उगवतीचे रंग
एकाच ह्या जन्मी जणू...
नमस्कार प्रिय वाचक मित्रांनो. रविवार नंतर आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. हा मधला दोन दिवसांचा विरह मला जाणवला. तुम्हालाही बहुतेक जाणवला असेल. सवयीचा परिणाम. असो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते पुण्याच्या डॉ शारदा बापट यांच्याबद्दल. तुम्ही म्हणाल असं काय विशेष आहे की त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगताय ? तर हा लेख वाचा आणि तुम्हीच सांगा काय विशेष आहे ते..!
यु ट्यूब वर ' वेध ' या सदरात डॉ आनंद नाडकर्णी यांनी डॉ शारदा बापट यांची घेतलेली मुलाखत सहज उत्सुकता म्हणून पाहिली आणि भारावून गेलो. ' झपाटलेपण ते जाणतेपण ' असं या मुलाखतीचं नाव होतं . डॉ शारदा बापट यांचं बोलणं ऐकलं आणि आठवण आली एखादया पूर्ण उमललेल्या गुलाबाच्या फुलाची किंवा कमळाची. जेव्हा ही फुलं पूर्ण उमललेली असतात ना, तेव्हा पाकळी पाकळी फुलून येते. ते फुल आपल्याला सुंदर वाटतं कारण ते आपल्या पूर्ण ताकदीने, नजाकतीने उमलून आलेलं असतं . म्हणूनच त्याचं सौंदर्य मनाला भुरळ घालतं . डॉ शारदा यांचं व्यक्तिमत्वही मला असंच भासलं. एखादी व्यक्ती एकाच जन्मात इतक्या विविध गोष्टी करू शकते यावर विश्वासच बसत नाही. म्हणून तर लेखाचं नाव ' एकाच ह्या जन्मी जणू..' असं ठेवावंसं वाटलं. आशा भोसले यांनी गायीलेलं हे नितांतसुंदर आणि अर्थपूर्ण गाणं आहे.
डॉ नाडकर्णी यांनी अनेक क्षेत्रात ज्यांनी अनोखं कार्य केलं आहे, अशा लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्यांना आपल्यासमोर आणण्याचं काम केलं आहे.
ते मुलाखतीत डॉ शारदाताईंना विचारत होते की शिक्षण म्हणजे स्वतःच्या अज्ञानाची टप्याटप्याने विकसित होणारी जाणीव असं आपल्याला का वाटतं ? ही खरं तर शिक्षणाची आगळीवेगळी आणि सुंदर व्याख्या. डॉ शारदा बापट यांनीच केलेली. उत्तरादाखल त्या म्हणाल्या, ' आपण जेवढे जेवढे अधिक शिकत जातो, तेवढे तेवढे आपल्याला किती कमी ज्ञान आहे हे कळत जाते. म्हणजेच आपल्या अज्ञानाची जाणीव होते. हे अफाट असलेलं विश्व, त्यात एक छोटासा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. त्या पृथीवरचा एक जीव म्हणजे मानव. तरी आपल्याला केवढा अभिमान असतो स्वतःचा...! लांब कशाला जायचे ? वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करताना मला आपल्या शरीरातल्याच अफाट विश्वाचं दर्शन झालं. हे शरीर लाखो पेशींनी बनलेलं एक अद्भुत आश्चर्य आहे. या सगळ्या पेशी एकमेकांच्या सहकार्याने काम करतात. एखादी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचं जणू..! आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. प्रदूषण, चुकीचा आहार-विहार इ मुळे कितीतरी आजारांची निर्मिती होते. त्यात सुधारणा केली तर अनेक आजार आपण टाळू शकतो. आपल्या आहारविहार, विचारात बदल केल्याने या सगळ्यात सुधारणा होऊ शकते. '
शारदा बापट या नावापासून सुरु झालेला आणि डॉ शारदा बापट यांच्यापर्यंत झालेला हा प्रवास अतिशय रंजक आणि रोमांचक आहे. अर्थात त्यांचा प्रवास अविरत सुरूच असतो. तो संपलेला नाही. हा प्रवास त्यांच्या जिद्दीची ,आणि सतत नवनवीन शिकण्याची साक्ष पटवणारा आहे. बी ए ला इंग्रजी विषय घेऊन पदवीधर झालेल्या शारदाताईंनी सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये डिप्लोमा इन कंप्युटर अप्लिकेशन केला. नंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हाइसेसशी संबंधित व्यवसायात भागीदार म्हणून पदार्पण केले. हे काम करीत असताना त्यांनी डबल एंट्री अकौंटिंगचे ज्ञान पण प्राप्त केले. या दरम्यान त्यांचे नरेंद्र बापट यांच्याशी लग्न झाले आणि लवकरच त्या आईसुद्धा झाल्या. याच दरम्यान त्यांनी एल एल बी चे शिक्षण घेऊन कायद्याची पदवी देखील प्राप्त केली.
