उगवतीचे रंग
स्वा सावरकर आणि येसूवहिनी ( भाग एक )
परवाच्या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मार्सेलिसच्या बंदरात मारलेल्या ऐतिहासिक उडीला ११० वर्षे पूर्ण झाली. मृत्यूलाही न घाबरणाऱ्या या मृत्युंजयाने या प्रसंगी उत्स्फूर्तपणे जी कविता म्हटली, ती अक्षरशः त्यांच्या जीवनाला लागू पडते.
अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला
मारील रिपु जगती असा कवण जन्मला !!
सावरकर यांच्या जीवनावर या निमित्ताने अनेक लेख सोशल मीडियावर आले. काही लेखातून त्यांच्या या उडीसंबंधीच्या धाडसाचे वर्णन केले गेले. काही लेखात त्यांच्या कार्याचे वर्णन आले होते. पण तरीही त्यांच्याबद्दल काहीतरी लिहावे असे मला वाटले. या संदर्भात मी विचार करत असताना असे जाणवले की आपण तात्याराव सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणून संबोधतो आणि ते योग्यच आहे. पण सगळेच्या सगळे सावरकर कुटुंब देशासाठीच्या स्वातंत्र्य यज्ञात सहभागी झालेले होते. त्या यज्ञकुंडात प्रत्येकाच्या समिधा पडल्या आहेत. बाबरांवाचा त्याग आणि त्यांचं कार्य स्वातंत्र्यवीरांपेक्षा यत्किंचितही कमी नाही. बाबारावांच्या पत्नी म्हणजे सावरकरांच्या वहिनी येसूबाई या माऊलीचा त्याग तर फार मोठा आहे. आपल्याला सावरकरांबद्दल माहिती असते पण येसूबाई कोण, त्यांचं कार्य काय आणि देशासाठी केवढा त्याग या माउलीने केला, याची जाणीव कदाचित फार थोड्या लोकांना असेल. म्हणून या लेखाच्या भाग दोन मध्ये त्यांच्या कार्याची थोडी दखल घेण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करणार आहे. आज फक्त एवढंच म्हणतो की ' तेथे कर माझे जुळती. '
सावरकर म्हणजे तेज. सावरकर म्हणजे लखलखती ज्वाला. स्वातंत्र्यासाठी पेटलेले धगधगते अग्नीकुंडही तेच आणि त्या यज्ञातील समिधा किंवा आहुतीही तेच. या देशभक्ताने आपले अवघे जीवन, अवघे तारुण्य देशासाठी अर्पण केले. स्वातंत्र्य मिळून आज सत्तरच्या वर वर्षे झाली, पण अजूनही आम्ही या भारतमातेच्या सुपुत्राला समजून घेण्यात आणि त्याच्या कार्याला पुरेसा न्याय देण्यात कमी पडतो आहोत असे मला वाटते. कारण अजूनही सावरकर वादाचा विषय ठरतात. सावरकर नायक की खलनायक असा चर्चेचा विषय मागे एका टीव्ही वाहिनीने ठेवला होता.
,मागे पुण्यातले प्रख्यात समाजवादी नेते एस एम जोशी सावरकरांबद्दल बोलताना म्हणाले होते की १९२१ पूर्वीचे सावरकर आम्हाला मान्य आहेत. त्यानंतरचे सावरकर आम्हाला मान्य नाहीत म्हणजेच सावरकर क्रांतिकारक म्हणून आम्हाला मान्य आहेत. पण स्वातंत्र्यानंतरही त्यांनी जे सामाजिक कार्य केले, त्यांची जी आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टी होती ती आम्हांला मान्य नाही. एस एम जोशींनी हे विधान करून बरीच वर्षे झाली पण अजूनही समाजातले काही घटक असे आहेत की ज्यांना सावरकर पचनी पडलेले नाहीत. एस एम जोशींच्या विधानाला उत्तर देताना प्रख्यात गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी असं म्हणाले होते की एस एम ना १९२१ पूर्वीचे सावरकर कळण्यासाठी ३५ वर्षे लागली. तेव्हा पुढचे सावरकर कळायला त्यांना आणखी ३५ वर्षे लागतील. बाबूजींचे हे विधान आजही आम्हाला लागू पडते. आम्हाला गांधीजी कळायलाही वेळ लागतो आणि सावरकरांना समजून घ्यायला सुद्धा. जसे सावरकरांबद्दल मतभेद आहेत तसेच गांधीजींबद्दल सुद्धा आहेत. पण या ठिकाणी फक्त एवढंच विधान करून थांबतो की दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जशी सावरकरांच्या वाटेला उपेक्षा आली, तशीच आणखीही काही स्वातंत्र्यसैनिकांच्या वाट्याला आली. डॉ पांडुरंग खानखोजे हे असंच एक नाव. स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांपासून घेऊन ते अगदी कमी वयात अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी गदर पार्टीच्या स्थापनेत सहभाग घेतला. याच ठिकाणी कृषी विद्यापीठातून संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात येतातच त्यांना तत्कालीन भारत सरकारने अटक केली. नंतर त्यांना परत पाठवण्यात आले. ते मेक्सिको देशात गेले. तेथे त्यांनी कृषिक्षेत्रात अक्षरशः क्रांती करून त्या देशाच्या अन्नधान्य समृद्धीस हातभार लावला. आज मेक्सिकोच्या शिक्षण खात्याच्या कार्यालयात तेथील राष्ट्राध्यक्ष आणि इतर मान्यवर व्यक्तींची जी म्युरल्स म्हणजे मोठी भित्तिचित्रे लावली आहेत, त्यात डॉ पांडुरंग खानखोजे यांचेही म्युरल असून त्याच्या शिरोभागी ' आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल ' असे लिहिले आहे. आपल्या देशाच्या सुपुत्राचा हा केवढा मोठा गौरव त्या देशाने केला आहे.
सावरकर म्हणजे अजोड प्रतिभा असलेला लेखक, कवी. असामान्य वक्तृत्व, दुर्दम्य जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असलेले व्यक्तिमत्व. असे गुण असणारे अनेक जण असतात पण हे सगळे गुण भारतमातेच्या चरणी अर्पण करणारा सावरकरांसारखा भारतमातेचा पुत्र विरळा. धन्य ती भारतभूमी जिने अशा नररत्नांना जन्म दिला. सावरकरांना या कवितेच्या ओळी पुरेपूर लागू पडतात.
सागर पोहत बाहू बळाने ।।
नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १
स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥
तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥
जो करी कर्म अहेतू निरंतर ॥
वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥
ओळख पटली ज्यास स्वतःची ॥
देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥
दरवर्षी लाखो लोक अंदमानला सावरकरांचे राष्ट्रीय स्मारक पाहण्यासाठी जातात. ती पावन भूमी पाहताना आजही आपण थरारून जातो. तेथे ज्या अंधारकोठडीत सावरकरांना ठेवले होते, ती पाहून आजही आपल्या जीवाचा थरकाप होतो. कसे राहिले असतील सावरकर तिथे ? कशी की काढली असतील इतकी वर्षे ? आपण आज कोरोनामुळे सहन कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनला कंटाळलो आहोत, अशा वेळी त्यांचे हे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण न भिता त्यांनी हे सर्व स्वीकारले. तेथून हा नरसिंह सुखरूप बाहेर आला आणि स्वातंत्र्यानंतरही समाजसेवेचे प्रचंड कार्य त्यांनी केले. जे सावरकरांवर टीका करतात त्यांनी हे लक्षात ठेवावे की हिंदी राष्ट्रभाषा व्हावी, हिंदुस्थान पुन्हा अखंड व्हावा, एका व्यक्तीला एक पद , मुसलमानांना सुद्धा मतदानाचा अधिकार असला पाहिजे, हा देश प्रजासत्ताक झाला पाहिजे ही तत्कालीन हिंदू महासभेची म्हणजेच सावरकरांची मागणी आहे. या सर्व गोष्टी त्यांनी जेव्हा देशाची राज्यघटना लिहिली जात होती, त्यावेळी सांगितल्या.
सावरकरांना भारतरत्न जेव्हा मिळायचे असेल तेव्हा मिळो, पण असे दहा भारतरत्न त्यांच्यावरून ओवाळून टाकले तरी कमी आहेत. भारतरत्न ते तर आहेतच. सावरकरांच्या सगळ्या कविता तर अप्रतिम आहेतच. पण शिवाजी महाराजांच्या गौरवार्थ लिहिलेल्या पहिल्या तीन ओळी त्यांनासुद्धा लागू पडतात. त्या इथे देतो आणि थांबतो.
हे हिंदुशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्या- पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्य-भुतीच्या साजा.
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१०/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा