उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग तीन ( गुरु शिष्य संबंध )
रामकथा भाग एक मध्ये रामायणाचे महत्व आपण पहिले. भाग दोन मध्ये श्रीरामांच्या माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी, राजा दशरथ, लक्ष्मण आणि सीता यांच्यातील मनोज्ञ नात्यांची गुंफण आपण पाहिली. मला याची जाणीव आहे की भाग एक आणि भाग दोन मध्ये मी जे काही आपल्याला श्रीराम आणि त्यांच्या माता , बंधू, पिता आणि पत्नी यांच्याबद्दल बोललो, ते अत्यंत त्रोटक आहे. पण माझा उद्देश या नात्यांचे विविध पदर उलगडणे आणि त्या पात्रांचे स्वभाव आणि गुणदर्शन घडवणे आणि त्या अनुषंगाने श्रीरामाचे गुण वर्णन करणे असा आहे. श्रीरामांचे आपल्या आईशी वागणे, वडिलांशी वागणे, आपल्या बंधू आणि गुरूंशी वागणे हे अत्यंत अनुकरणीय आहे. खास करून आजच्या पिढीला आवर्जून बघावी, वाचावी अशी ही रामकथा आहे.
रामायणात श्रीरामाचा वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याशी गुरु म्हणून संबंध येतो. श्रीरामाचे त्यांच्याशी आणि त्यांचे गुरु म्हणून श्रीराम लक्ष्मण आणि आपल्या शिष्यांशी वागणे अत्यंत आदर्शवत आहे. हे दोन्ही गुरु अतिशय तेजस्वी आहेत. गुरु कसा असावा याचा आदर्श या दोघा व्यक्तिरेखांकडे पाहता येते. ' बोले तैसा चाले ' अशा प्रकारचे हे दोघे गुरु आहेत. आपल्या शिष्यांना ते नुसता कोरडा उपदेश करत नाहीत. शिष्याचे आपल्या गुरूंशी वागणे कसे असावे हे ही आपल्याला राम लक्ष्मणांकडून शिकायला मिळते. पुढे लवकुश यांनासुद्धा वाल्मिकींसारखे समर्थ गुरु मिळाले. वाल्मिकी ऋषींनी तर लवकुशांना सर्व विद्यांमध्ये पारंगत केले. रामाने पुढे जेव्हा अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा त्या अश्वमेधाचा अश्व अडवून भरत, लक्ष्मण यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य या छोट्या सुकुमारांमध्ये होते. राम लक्ष्मण यांनी तरुण असतानाच ज्याप्रमाणे त्राटिका आणि इतर राक्षसांना मारले, त्यांची आठवण या प्रसंगी होते.
श्रीरामाचे गुरु वसिष्ठ ऋषी. त्यांच्या तालमीत राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे धनुर्विद्या, युद्धकला आणि वेदादी गोष्टीत पारंगत झाले. वास्तविक श्रीरामाला आपण विष्णूचा अवतात मानतो. सर्व ज्ञान ज्यांना उपजतच आहे, चारी वेद ज्यांचा श्वास आहे असे हे श्रीराम एखाद्या सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे गुरुगृही राहून गुरूंकडून शिक्षण घेत होते. गुरूंची सेवा करीत होते. ज्यावेळी त्यांचे शिक्षण पूर्ण होते, त्यावेळी वसिष्ठानी फार सुदर उपदेश श्रीराम आणि इतर स्नातकांना केला आहे. गुरु कसा असावा हे त्याच्यावरून आपल्याला कळते. ते म्हणतात, '" आज तुमचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षात ठेवा ' सा विद्या या विमुक्तये ' अर्थात जे मुक्त करते ते ज्ञान. म्हणून मी तुम्हाला आजपासून माझ्या सर्व आज्ञातुन मुक्त करीत आहे. एखादी गोष्ट मी सांगितली म्हणून प्रमाण मानू नका. आपले ज्ञान, विचार, विवेक यांच्या साहाय्याने निर्णय घ्या. ' आत्मदीपो भव. स्वयंप्रकाशित व्हा. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीन ऋण फेडावे लागतात. देवऋण, पितृऋण आणि आचार्यऋण. परमेश्वराची भक्ती केल्याने आणि सर्वाभूती ईश्वर पाहिल्याने देवऋण फेडता येते. आपले सुख त्यागून मात्यापित्यांची आज्ञा पाळणे आणि त्यांना सुख देणे यामुळे पितृऋण फिटते आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करणे, मानवधर्माचा आदर्श प्रस्थापित करणे यामुळे आचार्यऋण फेडता येते. "
आजच्या काळात सुद्धा वसिष्ठानी केलेला हा उपदेश गुरु आणि शिष्य दोघांना मार्गदर्शक आहे. राम आणि लक्ष्मण वसिष्ठांच्या आश्रमातून घरी जाण्यासाठी जेव्हा निघतात, तेव्हा श्रीराम आपल्या गुरुमातेला म्हणतात, " माते, या आश्रमात तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिले. आईची आठवण येऊ दिली नाही. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. " किती हा नम्रपणा...! धन्य ती प्रेमळ गुरुमाता आणि धन्य ते शिष्य. जणू समसमा संयोग जाहला. म्हणून रामायण आमच्या मुलांना शिकवणे, सांगणे आवश्यक आहे.
पुढे जेव्हा विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे येतात आणि यज्ञांमध्ये राक्षस त्रास देतात म्हणून यज्ञाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाला आपल्यासोबत पाठवावे अशी विनंती करतात, तेव्हा काही काळ दशरथ राजा पुत्रमोहाने विचलित होतो. सुकुमार असलेला राम राक्षसांशी लढू शकेल का असा प्रश्न त्याला पडतो. पण अशा वेळी वसिष्ठ ऋषी दशरथ राजाची समजूत घालतात आणि राम आणि लक्ष्मण दोघेही विश्वामित्रांसोबत जातात.
मार्गक्रमण करत असताना विश्वामित्र ऋषी आणि श्रीरामात जे काही संभाषण होते, त्यातून रामाची सेवावृत्ती, गुरुजनांबद्दल असणारा आदर आणि नम्रता प्रकट होते. वास्तविक राम हा राजपुत्र आहे. अयोध्येचा भावी राजा आहे. पण या सगळ्या गोष्टींचा त्याला यत्किंचितही अहंकार नाही. त्याचे नम्र बोलणे ऋषींचे मन जिंकून घेते. तो फक्त त्यांच्याशी नम्रतेने बोलतो असे नाही, तर त्यांची सेवाही करतो. गुरूंची चरणसेवा करणे, ते झोपल्यानंतर झोपणे आणि सकाळी ते उठण्यापूर्वी उठणे या गोष्टी एक शिष्य म्हणून करण्यात तो कुठेही कमी पडत नाही. रामाने त्राटिकेचा वध केल्यानंतर विश्वामित्र ऋषी त्याच्या शौर्याची स्तुती करतात, तेव्हा हे सगळे आपल्याच आशीर्वादाचे फळ आहे, ही सगळी आपली कृपा आहे. आपण सेवेची संधी दिल्यामुळेच हे शक्य झाले असे विनम्र उद्गार रामाच्या मुखातून बाहेर पडतात. तेव्हा विश्वामित्र प्रसन्न होऊन आपल्याकडील अनेक दिव्य अस्त्रे प्रदान करतात आणि रामाला या निमित्ताने गुरूपदेशही करतात. यज्ञाच्या वेळी त्रास देणाऱ्या मारीच, सुबाहू आदी राक्षसांचा राम नाश करतो आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडतो. तेव्हा विश्वामित्र आणि इतर सर्व ऋषिगण प्रसन्न होऊन रामलक्ष्मणाची स्तुती करतात.
पुढेही रामायणात ज्या ज्या वेळी प्रसंग पडेल, त्या त्या वेळी श्रीरामाने वसिष्ठांचा सल्ला घेतला आहे. दशरथ राजाला देखील वसिष्ठांचा सल्ला नेहमीच स्वीकारार्ह असायचा. राजसत्ता आणि गुरुसत्ता या त्यावेळी हातात हात घालून चालत होत्या. किंबहुना गुरुजनांचा आदर्श राजाला देखील शिरोधैर्य असायचा. पुढेही वनवासात असताना श्रीरामाने ज्या ज्या ऋषींची गाठ पडली, त्यांना त्यांना मान देऊन त्यांचा सल्ला शिरोधार्य मानला आहे. जेव्हा राजसत्ता गुरुजनांचा आदर करते, तेव्हा समाजात आपोआपच त्यांना मानाचे स्थान प्राप्त होते. जेव्हा राजसत्ता गुरुसत्तेला दुय्यम लेखून त्यांचा अनादर करते, तेव्हा महाभारत घडते. त्यावेळी द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारखे गुरुही आपले स्वत्व, स्वाभिमान विसरून राजसत्तेच्या आश्रयाने राहताना दिसतात. त्यांच्या मताला फारशी किंमत नसते. म्हणूनच आपण जेव्हा रामराज्याबद्दल बोलतो, तेव्हा या सगळ्या आदर्श गोष्टी आपण गृहीत धरून चालतो.
( भाग चार शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा