले. बिभीषणाला राष्ट्रद्रोही म्हणणाऱ्यांनी आपल्या राष्ट्राचे नाव बदनाम होऊ नये म्हणून किती प्रयत्न केले होते हे लक्षात घ्यावे. राम रावण युद्धात लंकेचा विनाश होईल हेही त्याने समजावून सांगितले आहे. सीतेला परत करून रामाला शरण जा आणि आपला, आपल्या कुळाचा आणि लंकेचा विनाश टाळा असा सल्ला त्याने अनेकवेळा रावणाला दिला आहे.
रावणाला वारंवार समजावूनही जेव्हा रावण ऐकत नाही, उलट बिभीषणाची निर्भत्सना करून त्याला हाकलून देतो, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून बिभीषण रामाला शरण जायचे ठरवतो. राम रावण युद्ध आता तोंडावर आलेले असते. अशा प्रसंगी शत्रुपक्षातील व्यक्तीला आणि तेही रावणाच्या सख्ख्या भावाला राम आश्रय देईल की नाही ही बिभीषणाच्या मनात शंका असते. परंतु शरणागताला आश्रय देणे हे रामाचे ब्रीद आहे. रामाने एकदा ज्याला आपले म्हटले त्याला तो शेवटपर्यंत सांभाळतो. तो बिभीषणाला सन्मानाने वागवतो आणि बिभीषणाच्या बाबत कुठलीही शंका न बाळगता, त्याला आश्रय देतोच शिवाय त्याला युद्धात रावणाचा पराभव झाल्यानंतर तूच लंकेचा राजा होशील म्हणून घोषित करतो. रामाला लंकेचे राज्य नको आहे. राज्याचा लोभ नाही. त्याला फक्त अन्यायी, दुराचारी अशा रावणाला दूर करून त्या जागी न्यायी, धर्माचे पालन करणारा शासक बसवायचा आहे.
राम रावण युद्धात रावणावर विजय मिळवणे ही रामासाठी सोपी गोष्ट नव्हती. या युद्धात राम लक्ष्मणाला बिभीषणाची मोलाची मदत झाली. रावणाची आणि इंद्रजिताची अनेक रहस्ये बिभीषणाने सांगितल्यामुळे युद्धात त्यांना मारणे शक्य झाले. बिभीषण हा रामाचा एवढा एकनिष्ठ सेवक होता की त्याने आपले सर्वस्व रामाच्या ठिकाणी समर्पण केले होते. त्यामुळे युद्धात आपला भाऊ रावण मारला गेल्यानंतर त्याने त्या अन्यायी, दुराचारी, अधर्मी अशा रावणावर अंत्यसंस्कार करायला सुद्धा नकार दिला होता. पण रामाने त्याला समजावून सांगितले की मरणानंतर वैर संपते. रावण हा तुझा भाऊ आहे. तू त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करीन. तेव्हा त्याने रावणावर अंत्यसंस्कार केले. या सगळ्या प्रसंगातून राम आणि बिभीषण यांची महानताच आपल्याला दिसते. पुढे बिभीषण लंकेचा राजा झाल्यावर रामाने त्याला राज्यकारभाराबाबत मोठा सुंदर उपदेश केला आहे. बिभीषणाचे चरित्र आणि व्यक्तिमत्व दिव्य आहे. बिभीषण हा चारित्र्य आणि नीतिमत्तेचा आदर्श आहे. ज्याला रामाने आपला सखा म्हणून हृदयाशी धरले, त्याच्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण राहत नाही.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा