उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग पाच ( भरत -शत्रुघ्न )
मागच्या लेखात लक्ष्मणाचे भव्यदिव्य आणि उदात्त चरित्र आपण पाहिले. आजच्या या लेखात मी आपल्याला भरत आणि शत्रुघ्न यांचा थोडा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. रामायणात जशी राम आणि लक्ष्मण ही भावांची एक जोडी आहे, तशीच दुसरी जोडी भरत आणि शत्रुघ्न यांची आहे. जसा रामासोबत नेहमीच प्रत्येक प्रसंगात लक्ष्मण असायचा, तसाच भरतासबोत शत्रुघ्न. रामाला वनवासात पाठवायच्या वेळी भरताबरोबर शत्रुघ्न सुद्धा आजोळी गेला होता. ते दोघे नंतर बरोबरच परत आले. जसे लक्ष्मणाचे रामावर निरतिशय प्रेम होते, तसेच भरताचे सुद्धा रामावर होते. रामाचेही तेवढेच प्रेम या सगळ्या भावंडांवर होते. त्यामुळे या बाबतीतही कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे सांगता येणे कठीण आहे. सगळेच महान. सगळेच त्याग आणि चारित्र्याची मूर्ती. असे भाऊ फक्त रामायणातच आपल्याला आढळतील. शत्रुघ्नही अत्यंत शूर आणि बुद्धिमान होता. त्याने लवणासुराचा पराभव करून आपल्या सामर्थ्याचे दर्शन रामायणात घडवले आहे.
भरताची आई कैकेयी हीने भरतासाठी दशरथाकडून राज्य मागून घेतले खरे, पण तिने भरताचा यासंबंधी कधी विचार घेतला नाही. आणि झालेही तसेच. भरताला राज्यमोह नव्हता. त्याचे निस्सीम प्रेम रामावर होते. जेव्हा त्याला कळते की रामाला वनवासात पाठवण्यासाठी आपली आईच जबाबदार आहे, तेव्हा तो तिला मारायला धावतो. तिला नको नको ते टाकून बोलतो. त्याच्यासोबत असलेला शत्रुघ्न सुद्धा या पाठीमागे मंथरेचा कावा आहे असे समजल्यावर मंथरेला मारायला धावतो. इतके या दोघांचे रामावर प्रेम आहे. भरताला राज्य नको असताना ते मिळाले, आणि रामाला त्याचा काही दोष नसताना वनवासात जावे लागले. परंतु या घटनेमुळे लोकांच्या मनात भरताविषयी संभ्रम निर्माण झाला. त्यालाच सगळे दोषी ठरवू लागले.
भरताला पूर्णपणे ओळखणाऱ्या दोनच व्यक्ती होत्या. एक म्हणजे राम आणि दुसरे वसिष्ठ. जेव्हा कैकेयी दशरथाकडून वर मागून घेऊन भरताला राज्य द्यायचे ठरवते, तेव्हा वसिष्ठ तिला सांगतात, ' तू ज्या भरतासाठी हे राज्य मागून घेते आहेस, त्याला हे आवडणार नाही. तो हे स्वीकारणार नाही. ' आणि झालेही तसेच. वसिष्ठांना भरताचे व्यक्तिमत्व पूर्णपणे आकलन झाले होते, म्हणूनच ते असे म्हणू शकले. राम जेव्हा वनवासात जायला निघाला, तेव्हा अयोध्येचे सगळे नागरिक शोकाकुल होऊन रामाला विचारू लागले की रामा तुझ्यानंतर हे राज्य चालवेल असा कोण आहे ? तेव्हा राम त्या सगळ्यांना सांगतो, ' भरत आहे. तो माझ्याइतकाच समर्थ आहे. तो उत्तम प्रकारे राज्यकारभार करील. ' एवढी खात्री भरताबद्दल रामाला होती.
भरत अयोध्येस परत आल्यावर त्याला जेव्हा हे कळते की आपल्या आईमुळे रामाला वनवासात जावे लागले आहे, तेव्हा तो राज्य करण्यास नकार देतो. मंत्रिगण आणि ऋषिगण त्याला सांगतात की असे केल्यास अराजक माजेल. पण तो म्हणतो की मी रामाला परत आणतो. रामाला परत आणण्यासाठी तो वनात जातो. भरताबद्दल सगळ्याच लोकांचा कसा गैरसमज झाला होता बघा. कौसल्यासुद्धा त्याला म्हणते की राम वनवासात गेल्यामुळे राज्य निष्कंटक झाले आहे. आता तू राज्याचा उपभोग घे. दशरथ सुद्धा आपल्या या पुत्राला ओळखू शकत नाही. तो म्हणतो की भरत जर गादीवर बसला तर त्याला माझे श्राद्ध करायला सांगू नका. तो अरण्यात जेव्हा रामाला घ्यायला जातो, तेव्हा त्याला गुह भेटतो. त्याला देखील असेच वाटते की हा रामाला मारायलाच आलेला आहे. नंतर लक्ष्मणाला सुद्धा तसेच वाटते. फक्त रामाला त्याच्याबद्दल खात्री आहे. लक्ष्मण रामाला म्हणतो की हा तुम्हाला मारण्यासाठी आला आहे. मला त्याच्याशी युद्ध करण्याची परवानगी द्या. तेव्हा राम सांगतो की तो मला भेटायला, परत न्यायलाच आला असेल. त्याला राज्याची कामना नाही. मी हवे तर तुला राज्य देववितो. तेव्हा लक्ष्मणाचा संशय दूर होतो.
