मुख्य सामग्रीवर वगळा

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

उगवतीचे रंग 

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा 

मुळात पौर्णिमा हा शब्दच किती सुंदर..! पौर्णिमा म्हटलं की आकाशात रात्री तेजानं प्रकाशमान होणारं पूर्ण चंद्रबिंब आपल्यासमोर येतं . त्या प्रकाशात  मनाला शांतता देणारी एक प्रकारची शीतलता असते. ' चंद्र व्हा हो पांडुरंगा , मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर...'  जसा चंद्राच्या चांदण्याला चकोर भुकेला असतो, तसाच सद्गुरुंच्या कृपेसाठी शिष्यही भुकेला असतो. सद्गुरू मग आपल्या शिष्याला ज्ञानामृत पाजण्यासाठी चंद्र होतात. पांडुरंग तर ते प्रत्यक्ष असतातच. आपल्या संस्कृतीत गुरूंना देव म्हणण्याची पद्धत आहे. नुसते ' गुरु ' न म्हणता आपण आदराने त्यांना गुरुदेव म्हणतो, आचार्यदेव म्हणतो. एवढा गुरूचा महिमा आहे. संत कबीर तर गुरूंना देवापेक्षाही महान मानतात. ते म्हणतात 

गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय 
बलिहारी गुरु आपकी, जो गोविंद दिजो बताय. 

एकाच वेळेला समोर सद्गुरू आणि परमेश्वर असे दोघेही उभे राहिले, तर मी आधी सद्गुरुंच्या पायी लागेन. कारण परमेश्वराचे दर्शन घडवणारे सद्गुरू आहेत. असे म्हणतात की एखादया वेळी देव कोपला तर सद्गुरू सांभाळून घेतात, पण सद्गुरू कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही, एवढी सद्गुरूंची शक्ती आहे. 

गुरु म्हणजे ज्ञानाची पौर्णिमा. गुरु या शब्दात दोन अक्षरे आहेत. गु आणि रु. गु  म्हणजे अंध:कार आणि रु म्हणजे प्रकाश. जो आपला अज्ञानाचा अंध:कार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, आणि त्या प्रकाशात मग आपली पुढची परमार्थाची वाटचाल सुलभतेने होते, तो गुरु. आपल्याला शाळा, महाविद्यालयात जे ज्ञानदान करतात ते आणि पारमार्थिक मार्गावर वाटचाल करत असताना जे मार्गदर्शन करतात ते, असे दोघेही गुरूच. आईवडील आपले पहिले गुरु, दुसरे म्हणजे आपल्याला ज्ञानदान करणारे आपले शिक्षक आणि तिसरे म्हणजे अध्यात्म मार्गात दिशा दाखवणारे सदगुरु. 

आषाढ शुद्ध पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. व्यासांना आद्य गुरु म्हटले जाते. त्यांनी चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांची पुनर्रचना केली असे म्हटले जाते. व्यासांनी ज्याला स्पर्श केला नाही असा एकही विषय नाही. महाभारतासारख्या महाकाव्यावरून व्यासांच्या अलौकिक प्रतिभेचे आपल्याला दर्शन होते. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारे गीतेसारखे अलौकिक तत्वज्ञान फक्त महाभारतातच आपल्याला सापडते. गुरुपौर्णिमेच्या प्रथेचे उल्लेख रामायण, महाभारत काळापासून सापडतात. आजच्या दिवशी विविध धर्म, संप्रदाय, शिष्य इ सगळे गुरुपौर्णिमा साजरी करून आपल्या गुरुंप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त करतात. 

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपले आदर्श. प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असलेल्या या दोघांनी गुरूंच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा केली. ते जरी प्रत्यक्ष परब्रह्म होते, तरी गुरूशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. गुरूमुळे शिष्याला ज्ञान मिळते तसेच आदर्श शिष्यामुळे गुरूला महानता मिळते, तशी या दोघांच्या गुरूंना मिळाली. ते धन्य झाले झाले आणि त्यांचे गुरुही. 

श्रीकृष्ण आणि बलराम संदिपनींच्या आश्रमात जाण्यासाठी मथुरेहून उज्जैनला अक्षरशः पायी चालत गेले. वास्तविक ते राजपुत्र होते. ते त्या काळात रथातून, सैन्याची मदत घेत आश्रमात जाऊ शकले असते. पण तसे करणे त्या काळातील संकेतांविरुद्ध होते. शिवाय गुरूंसमोर नम्र होऊन जायचे असते. पूर्ण शरणागत व्हायचे असते.  आश्रमात गेल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सामान्य शिष्यांप्रमाणे आश्रमातील सगळी कामे केली.  गुरूंसमोर आपल्या सत्तेचा दिमाख, मिजास, तोरा दाखवायचा नसतो. हा संकेत त्या काळात पाळला जात होता. म्हणून राजादेखील गुरूंसमोर नम्र होत असे. त्यांच्या शब्दांचा आदर करीत असे. पण पुढील काळात हे संकेत पायदळी तुडवले गेले हा भाग वेगळा. त्याची चर्चा इथे आज आपल्याला करायची नाही. 

शिवाजी महाराजांचे उदाहरण या ठिकाणी मला आठवते आहे. समर्थ रामदास शिवथरघळीत असताना राजे त्यांच्या भेटीसाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी तांबूल म्हणजे विडा खाणे सोडले होते.  समर्थाना हे माहित होते. त्यांनी निघताना शिवरायांच्या हातावर तांबूल ठेवला. शिवरायांनी कुठलाही विचार न करता तो लागलीच भक्षण केला. समर्थांनी त्यांना सहज विचारले, ' राजे, आपण तांबूल खाणे सोडले होते असे ऐकले होते. ' शिवराय तात्काळ उत्तरले, ' स्वामी, आम्ही तांबूल भक्षण केलाच नाही. जे काही भक्षण केले, तो आपला प्रसाद समजूनच भक्षण केला. ' अशी असावी लागते सद्गुरूंवर निष्ठा. 

असं म्हणतात की तुम्हाला गुरु शोधण्याची गरज नसते. एकदा शिष्य म्हणून तुमची पात्रता झाली की तुमचे गुरु स्वतःहून तुम्हाला शोधत येतात. गुरूंचे ज्ञान, तन, मन आणि धन सारे काही शिष्यासाठीच असते. गुरुचे शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते. शिष्याकडून त्याला कोणतीच अपेक्षा नसते. शिष्याची पात्रता पाहून गुरु ज्ञान देतात. गुरूंच्या शिकवण्याच्या अनेक पद्धती असतात. ते आपल्या उक्तीतून आणि कृतीतून तर शिकवतातच, पण आपल्या मौनातूनही शिकवतात. शिष्याला ते मंत्र देतात. तो गुरुमंत्र असतो. त्यात त्यांचे सामर्थ्य असते. एकदा अनुग्रह घेतल्यानंतर शिष्याची सगळी जबाबदारी गुरु घेतात. ते त्याचा धरलेला हात कधीही सोडत नाही. त्याच्या साधनेच्या मागे ते उभे असतात. ते त्याच्याकडून साधना करवून घेतात. म्हणून जेव्हा शिष्य साधना करतो, तेव्हा त्याच्या अहंकाराला कुठेही वाव नसतो. कारण सद्गुरूच आपल्याकडून सर्व करवून घेतात ही भावना त्यामागे असते. 

सद्गुरू म्हणजे फक्त देह असे जो समजतो, त्याला सद्गुरू कळलेच नाही असे म्हणावे लागते. सद्गुरू हे देहाच्या पलीकडे कार्यरत असणारा  एक चैतन्यस्त्रोत असतो. ते देहात असताना तर कार्य करतातच, पण त्यांच्या अवतार समाप्तीनंतर सुद्धा कार्यरत असतात. या तत्वाचा अनुभव आपली जर गुरूंवर श्रद्धा असेल तर आजही हजारो लोकांना येतो. श्री स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज आदी संतांच्या कृपेची प्रचिती आजही भाविकांना येते. आपले गुरु कोणतेही असो, ते श्रेष्ठच असतात. कारण गुरुतत्व एकच आहे. मला स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकल्या की इतर गुरूंपेक्षा ते श्रेष्ठ वाटू लागतात. गोंदवलेकर महाराजांबद्दल ऐकले की ते श्रेष्ठ वाटू लागतात. गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज आदींबाबतही असेच होते. पण माझे मन जर असे हेलकावे खात असेल, तर ते माझी माझ्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा नाही याचे द्योतक आहे. 

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंना आणि परमेश्वरालाही प्रार्थना करू या की मला माझ्या गुरुप्रती पूर्ण निष्ठा, श्रद्धा दे. समर्पण भावना माझ्यात येऊ दे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करण्याचे सामर्थ्य मला दे. त्यांनी सांगितलेली साधना माझ्याकडून होऊ दे. असे झाले म्हणजे मी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली असे होईल. ' माझी देवपूजा, पाय तुझे गुरुराजा. ' 

गुरुविण नाही दुजा आधार
रडता-पडता कोठे अडता
तोच नेतसे पार
गुरुविण नाही दुजा आधार

म्हणून सद्गुरूंना शरण जाऊ या.

( प्रिय रसिक वाचक मित्रांनो , जवळपास पाच महिन्यांपासून मी काही अपवाद वगळता, दररोज आपल्या सेवेत उगवतीचे रंग या सदरातून भेटीसाठी येत आहे. पण आता काही अडचणींमुळे दररोज लिहिणे शक्य होत नाही. एखादा लेख आपल्या सेवेत सादर करण्यापूर्वी त्याविषयी माहिती मिळवणे, चिंतन करणे, त्याची मांडणी करणे इ गोष्टींमधून जावे लागते. ते सर्व रोजच्या रोज करणे होईलच असे नाही. म्हणून यापुढे उगवतीचे रंग आपल्या सेवेत आठवड्यातून तीन दिवस म्हणजे रविवार, बुधवार आणि शनिवार सादर करण्याचा मानस आहे. आपले प्रेम आणि ऋणानुबंध आहेतच. ते यापुढेही असेच राहतील याची खात्री आहे. )

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०५/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )















टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...