मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग नऊ ( श्रीराम भाग एक )

उगवतीचे रंग 

रामकथा - भाग नऊ  ( श्रीराम भाग एक ) 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

( आज अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होतं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. रामकथा या सुरु असलेल्या आपल्या लेखमालिकेत मी आज बिभीषणावर लिहिणार होतो पण आजच्या या शुभ दिवशी रामावरच लिहावं असं वाटलं. जणू त्यानंच बुद्धी दिली. )

श्रीरामाचे चरित्र हिमालयासारखं उत्तुंग आहे. कुठून आणि कशी सुरुवात करावी ते कळत नाही. इतर व्यक्तिरेखा लिहिताना मला असा प्रश्न पडला नाही. राम हा तेजोनिधी आहे. सदासर्वकाळ ज्याचे गुणगान करावं असं पावन व्यक्तिमत्व आहे. रात्री आकाशातल्या तारका चंद्रामुळे शोभून दिसतात. ज्याच्यामुळे रामायणातील व्यक्तिरेखारुपी तारे शोभून दिसतात असा चंद्र म्हणजे रामचंद्र आहे. आतापर्यंत रामायणातील अनेक पात्रांची चरित्रे आपण पाहिली. पण या सगळ्या पात्रांना ज्याच्यामुळे महत्व प्राप्त होते, असे सगळ्यात महत्वाचे सुपात्र म्हणजे श्रीराम. राम म्हणजे गुणांची खाण. राम म्हणजे सागराचे गांभीर्य. राम म्हणजे हिमालयासारखे अढळ धैर्य. राम म्हणजे तेजाचा सूर्य. जो जो या प्रकाशात न्हाला, तो तो उजळून निघाला. लता मंगेशकर यांनी गायिलेले पं नरेंद्र शर्मा यांचं एक सुंदर गीत आहे. ' राम भजन कर मन. ' या गीतात शेवटी पुढील शब्द आहेत. 

रामनाम में पावत पावन, रवी तेजोमय चंद्र सुधा धन 

रामनामाने पाप्यांची पापे नाहीशी होतात. चंद्र, सूर्य त्याच्याच कृपेने प्रकाशतात. एवढे पावन हे रामनाम आहे. कलियुगामध्ये रामाचे नामस्मरण तर अत्यंत शीघ्र फलदायी आहे. रामाने लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधला. हा सेतू बांधण्यासाठी समुद्रामध्ये जे दगड टाकले जात होते, त्यांच्यावर रामाचे नाव लिहिले जात होते. ज्या दगडावर रामनाम लिहिले गेले, ते पाषाण सुद्धा पाण्यात तरले. याचा अर्थ प्रतीकात्मक पण घेता येईल. तो असा की पाषाण म्हणजे अज्ञानी किंवा पापी व्यक्ती. ज्याने रामाचे नाव आपल्या हृदयावर कोरले, तो पाषाणासारखा अज्ञानी, निर्दयी, पापी भलेही असू देत. तो हा संसार सागर तरून जाईल. पण ज्या पाषाणावर रामनाम लिहिलेले नाही, तो पाषाण मात्र या भवसागरात गटांगळ्या खात राहील. नारद ऋषींनी वाल्ह्या कोळ्याला रामनामाचा उपदेश केला आहे. रामनामाने या वाल्या कोळ्याचे रूपांतर वाल्मिक ऋषींमध्ये झाले. एवढी शक्ती रामनामात आहे. 

पण आता आपण रामाकडे एक व्यक्ती म्हणून दृष्टिक्षेप टाकू. व्यक्तित्वाचे श्रेष्ठतम आदर्श रामाने प्रस्थापित केले आहेत. राम हा आदर्श पुत्र , आदर्श पती, आदर्श शिष्य, आदर्श बंधू, आदर्श राज्यकर्ता, लोकोत्तर योद्धा आहे. तो आपल्या आईवडिलांना ज्याचा अभिमान वाटेल असा आदर्श पुत्र आहे. गुरूला अभिमान वाटावा असा शिष्य आहे. प्रजेला हवाहवासा वाटावा असा राजा आहे. ज्याची कळिकाळालाही भीती वाटावी असा तेजस्वी योद्धा आहे. त्याच्या प्रेमात समर्पण आहे. त्याच्या प्रेमात त्याग आहे. करुणा आहे, बंधुभाव आहे. त्याच्या व्यक्तिमत्वात शत्रूलाही आपलंस करून घेण्याची शक्ती आहे. ज्यांना ज्यांना तो भेटला, त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वात त्याने आपल्या स्वभावाने आणि वागण्याने परिवर्तन घडवले. हनुमान, नल, नील, जांबुवंत, सुग्रीव, निषादराज जे जे त्याला भेटले, ते ते त्याचे होऊन गेले. राम म्हणजे जणू परीस. ज्याला ज्याला या परिसस्पर्श झाला, त्याचे सोने झाले. बिभीषण त्याच्याकडे शरणार्थी म्हणून गेला, तेव्हा सुरुवातीला मनात भीती आणि शंका असणाऱ्या बिभीषणाचे  रामाने त्याचे असे काही स्वागत केले की बिभीषण कायमचा रामाचा होऊन गेला. अर्थात तो रामभक्त होताच. पण रामाची भेट होताच रामाने त्याला आश्वस्त केले आणि राम रावण युद्ध होण्यापूर्वीच त्याला लंकेचा सम्राट म्हणून घोषित करून टाकले. हे रामाचे मोठेपण होते. त्याने सुग्रीवाला राज्य दिले, बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. रावण त्याला जर युद्धापूर्वी भेटायला आला असता, तर रामाने त्यालाही आपलासा करून टाकला असता यात शंका नाही. पण तो योग यायचा नव्हता. 

रामाचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य असायचे. एकदा त्याने जे सांगितले, ती गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेषा असायची. त्यात कालत्रयीही बदल होत नव्हता. बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून घोषित केल्यानंतर कोणीतरी रामाला विचारले होते की आता जर रावण तुम्हाला शरण आला तर त्याला तुम्ही कोणते राज्य द्याल कारण लंकेचे राज्य तर तुम्ही बिभीषणाला द्यायचे कबूल केले आहे. त्यावेळी राम म्हणाला, ' रावणाला मी अयोध्येचे राज्य देईन आणि आम्ही चौघे भाऊ वनात जाऊ. ' हे उदार हृदयी शब्द फक्त रामच बोलू शकतो. अन्य कोणाची ती पात्रता नाही. असे हे रामाचे उत्तुंग व्यक्तिमत्व. राम आम्हा भारतीयांच्या मनामनात वसलेला आहे. तो केवळ मंदिरात नाही. तो तर सर्वांच्या हृदयमंदिरात आधीपासूनच आहे. अयोध्येत रामाचे मंदिर होणे ही फार मोठी गोष्ट नाही. ते आतापर्यंत होऊ शकले नाही ही मोठी गोष्ट आहे. या देशात जिथे रामराज्य होऊन गेले, त्या देशात रामाचे मंदिर व्हायला इतकी वर्षे लागणे हीच दुर्दैवी गोष्ट आहे. मतपेट्यांच्या क्षुद्र राजकारणामुळे ही गोष्ट होऊ शकली नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. आजही आमच्यातले काही महाभाग म्हणतात की राम ही काल्पनिक पौराणिक व्यक्तिरेखा आहे. त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत. अशांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यांच्या पूर्वजांच्या अस्तित्वाचे काही पुरावे मिळाले नाहीत तर त्यांचे पूर्वज होऊन गेले नाहीत असे म्हणायचे का ? असो. थोडे विषयांतर झाले पण मला खात्री आहे की तुम्ही या बाबतीत मला क्षमा कराल. 

रामाला विष्णूचा सातवा अवतार म्हटले जाते पण वाल्मिकींनी रामायण लिहिताना राम हा दैवी अवतार होता अशा पद्धतीने कुठेही लिहिलेले नाही. रामाच्या व्यक्तिमत्वात आनंद, हर्ष, शोक इ मानवी भावना वेळोवेळी आपल्याला बघायला मिळतात. ज्याच्यावर अगदी तरुण असल्यापासून संकटे,अडचणी पाचवीला पुजली आहेत, असा तो मानव आहे. ज्याचा राज्याभिषेक होणार आहे असे आदल्या दिवशी घोषित होते आणि दुसऱ्या दिवशी ज्याला ते सगळे सोडून वनवासात जाण्याची पाळी येते अशा परिस्थितीत एखादी सामान्य व्यक्ती असती, तर तिचे धैर्य खचले असते. किंवा तिने बंड केले असते. पण राम हसतमुखाने आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी हा वनवास सहज स्वीकारतो. यात रामाचे मोठेपण आहे. अशा तऱ्हेची अनेक संकटे त्याच्यावर वारंवार येतात पण तो आपले धैर्य खचू देत नाही, निराश होत नाही. कोणावर दोषारोप करीत नाही. रावणासारख्या बलाढ्य शत्रूलाही जो आपल्या मानवी गुणांच्या जोरावर पराभूत करतो, अशी व्यक्ती म्हणजे श्रीराम. ज्याने आपल्या आचार, विचार आणि उच्चार यात कधीही मर्यादा सोडली नाही अशी व्यक्ती म्हणजे श्रीराम. म्हणून राम हा मर्यादापुरुषोत्तम आहे. अशी व्यक्तीच मानवी अवस्थेकडून देवत्वाकडे वाटचाल करू शकते. या छोट्याशा लेखात श्रीरामाच्या चरित्राचा पूर्णपणे आढावा घेणे अशक्य आहे. श्रीरामावर अनेक थोर ऋषीमुनी आणि विद्वानांनी भरपूर लेखन केले आहे. काव्य केले आहे. असे म्हणतात की ' राजहंसाचे चालणे जगी श्रेष्ठ ' पण म्हणून इतरांनी चालूच नये काय ? याच भावनेतून माझ्यासारखी सामान्य व्यक्ती रामरायाची व्यक्तिरेखा लिहायची हिंमत करीत आहे. ( पुढील भाग शुक्रवारी ) 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...