राज्यलोभापायी भावांमधील होणारी भांडणे इतिहासात पुष्कळ आढळतील. पण मला राज्य नको, तू घे असे सांगणारे उदात्त चारित्र्याचे बंधू फक्त रामायणातच आढळतील. म्हणून रामायण ही सोन्याची खाण आहे. जेवढे सोने लुटावे तेवढे कमीच आहे. विशेष म्हणजे हा खजिना कधीच रिता होत नाही. महाभारतात कौरव पांडव हे एकमेकांचे बंधू आहेत. पण धृतराष्ट्राच्या पुत्रलोभापायी आणि दुर्योधनाच्या राज्यलोभापायी महाभारताचे युद्ध होते. दुर्योधन पांडवांना त्यांच्या वाट्याचे राज्यच काय पण पाच गावेही द्यायला तयार होत नाही. मी पांडवांना सुईच्या अग्राइतकी सुद्धा जागा देणार नाही असे तो म्हणतो. एवढेच नाही तर लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्यापर्यंत त्याची आणि शकुनीची मजल जाते. द्यूतक्रीडा आणि द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग तर पाहवत नाही. त्या पार्श्वभूमीवर भरत आणि राम यांचा एकमेकांसाठीचा त्याग केवढा उज्ज्वल, भव्य आणि उदात्त आहे. रामायणकाळातच इतर भावांची उदाहरणे पहा. लंकेचा राजा रावण आणि त्याचे भाऊ यांच्यात पटत नव्हते. किष्किंधा राज्यात वाली आणि सुग्रीव या भावांमध्ये तर वैरच होते. या पार्श्वभूमीवर राम, लक्ष्मण आणि भरत -शत्रुघ्न यांच्यातील बंधुप्रेम केवळ अनुपमेयच..!
रामाला भेटण्यासाठी वनात गेलेला भरत हरप्रकारे श्रीरामाला विनंती करून परत अयोध्येस येण्यास सांगतो. परंतु राम त्याला एकदा पित्याला आपण जे वचन दिले ते मोडणार नाही, मी चौदा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येस परत येईन हे निक्षून सांगतो. तो भरताच्या कोणत्याही युक्तिवादाला बळी पडत नाही. भरत खूप शोक करतो. या प्रसंगाचे गीतरामायणात मोठे सुंदर वर्णन ग दि माडगूळकरांनी केले आहे. आणि सुधीर फडके यांनी हे गीत ज्या प्रकारे गायिले आहे, त्याला तोड नाही. ते गीत तुम्हा आम्हा सगळ्यांच्या परिचयाचे आणि सगळ्यांना प्रिय असलेले आहे. ' दैवजात दुःखे भरता , दोष ना कुणाचा , पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ' हे ते गीत. हे गीत ऐकताना नकळत आपले डोळे पाणावतात. जीवनाचे तत्त्वज्ञानच जणू या गाण्यातून सांगितले आहे. या गाण्यातली प्रत्येक ओळ एखादया सुभाषितासमान आहे. धन्य ते गदिमा आणि बाबूजी आणि त्याहून धन्य राम आणि भरताचे बंधुप्रेम...!
भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येस परततो आणि त्या राज्यसिंहासनावर ठेवून राज्यकारभार करतो. भरत म्हणजे त्याग, सेवा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचे मूर्तिमंत प्रतीक. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात राहतात, खाली जमिनीवर झोपतात आणि कंदमुळे भक्षण करतात म्हणून तो सुद्धा राजवाड्याचा त्याग करतो. अयोध्येजवळ नंदिग्रामी एक झोपडी बांधून तेथे राहतो. जमिनीवर झोपतो, कंदमुळे खाऊन राहतो. तेथूनच राज्यकारभार पाहतो. केवढा हा त्याग..! केवढे हे वैराग्य..! असा भरतासारखा भाऊ मिळणे ही दैवदुर्लभ गोष्ट. भरताच्या चारित्र्यावर जो कैकेयीमुळे का होईना पण कलंक लागला होता, तो त्याने या आपल्या उज्ज्वल त्यागाने धुवून काढला आहे. लक्ष्मण सदैव रामजवळ होता, भरताला रामाचा वियोग सहन करावा लागला, पण भरत मनाने कायम रामजवळच होता. राममय झाला होता.
रामाने जेव्हा रावणाचा वध केला आणि तो अयोध्येस परत जायला निघाला, तेव्हा बिभीषण त्याला म्हणतो की प्रभू, एवढी घाई का करता ? लंकेत दोनचार दिवस थांबून पाहुणचार घ्या आणि मग जा. तेव्हा राम त्याला सांगतो की मला जायलाच हवे कारण भरत माझी वाट पाहत असेल. चौदा वर्षे पूर्ण झाल्यानंतर परत येण्याचे मी त्याला वचन दिले आहे. मी नाही गेलो तर तो प्राणत्याग करील. म्हणून राम परत निघतात. या चौदा वर्षातही भरताच्या मनात सत्तेबद्दल प्रेम उत्पन्न झालेले नसते. आताच्या राजकीय परिस्थितीबद्दल आणि सत्तामोहाबद्दल न बोललेले बरे. सुज्ञ वाचकांना सांगण्याची आवश्यकता नाही.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा