मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग आठ ( उर्मिला )

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग आठ ( उर्मिला ) 

रामायणात जिच्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नाही अशी एक व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मणाच्या पत्नीची, उर्मिलाची आहे. शी इज द अनसंग हिरोईन ऑफ द रामायण. म्हणून आज तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेसे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. 

उर्मिला ही मिथिलेच्या राजा जनकाची कन्या आणि सीतेची लहान बहीण. जशी सीता ही रूप आणि गुणांची खाण आहे, तशीच उर्मिला देखील आहे. सीतेचा त्याग, समर्पण, प्रेम, महानता आणि पातिव्रत्य याबद्दल आपण नेहमी बोलतो. पण उर्मिलेचा देखील त्याग, समर्पण, प्रेम, महानता आणि पातिव्रत्य यापेक्षा तिळभर देखील कमी नव्हते. जशी सीता नवविवाहिता म्हणून अयोध्येच्या राजकुळात आली, तशीच आणि तिच्यासोबतच उर्मिला देखील. सोबतच भरत आणि शत्रुघ्न यांच्या नववधू मांडवी आणि श्रुतकिर्ती देखील होत्या. या चारही मिथिलेच्या कन्यांनी अयोध्येचे इक्श्वाकु कुळ धन्य केले. 

रामाला वनवास झाल्यानंतर रामासोबत सीता आणि लक्ष्मण यांनी देखील वनात जायचे ठरवले. वनवास फक्त रामाला झाला होता. पण सीता आणि लक्ष्मण दोघेही रामाशिवाय राहू शकत नव्हते म्हणून रामाने पुष्कळ वेळा त्यांना आपल्यासोबत येऊ नका असे सांगून देखील ते त्याच्यासोबत गेले. रामाला त्यांच्या आग्रहासमोर मान तुकवावी लागली. त्याचवेळेला उर्मिला देखील लक्ष्मणाच्या मागे लागली होती. आपल्यालाही वनात येऊ द्यावे अशी तिची इच्छा होती. पण लक्ष्मणाने तिचे ऐकले नाही. आपल्या मात्यापित्यांची काळजी घेण्यासाठी तिने अयोध्येतच थांबावे असे त्याने तिला सांगितले. 

या प्रसंगी आपल्याला उर्मिलेचा त्याग लक्षात घेतला पाहिजे. उर्मिला ही नववधू म्हणून नुकतीच लक्ष्मणासोबत आलेली. तिच्या डोळ्यात आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्ने नक्कीच तरळत असणार. पण तिच्या नशिबात पतीचा वियोग आला. एक दोन नव्हे तर तब्बल चौदा वर्षे. एखाद्या नवविवाहितेने आपल्या पतीपासून एवढा प्रदीर्घ काळ दूर राहणे ही खरं तर तिच्यासाठी एक मोठीच शिक्षा म्हणावी लागेल. सीतेच्या नशिबात ती नववधू असतानाही वनवासात जावे लागल्यामुळे राजप्रसादातील सुख नव्हते,  तर उर्मिला राजप्रासादात राहूनही तेथील कोणतीही सुखे उपभोगू शकत नव्हती. उर्मिलेच्या त्यागाला आणखी एक किनार अशी आहे की जाताना लक्ष्मणाने तिच्याकडून एक वचन घेतले होते. त्याने तिला सांगितले होते की तू तुझ्या डोळ्यात कोणत्याही प्रसंगी अश्रू येऊ देता कामा नये कारण असे झाले तर तुला तुझ्या कर्तव्याकडे नीट लक्ष देता येणार नाही. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी देखील उर्मिला रडून आपले मन मोकळे करू शकत नव्हती. 

आपला पती वनात जाण्यासाठी निघाला आणि आता तो आपल्याला चौदा वर्षे भेटणार नाही, हे कळल्यावर सुद्धा तिने लक्ष्मणाला दिलेल्या वचनानुसार आपल्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नाहीत. एवढेच काय पण जेव्हा दशरथाचा मृत्यू झाला, त्याप्रसंगी देखील तिने केवळ या वचनाखातर आपल्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नाहीत. राम, लक्ष्मण आणि सीता वनात गेल्यानंतर राजा जनक आपल्या मुलीला नेण्यासाठी अयोध्येला आला. त्याने उर्मिलेला आपल्यासोबत मिथिलेला चलण्याची विनंती केली पण लक्ष्मणाला दिलेल्या वचनामुळे उर्मिलेने माहेरी जाण्यासाठी नकार दिला. 

आता तिचा आणखी एक अनोखा त्याग समजून घेऊ या. जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासाला गेले तेव्हा लक्ष्मण हा राम आणि सीता झोपलेले असताना रात्री पहारा देत जागा राहायचा. अशावेळी त्याने निद्रादेवीची प्रार्थना केली आणि जोपर्यंत आपण वनवासात रामासोबत आहोत तोपर्यंत आपल्याला निद्रा येऊ देऊ नकोस अशी तिला विनंती केली. निद्रादेवीने त्याची ही विनंती एका अटीवर मान्य केली. ती म्हणजे त्याच्या ऐवजी ती निद्रा चौदा वर्षे दुसऱ्या कोणी तरी घेतली पाहिजे. तेव्हा लक्ष्मणाने माझ्या ऐवजी माझी पत्नी उर्मिला चौदा वर्षे झोपेल असे सांगितले. तेव्हापासून ते लक्ष्मण परत येईपर्यंत उर्मिला ही लक्ष्मणासाठी चौदा वर्षे झोपून होती असे सांगितले जाते. ही सुद्धा तिची एक प्रकारची तपश्चर्या आणि त्याग होता. 

राम रावण युद्धात लक्ष्मणाने इंद्रजिताचा पराभव केला. इंद्रजित हा अपराजित होता. त्याला असे वरदान होते  की जी व्यक्ती आपल्या आयुष्यात चौदा वर्षे झोपली नसेल, अशीच व्यक्ती त्याचा वध करू शकेल. निद्रादेवीने लक्ष्मणाला दिलेल्या वरामुळे या अटींची पूर्तता झाली आणि लक्ष्मण अपराजित अशा इंद्रजिताचा वध करू शकला. इंद्रजिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शव रामाच्या सैन्याच्या ताब्यात होते. इंद्रजिताची पत्नी सुलोचना आपल्या पतीच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर त्या ठिकाणी आली. आपल्या पतीचे शव पाहून तिने खूप शोक केला. तेथे उभ्या असलेल्या लक्ष्मणाला ती म्हणाली, ' हे सुमित्रानंदन, तुम्ही असे समजू नका की मी माझ्या पराक्रमामुळे इंद्रजिताला मारले आहे. त्याला कोणीच मारू शकत नव्हते. तुम्ही त्याला मारलेत याचे श्रेय दोन पतिव्रता स्त्रियांना जाते. त्यामुळे तुम्ही तरी आपल्या पराक्रमावर गर्व करू नका. ' इंद्रजिताच्या पत्नीचे हे उद्गार उर्मिलेचा त्याग स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. ती जर लक्ष्मणाचे न ऐकता वनवासात आली असती किंवा त्याच्या ऐवजी चौदा वर्षे निद्रा घेणे तिने नाकारले असते तर लक्ष्मणाला हा इंद्रजिताचा वध करता आला नसता. 

जेव्हा लक्ष्मण राम सीतेसोबत रावणवधानंतर अयोध्येला परतला, तेव्हा निद्रादेवीने त्याला दिलेल्या वरदानाचा कालावधी संपला होता आणि आता तिला ( निद्रादेवीला ) दिलेल्या वचनानुसार लक्ष्मणाला आता निद्रा घ्यावी लागणार होती आणि उर्मिलेची निद्रा समाप्त झाली होती. म्हणून नंतर रामाचा जो राज्याभिषेक सोहळा झाला, तो पाहण्याचे भाग्य लक्ष्मणाच्या नशिबात नव्हते. त्याच्याऐवजी उर्मिला या सोहळ्याची साक्षी होती. पुढे उर्मिलेला लक्ष्मणापासून अंगद आणि धर्मकेतू असे दोन पराक्रमी पुत्र झाले. अशा रीतीने उर्मिलेचे संपूर्ण जीवन हे त्याग, सेवा आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. जोपर्यंत रामायण आहे, तोपर्यंत उर्मिला सुद्धा अमर राहील. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
 ०२/०८/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...