डॉ शारदा यांची आई त्या आठवीत असल्यापासून सतत आजारी असायची. तिच्या खूप तक्रारी असायच्या. डॉ शारदा या आईच्या आजारांसंबंधी, दिल्या जाणाऱ्या औषधांसंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायच्या. अर्थात निरनिराळी पुस्तके वाचून. त्यावेळी आजच्या सारखे इंटरनेट सुरु झालेले नव्हती. त्यामुळे ही माहिती मिळवणे तर कठीण होतेच, शिवाय ती समजणे त्यापेक्षाही कठीण. त्यासाठी डॉक्टर होण्याचीच आवश्यकता होती. डॉ शारदा यांच्या अमेरिकेतील एका मैत्रिणीचा इंजिनिअर असलेला नवरा नंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला होता. हे उदाहरण त्यांच्या डोळ्यांसमोर होते. आपणही असे डॉक्टर का होऊ नये या विचाराने त्यांच्या मनाचा ताबा घेतला आणि त्या दृष्टीने त्यांनी तपास करायला सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांच्या पदरी निराशाच पडली. सुरुवातीला तर लोकांनी वेड्यातच काढले. त्यांचं बारावी आर्टस् चे शिक्षण झालेलं होतं. वैद्यकीय शिक्षणासाठी बारावी विज्ञान पास होण्याची आवश्यकता होती. एकदा बारावी झाल्यावर पुन्हा बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही असं त्यांना सांगितलं गेलं. एच एस सी बोर्डात बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांना या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळाले. त्यासाठी त्यांनी जिथून बारावी आर्टस् केलं होतं, त्या कॉलेजचं ना हरकत प्रमाणपत्र आणावे लागले मगच दुसरीकडे बारावी सायन्सला प्रवेश मिळाला. त्यावेळी त्यांचं वय होतं ३५ वर्षे. आता शारदाताईंनी वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून नियमितपणे बारावीचे शिक्षण घेतले. आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्या हे शिक्षण घेत होत्या.
परीक्षा जवळ आली असतानाच त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले आणि त्यांच्या मनावर आईच्या निधनाचा फार मोठा आघात झाला. पण अशा वेळी त्यांचे पती नरेंद्र यांनी त्यांना धीर दिला आणि वर्षभर अभ्यास केलाच आहेस, तर बारावीची परीक्षा दे असा सल्ला दिला. त्या तशाही मनःस्तिथीत परीक्षेला बसल्या. तरीदेखील परीक्षेत त्यांना ७५% गुण मिळाले. पुण्यातच वाडिया कॉलेजला नुकतीच वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात होणार होती. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच होती. सुरुवातीला त्यांना या शिक्षणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना सांगितले गेले की अतिशय कठीण आहे, खूप अभ्यास असतो. नियमित विद्यार्थ्यांना सुद्धा करणे अवघड जाते वगैरे. पण कोणतीही गोष्ट त्यांना विचलित करू शकली नाही. त्यांचा निर्धार पक्का होता.
वाडिया कॉलेजात वैद्यकीय शिक्षण घेत असताना, कॉलेजला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची जी मान्यता लागते, ती मिळाली नाही आणि मग पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन वर्षांसाठी फिलिपिन्सला जावं लागेल असं सांगण्यात आलं. खरं तर लहान मुलगा, नवरा, आपला घर आणि आपला देश सोडून एकदम अशा अनोळखी देशात जाणं ही कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत कठीण गोष्ट होती. पण शारदाताईंना आपल्या मुलाचा आणि पतीचा मानसिक पाठिंबा यावेळी लाभला. अर्थात तेही जाणून होते की आता डॉक्टर होण्यापासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकत नाही.
फिलिपिन्सला गेल्यावर एक वर्ष पुढील शिक्षण आणि एक वर्ष इंटर्नशिप ज्याला तिकडे क्लार्कशीप म्हणतात, ते करावे लागणार होते. आणि हा सगळं दिनक्रम अतिशय शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहणारा होता. याच दरम्यान त्यांना असं आढळलं की त्यांच्या कॉलेजजवळ वैमानिकाचं प्रशिक्षण देणारे एक खाजगी केंद्र आहे. त्यांच्या कॉलेजला शनिवार, रविवार सुटी असायची. या सुट्यांचा उपयोग करून घेऊन त्यांनी तो पायलटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात त्यांना अनेक विषयांचा अभ्यास करावा लागला. भौतिकविज्ञान, एअर लॉज , नेव्हिगेशन, रेडिओ कम्युनिकेशन इ विषयांची परीक्षा द्यावी लागली. पण या सगळ्या गोष्टींचा ताण न घेता, त्यांनी उत्सुकतेपोटी या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. वैमानिकाची परीक्षा देतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागला. पण त्या सगळ्या दिव्यातून त्या पार पडल्या. ज्याचा निर्धार पक्का असतो, त्याला कोणतीही गोष्ट अडवू शकत नाही हेच जणू त्यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केले. फिलिपिन्समधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेऊन यशस्वीरीत्या त्या भारतात परतल्या. साधारणपणे वैद्यकीय शिक्षणाच्या ओढीने पस्तिसाव्या वर्षी सुरु झालेला हा प्रवास वयाच्या ४२व्या वर्षी पूर्ण झाला होता.
भारतात परत आल्यानंतरही त्यांच्या पाठीमागच्या परीक्षा काही संपल्या नाहीत. एमसीआय ची मान्यता मिळवण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागली आणि त्यांना रजिस्ट्रेशन मिळाले त्यानंतर एक वर्ष त्यांनी रुबी हॉलमध्ये एक वर्ष इंटर्नशिप केली. येथे डॉ प्राची साठे यांच्यासोबत काम करताना क्लिनिकल असिस्टंट आणि रिसर्च असोसिएट म्हणून त्यांना मदत केली. संशोधनात्मक काही पेपर्स प्रसिद्ध केले. नंतर वोडाफोनला व्हिजिटिंग फिजिशियन म्हणून जॉईन झाल्या आणि त्यासोबतच स्वतःची वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली.
आज त्या अल्गो अनॅलिटीक्स या संस्थेत आपली सेवा देत आहेत. या ठिकाणी त्यांचे जे विविध प्रकारचे शिक्षण आतापर्यन्त झाले आहे, त्या सगळ्यांचा एकत्रित उपयोग त्यांना होतो . विशेषतः कायद्याचे ज्ञान, कंप्युटर अँप्लिकेशन आणि वैद्यकीय शिक्षण हे सगळे ज्ञान तिथे उपयोगी पडते. अल्गो अनॅलिटिक्सला त्या पदावर काम करण्यासाठी अशाच व्यक्तीची आवश्यकता होती आणि ती त्यांना डॉ शारदा यांच्या रूपाने मिळाली. असे असले तरी डॉ शारदा यांचे सामाजिक जबाबदारीचे भान कधीही सुटत नाही. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा समाजासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे याकडे नेहमीच त्यांचे लक्ष असते. त्यातूनच त्यांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात सध्या गैरसमजातून जो काही संघर्ष होतो आहे, तो कमी व्हावा म्हणून काही समाजसेवी डॉक्टर्स आणि जबाबदार नागरिक यांची मिळून पीसीडीएफ म्हणजेच पूना सिटीझन-डॉक्टर फोरमची स्थापना केली. आरोग्यसेवा आणि शिक्षण यांची सांगड घातली जावी. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावे म्हणून ही संघटना प्रयत्नशील असते.
या सगळ्यांसोबत आपले छंदही जपण्यास त्या विसरल्या नाहीत. त्यांना लहानपणी पियानो वादनाची आवड होती. पण वेळेअभावी त्यात प्राविण्य मिळवता आले नव्हते. पण आता त्यांनी ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन ची पियानोची ग्रेड फोरची परीक्षा दिली आणि ती त्या चांगल्या प्रकारे उत्तीर्णही झाल्या. नैसर्गिक शेतीचा प्रयोगही त्यांनी नुकताच सुरु केला आहे. त्यासाठीही त्या वेळ देतात. आपल्या शेतात त्यांनी एक हजार झाडे लावली आहेत. या झाडांना बाहेरून कोणतेही कृत्रिम खत न देता नैसर्गिक वातावरणात, नैसर्गिक खत देऊन वाढवण्याचा प्रयोग त्या करीत आहेत. त्यासोबतच पर्यावरण जपण्यासही त्या हातभार लावत आहेत. त्या म्हणतात, ' आज हवा, पाणी आणि अन्न या गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत. पण आपल्याला त्या जशा आहेत तशा सगळ्यांसोबत शेअर कराव्या लागणार आहेत. म्हणूनच नागरिक म्हणूनही आपलीही वैयक्तिक काही जबाबदारी येते. पर्यावरणाची काळजी घ्यायला आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. '
या सगळ्या गोष्टींसाठी त्या वेळ कसा काढतात हे एक कुतूहलच आहे. पण त्यांना या बाबतीत विचारले असता त्या म्हणतात, ' वेळेचे नियोजन ( टाईम मॅनेजमेंट )महत्वाचे आहे. कामांमधून आपल्याला मिळणारा रिकामा वेळ त्या शोधतात आणि त्याचा खुबीने उपयोग करून घेतात. आपण मात्र बऱ्याच वेळेला मला वेळ नाही म्हणून बऱ्याच नवीन गोष्टी करण्याचे टाळत असतो. त्या दृष्टीने डॉ शारदा यांचे उदाहरण मार्गदर्शक आहे. वेळेच्या नियोजनासोबतच अनुभव घेण्याची वृत्ती, एखादी गोष्ट जाणून घेण्याचे कुतूहल या गोष्टी त्यांना काम करण्यासाठी प्रेरित करतात. त्या म्हणतात आपण जगणं एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. फार पुढचा विचार न करता जो क्षण आता आपल्या हातात आहे, तो आपण आनंदी करावा.
आपल्या आईवडिलांबद्दल सांगताना त्या म्हणतात, ' माझ्या आईवडिलांनी मला नवीन गोष्ट शिकण्यापासून कधीही परावृत्त केलं नाही. कधीही बक्षीस मिळवून आण म्हणून सांगितलं नाही. त्यांनी मला एखादी गोष्ट करून पाहण्याचे स्वातंत्र्य दिले आणि ते करण्यास प्रोत्साहन दिले. ' आपण पालकांनी सुद्धा मुलांना नंबर आला पाहिजे, बक्षीस मिळाले पाहिजे असा दबाव मुलांवर न आणता त्यांना ' करके देखो ' अशा भावनेतून प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांना वाटते. निसर्ग हे आपलं सगळ्यात मोठं ' रोल मॉडेल ' आहे. मुलांना जर लहानपणीच समजलं की निसर्गातील प्राणी, पक्षी, वनस्पती इ सगळ्या गोष्टी या एकमेकांशी कशा निगडित आहेत, तर मोठेपणी ते आपोआपच पर्यावरणाची ते काळजी घेतील.
आपल्याकडे आपण बुद्धिमत्ता चाचणी घेतो. पण या चाचणीत काही ठराविक गोष्टीचीच परीक्षा होते. बुद्धिमत्ता ही अनेक पदरी गोष्ट आहे. गणिती क्षमता, तर्कशुद्ध विचार करणे यापलीकडे सुद्धा खूप साऱ्या क्षमता असतात. अशा साठ पेक्षा जास्त क्षमता आहेत. काही लोकांची रंग पारखण्याची क्षमता इतरांपेक्षा उत्तम असते, काहींना यंत्रांमध्ये उत्तम गती असते, काहींना संगीतात गती असते. अशा अनेक क्षमता व्यक्ती उपजत घेऊन येत असते. अनेक व्यक्तींमध्ये अशा बहुरंगी क्षमता असतात. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यासारखे साहित्यिक, कलाकार अशा क्षमतांची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्वे म्हणून आपण ओळखतो.
पण आपण लहानपणीच बरेचदा आपल्या मुलांचे पंख छाटून टाकतो. त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्वाला वेसण घालण्याचा प्रयत्न करतो. तुला हे जमणार नाही, ते जमणार नाही. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित कर असे सांगतो. जणू त्या बहुरंगी बुद्धीचं आपण बोन्साय करून टाकतो. मुलांच्या बुद्धिमत्तेला जर योग्य वाव मिळाला, तर ते वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला व्यक्त करू शकतील, सिद्ध करू शकतील. ' करके देखो ' असे त्यांना सांगायला हरकत नाही. मुलांना काही सांगण्याआधी आपण त्यांच्यासमोर त्या प्रकारे जगून दाखवले पाहिजे. कारण मुलं पाहत असतात, अनुकरण करत असतात. सांगून फारसं ऐकत नाहीत. अशा प्रकारे जगण्याचं स्वातंत्र्य आणि उदाहरण डॉ शारदा यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासमोर ठेवलं. म्हणून त्या विविध गोष्टी करू शकल्या.
डॉक्टर, कायद्याची पदवीधर, संगणकाचं ज्ञान, वैमानिकाचं कौशल्य, पियानो वादन, नैसर्गिक शेती आणि आणखीही इतरही बऱ्याच गोष्टी डॉ शारदा यांच्या व्यक्तिमत्वात सुरेख गुंफल्या गेल्या आहेत. सुरेख मेळ जमला आहे. विविध पाकळ्यांनी फुललेलं मनोहर कमळच जणू..! अवघा रंग एक झाला.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०८/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा