उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग सहा ( सीता )
आज एक अत्यंत पवित्र आणि भव्यदिव्य चरित्र आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणजे सीतेचे. वाल्मीकींच्या लेखणीतून जी काही सुंदर आणि भव्यदिव्य अशी रामायणातील पात्रे प्रत्यक्षात आपल्यासमोर उतरली, त्यातील अनुपमेय असे हे सीतेचे पात्र. सीता ही अप्रतिम लावण्यवती होती, बुद्धिमान होती, आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श सून आणि पातिव्रतेचा आदर्श असणारी एक भारतीय नारी . इतके सगळे गुण तिच्या ठायी एकवटले होते. चंद्रावर तरी डाग सापडेल, पण सीतेच्या चरित्रामध्ये तिच्या महत्तेला कमीपणा येईल अशी एकही गोष्ट सापडणार नाही. अशी ही गुणांची खाण असलेली सीता वाल्मिकींनी अयोनिज दाखवली आहे. म्हणजे मानवी उदरातून तिचा जन्म झालेला नाही. तिची आई कोण, वडील कोण माहिती नाही. ती भूमिकन्या आहे. मिथिलेचा राजा जनक याला ती शेत नांगरताना प्राप्त झाली आहे. विधात्याने सीतेच्या ठायी अनेक अनुपम गुणांचे चे दान भरभरून बहाल केले आहे, ते सांभाळण्यासाठी तशी पात्रता असणारे मातापिता देखील विधात्याने शोधून ठेवले आहे. अत्यंत पुण्यवान असा मिथिलेचा राजा याला ती प्राप्त झाली आहे. जनक राजा आणि सीतेची आई सुनयना यांनी तिचे मोठ्या लाडाने आणि उत्तम संस्कार करून पालन केले. जनकाची कन्या म्हणून ती जानकी आहे. मिथिलेची राजकुमारी म्हणून ती मैथिली आहे.
जसे सुपात्र असे मातापिता सीतेला मिळावे अशी नियतीची योजना होती, तशीच तिला जगातील सर्वोत्तम पती प्राप्त व्हावा अशीही नियतीची योजना असावी. त्यानुसार श्रीरामाशी तिचा विवाह झाला. सीता स्वयंवर हे एक निमित्त ठरले. स्वयंवराच्या आधी राम आणि सीतेने एकमेकांना पाहिले होते. सीतेने मनोमन रामाला वरले होते. पण अर्थात त्याला जगन्मान्यता मिळणे आवश्यक होते. ती स्वयंवरामुळे मिळाली. ग दि माडगूळकरांनी गीतरामायणात या प्रसंगाचे फार सुंदर वर्णन केले आहे आणि सुधीर फडके यांनी ते शब्द आपल्या गायकीतून अमर केले आहेत. ते म्हणतात
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे, स्वयंवर झाले सीतेचे.
आकाश म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म असलेले श्रीराम आणि धरणीमाता म्हणजेच भूमिकन्या सीता यांचे नाते या विवाहाने जुळले. सीता ही अप्रतिम सौंदर्यवती होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून रावणासहित अनेक राजांनी या स्वयंवराला हजेरी लावली होती. सीता आपल्यालाच प्राप्त व्हावी ही प्रत्येकाच्या मनाची अभिलाषा होती. पण नियतीच्या योजनेनुसार हे सीता नावाचे रत्न राम नावाच्या मुकुटात जाऊन बसले. आणि ते सीताराम झाले. पण प्रत्यक्ष रामाच्या मनाची या प्रसंगी काय स्थिती होती ? मुळात राम त्या ठिकाणी सीतेशी विवाह करण्यासाठी आलेला नव्हता. विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला आपल्यासोबत तेथे घेऊन आले. होते. त्या ठिकाणी शिवधनुष्य रामाने भंग केले आणि स्वयंवरासाठी असलेला पण पूर्ण केला. जिथे सीतेसारखे रत्न आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून भले भले राजे आस लावून बसले होते, तिथे ही सीता रामाची झाली. ' न मागे तयाची रमा होय दासी. ' पण या प्रसंगी सीतेसारख्या सौंदर्यवतील पाहून राम लगेच विचलित झाला नाही. तो म्हणाला, ' या विवाहाला मी वडिलांची संमती घेऊन येतो. त्यांची संमती मिळाली तरच मी सीतेचा स्वीकार करीन.' केवढी हा संयम, मनोनिग्रह आणि आज्ञाधारकपणा..! म्हणूनच राम आणि सीता दोघेही अलौकिक आहेत.
सीतेने सासरी आल्यावर सर्वांची मने जिंकून घेतली. एक नाही तर तिन्ही सासूंचे मन तिने जिंकले आहे. राजमहालातल्या प्रत्येकाला, नगरातल्या सगळ्या नागरिकांना ती अत्यंत प्रिय झाली आहे. म्हणून राम वनात गेल्याचे कौसल्येला तेवढे दुःख होत नाही, जेवढे आपली लाडकी सून सीता गेल्याचे तिला होते. ती सुमंताला म्हणते, ' जिला पायी चालण्याची सवय नाही, अशी माझी सीता वनात कशी चालत असेल ? ' सुमंत तिला सांगतो की राजवाड्यातील वाटिकेत ती जशी मनसोक्त हिंडत, फिरत होती तशीच ती वनातही हिंडत आहे.
जसे रामासोबत लक्ष्मण, भरतासोबत शत्रुघ्न तशीच रामासोबत सीता आहे. ती रामाशिवाय राहू शकत नाही. रामाला वनवास झाल्यानंतर तिने त्याच्यासोबत जाणे आवश्यक नव्हते. ती राजमहालात राहून सुखोपभोग घेऊ शकली असती. शिवाय त्या काळातील वनातली परिस्थिती भयंकर होती. घनदाट अरण्ये, वाघ,सिंहासारखे जंगली प्राणी, राक्षसांची भीती, थंडी, ऊन, वारा, पाऊस ही सगळी संकटे वनवासात गेल्यावर सहन करावी लागणार होती. सीता जेव्हा रामाला म्हणाली की मीही तुमच्यासोबत येणार आहे तेव्हा रामाने जंगलातील या सगळ्या भयानक परिस्थितीची तिला कल्पना दिली. पण तरीही ती विचलित झाली नाही. तिचा निर्धार कायम होता.
काही लोक म्हणतात की सीतेला आयुष्यात सुख मिळालेच नाही. पण हे खरे नाही. वनवासातील रामासोबतचा काळ हा सीतेसाठी सर्वोच्च आनंदाचा काळ होता. कारण एका रामाशिवाय तिला काहीच प्रिय नव्हते. रामासोबतचा वनवास देखील तिला स्वर्गसुखापेक्षा कमी नव्हता. पंचवटीत कुटी बांधून राम, सीता आणि लक्ष्मण राहिले तेव्हाचे त्यांचे दाम्पत्यजीवन अत्यंत विलोभनीय होते, कोणीही हेवा करावा असा होते. पण या सुखी दाम्पत्यजीवनात मिठाचा खडा पडला. राम लक्ष्मणाला भुलवण्यासाठी आलेल्या रावणाची बहीण शूर्पणखा हिला लक्ष्मणाने विद्रुप करून पाठवले. तिचा भयंकर अपमान झाला होता. पण तिने रावणाला सांगताना सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करून सांगितले. सीतेसारखी स्त्री तुलाच पत्नी म्हणून शोभेल असे त्याला सांगितले. रावण हा स्त्रीलंपट होताच. म्हणून मग रावणाचा मामा मारीच याला त्याने आपल्या योजनेत बळजबरी सहभागी करून घेऊन सीता अपहरणाची योजना आखली. साधूचा वेष धारण करून राम आणि लक्ष्मण यांच्या अनुपस्थितीत त्याने सीतेचे अपहरण केले.
अशाही परिस्थितीत सीता विचलित होत नाही. तिचा रामावर पूर्ण विश्वास आहे. रावणाच्या सामर्थ्याला ती भीक घालत नाही. रावण तिला म्हणतो की मी देवांना बंदिवान केले आहे. तुझा राम म्हणजे माझ्यापुढे एक तुच्छ मानव आहे. तेव्हा सीता त्याला म्हणते, ' तू कोल्हा आहेस आणि मी सिंहीण आहे. तू सिंहीणीची अभिलाषा धरतोस हा तुझा मूर्खपणा आहे. देव तुला मारू शकत नाहीस हे तू मला काय सांगतोस ? माझा राम येऊन तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. ' केवढी ही निर्भयता आणि रामाबद्दलचा विश्वास...! रावणाने जेव्हा तिला लंकेत नेऊन अशोक वाटिकेत ठेवले, तेव्हा अनेक भयानक राक्षसिणींचा पहारा तिच्याभोवती होता. रावणाने त्या ठिकाणी येऊन तिला साम, दाम, दंड, भेद इ सगळ्या मार्ग तिला वश करण्यासाठी वापरून पाहिले. पण सीतेचा रामावर अढळ विश्वास आणि प्रेम होते. त्यामुळे रावणाच्या या गोष्टींचा तिच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या सगळ्या परिस्थतीत तिने आपले मनोधैर्य टिकवून ठेवले. तिच्याजागी दुसरी एखादी सामान्य स्त्री असती तर ती कधीच विचलित झाली असती. ती एकतर रावणाला वश तरी झाली असती किंवा तिने प्राणत्याग तरी केला असता.
सीतेच्या सुटकेत हनुमानाची भूमिका फार महत्वाची आहे. हनुमानाने लंकेत आधी जाऊन सीतेचा ठावठिकाणा शोधून काढला आणि तिला धीर दिला. रामाची मुद्रिका ( अंगठी ) दिली. एवढेच नाही तर मी आताच तुला माझ्या खांद्यावर बसवून रामाकडे घेऊन जातो असे सांगितले. पण सीतेला रामाशिवाय कोणाचाही स्पर्श आपल्या शरीराला नको होता. रावणाने तिला बळजबरीने नेले तेव्हा ती विवश होती. म्हणून ती म्हणते , ' श्रीराम येतील आणि पापी रावणाला मारून मला त्यांच्यासोबत घेऊन जातील. तेच योग्य होईल. ' एवढी रामावर अविचल निष्ठा सीतेची आहे.
पण तरीही अशी अविचल निष्ठा असणाऱ्या सीतेला आपल्या पावित्र्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. पुढेही रामाच्या राज्याभिषेकानंतर जेव्हा प्रजाजन सीतेच्या पावित्र्याबद्दल शंका उपस्थित करू लागतात, तेव्हा सीता गर्भवती असताना तिला लक्ष्मण रामाच्या आज्ञेवरून वाल्मिक ऋषींच्या आश्रमात सोडून येतो. सीतेसाठी रामाचा वियोग अत्यंत दुःखद आहे. पण ती हे जाणून होती की रामाने राजा म्हणून त्याचे कर्तव्यपालन केले आहे. त्याने आपल्याला पत्नी म्हणून पाठवले नाही तर राणी म्हणून त्याग केला आहे. इकडे रामाला सुद्धा वियोग सहन होणारा नव्हताच. तोही त्या काळात जमिनीवर झोपत होता. विरक्त वृत्तीने राहत होता. वाल्मीकींच्या आश्रमात सीता लव कुशांना जन्म देते. ते तेथेच काही काळ वाढतात. वाल्मिक ऋषी त्यांना सर्व विद्या देऊन सामर्थ्यशाली करतात.
लवकुश जेव्हा रामालाच रामायण ऐकवतात, तेव्हा त्याला ही आपली मुले आहेत हा साक्षात्कार होतो. अशा वेळी वाल्मिक ऋषी सीतेला घेऊन येतात. सीता निष्कलंक आहे. तिचा स्वीकार कर म्हणून सांगतात. यावेळी वसिष्ठ ऋषी रामाला म्हणतात, ' मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही. सीता पवित्र आहे, शुद्ध आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. हे जर खरे नसेल तर माझ्या आतापर्यंत केलेल्या पुण्याचे फळ मला मिळणार नाही. ' रामालाही सीता शुद्ध आहे, पवित्र आहे याची खात्री असते. पण प्रजाजनांच्या समाधानासाठी आणि आपल्या कुळाच्या प्रतिष्ठेसाठी तिने पुन्हा तिची निष्कलंकता सिद्ध करावी असे त्याला वाटते. या वेळी सीतेवर जणू आकाशच कोसळते. तिच्यासारख्या पतिव्रता स्त्रीवर त्या काळच्या समाजाने केलेला हा अन्यायच होता. म्हणून ती भूमीची प्रार्थना करते. ती म्हणते, ' मी काया, वाचा, मने फक्त श्रीरामावरच प्रेम केले आहे. मी पवित्र आणि शुद्ध असेल तर हे धरणीमाते, मला आपल्या पोटात घे. ' या वेळी धरणी दुभंगून एक दिव्य सिंहासन घेऊन पृथ्वीमाता प्रकट होते आणि सीतेला आपल्यासोबत घेऊन जाते. सीतेचा जन्म जसा अयोनिज आणि अलौकिक आहे, तसाच तिचा अंतही दिव्य आणि अलौकिक आहे.
सीतेच्या भूमी प्रवेशानंतर मर्यादापुरुषोत्तम असलेल्या रामावर सीतेच्या शोकाने जणू आभाळ कोसळले . त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. सीतेचा वियोग सहन करणे त्याच्या शक्तीपलीकडचे होते. असे हे सीतेचे जीवन आणि त्याग, सर्वस्वाचे बलिदान सगळेच अलौकिक आणि दिव्य. जोपर्यंत या पृथ्वीवर रामायण आहे, तोपर्यंत सीताही आहे. ती प्रातःस्मरणीय आहे. पंचपातिव्रतातील ती एक आहे. या मातेला वंदन...!
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा